आणखी एका मोदींनी लावला चुना!

योगेश कानगुडे
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

बँकेतील एखादा गैरव्यवहार समोर येणे हे आता म्हणावे तितके नवीन राहीले नाही. पण दिवसागणिक या घटनांमध्ये भर पडत असल्याचे पहायला मिळत आहे. नुकताच पंजाब नॅशनल बँकेतील एक मोठा गैरव्यवहार समोर आला असून मुंबईतील बँकेच्या एका शाखेतून 11 हजार कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे.

बँकेतील एखादा गैरव्यवहार समोर येणे हे आता म्हणावे तितके नवीन राहीले नाही. पण दिवसागणिक या घटनांमध्ये भर पडत असल्याचे पहायला मिळत आहे. नुकताच पंजाब नॅशनल बँकेतील एक मोठा गैरव्यवहार समोर आला असून मुंबईतील बँकेच्या एका शाखेतून 11 हजार कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे.

हा गैरव्यवहार उघडकीस येण्याअगोदर विजय मल्ल्या नामक व्यक्तीने आपल्या बँकांना नऊ हजार कोटींचा गंडा घातलेला आहे. आता विख्यात हिरे व्यापारी नीरव मोदी याने बॅंकेच्या अधिकाऱ्यांच्या साह्याने हा गैरप्रकार केल्याचा आरोप आहे. त्यात काही बड्या सराफांचे लागेबांधे असून, त्यात आणखी काही बॅंकांचा समावेश असण्याची शक्‍यता आहे. 'पीएनबी'च्या तक्रारीनुसार 'सीबीआय'ने या प्रकरणी तपास सुरू केला आहे. आयपीएलमध्ये करोडांचा गैरव्यवहार केलेल्या ललित मोदीनंतरचे हे दुसरे मोदी. 

गैरव्यवहार कसा झाला?
नीरव मोदी आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी आपल्या तीन कंपन्यांद्वारे हे षडयंत्र रचल्याचा आरोप आहे. तीन कंपन्यांच्या नावावर हाँगकाँगमधून सामान येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सामान मागवण्यासाठी लेटर ऑफ अंडरटेकिंगची मागणी बँकेकडे केली.

लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे मागवण्यात आलेल्या सामानाचे पैसे देण्याची जबाबदारी बँक घेत असल्याचं पत्र. हेच पत्र अलाहाबाद बँक आणि अॅक्सिस बँकेच्या हाँगकाँगमधल्या शाखांच्या नावावर काढण्याची मागणी केली. याद्वारे हाँगकाँगहून 280 कोटी रुपयांचं सामान मागवण्यात आलं.

पीएनबीने हाँगकाँगमधील अलाहाबाद बँकेला 5 आणि अॅक्सिस बँकेला 3 लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी केली आणि जवळपास 280 कोटी रुपयांचं सामान आणण्यात आलं. 18 जानेवारीला या तिन्ही कंपन्यांचे संबंधित अधिकारी पीएनबीच्या मुंबई शाखेत गेले आणि त्यांनी सामानाचे पैसे भरण्यास सांगितलं.

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बँकेचं लेटर दाखवलं आणि पेमेंटची मागणी केली. जितके पैसे परदेशात पाठवायचे आहेत, तितकी कॅश भरायला  बँक अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र बँकेने जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांची झोपच उडाली. कारण बँकेत एक रुपयाही न ठेवता या कंपन्यांनी लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी करायला लावल्याचं उघड झालं.

बँकेने तक्रार दाखल केली असून हे प्रकरण आता सीबीआयपर्यंत पोहोचलं आहे. नीरव मोदी यांना जारी केलेले आठही लेटर ऑफ अंडरटेकिंग बनावट असल्याचं उघड झालं. पीएनबीचे डेप्युटी मॅनेजर गोकुळनाथ शेट्टी यांनी एका कर्मचाऱ्याला हाताशी घेऊन हे लेटर जारी केल्याची माहिती आहे. त्यामुळे आता 280 कोटी रुपये पीएनबीला चुकते करावे लागणार आहेत.

नीरव मोदी कोण आहेत?
नीरव मोदी भारतातील मोठे हिरे व्यापारी आहेत. त्यांना भारतातील 'डायमंड किंग' असंही संबोधलं जातं. 48 वर्षीय नीरव मोदी फोर्ब्ज या जगभरातील श्रीमंतांच्या यादीत 84 व्या स्थानावर आहे. फोर्ब्जच्या आकडेवारीनुसार नीरव मोदी यांची जवळपास 12 हजार कोटींची संपत्ती आहे.

नीरव मोदी यांची फाईव्ह स्टार डायमंड नावाची कंपनी आहे. त्यांनी 'नीरव मोदी डायमंड ब्रँड' या नावाने भारतासह जगभरात ज्वेलरी शोरुम सुरु केली आहेत. दिल्ली, मुंबईपासून ते लंडन, हाँगकाँग आणि न्यूयॉर्कपर्यंत नीरव मोदींची 25 लग्झरी स्टोअर्स आहेत.

नीरव मोदी यांच्या ज्वेलरीची किंमत 10 लाखांपासून 50 कोटी रुपयांपर्यंत आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा 'नीरव मोदी डायमंड ब्रँड'ची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. केट विंसलेट आणि डकोटा जॉनसन यांच्यासारख्या हॉलिवूड अभिनेत्री नीरव मोदींच्या ज्वेलरीच्या ग्राहक आहेत. नीरव मोदींचे वडीलही हिरे व्यापारी आहेत. नीरव मोदींनी सुरुवातीचं शिक्षण अमेरिकेत घेतलं. अमेरिकेहून भारतात परतल्यानंतर व्यवसाय सुरु केला.

नीरव मोदी देशाबाहेर पळून गेले आहेत. या घोटाळ्यामुळे केंद्र सरकारबरोबर गुंतवणूकदारांना जोरदार धक्का बसला आहे. कारण याच वर्षी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी मोठी बॅंक असलेल्या 'पीएनबी'ला तब्बल 5 हजार 473 कोटींची भांडवली मदत केली होती; मात्र 11 हजार कोटींचा घोटाळा उघड झाल्यामुळे केंद्र सरकारला मोठा झटका बसला आहे. बॅंकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या सरकारच्या मनसुब्यांना धक्का बसला आहे. 

आता लक्ष असंणार ते भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांविरोधात आम्ही खूप आक्रमक भूमिका घेत आहोत असा दावा करणाऱ्या सरकारच्या भूमिकेकडे.

Web Title: marathi news nirav modi CBI Punjab Natioanl Bank Yogesh Kangude