स्त्री-आरोग्या तुझी कहाणी..

डॉ. प्रिया रमेश इंगळे
गुरुवार, 8 मार्च 2018

चाकरमानी स्त्री आणि तळपत्या उन्हात शेतात राबणारी शेतमजूर स्त्री या दोघीही आपापली लढाई लढतच असतात, या संघर्षाचे परिणाम त्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर होतात यात शंकाच नाही.

स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून ज्या चळवळी पुढे आल्या त्यांच्या सन्मानार्थ 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा होतो, मतदानाचा किंवा शिक्षणाचाच काय कुठलाही हक्क मिळवताना स्त्रियांना लढाई लढावी लागते. आजही मुंबईच्या लोकलमधून तुडूंब गर्दीतून प्रवास करणारी चाकरमानी स्त्री आणि तळपत्या उन्हात शेतात राबणारी शेतमजूर स्त्री या दोघीही आपापली लढाई लढतच असतात, या संघर्षाचे परिणाम त्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर होतात यात शंकाच नाही.

स्त्री-आरोग्याचा विचार करता कुठल्याही स्त्रीच्या आयुष्यात तिची पहिली मासिक पाळी हा एक वेगळाच अनुभव असतो. आरोग्यशास्त्रात याला ऋतूदर्शन किंवा menarche म्हणतात. सहसा वयाच्या 11 ते 13व्या वर्षी मुलीची पहिली मासिक पाळी येते. आपल्या समाजात या एका नैसर्गिक घटनेला एका टॅबुच्या स्वरूपात पाहिलं जात असल्याने आधीच गोंधळलेल्या त्या मुलीच्या मनात स्वतःविषयी आणि स्वतःच्या शरीराविषयीच घृणा निर्माण होते. त्यात त्या मुलीला जर मासिक पाळीत वेदना (Dysmenorrhea) होत असतील तर या मानसिक त्रासात अजूनच वाढ होते. अगदी बडीशोपेचा फांट (कुटून बारीक केलेली बडीशेप रात्रभर साध्या पाण्यात ठेवून सकाळी ते पाणी पिणे) किंवा एक कोमट पाण्याची बाटली पोटाजवळ ठेवणे यासारखे सोपे उपाय या वेदनांच्या त्रासावर करता येतात. मासिक पाळीच्या काळात घ्यायची काळजी व तेव्हाचा हायजीन या गोष्टींचेही प्रशिक्षण याच वयात व्हायला हवे.

मासिक पाळीत रक्तस्त्राव जर जास्त होत असेल तर अॅनिमियाचा धोका वाढतो, पण मासिक पाळी नॉर्मल असणार्या स्त्रियांमध्येही अॅनिमियाचे प्रमाण वाढतेच आहे. एका सर्व्हे नुसार देशातील 18-49 वयोगटातील 52% स्त्रिया ह्या अॅनिमिक आढळल्या आहेत. नोकरी करणाऱ्या स्त्रियांप्रमाणेच गृहिणीवर्गातही अॅनिमियाचे कित्येक रुग्ण आहेत. स्वतःच्या जेवणाची पर्वा न करता फक्त स्वतःच्या कुटुंबासाठी राबराब राबणारी गृहिणी कुटुंबात सर्वात शेवटी जेवते तेव्हा तिची भूक मरून जात असेल का याचा विचार कुणीच करत नाही, आणि आपण स्त्रियाही या हाल-अपेष्टांना कौटुंबिक प्रेमाच्या, जबाबदारीच्या नावाखाली मुकाट्याने सहन करत असतो. आताच्या काळात मात्र घर आणि नोकरी/व्यवसाय या दोन्हीचा समतोल साधताना स्त्रीच्या आरोग्याची जी हेळसांड होते तिच्यावर विशेष लक्ष देणे गरजेचे झाले आहे. धावपळीची नोकरी किंवा रोजमजुरी करणाऱ्या स्त्रीचं तिच्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होतं शिवाय खाण्याच्या वेळाही निट पाळल्या जात नाहीत किंवा शिळे अन्न खाल्ल्या जाते, वेळा निट न पाळल्याने आम्लपित्ताचा त्रास होतो शिवाय कमी आहारामुळे अशक्तता, रक्ताल्पता (anemia) यांचाही धोका वाढतो. आहारात पोषणमुल्ये आणि कॅलरिज यांचा जर योग्य अंतर्भाव नसेल तर अगदी एखाद्या मोठ्या कंपनीतली पाच आकडी पगार घेणारी उच्चपदस्थ स्त्रीही अनेमिक आणि अशक्त असू शकते (आणि अशा केसेस सुद्धा आहेत) कुपोषण हे फक्त सामाजिक-आर्थिक दृष्ट्या गरीब स्त्रियांमध्येच आढळते असंच काही नाही, सर्व परिस्थिती चांगली असून काही जणी वेगवेगळ्या अशास्त्रीय डायटच्या वेडात किंवा कामाच्या आत्यंतिक ताणात आपले बहुमुल्य आरोग्य गमावून बसतात. गुळ, शेंगदाणे, खजूर, बीट, नाचणी शतावरी कल्प यासारख्या साध्या साध्या घटकांचा जर आहारात समावेश केला आणि जेवणाच्या वेळा आणि प्रमाण योग्य राखले तर या संकटांपासून स्त्रियांची सहज सुटका होऊ शकते.

भारतात गर्भवती स्त्रियांच्या मृत्यूचे एक आव्हान हे सतत डॉक्टर मंडळींच्या समोर उभे असते, देशातल्या दर एक लाख गर्भवती स्त्रियांमागे 212 स्त्रिया या बाळाला जन्म देताना मृत्यू पावतात. यातले कित्येक मृत्यू हे लोह आणि फोलिक अॅसिडच्या गोळ्या (ज्या सरकारद्वारे मोफत मिळतात) न घेण्याने किंवा दुध, पालेभाज्या, फळे असा आहार न घेतल्याने होतात. गर्भारपण हे जितके आनंदाचे तितकेच स्त्रीच्या आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचेही असते, स्त्रीच्या शरीरात या काळात बदल घडतात तसेच मानसिक स्थितीही वेगाने बदलत असते तेव्हा ध्यान किंवा प्राणायाम यांचा चांगलाच उपयोग या काळात करून घेता येईल. आयुर्वेदाच्या मतानुसार गर्भिणी स्त्रीने ताजे सकस अन्न घ्यावे व स्वतःची मानसिक स्थिती प्रफुल्लीत ठेवावी असे सांगितले आहे.

स्त्री आरोग्याचा अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणजे रजोनिवृत्ती. आरोग्यशास्त्रानुसार अंदाजे वयाच्या 45 ते 55व्या वर्षी रजोनिवृत्ती येते. याच काळात हार्मोनल बदलांमुळे स्त्रीचा स्वभाव चिडचिडा झालेला असतो, या काळात कुटुंबीयांनी विशेषतः नवऱ्याने स्त्रिच्या भावना समजून घेत तिला आधार देणे गरजेचे असते. याच काळात स्त्रीच्या हाडांमधून कॅल्शियम कमी व्हायलाही सुरुवात होते, त्यामुळे फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते. रजोनिवृत्तीच्या काळात खरंतर प्रतिबंधात्मक तपासण्यावर भर द्यायला हवा. पंचेचाळीशी नंतर दर दोन किंवा तीन वर्षांनी सर्व्हायकल कॅन्सर साठी पॅप स्मिअर व स्तनाच्या कर्करोगासाठी मॅमोग्राम ह्या तपासण्या करायलाच हव्यात, त्यात सतत निगेटिव्ह रिझल्ट्स आल्यास आपण ह्या तपासण्या थांबवू शकतो.

आहारात खजूर, मनुका, बदाम, नाचणी सत्व, गुळ-शेंगदाणे, अहळीव, बीट यांचा समावेश व वेळेवर जेवण, महिन्यातून एकच उपवास व ताजे, गरम अन्न खाणे शिवाय रोजचा अर्धा तास तरी स्वतःसाठी देऊन त्यात ध्यानधारणा, प्राणायाम यांचा समावेश केल्यास स्त्रिया नवीन युगाच्या कुठल्याही समस्यांना तोंड देण्यास सक्षम होतील यावर माझा विश्वास आहे.

आपणा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

Web Title: marathi news article womens day special womens health issues