परिवर्तनासाठी डिझाइन-विचारसरणी (आश्विनी देशपांडे)

आश्विनी देशपांडे
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

‘परिवर्तनासाठी डिझाइन-विचारसरणी’ या सूत्राचा प्रसार करण्यासाठी एक माध्यम म्हणून २००९ मध्ये Design for Change या स्पर्धेची सुरवात करण्यात आली. डिझाइन-विचारसरणी कशा प्रकारचं परिवर्तन घडवून आणू शकते, याचं ही स्पर्धा म्हणजे जागतिक पातळीवरचं उदाहरण बनली आहे. एकमेकांविषयीची आस्था, कल्पनाशक्ती आणि स्वतः पुढाकार घेण्याचं बळ ज्या पिढीला मिळालेलं आहे, ती एक मोठा सकारात्मक बदल नक्कीच घडवून आणू शकेल.

डि  झाइन-प्रक्रियेचा समावेश असंख्य क्षेत्रांत होतो. सेवा, उपकरणं, तंत्रज्ञान सुबक, सुरक्षित होण्यासाठी, तसंच माहिती आणि रचना सुशोभित, सुलभ होण्यासाठी डिझाइन व्यापक प्रमाणात वापरलं जातं. या ठिकाणी परिणामकारक बदल योग्य वेळात, योग्य खर्चात शक्‍य व्हावा म्हणून प्रशिक्षित, अनुभवी डिझाइन-टीम आवश्‍यक असते.
डिझाइनच्या प्रशिक्षणात तीन महत्त्वाच्या भागांचा समावेश असतो. पहिला भाग म्हणजे व्यक्ती आणि समस्यांविषयीची आस्था. ज्या व्यक्तिगटांसाठी डिझाइन-प्रक्रिया वापरली जाणार आहे, त्या गटांच्या आयुष्यात खोलवर डोकावून समस्येचा गाभा समजून घेण्याची परिपूर्ण क्षमता हा या शिक्षणाचा पाया म्हणता येईल. समजून घेतलेली समस्या कल्पकरीत्या सोडवण्यासाठी लागणारी सर्जनशीलता हा दुसरा महत्त्वाचा भाग.

कल्पनाशक्ती प्रत्येकाकडं उपजतच असते; पण कल्पनारंजनात न अडकता वेगळेपणा आणि व्यवहार्यता यांचा समतोल साधून कल्पना मांडण्याचं कौशल्य हे या शिक्षणाचे स्तंभ मानता येतील. या कल्पना रेखाचित्राद्वारे अथवा त्रिमितीत स्पष्टपणे व्यक्त करण्याचं कौशल्य आणि त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्‍यक असलेलं तंत्रज्ञान, चातुर्य आणि सामाजिक जाणीव हा डिझाइनच्या शिक्षणाचा कळस म्हणता येईल. अनेकदा केवळ हा कळस म्हणजेच डिझाइन अशी गैरसमजूत दिसून येते. चित्रकला, संभाषणकला ही कौशल्यं महत्त्वाची आहेत; पण ती नसली तरी केवळ डिझाइन-विचारसरणी वापरून मोठ्या प्रमाणात सकारात्मक परिवर्तन घडणं, घडवणं शक्‍य आहे. राष्ट्रीय डिझाइन संस्थेत (NID) शिक्षण घेऊन काही वर्षं व्यावसायिक प्रवास केल्यानंतर किरण बीर सेठी या माझ्या वर्गमैत्रिणीला काही मूलभूत परिवर्तन करण्याची तळमळ अस्वस्थ करत होती. स्वतःची मुलं ज्या प्रकारच्या साचेबंद शिक्षणातून जाताना ती पाहत होती, त्यामुळं या अस्वस्थतेत भर पडत होती. शालेय शिक्षणाचा उद्देश सकस मानसिक आणि शारीरिक वाढ हा असावा, असं तिचं मत होतं. मात्र, परीक्षा, मार्क, ग्रेड या चक्रात ज्ञानावर, वाढीवर लक्ष केंद्रित केलं जात नाही, असं तिला जाणवत होतं.

सन २००१ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर तिनी Riverside ही शाळा अहमदाबाद इथं सुरू केली. केवळ मुलांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करून, ‘चांगलं केल्यानं चांगलं होतं’ अशी विचारसरणी बाळगून आणि डिझाइनच्या विचारसरणीवर आधारित अभ्यासक्रमानुसार ही शाळा चालते. पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडं प्रत्यक्ष अनुभव घेऊन मुलांनी शिक्षण आत्मसात करावं, असा दृष्टिकोन या शाळेत राबवला जातो. जसजसे या आगळ्यावेगळ्या अभ्यासक्रमाचे सकारात्मक परिणाम मुलांमध्ये दिसायला लागले, तसतसे किरणच्या मनात पुढच्या टप्प्याचे विचार सुरू झाले. Riverside या शाळेत येणारी मुलं उच्चभ्रू वर्गातली होती. त्यांना डिझाइन-विचारसरणीवर आधारित Learning by Doing या तत्त्वाचा फायदा निश्‍चित माहीत होता. त्यामुळं त्यांच्यात आस्थाभाव वाढत होता. स्वतःच्या समस्या ओळखून त्या स्वतः सोडवण्याकडंही त्यांचा कल होता. हाच फायदा देशातल्या सगळ्या लहान मुलांना कसा मिळेल, यावर विचार सुरू होता. प्रत्येक शाळेत या विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी एक माध्यम  म्हणून २००९ मध्ये Design for Change या स्पर्धेची सुरवात किरण हिनं केली. ‘परिवर्तनासाठी डिझाइन-विचारसरणी’ अशी संकल्पना होती. त्याअंतर्गत माध्यमिक शाळेतल्या मुलांनी स्वतःच्या अनुभवातून निरीक्षण करून छोट्या-मोठ्या समस्या सुस्पष्ट कराव्यात, उपजत कल्पनाशक्तीचा वापर करून त्या समस्यांवर उपाय शोधावेत आणि सोप्या रीतीनं ते उपाय प्रत्यक्षात आणून स्वतः अनुभवलेली समस्या स्वतःच सोडवावी असं एकंदरीत या संकल्पनेचं स्वरूप होतं, आवाका होता.  
डिझाइन-विचारसरणीच्या प्रसाराचं माध्यम म्हणून लावलेलं हे स्पर्धेचं रोपटं झपाट्यानं पाळंमुळं धरू लागलं. या अभिनव उपक्रमाला देशांतर्गत आणि जागतिक पुरस्कार मिळू लागले. निधी मिळू लागला आणि स्वयंसेवकही या उपक्रमाशी जोडले जाऊ लागले आहेत.

केवळ भारतातलीच नव्हे, तर तब्बल ५० देशांतली मुलं या स्पर्धेत भाग घेतात. छोट्या खेड्यातल्या सरकारी शाळांपासून ते महानगरातल्या प्रख्यात शाळांपर्यंत सगळ्या ठिकाणांहून हजारो मुलं या स्पर्धेत भाग घेऊन आपापल्या समस्या सोडवण्यात कुशल होत आहेत. आजपर्यंत सुमारे दहा हजारांहून अधिक अतिशय  वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आणि त्या सोडवण्यासाठी मुलांनी शोधलेले उपाय पुढं आले आहेत. हा महावृक्ष जोमानं पसरतो आहे. यातल्या दोन-तीन गोष्टी तुमच्यापुढं ठेवते, म्हणजे या प्रकल्पाचा साधेपणा आणि तरीही त्याचा असलेला प्रचंड आवाका लक्षात येईल. 

महाराष्ट्रातल्या भोईसर गावातल्या ‘चिन्मय विद्यालया’ची ही गोष्ट आहे २०१२ मधली. 

आपल्याला कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे, याचा विचार करायला जेव्हा मुलांनी सुरवात केली, तेव्हा त्यांना एक समस्या जाणवली व ती म्हणजे स्थानिक दुकानात स्टेशनरीचा वारंवार असणार तुटवडा. या समस्येमुळं मुलांना गृहपाठ करायला अनेक वेळा उशीर व्हायचा किंवा कधी कधी तर विज्ञानविषयक प्रकल्प किंवा भूगोलाचे नकाशे त्यांना वेळेवर पूर्ण करता येत नसत. यावर काय उपाय करता येईल याचा एकत्रित विचार केला तेव्हा काही कल्पना पुढं आल्या. मात्र, मुलांचा भर समस्या स्वतः सोडवण्यावर होता. तेव्हा त्यांनी पुढाकार घेऊन नेहमी लागणाऱ्या स्टेशनरीचं एक छोटंसं केंद्रच शाळेत उघडायचा निर्णय घेतला. ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर मुलांनी मुलांसाठी हे केंद्र चालवण्याची जबाबदारी उचलली. यामुळं त्यांना मालाचा आणि पैशाचा हिशेब ठेवण्याचं शिक्षण मिळत गेलं आणि या बाबी हाताळण्याचं भानही आलं. सहकायांनं एखादी समस्या सुटू शकते, असा विश्वास आला आणि अर्थातच गृहपाठ किंवा भूगोलाचा प्रकल्प नेहमीच वेळेवर पूर्ण होऊ लागला. 
दुसरी कहाणी आहे महाराष्ट्रातल्याच ‘के. सी. ठाकरे विद्या निकेतन’मधली. या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी एक अतिशय संवेदनशील समस्या पुढं आणली. ती म्हणजे शाळेतलं वातावरण सुरक्षित बनवण्याची. गुंडगिरी, दादागिरी, मारामारीच्या घटना शाळेत घडल्याच्या बातम्या अनेकदा कानावर येत असतात; पण या समस्यांचा व्यापक स्वरूपात आणि खोलात जाऊन विचार होत नाही.

त्या त्या वेळी एकतर शिक्षक पुढं येऊन भांडणं सोडवतात किंवा जो विद्यार्थी कमकुवत असेल तो मार खाऊन, मनात अपमानाची, अपयशाची भावना ठेवून घरी जातो. या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी ही समस्या मुळापासून सोडवण्याचा निर्धार केला. त्यासाठी वर्गात एकमेकांच्या बरोबर संवाद साधणं, सुख-दुःख वाटून घेणं, एकंदरीत आनंदी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करणं, जे गुंडगिरी करतात त्यांचं शिक्षकांबरोबर समुपदेशन करणं, ज्यांना त्रास दिला जातो त्यांच्याबरोबर राहणं, त्यांना धीर देणं अशा अनेक प्रकारे ही समस्या सोडवण्याचे प्रयत्न विद्यार्थ्यांनी  सुरू ठेवले. इतकंच नव्हे तर, एक न्यायासनपद्धत सुरू करून गुंडगिरी करणाऱ्या आणि ती सोसावी लागणाऱ्या मुलांना शिक्षकांच्या समोर आणून योग्य वर्तवणुकीबाबतचा सल्ला दिला गेला  आणि चर्चाही घडवून आणण्यात आल्या. २३ मुला-मुलींनी एकत्र येऊन हा त्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सातत्यानं सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आलंच, शिवाय सामोपचार, नीतिमूल्यं, चिकाटी, संभाषणकला यांत प्रावीण्य मिळवण्यासारखे अनेक फायदेही झाले. 

प्लास्टिकच्या बाटल्या वापरून बांधलेलं कुंपण, शाळेचा परिसर सुशोभित करून केलेलं वृक्षारोपण, स्वच्छतागृहांची बांधणी, वर्गाबाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षित राहाव्यात म्हणून केलेली युक्ती, अपंग वर्गमित्राला पायऱ्यांचा त्रास होऊ नये यासाठीची कल्पना अशा अनेक गोष्टी designforchange.org वर वाचायला मिळतील. 

आता ही स्पर्धा म्हणजे डिझाइन-विचारसरणी कशा प्रकारचं परिवर्तन घडवू शकते, याचं एक जागतिक उदाहरणझालेलं आहे. यापासून स्फूर्ती घेऊन यापुढंही लाखो मुलांचं भविष्य उज्ज्वल होण्याच्या मार्गावर आहे.

एकमेकांविषयीची आस्था, कल्पनाशक्ती आणि स्वतः पुढाकार घेण्याचं बळ ज्या पिढीला मिळालेलं आहे, ती एक मोठा सकारात्मक बदल नक्कीच घडवून आणू शकेल.

Web Title: Marathi News Sakal saptranga esakal Ashwini Deshpande Elephant Design