A75B (विजय शिंगोर्णीकर)

विजय शिंगोर्णीकर
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

साठच्या दशकात कोलकत्यात महिना सोळाशे रुपये पगारावर नोकरी करताना तिथल्या रस्त्यावरील भर गर्दीतून सायकल दामटत जाणाऱ्या अमिताभ बचच्चनचं त्रासिक मुद्रा असलेलं एक जुनं छायाचित्र ‘धर्मयुग’ या साप्ताहिकात पाहिल्याचं आजही लख्खपणे आठवतं. त्याचा तो टिपिकल हाफ बुशशर्टमधला चाकरमानी अवतार बघून पुढं तो असामान्य अभिनेता होईल आणि जगभरात त्याचे लाखो फॅन्स निर्माण होतील, याची तेव्हा सुतरामही शक्‍यता वाटली नव्हती; पण तसं झालं खरं! 

सिद्धार्थ बसूच्या मेंदूला कल्हई करणाऱ्या ‘केबीसी’चं खुमासदार सूत्रसंचालन करायला सोनी एंटरटेनमेंटला आजपर्यंत त्याच्याखेरीज दुसरा पर्याय सापडलेला नाही. तसा तो ३३ वर्षापूर्वी बुजुर्ग, मुरब्बी राजकारणी हेमवतीनंदन बहुगुणा यांचा दारुण पराभव करण्यासाठी काँग्रेसला तरी तेव्हा कुठं सापडला होता? बिचाऱ्या बहुगुणा यांच्यावर चक्क डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढवली. त्यावेळी विजयी ठरलेल्या या उमेदवाराचं अभूतपूर्व स्वागत अलाहाबादच्या पदपथावर तिथल्या महिलांनी आपल्या नव्या कोऱ्या साड्या अंथरून केल्याची घटना चर्चेचा विषय ठरलेली. पंचाहत्तर वर्षापूर्वी प्रसिद्ध हिंदी साहित्यिक सुमित्रानंदन पंत यांनी बच्चन कुटुंबातल्या या बाळाचं ‘अमिताभ’ या नावानं बारसं केलं, तेव्हा त्यांनाही या गुणी मुलाच्या भविष्यातल्या अफाट कर्तृत्वाची कल्पना आली नसेल. साठच्या दशकात कोलकत्यात महिना सोळाशे रुपये पगारावर नोकरी करताना तिथल्या रस्त्यावरील भर गर्दीतून सायकल दामटत जाणाऱ्या अमिताभचं त्रासिक मुद्रा असलेलं एक जुनं छायाचित्र ‘धर्मयुग’ या साप्ताहिकात पाहिल्याचं आजही लख्खपणे आठवतं. त्याचा तो टिपिकल हाफ बुशशर्टमधला चाकरमानी अवतार बघून पुढं तो असामान्य अभिनेता होईल आणि जगभरात त्याचे लाखो फॅन्स निर्माण होतील, याची तेव्हा सुतरामही शक्‍यता वाटली नव्हती; पण तसं झालं खरं!

नेमकी तारीख सांगायची, तर १९ फेब्रुवारी १९६९ रोजी अमिताभनं अवघ्या पाच हजार रुपयांत के. ए. अब्बास यांचा ‘सात हिंदुस्थानी’ साइन केला. तेव्हापासूनची त्याची फिल्मी कारकिर्द आणि आज तो ज्या अत्युच्च पदावर विराजमान झालाय तिथपर्यंतचे सगळे चढउतार, यशापयश स्वप्नवत. डाव्या विचारसरणीचे ख्वाजा अहमद अब्बास यांनी निर्मिलेले सगळे चित्रपट तसे ऑफबिट आणि पचायला जड. ‘सात हिंदुस्थानी’ही वेगळा नव्हताच. १९७०च्या मार्च महिन्यात गिरगावातल्या सेंट्रल टॉकीजला तो प्रदर्शित झाला, तेव्हा चित्रपटगृहाच्या आवारात चिटपाखरूही दिसलं नव्हतं. पाठोपाठ हृषिकेश मुखर्जी यांचा ‘आनंद’ झळकला. त्यातला बाबुमोशाय ‘मौत तू एक कविता है...’ असं आपल्या खर्जातल्या आवाजात वाचन करू लागतो, तेव्हा प्रेक्षक थरारले. त्याच्या आवाजानं भारून गेले; मात्र हितशत्रूंनी नाकं मुरडत ‘या किडकिडीत, ताडमाड उंचीच्या नटाकडं दुसरं आहेच काय,’ असाही सूर लावला. गंमत बघा. सुनील दत्तनं त्याला ‘रेश्‍मा और शेरा’मध्ये घेतल्यावर या पोराची डायलॉगबाजी आपल्याला डोईजड होईल, या भीतीपोटी त्याला मुकं बनवून टाकलं. चित्रपट चालला नाही; पण अमिताभनं अभिनयाच्या बळावर त्याच हितशत्रूंची बोलती बंद करून टाकली.

मेहमूदच्या ‘बाँबे टू गोवा’चा थोडाफार अपवाद वगळता अमिताभचे सगळे चित्रपट एकापाठोपाठ एक धडाधडा कोसळत होते. ‘फ्लॉप हिरो’ असं कपाळावर लेबल चिकटवून इंडस्ट्रीत मान खाली घालून वावरणाऱ्या अमिताभच्या त्या काळातल्या दोन अपमानास्पद घटना इथं मुद्दाम सांगाव्याशा वाटतात. निर्माते ओ. पी. रल्हन यांनी ‘बंधे हाथ’ सेटवर नेला, तेव्हा नायकाची निवड करण्यासाठी रल्हनसाहेबांच्या ऑफिसमध्ये चर्चा सुरू झाली. युनिटमधलं कुणीतरी मध्येच बोलून गेलं ः ‘‘अमिताभ बच्चन कैसा रहेगा?’’ त्याच क्षणी खुर्चीत बसलेले रल्हन उसळून म्हणाले ः ‘‘कौन अमिताभ? जिसकी टांगे गर्दनसे सुरू होती है वो?’’ आणि एकच खसखस पिकली. मात्र, कसं कोण जाणे, अमिताभची नायक म्हणून वर्णी लागली. दुसरीकडं तो रेखासमवेत ‘दुनिया का मेला’मध्ये काम करीत असताना त्याचं चार-पाच रिळाचं शूटिंगही पार पडलं. शिवाय त्यातलं ‘ये चेहरा ये जुल्के जुल्फे, जादूसा कर रहे है...’ हे रफी-लताचं द्वंद्वगीतही त्या दोघांवर चित्रित करण्यात आलं; पण नंतर वितरकांनी निर्मात्याला ‘या फ्लॉप हिरोला बदला,’ असा आग्रह धरला आणि तिथं संजय खान आला.

‘जंजीर’मुळं कायापालट
प्रकाश मेहरा यांच्या ‘जंजीर’मुळं अमिताभचा कायापालट झाला. सलीम-जावेद यांनीच त्याच्या नावाची शिफारस केली होती. मागं एकदा जावेद अख्तर यांच्या घरी त्याच्या मुलाखतीसाठी जाण्याचा योग आला, तेव्हा अमिताभचा विषय निघाल्यावर मुद्दाम त्या गोष्टीची शहानिशा करून घेतली. जावेद त्यावेळी म्हणाले होते ः ‘‘मी त्याचं नाव सुचवलं हे खरंय! पण त्याहीपेक्षा जेव्हा मी त्याला ‘जंजीर’चं संपूर्ण स्क्रीप्ट वाचून दाखवलं, तेव्हा अमिताभनंच मला उलटा प्रश्‍न केला होता ः ‘ही भूमिका मी करू शकेन असं वाटतं तुला?’ मी त्याला तशी खात्री दिली.’’ नैराश्‍यामुळं होतकरू माणसाचाही आत्मविश्‍वास कसा डळमळीत होतो याचं हे उत्तम उदाहरण ठरावं. अर्थात नेमकी याच चित्रपटात अमिताभची ‘अँग्री यंग मॅन’ ही इमेज प्रस्थापित झाली. रागानं उसळणारा तडफदार युवक त्यानं पडद्यावर जिवंत केला. त्याचा त्वेष, त्याची तडफड आणि उफाळून येणारा जोश यात कमालीचा नैसर्गिकपणा दिसतो. ‘अदालत’मध्ये बहिणीच्या मृतदेहाजवळ चेहरा नेला असताना त्यानं केलेला मुद्राभिनय आठवून बघा. तोंडून एक शब्दही नाही; मात्र चेहरा त्वेषानं नुसता फुलून आलेला. ‘नमकहराम’मध्ये रागानं डोळे फिरवत जबरदस्त आवाजात त्यानं टाकलेल्या ‘कौन है वो माई का लाल जिसने सोमू पर हाथ उठाया..’ या संवादाला चित्रपटगृहात उत्स्फूर्तपणे दाद दिली गेली. वाढलेली दाढी, गुंड्या तुटलेला फाटका शर्ट, मळकट पॅंट, विस्कटलेले केस, तारवटलेले डोळे, भेदक नजर आणि खर्जातल्या आवाजात केलेली तुफान डायलॉगबाजी यामुळे तो परफेक्‍ट ‘अँग्री यंग मॅन’ ठरला.

अन्यायाचा सूड केंद्रस्थानी
अमिताभनं हृषिकेश मुखर्जी यांच्याकडं केलेले चित्रपट वगळता त्याच्या चित्रपटात नायिकेला नेहमीच गौण स्थान मिळालं. त्याच्या चित्रपटाचा मुख्य हेतू सामाजिक अन्याय हाच राहिला. मात्र, त्याच्या चित्रपटातली ‘आई’ नेहमीच सर्वश्रेष्ठ ठरली. वैयक्तिक आयुष्यातही अमिताभनं भलेही आपल्या वडिलांचा आदर केला; परंतु आईची कायम पूजाच केली. त्यामुळंच केबीसीच्या मागं होऊन गेलेल्या एका पर्वात कुठल्याशा स्पर्धकाशी संवाद साधताना तो भावुकतेनं बोलून गेला होता ः ‘मां का स्थान तो भगवान से भी उँचा होता है!’ ‘त्रिशूल’मध्ये तो हाणामारी करण्यासाठी थेट ॲम्ब्युलन्सच घेऊन जातो खरा; पण त्यातही आपल्या आईवर झालेल्या अन्यायाचा त्यानं घेतलेला सूडच होता. काळाच्या ओघात त्याच्या सुडाचं स्वरूप बदललं; पण अन्यायाशी लढा तोच राहिला. ‘वजीर’, ‘पिंक’, ‘तीन’ ही त्यातलीच उदाहरणं.

दुसरीकडं या मनस्वी कलाकारानं ‘कभीकभी’, ‘चुपकेचुपके’, ‘अभिमान’, ‘मंझिल’, ‘बेनाम’, ‘जुर्माना’ अशा असंख्य चित्रपटांतून तितक्‍याच तन्मयतेनं हलक्‍याफुलक्‍या, नर्म विनोदी व्यक्तिरेखाही प्रभावीपणे साकारल्या. अलीकडच्या काळातील त्याचे ‘बागबाँ’, ‘पा’, ‘पिकू’सारखे विविधढंगी चित्रपट बघताना त्याच्या अफाट आवाक्‍याची कल्पना येते. माणसातल्या सुप्त भावनांचा उद्रेक अत्यंत लढाऊ बाण्यानं पडद्यावर पेश करणाऱ्या अमिताभचे ‘कुली’नंतर आलेले ‘मर्द’, ‘जादुगर’, ‘तुफान’, ‘मै आझाद हूँ’ वगैरे चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर कोसळले. त्याला त्याची ‘लार्जर दॅन लाइफ’ ही बेगडी इमेज कारणीभूत ठरली. हा अमिताभ सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडचा होता. जबरदस्त अभिनयक्षमता असलेल्या या गुणी अभिनेत्यावर अशी वेळ यावी, हे त्याचं दुर्दैवच म्हणायला हवं. त्यामुळंच कदाचित सोशल मीडियावर ट्‌विटरद्वारे सतत ॲक्‍टिव्ह असलेल्या या कलाकारानं अलीकडेच अतिशय विनम्रपणे ट्‌विट केलं होतं ः ‘अजूनही काही जण मला अभिनेता समजतात.’

मूर्तिमंत सुसंस्कृतपणा
सुसंस्कृतपणा हा अमिताभचा मोठा गुणविशेष मानावा लागेल. समोरची व्यक्ती कितीही सामान्य असली, तरी तिचा आदर राखणं, आपली प्रतिमा, प्रभाव या गोष्टींचा वापर करून त्या व्यक्तीवर कुरघोडी करणं तर त्याला कधी जमलंच नाही. माणेक इराणीसारखा सामान्य स्टंटमन त्याचा ‘मजबूर’पासूनचा हाणामारीतला डुप्लिकेट. सांगून खरं वाटणार नाही; पण अनेकदा तो सेटवर हजर असतानाही अमिताभ कितीतरी धाडसाची जीवघेणी दृश्‍यं स्वतःच करायचा आणि वर फाइट कंपोजरला म्हणायचा ः ‘‘माणिकचं मीटर चालूच राहू द्या. मी या सीनमध्ये डुप्लिकेट घेत नाही.’’ त्याचा सोशिकपणा तर मानावा लागेल. ‘कुली’च्या वेळी गंभीर अपघात झाल्यावर त्याला बेंगळुरूच्या सेंट फिलेमिना या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथंसुद्धा ‘‘माझ्यामुळं तुम्हा सर्वांचा किती खोळंबा होतोय याचं मला खूप वाईट वाटतंय,’’ असं युनिटमधल्या माणसांना तो म्हणत होता. नंतर त्याला मुंबईच्या ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. त्यावेळी सगळी फिल्म इंडस्ट्री तिथं लोटली. तिथल्या व्हिजिटर्स बुकमधल्या काही नोंदीच त्याच्या चांगुलपणाची साक्ष पटवतात. प्रकाश मेहरा त्यात लिहून गेला ः ‘आस्क फॉर एनी मेडिसीन इन द वर्ल्ड.’ अमजद खाननं तर स्वतःचा फोननंबर दिला ः ‘डायल माय नंबर फॉर एनी अमाऊंट.’

सततचा संघर्ष
माणसानं आयुष्यात कितीही मानमरातब, पैसा, प्रतिष्ठा संपादन केली, तरी संघर्ष त्याचा पाठलाग सोडत नाही हेच खरं! ‘कुली’च्या वेळीही अमिताभला असाच जीवन-मृत्यूशी संघर्ष करावा लागला होता. अर्थात तो त्याच्या पाचवीलाच पुजला होता, असं म्हणणं अधिक सयुक्तिक ठरेल. कारण हृषिदांच्या ‘आनंद’चं शूटिंग अंधेरीच्या मोहन स्टुडिओत चाललेलं असताना राजेश खन्नाभोवती सदैव गराडा पडलेला असे आणि अमिताभ मात्र मुकाट्यानं आपले शॉट्‌स संपल्यावर बाहेर येऊन टॅक्‍सीची वाट बघायचा. तेच कशाला, मुंबईच्या फोर्ट विभागात भर पावसात शूट झालेल्या ‘रिमझिम गिरे सावन...’ या ‘मंझिल’मधल्या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी तरी त्याच्याकडं स्वतःची गाडी कुठं होती? चित्रीकरण संपल्यावर त्याचा भाऊ गाडी घेऊन यायचा, अशी आठवण खुद्द मौसमी चटर्जीनंच एकदा सांगितली होती. मध्यंतरीच्या काळात त्याच्याकडं म्हणे एकही चित्रपट नव्हता. काहीच काम नसलेल्या अमिताभला त्याच्यातल्या कलाकार स्वस्थ बसू देईना. मग एका कातरवेळी तो हळूच यश चोप्रा यांच्या दारी गेला आणि त्यांना एखादा चित्रपट देण्याची विनंती केली होती.

आज अवघं पाऊणशे वयोमान असलेला हा महानायक सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून यशाच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान झालाय. सगळे त्याला आदरानं ‘बिग बी’, ‘बच्चनसाब’ म्हणतात; परंतु आपल्यासारख्या सर्वसामान्य रसिक प्रेक्षकांसाठी तो फक्त अमिताभच आहे. आपल्या सुप्त भावनांना पडद्यावर मोकळी वाट करून देणारा....आणि वास्तव जीवनात? अलीकडंच काही वर्षांपूर्वी जुहूच्या एका आलिशान हॉटेलातल्या दिमाखदार सोहळ्याला सपत्नीक हजर राहण्याचा योग आला होता. सेलिब्रिटींच्या त्या गोतावळ्यात समारंभाचे आयोजक अमिताभला प्रत्येक उपस्थिताजवळ नेत होते आणि हा प्रत्येकाला आदबीनं नमस्कार करत होता. त्याच्यामागं माणसांची केवढी तरी गर्दी; मात्र तो प्रत्यक्ष आमच्यासमोर उभं राहून आम्हालाच नमस्कार करू लागला. त्या अविस्मरणीय प्रसंगी त्यानंच म्हटलेला तो डायलॉग मनात चमकून गेला ः ‘हम जहाँ खडे होते है, लाइन वही से शुरू होती है!’

Web Title: Marathi News Sakal saptranga esakal amitabh bachchan