लिओ वराडकर.. आगे बढो..!! 

File photo of Leo Varadkar
File photo of Leo Varadkar

आयर्लंडचे नवे पंतप्रधान लिओ वराडकर यांच्या आमंत्रणावरून कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो गेल्या वर्षी जुलैच्या सुरवातीस आयर्लंडला गेले होते. वराडकर यांनी ट्रुडो यांचे स्वागत एका स्थानिक बागेत पळत दोन वेढे मारून केले. 

आपल्या इब्लिन शहरातील कचेरीत बसून लिओ वराडकर म्हणाले, "पळण्याच्या या फेरीमुळे फोटोग्राफर्स व टिपणे काढणाऱ्या लोकांपासून दूर राहून मला कॅनेडियन पंतप्रधानांशी मोकळेपणाने बोलता आले. नव्याने पंतप्रधानपद घेण्याच्या अनुभवातून ते (ट्रुडो) मला काही सल्ला देऊ शकले. त्याअधी ते 18 महिने आणि मी फक्त 18 दिवस पंतप्रधानपदावर होतो. त्यामुळे ते काही उपयुक्त सूचना मला करू शकले.'' 

वराडकर 14 जून 2017 रोजी आयर्लंडच्या सर्वोच्च पदावर आरुढ झाले. तेव्हा ते 38 वर्षांचे होते. आयर्लंडच्या इतिहासातील ते सर्वांत तरुण पंतप्रधान आहेत. 

त्यांचे वडील भारतीय असून आई आयरिश आहे. त्यांचे वडील मुंबईमध्ये डॉक्‍टर होते आणि देशांतर करून ते आयर्लंडला आले. वराडकरांनी त्यांच्या आधीच्या वृद्धत्वाकडे झुकणाऱ्या गोऱ्या पंतप्रधानांची साखळी मोडली. 47 लाख लोकांच्या या देशातील जनतेच्या सामाजिक वृत्तीमध्ये, दृष्टिकोनामध्ये त्यांच्या पंतप्रधानपदामुळे फार मोठा बदल घडून आला. एकेकाळी आयर्लंड हा देश कॅथलिक मूल्यांचा आधार होता. पण 2015 मध्ये समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारे आयर्लंड हे जगातील पहिले राष्ट्र ठरले. वराडकर त्यावेळी आरोग्य मंत्री होते आणि 'मी गे आहे' असे त्यांनी राष्ट्रीय रेडिओवर जाहीर केले होते. या प्रकटीकरणाचे लोकांना आश्‍चर्य वाटले; पण धैर्य खचून लोकांमध्ये गोंधळ उडाला नाही. 

वराडकरांनी त्यांच्या वयाच्या सातव्या वर्षीच ठरविले होते, की राजकारणात उतरायचे आणि आरोग्यमंत्री व्हायचे. डब्लिनच्या त्रिनिटी कॉलेजमध्ये त्यांनी औषधशास्त्राचा अभ्यास केला. पण ते राजकारणातही सक्रिय होते. प्रथम स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करून 2007 मध्ये आयर्लंडच्या 'दाईल' या संसदेत प्रथम निवडून आले. त्यावेळी त्यांनी 'फाईन गाएल' हा पक्ष विरोधात होता. 

पुढच्या वर्षी म्हणजे 2008 मध्ये जागतिक आर्थिक अरिष्ट आले, त्यात आयर्लंडमधील प्रमुख बॅंका कोसळल्या. त्यांनी देश जवळजवळ दिवाळखोर करून टाकला आणि आयर्लंडला युरोपियन युनियन आणि इंटरनॅशनल मॉनेटरी फंडाकडे 6700 कोटी युरोची याचना करावी लागली. या घटनेमुळे 2011 मधील आयर्लंडमध्ये सत्तेची उलथापालथ झाली आणि वराडकरांचा 'फाईन गाएल' हा पक्ष सत्तेवर आला. 

या पक्षातील पंतप्रधान एन्डा केनी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये वराडकर यांची वाहतूक, प्रवास आणि क्रीडा या खात्यांचे मंत्री म्हणून नेमणूक केली. हे काम करत असताना त्यांचा डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंध आला. त्यावेळी ट्रम्प एक साधे नागरिक होते. वराडकर यांनी त्यांना एका गोल्फ कोर्सच्या निर्मितीसाठी मदत केली. दरम्यान, वराडकर यांची राजकीय प्रगती चालूच राहिली. 2014 मध्ये आरोग्य मंत्री होऊन त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. 

लैंगिकतेबद्दलच्या स्पष्टकव्क्तेपणामुळे त्यांना राष्ट्रीय महत्त्व आले आणि समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता मागणाऱ्या चळवळीला बळ प्राप्त झाले. मे 2015 मध्ये एन्डा केनी यांनी पंतप्रधानपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला आणि लिओ वराडकर आयर्लंडचे पंतप्रधान झाले. 

त्यांच्या समतोल व्यवस्थापनामुळे आणि त्यांनी वापरलेल्या काटकसरींच्या उपायांमुळे आयर्लंडच्या अर्थव्यवस्थेने नजरेत भरण्याइतकी प्रगती केली आहे. गेल्ल्यआ तीन वर्षांत युरो वापरणाऱ्या 19 देशांमध्ये आयर्लंड ही सर्वांत जलद गतीने वाढणारी अर्थव्यवस्था अशी कीर्ती मिळविली आहे. वराडकर पंतप्रधान होण्यापूर्वीच्या महिन्यात बेरोजगारीचा दर 6.2 टक्के म्हणजेच त्यापूर्वीच्या नऊ वर्षांतील सर्वांत कमी झाला होता. 

'टॅक्‍ससाठीचे नंदनवन' ही आयर्लंडची महती अबाधित राहणार आहे. साडेबारा टक्के इतका कमी कॉर्पोरेट टॅक्‍स आणि खास स्वरूपाच्या उदार सवलतींची मालिका यामुळे परदेशात मुख्य कचेऱ्यांच्या शोधात असलेल्या अमेरिकी तांत्रिक आणि औषधी कंपन्यांना आयर्लंड हे फार मोठे आकर्षणाचे केंद्र झाले आहे. वराडकर म्हणतात, आयर्लंडच्या सवलतींनी भरलेल्या करपद्धतीचा फायदा घ्यायला अमेरिकी कंपन्यांना प्रत्यवाय करू शकणार नाही. आमचे टीकाकार म्हणतात, त्याप्रमाणे अमही कर चुकवायला मदत करत नाही. मला असेच वाटते, की कंपन्यांनी टॅक्‍स भरलाच पाहिके. कंपन्यांना टॅक्‍स टाळता येऊ नये, म्हणून आम्ही योग्य ते बदल करत राहूच! 

राजकीय स्थैर्याची आजतरी खात्री देता येणार नाही; पण वराडकर आज दोन प्रमुख पक्षांचे संयुक्त सरकार चालवत आहेत. शिवाय, या सरकावर ब्रिटनच्या 'ब्रेक्‍झिट'ची छाया आहेच. 'ब्रिटन युरोपीय समुदायातून बाहेर पडणार' ही गोष्ट आयर्लंडच्या दृष्टीने एक मोठे आर्थिक आव्हान असणार आहे. ब्रिटन आणि आयर्लंड या दोन देशांमध्ये दर आठवड्याला 120 कोटी युरो इतका व्यापार होतो आणि शेती, धान्य, व्यापार यासाठी ब्रिटिश बाजारपेठांशी सातत्याने संपर्क असण्यावर अवलंबून आहे. 

ब्रिटन आणि आयर्लंड एकमेकांशी ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भौगोलिकदृष्ट्या बांधलेले आहेत. आयर्लंडची जमिनीची एक सरहद्द ब्रिटनच्या भाग असलेल्या उत्तर आयर्लंडच्या सरहद्दीशी मिळती-जुळती आहे. ब्रिटनने आयर्लंडशी करार न करता युरोपीय समुदाय सोडला, तर आयरिश अर्थव्यवस्थेला खूप तोटा होईल. ब्रिटनमधून होणारी आयात किंवा होणारा मालपुरवठा तोडला जाईल. आयात-निर्यातींना करांचा मोठा दणका बसेल. 

या घटनांमध्ये काही लोकांना आयर्लंडच्या युरोपीय समुदायातून बाहेर पडण्याची शक्‍यता दिसते. याला 'आयरेक्‍झिट' असे म्हणावे लागेल. या परिस्थितीत आयर्लंड ब्रिटनशी स्वत:ची व्यापारी व्यवस्था उभी करू शकेल आणि ब्रिटन ज्या प्रकारची व्यापारी व्यवस्था अमेरिका, चीन आदी देशांशी करेल, त्याचा फायदा आयर्लंडला होईल. 

वराडकर म्हणतात, 'या गोष्टींचा आम्ही विचारही करत नाही. आयर्लंडमधील अलिकडील मतदानात 80 टक्के जनतेचा पाठिंबा युरोपीय समुदायातील सदस्यत्वाला मिळाला आहे. आमची जागा युरोपच्या हृदयाजवळ आहे. युरोपीय समुदायामुळे आम्ही अधिक बलवान झालो आहोत. वाटाघाटी करताना आम्ही अशा 'टीम'मध्ये आहोत, की ज्यात 450 दशलक्ष लोक आमच्या पाठीशी उभे आहेत. आयर्लंड या बेटावर आम्हाला नवी आर्थिक सरहद्द पुन्हा निर्माण करायची नाही. आयर्लंडला अमेरिकेशी असलेले नाते कमी महत्त्वाचे वाटत नाही. दहापैकी एक अमेरिकी नागरिक आयरिश वारसा सांगतो. आयरिश पंतप्रधान 17 मार्च रोजी सेन्ट पॅट्रिक्‍स डे साजरा करण्यासाठी वॉशिंग्टनला जातात. त्यावेळी जर मला ट्रम्प यांना भेटता आले, तर मी त्यांना मुक्त व्यापाराचे महत्त्व सांगेन, की जो अमेरिका आणि आयर्लंड या दोन्ही देशांच्या फायद्याचा आहे.' ज्या गोष्टी खऱ्या आहेत, त्या एकमेकांशी बोलता आल्या पाहिजेत. ज्यांचे स्पष्ट आणि उघड बोलणे त्यांना फायद्याचे ठरले आहे, त्या वराडकरांना आयर्लंडला जागतिक मंचावरून खेळणारा देश या स्थितीत ठेवायचे आहे. असा दर्जा त्यांना मिळवून द्यायचा आहे. 'भौगोलिकदृष्ट्या आम्ही युरोपच्या काठावर आहोत; पण मी आयर्लंडकडे जगाच्या केंद्रस्थानी असलेले बेट या दृष्टीने पाहतो', असे वराडकर म्हणतात. 

मी म्हणेन.. 'वराडकर तुमचे शहाणपण जागतिक दृष्टिकोन आणि दूरदर्शीपणाच्या या गुणांमुळे आयर्लंडला तुम्ही प्रतिष्ठा व नवे व्यक्तिमत्व दिले आहे.. आगे बढो..!' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com