विजय तेंडुलकर...शांततेचे प्रवासी!

विजय तेंडुलकर...शांततेचे प्रवासी!

नाटककार, लेखक विजय तेंडुलकरांचं व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी. त्यांचं अल्पाक्षरी पण टोकदार बोलणं, त्यांच शांत वागणं यामुळे त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकावर जणू गारूडच होई. त्यांच्यासोबत एका चित्रपटाच्या पटकथेसाठी लेखनिक म्हणून काम करण्याची संधी मिळालेल्या पटकथालेखिका मनीषा कोर्डे यांच्यावरही ते झालं. नुकताच त्यांचा जन्मदिवस येऊन गेला. या निमित्ताने सहवासातून जाणवलेले 'तें.' त्यांनी या आठवणीतून मांडलेत... 

तेंडुलकरांसारख्या मोठ्या लेखकाचा सहायक होण्याची संधी मिळाली होती. सुरेश द्वादशीवारांच्या 'तांदळा' कादंबरीवर आधारित स्क्रीन प्ले लिहायचा होता. दिग्दर्शक असणार होते हेमंत देवधर. समीर कवठेकर आणि हेमंतने माझं नाव त्यांना सुचवलं. माझ्या त्यांच्या पहिल्या भेटीत त्यांनी मला 'पास' केलं. काम सुरू झालं. ते सांगतील, मी लिहायचं. चर्चा वगैरे करत. ते आजारी होते. हाताने लिहिणं बंद होतं; पण मला ते डिक्‍टेशन देऊ शकणार होते. माझी कादंबरीची पारायणं झाली होती. त्यांनी काही विचारलं तर अडायला नको! इतक्‍या मोठ्या लेखकाच्या हाताखाली काम करायचं. दडपण होतं. 

खिडकीशेजारच्या मोठ्याशा आरामखुर्चीत बसून थोडं झुलत, थोडं आवळा सुपारी चघळत त्यांचं विचारमंथन सुरू असायचं. कधी नजर खिडकीबाहेर, कधी डोळे बंद. घनघोर शांतता. वाक्‍याची नीट गाठोडी बांधली गेली की, ती माझ्याकडे फेकली जायची. ज्या लोकांनी डिक्‍टेशन दिलं आहे, त्यांना कल्पना आहे की, डिक्‍टेशन देणं एक कला आहे. डोक्‍यात उद्रेक करणाऱ्या पाऱ्यासारख्या सुळसुळ विचारांना तोंडाने सांगणं महाकठीण काम असतं. शब्द न सापडून चिडचिड होते, लय बिघडते, समोरचा नीट लिहतोय की नाही? या विचाराने अस्थिर व्हायला होतं... विचारांचा, सांगण्याचा व लिखाणाचा तीनपायी धावण्याचं त्रैराशिक जमावं लागत! अनेक व्यवधानं! पण 'तें.' म्हणजे डिक्‍टेशनचं अतिस्मूथ डेअरी मिल्क सिल्क चॉकलेट! कुठे खट्ट नाही कुठे खुट्ट नाही. शांत नदी. संथ नाव. इतक्‍या मोठ्या लेखकाचा आत्यंतिक एकांत - आणि तो ही लिहितानाचा- मला अनुभवायला मिळाला. ही माझ्या आयुष्यातली सर्वांत मौजेची बाब मी मानते. मी जो शब्द वापरणार आहे आता तो त्यांना आवडला नसता; पण अर्थातच मी मोकळी आहे माझे विचार मांडायला... तो पवित्र निःशब्द एकांत जगणं, यातच मी खूप काही शिकले. 'ठहराव' कसा असावा लेखकाचा तेही. 
ते कधी क्वचित प्रश्न विचारायचे. त्यांनी दिलेली उत्तरं कधी पटायची कधी पटायची नाहीत, ...तेव्हा! आज 10 वर्षांनंतर जे आठवतं, ते पटतं. एकेक ठाशीव वाक्‍य म्हणजे भरतवाक्‍यच असायची. अनुभवाच्या मुशीतून भरीव शरीराने ठेक्‍यात उतरलेली. एका पात्राच्या वागण्याच्या रितीबद्दल मी म्हटलं होतं, किती मोनोटोनस होतय हे. काहीतरी वेगळं वागू द्या की त्याला! एकाच शब्दात उत्तर आलं. 'स्वभाव!' 

'पण माणसं जरा जरा वेगळी वागतातही खऱ्या आयुष्यात.'- मी घोडं माझं अजून पुढे दामटलं. 

'मग आयुष्य लिहितोय का आपण?' 

प्रश्नाचं उत्तर प्रश्न! 

खूप नंतर Consistency of character वगैरे आयते शब्द सापडले लिखाणाच्या पाठ्यपुस्तकात आणि 'हेच ते, तेंडुलकर म्हणायचे तें!!' असा साक्षात्कार झाला. 
'आता ती (नायिका) काय करेल?' 

'काहीही करू शकेल!' नवशिक्‍या सहायकांकडे कधी कधी जो धादांत उत्साह असतो, त्यात मी उत्तर दिलं. परत नकार. 'माणूस असा काहीही वागू शकत नाही. तो बांधलेला असतो. पर्याय नसतातच. पर्यायांचे आभास असतात. एकच निर्णय खरा.' 

हेही तेव्हा कळलं नव्हतच. खूप नंतर, कधीतरी बरीच उरफोड झाल्यावर, समुद्रकिनारी अचानक आणून टाकलेल्या संदेशाच्या बाटलीसारखं. सापडलं. कळलं. अजून 'हृदयी कवटाळीले' नाही; पण तेही होईल कधीतरी. 

कमी वयात स्वतंत्रतेचं, स्वच्छन्दतेचं किती वेड असतं. त्या वेडाच्या भरात मी काही करू शकतो, कुठे ही जाऊ शकतो. रान मोकळं आहे. विचारायला कोणी नाही. आणि असलं तरी माणूस आपलं आपण स्वतंत्र नाही का? अशीच माझी 'वैचारिक' बैठक होती... त्यांचं उत्तरं, 'लिखाणातील पात्र त्या अर्थाने स्वतंत्र नाही. 'हे पचनी पडायला खूप वेळ गेला. वर्ष! मी बुजरी होते. खूप प्रश्न विचारायची हिंमत नव्हती, तेव्हढा वेळही. पात्रांबद्दलची त्यांची उत्तरं आणि माझा मुक्ततेचा ध्यास. विरोधाभास त्रास द्यायचा. मनात, डोक्‍यात अडकलेल्या बंदुकीच्या गोळ्या. 'तिने पळून जायला हवं, 'ती हे का सहन करतेय, येईल की तिची कोणीतरी सुटका करणार!' माझ्या प्रतिवादांचे उत्तर असे की, जणू मोबाईलचं कव्हर काढावं. आतलं सर्किट दिसावं. तेव्हा थोडी धुसपूस व्ह्यायची. 'का??' चा आकांत असायचा; पण तेंडुलकरी लिखाणाचे पीळ इतके घट्ट! माझे वेडेवाकडे धागेदोरे ही केवळ गुरफटायचे नाहीत तर, त्यांच्याच पिळाचा भाग बनायचे. खूप नंतर लिखाणाची पुस्तक वाचली. लेखकांच्या मुलाखती वाचल्या. आणि जगणं व लिखाण, यातले मूलभूत फरक कळले. अंतःप्रवाह आणि प्रयोजन! हे मला अन्यथा कळते ना. हे मौलिक मला तेंडुलकरांच्या-माझ्या सह-एकांतामुळे मिळालं आहे. अशी संधी किती जणांना मिळते? जगण्याचा धपापता ओघ असा आहे, मिळाली तरी ती घेता येईल का आजच्या काळात? मी कोणत्याही इन्स्टिट्युटमध्ये लिखाणाचे धडे घेतले नाहीत. कोणता कोर्स केला नाही. एनएसडी, एफटीआयआय यांनी नाकारलेली शिकाऊ व्यक्ती आहे मी. माझ्यासाठी तेंडुलकर 'आधार कार्ड' ठरले. कसं वागावं, कसं जगावं लेखकाने - टिपत टिपत; कागदावर टिपकवत टिपकवत - याचा परिपाठ ठरले. ही अशी या पद्धतीची पुस्तकं वाचायची असतात, त्याची लायब्ररी असते, लिहिताना मेंदूला चालना म्हणून काहीतरी चघळायला लागतं नाहीतर वैचारिक गुंगी येते. आपली बैठक अशी असावी, कुत्रा असावा पण फार लाळघोटेपणा करू नये. कुटुंबात असावं पण अलिप्त असावं किंवा प्रयत्न करावा - एक ना अनेक. 

आज काही जणांना या गोष्टी 'प्राथमिक' वाटतील; पण वैदर्भीय, सिनेमाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून आले होते मी. सारं नवं होतं. सारं पिऊन टाकण्याजोगं वाटलं. दमडीसुद्धा खर्च करावी लागली नाही. जे मिळालं ते शाश्वत. 

ही आमची सहशांतता-एक. 

एक दुपार वेगळी होती. माझ्या आत काहीतरी तुटलं होतं. आता एक दशकानंतर आठवत नाही. त्यांच्या पद्मपुरस्कारासमोरच्या खुर्चीत होते. समोर श्वेतवस्त्रधारी तेंडुलकर. नेहमीप्रमाणे जगाच्या गप्पा मला मारता येईनात. आत गोंधळ होता. त्यांच्या नजरेतून काहीच सुटणं शक्‍य नव्हतं. सगळं बाहेर आलं. तत्कालीन बारकाव्यांना अर्थ नव्हताच. मी सांगितलं नाही. त्यांनी विचारलं नाही. शांतपणे आत जाऊन त्यांच्या त्वचेइतकाच नितळ रुमाल घेऊन आले. दिला. मी हुंदकत काही बोलले. काय, आता आठवत नाही. भर ओसरला. तसं ते म्हणाले, 'होतं. मलाही होतं. अशा वेळी त्या जागी बसून राहू नये. निघून जावं.' आणि मग -- शांतता. त्या वेळी जे 'घनघोर' वाटलं होतं, ते आज आठवतही नाही. आठवतात 'तें' शब्द. 'त्या जागी' ही जागा भौगोलिक, तशीच आंतरिकही. नंतर उमजून चुकले, आंतरिक गोंधळाला पर्याय नाही. असह्य झालं, की तिथून उठून जाण्यालाही. 

लेखक 'गोंधळी समाज' असतो. त्याला हाताळायची ही तेंडुलकरी क्‍लुप्ती आजही कामी येते. 

ही आमची सहशांतता- दोन. 

--- 

आणि मग शेवट तर सगळा शांततेतचं होता. तोवर 'मालामाल विकली' रिलीज झाला होता. काम होतं. भेटी कमी झाल्या होत्या. त्यांच्या आजारपणामुळेही. मेसेजेस यायचे. कमी शब्दांचे. खूप दिवस घरी अंथरुणात असावेत. तेव्हाचा एक. 

'Birds outside. Too many. Want to be one of them. Come to you.' चर्रर्र झालं. पायी, बसने, लोकलने मुंबई पालथी घालणारा माणूस. कसा राहत असेल, खिडकीबाहेरचं जग बघत? या मेसेजमध्ये वैयक्तिक काहीच नाही. ते त्यांचं बांधलेपण होतं. मला कळतं होत. कळणं विकल करत गेलं. तो ही माझ्या मनाचा कमकुवतपणा. त्यांच्या त्या बांधलेपणादेखील ग्रेस होती. लिखाणावर, भवतालावर त्यांच्या अवधानाचे लगाम होते. पुण्याच्या 'आयआयसीयू'त लॅपटॉप घेऊन लिहीत बसलेल्या तेंडुलकरांचे काही फोटोज माझ्याकडे आहेत. इथे कसं काय लिखाण होऊ शकतं, यावर 'इथेच होऊ शकतं. किती शांतता आहे!' असलं काही बुल्सआयसारखं उत्तर. त्या भेटीतही त्यांची शांतता अनुभवली. तिचा थांग आजवरच्या शांततांपेक्षा गहिरा होता. म्हणूनच, माझ्यावरचा परिणामही. ही आमची सहशांतता- तीन, अंतिम. 

(पुढे 'तांदळा' बारगळला. पुढे संजय सुरकरांनी केला. लिखाण कोणाचं होतं, मी लक्ष दिलं नाही. आजही त्या वह्या माझ्याकडे आहेत. अक्षरं माझी. सुधारणा तेंडुलकरांच्या. आमच्या सह-शांततेच्या खुणा.) 

किती हुडदौस घालतो आपण काही समजून घ्यायला, काही पचनी पडायला. पण गाठी शांततेतच उकलतात. बघण्यासाठी कोलाहल. रिचवण्यासाठी शांतता. मी ऋणी आहे, तेंडुलकर. राहीन.

फीचर्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com