अर्थव्यवस्था खिळखिळी करणारा मुद्रांक गैरव्यवहार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

पहिल्यांदा 12 पोलिस आणि दोन आमदारांपर्यंत असलेले हे जाळे तेलगीने देशभर पसरविले. तेलगीला अटक झाली तेव्हा त्याने आपल्या या कारनाम्यात कोणकोण आहेत, त्याचे सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचे म्हटले होते. यासाठी त्याने 1,200 कॉल रेकॉर्डस्‌ एकत्रित करून ठेवल्याचे स्पष्ट केले होते.

र्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील खानापूरसारख्या जंगल प्रदेशात आधी रेल्वे स्थानकावर फळे विकणारा तरुण पुढे पदवीधर होतो. बनावट पासपोर्टप्रकरणी राजस्थानमधील कारागृहात जातो. कारागृहात एकजण भेटल्यानंतर त्याच्या डोक्‍यात बनावट मुद्रांकाची कल्पना वेग घेते आणि अवघ्या आठदहा वर्षांत देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी होईल, असा तब्बल 20 हजार कोटींचा बनावट मुद्रांक गैरव्यवहार करतो. जन्मभूमी कर्नाटक, तर कर्मभूमी महाराष्ट्र बनविलेल्या अब्दुल करीम लाडसाब तेलगीने 12 राज्यांमध्ये मुद्रांक गैरव्यवहार करत देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी बनविली होती.

जैसवाल अहवाल
पोलिस खाते व सरकारच्या विविध संस्थांचा तेलगीला मोठा पाठिंबा होता. तेलगीने गैरव्यवहार इतका पद्धतशीरपणे केला होता, की कोणीही त्याला पकडू शकत नव्हते. गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर सुरवातीला विशेष तपास पथकाने एक अहवाल केला होता, तो जैसवाल अहवाल म्हणून ओळखला जात होता. या अहवालानुसार सर्व ती विचारणा नोव्हेंबर 2002 मध्ये झाली होती. परंतु, तेलगी आणि त्याच्या साखळीवर कोणतीच कारवाई झाली नाही. राष्ट्रीय पातळीवर पोचलेल्या या बनावट मुद्रांक प्रकरणाचा तपास सीआयडी, सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी होऊनही त्याकडे दुर्लक्ष झाले. परंतु, सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी याचा सखोल तपास करण्याची विनंती न्यायालयाला करत जनहित याचिका दाखल केली तेव्हा कुठे या प्रकरणाचा तपास गतीने सुरू झाला. जैसवाल अहवालामध्ये नाशिकच्या इंडिया सिक्‍युरिटी प्रेसकडून काही तांत्रिक माहिती मुद्रांकासाठी पुरविल्याचा स्पष्टपणे उल्लेख होता. परंतु, महाराष्ट्राच्या कोशागार विभागाने याकडे काणाडोळा केला आणि गैरव्यवहार उघडकीस आला तेव्हा तो महाराक्षस बनला होता.

राजकीय नेत्यांचाही सहभाग?
तेलगीने केलेला गैरव्यवहार 20 हजार कोटींहून अधिक रकमेचा असल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. यात तेलगी एकटाच नव्हता, तर त्याने कॉन्स्टेबलपासून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यापर्यंत आणि नगरसेवक, आमदारापासून मंत्र्यांपर्यंत सर्वांना सामावून घेतले होते. तेलगी काय करतो आहे, यापेक्षा आपल्याला मोठे घबाड मिळते आहे, याचाच विचार प्रत्येकाने केला आणि तेलगीला रान मोकळे झाले. पहिल्यांदा 12 पोलिस आणि दोन आमदारांपर्यंत असलेले हे जाळे तेलगीने देशभर पसरविले. तेलगीला अटक झाली तेव्हा त्याने आपल्या या कारनाम्यात कोणकोण आहेत, त्याचे सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचे म्हटले होते. यासाठी त्याने 1,200 कॉल रेकॉर्डस्‌ एकत्रित करून ठेवल्याचे स्पष्ट केले होते. त्यात कर्नाटकातील वरिष्ठ पोलिस अधिकारी, आयपीएस, आयएएस अधिकारी, आमदार, मंत्री असे सर्वांचे धाबे दणाणले होते. त्यामुळे तेलगीला अटक झाल्यानंतर तो बाहेर येऊ नये, यासाठीच अनेकांकडून प्रयत्न सुरू होते.

सर्वच अधिकारी मालामाल
तेलगीचा बनावट मुद्रांक गैरव्यवहार उघडकीस आला तेव्हा "एसआयटी'ने अनेक पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी केली होती. त्या वेळी एकेक धक्कादायक प्रकार समोर आला होता. ज्या कामत नामक पोलिस कॉन्स्टेबलला महिना नऊ हजार रुपये पगार होता, त्याच्याकडे 100 कोटींची मालमत्ता आढळून आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला दरमहा 14 हजार 500 रुपये पगार होता; परंतु त्याच्याकडे 50 कोटी, 24 हजार पगार असणाऱ्या सह पोलिस आयुक्ताकडे 25 कोटींची मालमत्ता व रोकड आढळून आली होती. एकंदरित काय, तर सुमारे 400 एजंट देशभर नियुक्त करून त्यांच्यामार्फत तेलगी पाण्यासारखा पैसा मिळवत होता. त्यामुळे तो या अधिकाऱ्यांवरही कोट्यवधी रुपयांची रक्कम अगदी सहजरीत्या उधळत होता.

काय आहे गैरव्यवहार?

  • 12 राज्यांमध्ये 20 हजार कोटींहून अधिक रकमेचा बनावट मुद्रांक गैरव्यवहार
  • अनेक पोलिस अधिकारी, वरिष्ठ सरकारी अधिकारी व राजकारणी रातोरात कोट्यधीश
  • 17 जानेवारी 2006 रोजी तेलगी व अन्य सहकाऱ्यांना 30 वर्षांचा सश्रम तुरुंगवास
  • 28 जून 2007 रोजी एका स्वतंत्र गुन्ह्यांतर्गत 13 वर्षांचा सश्रम तुरुंगवास
  • तेलगीच्या मालमत्तेवर एक हजार कोटींचा दंड ठोठावत सर्व मालमत्ता जप्तीचे आदेश
  • 1992 ते 2002 या काळात त्याच्याविरोधात पहिल्या टप्प्यात देशभरात 27 गुन्हे दाखल झाले. यापैकी 12 गुन्हे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेले आहेत. विविध राज्यांत एकूण 39 ठिकाणी गुन्हे दाखल

तेलगीच्या गैरव्यवहारावरील चित्रपट डब्यात
मुद्रांक (दी स्टॅंप) नावाच्या चित्रपटाची घोषणा होऊन 2008 मध्ये या चित्रपटाचे चित्रीकरणही पूर्ण झाले. परंतु, तो प्रदर्शित होण्यापूर्वीच तेलगीने हा चित्रपट आपल्या कायदेशीर लढाईला बाधा आणत असल्याचे सांगत त्यावर बंदी घालण्याची मागणी न्यायालयाकडे केली. कारण, या चित्रपटात तेलगीने केलेला संपूर्ण गैरव्यवहार चित्रित करण्यात आला आहे. परंतु, न्यायालयाने बंदी घातल्यामुळे तो चित्रपट आजतागायत प्रदर्शित झालेला नाही.

Web Title: marathi news abdul karim telgi stamp paper scam