कर्करोग: उपचारांपेक्षा प्रतिबंध योग्य

डॉ. प्रिया रमेश इंगळे, पुणे.
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

आजकाल वाढत चाललेले प्रदूषणही कित्येक कर्करोगांचे कारण बनत आहे. तर १०% कर्करोग हे वाढलेले वजन आणि अयोग्य आहाराने होतात. अतिरिक्त मद्यसेवनानेही लिव्हर आणि इतर काही कर्करोग होतात.

कर्करोगाचा पहिला उल्लेख सापडतो तो ख्रिस्तजन्माच्या १६०० वर्षे आधी एका लिहिल्या गेलेल्या एका भूर्जपत्रावर. म्हणजे कर्करोगाच्या आणि माणसाच्या सोबतीला आता ३६०० वर्षे पूर्ण होतील. या ३६०० वर्षात मानव कर्करोगाची औषधे, उपचारपद्धती शोधण्याचा सतत प्रयत्न करत आला आहे. कॅन्सर म्हणजे पेशींची अनियंत्रित वाढ, या अनियंत्रित वाढीला ट्युमर असे म्हटले जाते पण सर्वच ट्युमर हे कॅन्सरचे कारण असतातच असे नाही. शरीराच्या दुसऱ्या भागात जे पसरत नाहीत किंवा ज्यांची वाढ एका विशिष्टमर्यादेनंतर थांबते, त्या ट्युमर्सला बिनाईन (म्हणजे शब्दशः चांगले, हानिरहित) ट्युमर्स म्हणतात. याउलट कॅन्सरचे ट्युमर हे अनियंत्रितरित्या वाढतात व शरीराच्या दुसऱ्या भागातही पसरतात. हे ट्युमर्स नंतर आसपासच्या अवयवांत पसरून त्यांच्या कार्यात अडथळा निर्माण करतात व त्यातून कर्करोग उद्भवतो.

आयुर्वेदालाही कर्करोग माहिती होताच, माधवनिदानात अर्बुदाचे (म्हणजे ट्युमरचे) वेगवेगळे प्रकार अगदी सखोल वर्णन करुन सांगितले आहेत. आयुर्वेदानुसार कुठलाही व्याधी हा वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांच्या वैषम्यामुळे होतो, मात्र स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणं (निरोगी माणसाचे स्वास्थ्यरक्षण) हे आयुर्वेदाचे एक महत्वाचे तत्व असल्याने आयुर्वेदाने कर्करोग झाल्यावर त्याच्यावर उपचार करत बसण्यापेक्षा जीवनशैली व योग्य आहार-विहाराच्या माध्यमातून कर्करोग होऊच नये, याला प्राधान्य दिले आहे. तंबाखू सेवन (मग ते धुम्रपान असो कि तंबाखू चघळणे) हे जगातील २२% कर्करोगांच्या मुळाशी आहे. तर १०% कर्करोग हे वाढलेले वजन आणि अयोग्य आहाराने होतात. अतिरिक्त मद्यसेवनानेही लिव्हर आणि इतर काही कर्करोग होतात. आजकाल वाढत चाललेले प्रदूषणही कित्येक कर्करोगांचे कारण बनत आहे. इंधनाच्या ज्वलनातून बाहेर पडणारे वायूमुळे फुफ्फुसाचे कर्करोग होतात. शहरात राहून प्रदूषण टाळणे काहीसे अवघड असले तरी व्यसनांपासून दूर राहणे मात्र अशक्य नक्कीच नाही. 

cancer day image

कर्करोगाच्या अनेक कारणांपैकी एक कारण हे अयोग्य आहार हे सुद्धा आहे. विशेषतः धुरावर बनवलेले (smoked food), जाळलेले अन्न, वेगवेगळे प्रीझर्व्हेटीव्ह, कृत्रिम रंग घातलेले अन्न यांनी जठर आणि पचनसंस्थेचे कर्करोग होण्याचा धोका वाढतो. आजकाल वाढलेले चायनीज पदार्थ व बार्बेक्यू पार्टीज चे फॅड पाहता भारतातही या प्रकारच्या कर्करोगात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच एकदा वापरात आलेले (तापलेले) तेलही पुन्हा खाण्यासाठी वापरु नये. कारण त्यात वेगवेगळे अल्डेहाईड्स तयार झालेले असतात. दिल्लीतून घेतलेल्या ब्रेडच्या काही नमुन्यात पोटॅशियम ब्रोमेट हा कार्सीनोजेन (म्हणजे कर्करोग घडवून आणू शकणारा घटक) सापडला होता. कर्करोगाच्या उपचारपद्धतीपैकी रेडीएशन व केमोथेरपी हे सर्वात जास्त वापरले जाणारे उपचार आहे. कर्करोगाच्या पेशी या इतर पेशींपेक्षा वेगळ्या असतात. त्यांच्या चयापचयाचा वेग जास्त असतो. याच फरकांच्या आधारे रेडीएशन व केमोथेरपी फक्त याच पेशींना लक्ष्य करून त्यांना नष्ट करतात. अर्थात रेडीएशन व केमोथेरपीमुले रुग्णालाही भयावह साईड इफेक्ट्स सोसावे लागतात हि वस्तुस्थिती आहे. फ्री रेडीकॅल्सची संख्या शरीरात वाढल्याने ते पेशींच्या जेनेटिक कोडमध्ये बदल घडवून आणून कर्करोगाची सुरवात करुन देऊ शकतात. मात्र जेवणात हिरव्या भाज्या, ताजी फळे व ज्युस यांचा समावेश केल्याने या फ्री रेडीकॅल्सची संख्या कमी होऊन शरीराला कर्करोगापासून नैसर्गिक संरक्षण लाभू शकते. 

शिवाय फळे व भाज्यांचा चोथा (तंतुमय पदार्थ) आतड्यांच्या कर्करोगापासून बचाव करतो. कर्करोगाच्या उपचारांचे क्षितीज आता विस्तारते आहे, स्टॅनफोर्ड विद्यापीठात तर कर्करोगावरील एक लस विकसित करणे सुरु आहे, अल्बिनो उंदीरावरील त्यांच्या चाचण्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, ह्युमन जीनोम प्रोजेक्टनंतर तर कर्करोगातील संशोधनाच्या कित्येक नवीन संधी उपलब्ध झालेल्या आहेत. पण नंतरच्या उपचारांपेक्षा आधीचा प्रतिबंध कधीही चांगला. रोजच्या आहारात स्ट्रोबेरी, पपई यांसारखी फळे व ब्रोकोली, कोबी, टोमाटो, गाजर या भाज्या ज्यांच्यात अँटी ऑक्सिडंटस भरपूर प्रमाणात आहेत यांचा समावेश करणे योग्य राहील, तसेच आवळा, लसून, तुळस, हळद, अद्रक हे घटकहि आयुर्वेदाने कर्करोग विरोधी म्हणून मानले आहेत. येत्या दशकात रेडीएशन व केमोथेरपी या उपचारपद्धती कालबाह्य झालेल्या असतील, त्यांची जागा अधिक परिणामकारक व कमी साईड इफेक्ट्स असलेल्या उपचारांनी घेतलेली असेल. पण तोपर्यंत आहारातले बदल आणि एक सक्रीय जीवनशैली यांनीच कर्करोगापासून आपला बचाव करता येईल. आजच्या कर्करोगदिनी हे बदल आपल्या आयुष्यात अंतर्भूत करा.

Web Title: marathi news article world cancer day tumor precautions