ये लाल रंग... (आश्विनी देशपांडे)

आश्विनी देशपांडे
रविवार, 9 जुलै 2017

रंग आपल्याला काही तरी सांगू इच्छित असतात, काही संदेश-संकेत देऊ इच्छित असतात. त्यामुळं एखाद्या ब्रॅंडचा रंग ठरवतानाचा निर्णय हा अतिशय महत्त्वपूर्ण असतो आणि तो काळजीपूर्वकच घ्यावा लागतो. सकाळपासून रात्रीपर्यंत आपण शेकडो ब्रॅंड्‌सच्या संपर्कात येत असतो. जर काळजीपूर्वक विचार करून पाहिलं, तर लक्षात येईल की यातले ७०-८० टक्के ब्रॅंड लाल रंगात झळकत असतात. 

रंगसंगती हा सगळ्यांच्याच आवडीचा विषय. प्रत्येक व्यक्तीची रंगाबाबत स्वतःची अशी आवड-निवड असते. त्यानुसार व्यावसायिक आणि खासगी आयुष्यात अनेक निर्णय कळत-नकळत घेतले जातात. आज नेमक्‍या कोणत्या रंगाचे कपडे घालायचे इथपासून ते प्रेझेंटेशन स्लाईड कोणत्या रंगात बनवायची किंवा घराला कोणता रंग द्यायचा इथपासून ते गाडी कोणत्या रंगाची घ्यायची इथपर्यंत असंख्य निर्णय रोज घेतले जातात.

एखादी प्रतिमा जेव्हा समोर येते तेव्हा १) रंग, २) आकार, ३) चित्र, आणि ४) शब्द या क्रमानं तिचं अवलोकन होत असतं. त्यानुसार रंग हा डिझाइनच्या क्षेत्रात किती मोठा विषय असावा, याची कल्पना करता येईल.

रंगाबाबत निर्णय घेणं ही एक शास्त्रीय प्रक्रिया आहे. वैज्ञानिक, मानसशास्त्रीय, तर्कशुद्ध अशी ही प्रक्रिया डिझायनर्स अभ्यासपूर्वक शिकतात आणि अनुभवानुसार कमी-जास्त प्रमाणात ती प्रत्येक निर्णयासाठी वापरतात. मानसशास्त्रानुसार संस्कृती, हवामान, पर्यावरण, राजकीय वातावरण, आर्थिक आणि सामाजिक बदल, तंत्रज्ञानातली प्रगती या सगळ्यांचाच परिणाम आपल्या आवडींवर होत असतो.
पूर्वेकडच्या देशांत जे रंग आवडतील किंवा स्वीकारले जातील, ते पाश्‍चात्य देशांत त्याच कारणांसाठी आवडतील असं नाही. याचं कारण, दोन संस्कृती अगदी भिन्न आहेत. इतकंच नव्हे तर, सूर्याच्या दिशेनुसार, अंतरानुसार एकच रंग जगाच्या दोन टोकांवर मानवी डोळ्यांना वेगवेगळाही दिसू शकतो! 

आवडी-निवडी भिन्न असू शकतात; मात्र प्रत्येक व्यक्तीसाठी वस्तू किंवा ब्रॅंड्‌स वेगवेगळा रंग तर परिधान करू शकत नाहीत. त्यामुळं डिझायनर्ससमोर हा कठीण निर्णय घेण्याची वेळ वारंवार येते. एखादं प्रॉडक्‍ट दोन-तीन किंवा फार फार तर पाच-सहा रंगांत उपलब्ध करता येऊ शकतं, तसंच ब्रॅंडची एकच आणि पक्की ओळख राहावी म्हणून बहुतेक ब्रॅंड एकच रंगसंगती ठेवणं पसंत करतात. त्यामुळं हा रंगाविषयीचा निर्णय अतिशय महत्त्वाचा मानला जातो. 

मानवी दृष्टीला सहज दिसू शकणारे प्राथमिक रंग म्हणजे लाल, पिवळा आणि निळा. हे तीन रंग एकमेकांत मिसळण्यातून नारिंगी, हिरवा आणि जांभळा हे दुय्यम रंग तयार होतात. हे रंग एका चक्रात सादर करण्याची कल्पना न्यूटन या थोर शास्त्रज्ञाची. रंगचक्र पाहिलं तर शेजारी असणारे रंग एकमेकांना पूरक असतात आणि समोरासमोर असणारे रंग विरोधाभास निर्माण करत असतात. जेव्हा सहजच ही रंगसंगती ‘उठून’ दिसते आहे असं वाटतं, तेव्हा परस्परविरोधी रंग एकत्र वापरल्यामुळं जो काँट्रास्ट किंवा फरक दृष्टीला जाणवतो, त्याची ती पावती असते. 

विम्बल्डन स्पर्धेत वापरले जाणारे हिरवा आणि जांभळा हे रंग परस्परविरोधी असल्यामुळं संस्मरणीय ठरतात. ICICI बॅंकेची नारिंगी- गडद लाल पट्टी निळ्या रंगाबरोबर योग्य काँट्रास्ट दाखवते आणि पेप्सीचा लाल-निळा रंगही याच विरोधाभासामुळं स्पष्टपणे लक्षात राहतो. 

प्रत्येक रंगाबाबत एक खास सिद्धान्त आहे आणि त्यानुसार त्या त्या रंगाचा वापर विशिष्ट भावना किंवा कल्पना व्यक्त करण्यासाठी केला जातो. डिझाइनच्या संदर्भातले निर्णय हे नेमकी कोणती भावना जागृत करण्यासाठी कोणता रंग वापरायचा, यानुसार घेतले जातात.

अथांग सागर किंवा आभाळाचा निळा रंग शांत, विश्वसनीय आणि परिणामकारक मानला जातो. एका जागतिक पाहणीत आवडता रंग विचारला तर निळ्या रंगाचं प्रमाण ३३ टक्‍क्‍यांहून अधिक उत्तरांमध्ये आढळून आलं होतं. दुसरा कोणताही रंग निळ्या रंगाएवढा लोकप्रिय नाही. 

बाजारात स्वच्छ, शुद्ध, निर्मळ, ताजेतवाने दिसू इच्छिणारे ब्रॅंड्‌स निळ्या रंगाचा वापर करून विशिष्ट संदेश देण्याच्या प्रयत्नात असतात. भारतात बिस्लेरी या पाण्याच्या ब्रॅंडनं निळ्या रंगाच्या लेबलद्वारे आपली विश्वासार्हता प्रकट केली होती. मात्र, जसजशी इतर ब्रॅंड्‌सची गर्दी निळ्याच रंगात व्हायला लागली, तेव्हा या अग्रगण्य ब्रॅंडला योग्य मूल्य सांगणारा दुसरा रंग शोधण्याची गरज निर्माण झाली. मग बिस्लेरीनं आपलं पॅकेजिंग नव्या आणि आल्हाददायक अशा चिंतामणी रंगात करायचं ठरवलं. हा रंग इतर ब्रॅंड्‌सपेक्षा वेगळा तर होताच; शिवाय निर्मळ आणि विश्वासार्हही होता. तो किंवा त्याच्याजवळचा रंग दुसऱ्या ब्रॅंडनं वापरणं म्हणजे स्पष्टपणे कॉपी करणं होईल म्हणूनच गेली कित्येक वर्ष बिस्लेरी आपल्या वेगळेपणावर अढळ आहे. 

प्राथमिक समजला जाणारा दुसरा रंग म्हणजे पिवळा. सूर्यप्रकाशातून आलेला हा रंग उबदार, चमकदार आणि आशादायी समजला जातो. आनंददायी, उत्स्फूर्त, चैतन्यदायी आणि जोमदार भावना व्यक्त करण्यासाठी पिवळ्या, सोनेरी रंगाचा वापर केला जातो. 
व्हॉट्‌सॲप आणि फेसबुकमध्ये सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या इमोजींमध्ये किंवा संकेतचिन्हांमध्ये स्मायली म्हणजेच हसरा चेहरा हा तेजस्वी अशा पिवळ्या रंगाचाच असतो. तो स्मायली म्हणजे जणू पिवळ्या रंगात व्यक्त करता येणाऱ्या भावनांचं प्रतीकच म्हणता येईल. 

तिसरा आणि सगळ्यात जास्त वापरला जाणारा प्राथमिक रंग म्हणजे लाल. लाल रंगाची वेव्हलेन्थ म्हणजेच परावर्तित होणारी लहर ही अतिशय प्रखर असते. त्यामुळं लाल रंग अतिशय दुरून, कमी प्रकाशात, गर्दीत स्पष्ट आणि सहज सापडतो. सहज नजरेस पडतो. याच कारणामुळं प्रत्येक प्रकारच्या श्रेणीच्या आणि उपयुक्ततेच्या ब्रॅंड-लोगोसाठी लाल रंग हा प्रचंड प्रमाणात वापरला जातो. धोक्‍याची सूचना किंवा ‘थांबा’ हा संकेत लाल दिव्यांनी दिला जातो, तसंच रक्त, अग्नी, क्रांती आणि आक्रमकता या सगळ्यांचाच रंग लाल! 

सकाळपासून रात्रीपर्यंत आपण शेकडो ब्रॅंड्‌सच्या संपर्कात येतो. जर काळजीपूर्वक विचार करून पाहिलं, तर लक्षात येईल की यातले ७०-८० टक्के ब्रॅंड लाल रंगात झळकत असतात. 

प्राथमिक रंग हे तेजस्वी आणि लक्षणीय असल्यामुळं त्यांचा वापर लक्ष वेधण्यासाठी केला जाणं साहजिक आहे; पण या रंगांचा वापर मोठ्या पृष्ठभागावर म्हणजे इमारतींवर सहसा केला जात नाही. मोठ्या आकाराची प्रॉडक्‍ट्‌स सहसा दुय्यम रंगांमध्ये सादर केली जातात. राखाडी, फिकट तपकिरी, हलका पांढरा, चंदेरी असे न्यूट्रल किंवा तटस्थ रंग डोळ्यात भरू नयेत अशा वस्तूंसाठी वापरले जातात. उदाहरणार्थ ः कॉम्प्युटर्स, प्रिंटर्स, स्वयंपाकघरातली उपकरणं इत्यादी. याच कारण असं, की त्यांच्या रंगामुळं कामात व्यत्यय येऊ नये. 

घरातली आणि ऑफिसची रंगसंगती त्या त्या जागी कशा प्रकारची राहणी किंवा कार्यक्षमता गरजेची असेल, त्यानुसार ठरवली जाते. सजग होऊन पाहिलं, तर निसर्गातले आणि मानवनिर्मित रंग प्रत्येक ठिकाणी आपल्याला काहीतरी संदेश देत असतात आणि त्यातून आयुष्य रंगतदार होऊ शकतं! 

(लेखात प्रसिद्ध करण्यात आलेले लोगो प्रातिनिधिक असून, त्यांच्यावर लेखिकेचा अथवा प्रकाशकांचा कोणताही अधिकार नाही.)

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Marathi News Sakal saptranga esakal Ashwini Deshpande Elephant Design