कन्नडप्रेमी मनसे !

Raj Thackray
Raj Thackray

सध्या गटांगळ्या खात असलेल्या 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'ला नवसंजिवणी देण्यासाठी राज ठाकरे केविलवाणे प्रयत्न करीत आहेत. मनसेचे बारसे घातल्यापासूनच राज यांनी खास आपल्या बेधडक शैलीत पक्षाची बांधणी केली. हा बेधडकपणा मराठी माणसांनीही डोक्यावर घेतला. त्यामुळे राजकीय डावपेच, नियोजन, पक्ष बांधणी अशा बाबींचा अभाव असतानाही पक्ष वाढला, फोफावला. सुरूवातीची सात - आठ वर्षे स्वतः राज ठाकरे आणि त्यांचे शिलेदार सातव्या आस्मानावर होते. त्यामुळे त्यांच्या बेधडकपणाचा वारू महाराष्ट्राच्या मातीत चौखूर झेपा घेऊ लागला. पण बेधडकपणाला कुठे कसा वापरायचा हे राज यांना कधी कळलेच नाही.

त्यांच्या सभोवतीच्या चेल्यांपैकी काहींनी राज यांच्या समोर नंदीबैलासारख्या माना डोलावण्याचे काम तेवढे केले. काही चेल्यांना राज यांचा हा बेधडकपणा पटत नव्हता, पण त्यांच्या 'हिटलरी बाण्या'समोर ब्र काढण्याची बिशाद कुणाकडेच नव्हती. शेवटी 'अती केलं अन् हसू झालं' अशी गत राज व त्यांच्या मनसेची झाली. राज यांच्या अशा वागण्याची अनेक उदाहरणे सांगता येतील.

पण या लेखाची पार्श्वभूमी असलेल्या मुद्द्यावरच आपण चर्चा करूयात. पाचेक वर्षांपूर्वी राज यांनी एक जाहीर वक्तव्य केले होते. कोणत्याही संवेदनशील मराठी भाषकाच्या हृदयावर घाव घालणारे ते विधान होते. जवळपास 50 - 55 वर्षांपासून महाराष्ट्रात सामाविष्ट होऊ पाहणा-या सीमा भागातील विशेषत: बेळगावमधील मराठी भाषकांच्या भावनांवर उकळलेले तेल ओतणारे ते विधान होते. 'सीमाभागातील मराठी जनतेने आता महाराष्ट्रात येण्याच्या फंदात पडू नका. जिथे आहात, तिथेच गुण्या गोविंदाने राहा,' असे ते विधान होते. राज यांच्या बेधडक शैलीचाच हा अविष्कार होता. त्यावेळी मनसे ऐन फॅार्मात होती. मराठी तरूणांनी मनसेला डोक्यावर घेतलेले होते. त्यामुळे त्यांच्या या विधानाने सीमाभागातील मराठी बांधवांना काय वाटेल याची त्यांनी पर्वाही केली नव्हती.  महाराष्ट्रातील मराठी बांधवांसाठी त्यांचे हे विधान अचंबित करणारे होते.

खरेतर, मराठी व महाराष्ट्राचा कैवार घेवून स्थापन झालेल्या मनसेच्या धोरणांत सीमाभागातील मराठी बांधव हे महत्त्वाच्या अजेंड्यावर असतील, अशी ठाम समजूत भाबड्या मराठी जनतेची होती. मनसेच्या स्थापनेनंतर बेळगाव व सीमाभागातील जनतेमध्ये राज हे हिरो झाले होते. सीमाभागात मनसेच्या शाखा मोठ्या प्रमाणात स्थापन झाल्या होत्या. शिवसेना, महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्यापेक्षाही मनसेचा झंझावात सीमाभागात वाढू लागला होता. अशा परिस्थितीत राज यांनी सीमा भागातील मराठी जनतेच्या विरोधात वक्तव्य केले. या वक्तव्याने सीमाभागातील मनसे पक्ष एका रात्रीत हद्दपार झाला. मनसेचे झेंडे, शाखा बंद झाल्या. पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले.

परंतु सीमाभागातील या नाराजीची राज यांना कसलीही फिकीर वाटली नाही. कारण त्यांना महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघाचे जेवढे कार्यक्षेत्र आहे, तेवढ्याच मराठी (मतदारांची) गरज होती. थोडक्यात, त्यांना राजकीय स्वार्थापुरताच महाराष्ट्र व मराठी माणूस हवा होता. साहजिकच त्यांच्या स्वभावानुसार सीमाभागातील जनतेला काय वाटले याची पर्वा त्यांनी केली नाही.
त्या वक्तव्यामुळे सीमाभागात मनसेचे भलेही नुकसान झाले असेल. पण महाराष्ट्रात मात्र त्याचा राजकीय फटका त्यावेळी राज यांना बसला नाही. पण कालांतराने आंदोलनातील धरसोड, टोलच्या आंदोलनात त्यांनी 'सेंटिंग' केल्याची तयार झालेली जनभावना अशा अनेक कारणांनी मराठी जनता राज व त्यांच्या मनसेपासून दुरावली. हे हळूहळू घडत गेले.

त्यात सीमा भागातील मराठी बांधवांविषयी त्यांनी केलेले असंवेदनशील वक्तव्य सुद्धा थोडेफार का होईना कारणीभूत आहे, असे मानण्यास वाव आहे.
राज यांच्या या बेधडकपणाला मराठी जनतेने विधानसभा व त्यानंतर महानगरपालिका (विशेषतः नाशिक महानगरपालिका) निवडणुकीत जागा दाखवून दिली. स्वप्नातही कुणाला वाटले नसेल इतका केविलवाणा पराभव पक्षाच्या नशिबी आला. राज ठाकरे ज्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाचा अत्यंत तुच्छतेने हेटाळणीवजा जाहिर पाणउतारा करायचे, त्या रिपब्लीकन पक्षापेक्षाही दुबळी अवस्था मनसेची झाली.

मनसे पुन्हा जोमाने उभा राहू शकतो. भविष्यात शिवसेना, भाजपएवढाही मोठा होऊ शकतो, असा आत्मविश्वास अजूनही राज ठाकरे यांना वाटत असेल, तर त्यात चूक काही नाही. किंबहूना त्यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा झेप घेतली तर कोणत्याही मराठी माणसाला कौतुकच वाटेल. पण झालेल्या चुका परत व्हायला नकोत, एवढी साधी समज सुद्धा राज यांच्याकडे नाही की काय अशी शंका वाटू लागली आहे. कारण सीमा भागातील मराठी जनतेविषय़ी पाच - सहा वर्षांपूर्वी त्यांनी केलेल्या बेधडक वक्तव्यापासून आजही काही बोध घेतलेला दिसत नाही. अन्यथा त्यांनी आपला चेला संदिप देशपांडे यांना 'कन्नड रक्षक वेदिके' या संघटनेच्या व्यासपीठावर जाहीर भाषण करण्यासाठी पाठविले नसते.

हा कार्यक्रम हिंदी भाषेच्या विरोधी होता. पण बेळगावात मराठी भाषेवर, मराठी माणसांवर ज्यांच्याकडून अत्याचार होत आहेत, त्यात ही 'कन्नड रक्षक वेदिके' ही संघटना आघाडीवर आहे. कर्नाटक सरकार जेवढे आक्रमक नाही, त्यापेक्षा जास्त ही संघटना मराठीद्वेष्टी आहे. काही वर्षांपूर्वी बेळगाव महाराष्ट्रात सामाविष्ट करण्याचा अत्यंत धाडसी ठराव बेळगाव महानगरपालिकेने केला होता. विजय मोरे हे त्यावेळी महानगरपालिकेचे महापौर होते. लोकशाही मार्गाने महानगरपालिकेतील नगरसेवकांनी बहुमताने हा ठराव मंजूर केला होता. त्यामुळे या लोकभावनेचा कुणीही आदरच करायला हवा. पण बंगळुरू येथे गेलेल्या विजय मोरे यांना तेथील विधानभवन परिसरातच या 'कन्नड रक्षक वेदिके'च्या गुंडांनी प्रचंड मारहाण केली होती. त्यांच्या तोंडाला काळे फासले होते. अंगावरील कपडे फाडले होते. केवळ नशीब बलवत्तर म्हणून मोरे त्या हल्ल्यातून वाचले. मोरे यांच्या जिवावर बेतलेल्या या हल्ल्यामुळे अख्खा महाराष्ट्र पेटून उठला होता. महाराष्ट्रातील विधीमंडळांच्या दोन्ही सभागृहांमध्ये या घटनेचा जाहीर निषेध केला होता. आझाद मैदानात धरणे आंदोलन झाले होते. राज्यभरातही मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली होती. विजय मोरे व बेळगावांतील मराठी बांधवांच्या पाठीमागे महाराष्ट्रातील जनता ठामपणे उभी आहे. मोरे यांच्यावरील हा हल्ला आम्ही कदापी विसरणार नाही, अशा गर्जना त्यावेळी अनेक राजकीय व सामाजिक चळवळीतील नेत्यांनी केल्या होत्या.

एखाद्या दहशतवादी संघटनेपेक्षाही कमी वाटणार नाही, इतका राग मराठी माणसांचा या 'कन्नड रक्षक वेदिके'वर आहे. अशा या मराठीद्वेष्ट्या संघटनेच्या मांडीला मांडी लावून मनसेचा एक पदाधिकारी बसतो, हे तमाम मराठी माणसांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे. राज व त्यांच्या मनसेचे राजकीय डावपेच नक्की काय आहेत, हे तेच जाणो. पण सीमाभागातील व महाराष्ट्रातील जनतेला हा असला बेधडकपणा आजिबात आवडणार नाही. त्यातून मनसेचा पाय आणखी खोलात गेला तरी नवल वाटायला नको.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com