पंतप्रधान, सरसंघचालकपदी  दलित माणूस केव्हा? 

शुक्रवार, 30 जून 2017

देशाचा पंतप्रधान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालक या सर्वोच्च पदावर दलित माणूस का नाही. याची उत्तरे देणे तसे सोप नाही आणि या पदावर या समाजाच्या व्यक्ती येण्यासाठी आणखी काही वर्षे जावी लागतील ?

गेल्या दशकभरात राजकारणाचा चेहराच बदलून गेला. एक भूमिका, आदर्श आणि तत्त्व घेऊन राजकारण करणारी थोर आणि त्यागी माणंस भारतीय लोकशाहीनी पाहिली. राजकारणात कितीही मोठी संधी आली तरी आपला पक्ष सोडायचा नाही आणि जे तत्त्व बाळगले त्याला तडा जावू द्यायचा नाही. ही भूमिका घेऊनच ही माणसं सार्वजनिक जीवनात कार्यरत राहिली. त्यामध्ये भाजप, काँग्रेस, समाजवादी, कम्युनिस्ट आदी पक्षातील नेत्यांचा उल्लेख करावा लागेल. अजूनही समाजापुढे आदर्श निर्माण करू शकतील असे नेते आहेत. त्यांच्याकडे पाहून नेहमीच अभिमान वाटत असतो. नाहीतर सकाळी एक आणि संध्याकाळी दुसरीच भूमिका घेणारे महाभागही आहेतच की ! 

आपल्या पक्षाशी बांधलकी जपणारे सर्वाधिक कार्येकते आणि नेते देशातील दोन पक्षातच दिसून येतात. ते दोन पक्ष म्हणजे भाजप आणि कम्युनिस्ट पक्ष अर्थात डावे. सत्ता येवो की जावो. या दोन्ही पक्षाला काहीही फरक पडत नाही. ते आपली निष्ठा कदापी गहाण टाकत नाही. नाहीतर काँग्रेसवाले. सत्ता गेली की त्यांची अवस्था पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखी होते. ज्यांचा आदर्श म्हणून भिंतीवर फोटो लटकविलेला असतो त्याची जागा रातोरात दुसराच नेता घेतो. काय म्हणावे या निष्ठेला. 

आपले रामदासभाई आठवले हे ही एक अजब रसायन आहे हो ! त्यांना काही गोष्टी लोकांना कशा काय पटवून देता येतात याचचं खरेतर आश्‍चर्य वाटते. प्रत्येक गोष्ट अगदी सहजच. कोणाला शिव्या घालायच्या आणि कोणाला कसे खांद्यावर घ्यायचे हे ही त्यांना अगदी फसक्‍लास जमते. ज्यांची हयात संघ, भाजपवर टीका करण्यात गेली. त्यांची टिंगळटवाळकी केल्याशिवाय ज्यांचा एकही दिवस पुढे सरकत नव्हता तेच रामदासभाई आज संघ, भाजपची अशी आरती ओवाळत आहेत की ते क्षणभर रिपब्लिकन पक्षाचे आहेत असे वाटतही नाही. एखाद्या प्रचारकाचीच भाषा ते बोलत असल्याचे पाहून त्यांच्याविषयी खरंच अभिमान वाटला. असो! 

रामदासभाई जेथे जातात तेथे उत्तम बॅटींग करतात. त्यांच्या कविता, शेरोशायरीने पत्रकारांबरोबर कार्यकर्तेही आणि चाहतेही हास्यविनोदात न्हाऊन निघतात. सध्या ते काँग्रेसवर तुटून पडताना दिसतात. त्यांच्या कोपरखळ्यानी काँग्रेस नेते पार घायाळ होतात. ज्या भाजपवर (पूर्वीचा जनसंघ) जातीयवादी, धर्मांध म्हणून हेच रामदासभाई टीकेचे प्रहार करीत असतं. त्यांची जर जुनी भाषणे आठवली किंवा पाहिली तर हेच का ते आठवले असा प्रश्‍न पडल्याशिवाय राहाणार नाही. काही वर्षापूर्वी ज्या पद्धतीची टीका किंवा जे शब्द ते भाजपविरोधात वापरत होते. त्याची जागा आज काँग्रेसने आणि काँग्रेसची जागा भाजपने घेतली आहे. काँग्रेस कशी जातीयवादी आहे हे आता आठवले दररोज सांगत आहेत. 

राष्ट्रपतीपदाबाबत बोलताना काँग्रेस जातीयवादी असल्याचे म्हटले आहे. दलित माणूस जिंकणार नसल्याचे पाहून काँग्रेसने यापूर्वी उपराष्ट्रपतीपदासाठी सुशीलकुमार शिंदे आणि आता राष्ट्रपतीपदासाठी मीराकुमार यांना बळीचे बकरे बनविले असे त्यांचे म्हणणे आहे. खरेतर हा आरोप आठवलेंच्या तोंडीच अधिक शोभतो. बिचारे शिंदे काय किंवा मीराकुमार काय ते असे स्वप्नात तरी बोलू शकतील का हो ! काँग्रेसने या दोघांना अजून काय द्यायचे बाकी ठेवले आहे. याचा तरी विचार व्हायला हवा. मीराकुमार तर थोर स्वतंत्रसेनानी बाबू जगजीवनराम यांची कन्या. गेल्या दोन पिढ्या त्यांचे घराणे कॉग्रेससोबत आहेत. तेच सुशीलकुमार शिंदेंचे. त्यांनाही काँग्रेसने भरपूर दिले. काँग्रेसने त्यांना राज्याचे मुख्यमंत्री केले. केंद्रात दोन नंबरचे गृहमंत्री दिले. पक्षाचा दलित चेहरा म्हणून त्यांना संधी मिळेल तेथे पाठविले. हे नाकारून कसे चालेल. ठीक आहे. सध्या भाजपची हवा आहे. त्यामुळे आठवले काय किंवा कोणताही मोदी भक्त काय ते जर म्हटले की सूर्य पूर्वेला नाही दक्षिणेला उगावतो तर होच म्हणावे लागते. नाही म्हणून कसे चालेल. 

दलितांना उमेदवारी देणे हा भाजपचा क्रांतीकारक निर्णय आहे तर जिल्हा परिषद, पंचायत समित्या असल्या तरी दलितांना किती संधी काँग्रेसने दिली. हा पक्ष जातीयवादी आहे असे त्यांचे मत आहे. काँग्रेस काय किंवा भाजप काय ? हे दोन्ही पक्ष दलित, ओबीसी, आदिवासी काय किंवा कोणताही वंचित समाज असेल. त्यांना सत्तेचा वाटा देते म्हणून काही मेहरबाणी करीत नाही. तो उपेक्षितांचा अधिकारच आहे. आजपर्यंत ज्यांनी सत्तेची फळे चाखली आहे. ते थोडे बाजूला झाले म्हणून काही बिघडत नाही. देश हा काही एकाच घराण्याची आणि एका पक्षाची मालकी बनता कामा नये. 

तसेच काँग्रसने आजपर्यंत दलित राष्ट्रपती दिला नाही असा जो दावा आठवले करतात ते चुकीचे वाटते. कारण के. आर. नारायण्‌न यांनाही काँग्रेसने राष्ट्रपती केलेच होते की ! राष्ट्रपतीपदावर आज विविध जातीधर्माचे लोक होऊन गेले आहेत. उद्या राष्ट्रपती म्हणून कोविंद किंवा मीराकुमार जरी बनल्या तरी संपूर्ण देश त्यांच्याकडे केवळ दलित म्हणून पाहणार नाही तर राष्ट्रपती म्हणूनच पाहतील. त्यामुळे सर्वोच्च पदाकडे आपण सगळेच संकुचितपणे का पाहात आहोत. 

तसा विचार करायला गेल्यास आपण असे म्हणून शकतो का ? की देशाचा पंतप्रधान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालक या सर्वोच्च पदावर दलित माणूस का नाही. याची उत्तरे देणे तसे सोप नाही आणि या पदावर या समाजाच्या व्यक्ती येण्यासाठी आणखी काही वर्षे जावी लागतील ? निळू फुलेंनी एकदा बोलताना अशी खंत व्यक्त केली होती. साधनाचा संपादक अजून बहुजन समाजातील का बनला नाही. पुढे नरेंद्र दाभोळकरांच्या हयातीतच विनोद शिरसाठ कार्यकारी संपादक बनले. पुढे संपादकही झाले. परिवर्तन हा निसर्गाचा नियमच आहे. देशात आणखी खूप मोठे परिवर्तन होऊ शकते. त्यासाठी मात्र सर्वानाच प्रतीक्षा करावी लागेल. 

असो. आठवलेसाहेब, आज तुम्ही काँग्रेसला लक्ष्य करता आहात. उद्या भाजपलाही करू शकता. सत्ता काय येते आणि जातेही. त्यामुळे जसे वारे येईल तशी पाठही फिरवा हा मंत्रही काही दिवसापूर्वी आपणच दिला. शेवटी ' खोबरं तिकडं चांगभलं 'चा जमानाही आहे. तुम्हीही त्याला कसे अपवाद असू शकता. रामदासभाई ! 

महाराष्ट्राच्या राजकारणातील बित्तंबातमी वाचा

राष्ट्रपती निवडणूक : महाराष्ट्रात विरोधकांची मते फोडण्यासाठी भाजपची फिल्डिंग!

संपूर्ण कर्जमाफीसाठी दीड लाखापर्यंतच्या शेतकऱ्यांचे प्रमाण 85 टक्के

जावई माझा भला : पतंगरावांचे जावई राजेंद्र जगताप यांना पुन्हा पुण्यात पोस्टिंग

कर्जमाफी हे भाजप आणि संघाचे केवळ नाटक : प्रकाश आंबेडकर

 

प्रकाश पाटील

Web Title: marathi news maharashtra politics Presidential Election Ramnath Kovind Narendra Modi BJP RSS Prakash Patil