'पाणीदार' चंद्र (डाॅ. बाळ फोंडके)

डाॅ. बाळ फोंडके
रविवार, 30 जुलै 2017

मानवी वस्तीसाठी पृथ्वीच्या व्यतिरिक्त इतर कुठं शक्‍यता आहेत का, या प्रश्‍नाचं उत्तर शोधण्यासाठी शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. एका नव्या शोधामुळं त्या प्रयत्नांना एक सकारात्मक किनार मिळाली आहे. चंद्राच्या पृष्ठभागाच्या आत मुबलक प्रमाणात पाणी असण्याची शक्‍यता आहे, असं एक नवं संशोधन समोर आलं आहे. चंद्रावरचा भूभाग कोरडा आहे, अशी आतापर्यंत समजूत असताना या नव्या संशोधनाच्या ‘ओलाव्या’मुळं चैतन्य आलं आहे, यात शंकाच नाही. या संशोधनाचा नेमका अर्थ काय, चंद्रावरच्या पाण्याचा प्रत्यक्षात मानवाला उपयोग काय, पृथ्वीबाहेरच्या वसाहतीच्या शोधाला त्यामुळं काही नवीन आयाम मिळतील का आदी बाबींचं विश्‍लेषण.

चंद्र! केवळ आपल्या पृथ्वीचा एक उपग्रह; पण त्याच्या शीतल प्रकाशानं आणि दुधाळ चांदण्यानं मानवी मनावर भलतंच गारुड केलेलं आहे. म्हणूनच तर त्याला ‘चांदोबा’ किंवा ‘चंदामामा’ म्हणत लहानपणापासूनच त्याच्याशी भावनिक जवळीक साधण्याचीच धडपड मानवप्राणी करत आला आहे. तारुण्याच्या स्वप्नभारल्या काळात प्रियतमेला ‘चंद्रमुखी’ म्हणण्यात आणि प्रियतम जोडीदाराबरोबर आणाभाका घेताना त्या चंद्राचीच साक्ष काढण्यात कमालीचा आनंद अनुभवला जातो. कविमंडळींनी तर रोमांचक कल्पनांची भर घालत त्या आनंदाला उधाणच आणलं; पण माणसानं धरतीची नाळ सोडत अवकाशात झेप घेतली, प्रत्यक्ष चंद्रावर पाऊल ठेवण्यापर्यंत मजल मारली आणि चंद्राबद्दलच्या या मृदू भावनांना तडा जायला सुरवात झाली.

चंद्रावर स्वारी करण्यात यशस्वी झालेल्या चांद्रवीरांनी आणि मानवरहित यानातून त्या उपग्रहाचा वेध घेण्यासाठी पाठवलेल्या यंत्रांनी सादर केलेल्या छायाचित्रांनी भलताच झटका दिला. पावसाळ्यानंतरच्या दुर्दशा झालेल्या आपल्या रस्त्यांची आठवण करून देणारा तिथला खाचाखळग्यांनी भरलेला वैराण प्रदेश पाहून नाजूक भावनांचा कोळसा व्हायला लागला नसता तरच नवल!...म्हणूनच तर चंद्राच्या स्वरूपाविषयीच्या तोवर केलेल्या सर्व गोडगोड कल्पना मोडीत काढाव्याशा वाटू लागल्या.

मात्र, चंद्राच्या स्वरूपाविषयीच्या आपल्या मनातल्या चित्रात बदल करण्याची परत एकदा वेळ आली आहे. कारण वरवर राकट आणि ओबडधोबड दिसणाऱ्या नारळाच्या आत जसा चविष्ट पाण्याचा साठा मिळावा; तसंच वरवर ओसाड दिसणाऱ्या चंद्राचं अंतरंग नितळ पाण्यानं भरलेलं असल्याचं शुभवर्तमान अमेरिकेतल्या ब्राऊन विद्यापीठातल्या वैज्ञानिकांनी आणलं आहे. 

तसं पाहिलं तर चंद्रावर पाणी असावं, अशी शंका अर्धशतकापूर्वीच आली होती. ज्या नासाच्या मानवरहित यानांनी त्याच्या पृष्ठभागाची ती मनं झाकोळून टाकणारी छायाचित्रं आणली होती, त्यांनीच तिथल्या मातीचे काही नमुने गोळा करून परीक्षणासाठी आणले होते. त्या मातीतच काचेचे काही मणी मिळाले होते. त्या मण्यांमध्ये पाण्याचे काही अंश अडकून पडल्याचं दिसून आलं होतं. तरीही त्यापायी चंद्रावर पाणी असल्याचा ठाम निष्कर्ष काढायला वैज्ञानिक धजावले नव्हते. कोणतंही ठाम विधान करण्यापूर्वी साधकबाधक विचार करण्याची आणि म्हणूनच सावधगिरी बाळगण्याची त्यांच्या हाडीमाशी खिळलेली सवय याला कारणीभूत होतीच; पण तसा सावध पवित्रा घेण्याचं आणखी सयुक्तिक कारणही होतं. जे मातीचे नमुने आणले गेले होते, ते एकाच जागीचे आणि एकूण पृष्ठभागाच्या एका मामुली तुकड्यातून मिळवलेले होते. संपूर्ण पृष्ठभाग नसला, तरी त्याचा लक्षणीय हिस्सा तपासल्याशिवाय तिथं पाणी असल्याचा निष्कर्ष घाईघाईनं काढणं उतावीळपणाचं लक्षण ठरलं असतं. अर्थात तो विषय तसाच सोडून न देता त्याचा सखोल अभ्यास करण्याचा परिपाठ मात्र चालूच ठेवला गेला होता. 

आठ वर्षांपूर्वी पहिली चाहूल
त्या प्रयत्नांना पहिलं यश मिळालं ते आपल्याच चंद्रयानामुळं. नऊ वर्षांपूर्वी, नेमकं सांगायचं तर १८ नोव्हेंबर २००८ रोजी आपलं चंद्रयान चंद्राच्या पृष्ठभागापासून शंभर किलोमीटर अंतरावर पोचलं होतं. त्यावेळी यानानं एक खास उपकरण अलगद चंद्राच्या दिशेनं सोडून दिलं. आपण अलगद म्हटलं, तरी त्याच्यावर यानाच्या वेगाचा आणि चंद्राच्या गुरुत्त्वाकर्षणाचा प्रभाव जबरदस्तच होता. त्यापायी ते वेगानं चंद्राकडं झेपावलं होतं. तरीही चंद्राच्या पृष्ठभागावर जाऊन आदळण्यासाठी त्याला २५ मिनिटांचा वेळ लागलाच. या प्रवासात ते चंद्राभवतीच्या विरळ वातावरणातूनही गेलं.

त्या वातावरणात असलेल्या अणुकणांकडून सूर्यप्रकाश विखुरला जात होता. त्या विखुरलेल्या प्रकाशलहरींचं परीक्षण करून ते अणुकण कोणते याचा छडा लावता येत होता. त्यातूनच मग तिथं पाण्याचे घटक असलेले हायड्रॉक्‍सी आयन असल्याचा निःसंदिग्ध पुरावा हाती आला. अशी निरीक्षणं वारंवार नोंदली गेल्यामुळं त्या आयनांची उपस्थिती मर्यादित नसल्याचंही स्पष्ट झालं. त्यामुळंच मग चंद्रावर पाणी असल्याची दवंडी पिटली गेली. चंद्रयान मोहिमेच्या यशातला हा मानाचा तुरा ठरला. 

अर्थात तरीही मनातल्या शंका पार पिटाळून लावल्या गेल्या नव्हत्या. कारण ते पाणी सर्वत्र असलं, तरी मुबलक प्रमाणात आहे की काय या प्रश्नाचं उत्तर मिळालं नव्हतं. लुना २४ या सोव्हिएत रशियाच्या यानानं जे काही प्रयोग केले, त्यातून तिथल्या खडकांना चिकटून पाणी असल्याचं; पण त्याचं प्रमाण केवळ ०.१ टक्काच असल्याचं दिसून आलं होतं. म्हणजे या पाण्याचा एक पातळसा पापुद्राच चंद्रभर पसरलेला असावा असं वाटत होतं; पण चंद्राच्या उत्तर ध्रुवाजवळच्या घळींमध्ये गोठलेल्या रूपात जवळजवळ साठ कोटी मेट्रिक टन पाणी असावं असंही दिसून आलं होतं. त्यामुळं परत खरी परिस्थिती काय आहे, हा सवाल फणा काढून उभा राहिला होता. 

सखोल अभ्यासाची जोड
म्हणूनच मग अंतराळयानांनी उपलब्ध करून दिलेल्या छायाचित्रांचा; तसंच तिथल्या मातीच्या, दगडांच्या नमुन्यांचा अधिक व्यापक आणि सखोल अभ्यास हाती घेण्यात आला. सुरवातीला आणले गेलेले काचेचे मणी एकेकाळी तिथं जागृत असलेल्या ज्वालामुखींच्या परिसरातले होते. ज्वालामुखींच्या उद्रेकाच्या वेळी जो लाव्हारस बाहेर पडतो, तो थंड होऊन त्याचं स्फटिकांमध्ये रूपांतर होताना पाण्याची वाफही त्यात अडकून पडते. तीच त्या मण्यांमधल्या पाण्याच्या अंशाच्या रूपात दिसून आली होती; पण हे मणी त्या ज्वालामुखीच्या परिसरापुरतेच मर्यादित क्षेत्रात नसून सर्वत्र पसरलेले असल्याचं आता निश्‍चित झालं. त्याला चंद्रयानानं दिलेल्या पुराव्याची जोड मिळाली.
अर्थातच पाण्याच्या मोजमापाचंही पुनर्परीक्षण केलं गेलं. त्यातूनच मग तिथलं सगळं पाणी एकत्र केलं, तर दीड मीटर खोलीचा आणि संपूर्ण पृष्ठभाग व्यापून टाकू शकेल इतका विशाल सागर तिथं तयार होईल, असं निदान केलं गेलं. 

अर्थात हा झाला पृष्ठभागावरचा जलसाठा; पण आपल्या पृथ्वीवर पाणी पृष्ठभागावर सागरांच्या, नदीनाल्यांच्या रूपात पसरलेलं आहे, तसंच जमिनीखालीही त्याचे मुबलक साठे आहेत. तीच परिस्थिती चंद्रावर का असणार नाही, असा सवाल स्वतःलाच करत ब्राऊन विद्यापीठातल्या वैज्ञानिकांनी अंतराळयानांनी आणलेल्या तिथल्या खडकांच्या नमुन्याकडं आपली वेधक नजर वळवली. ज्वालामुखीच्या उद्रेकावेळी अंतरंगातून उफाळून आलेला लाव्हा म्हणजे उच्च तापमानाला तिथले खडक वितळून झालेला शिलारसच असतो. साहजिकच तो थंड झाल्यावर गोठून जेव्हा त्याच्या परत शिळा बनतात, तेव्हा त्या तिथल्या अंतरंगाचंच प्रतिनिधित्व करत असतात. त्यांचं परीक्षण करताच तिथंही भरपूर पाणी असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळं चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचा साठा कमी असला तरी अंतरंगात मात्र मुबलक पाणी असावं, असा निष्कर्ष काढला गेला आहे. प्रश्न आहे तो मुबलक म्हणजे नेमकं किती हाच. त्याचंही उत्तर मिळवण्याच्या खटपटीला आता हे वैज्ञानिक लागले आहेत. 

पाणी आलं कुठून?
हे पाणी तिथं कुठून आलं, याविषयीही काही आडाखे बांधले गेले होते. जलसंपन्न असे धूमकेतू, लघुग्रह आणि मृत्तिकाखंड चंद्रावर येऊन आदळले, तेव्हा त्यांनी काही पाणी चंद्राला बहाल केलं. तेच तिथं अडकून राहिलं, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीही एक शक्‍यता आहे. सौर वाऱ्यांच्या झोतात प्रोटॉन्स असतात. हे म्हणजे हायड्रोजन वायूचे आयनच. त्यांची जेव्हा चंद्रावरच्या खनिजांमधल्या ऑक्‍सिजनच्या अणूंशी भेट होते, तेव्हा त्यांच्या मिलनातून पाण्याचे रेणू तयार होऊ शकतात. हे मग त्या खनिजांचे जनक असलेल्या कातळांना चिकटून राहू शकतात. उत्पत्ती कशीही झाली असो, तिथं पाणी आहे, याविषयी आता शंका राहिलेली नाही. 

कंदमुळं वेचून आणि शिकार करून उपजीविका करण्याच्या वेची-वेधी संस्कृतीतल्या भटक्‍या जीवनशैलीचा त्याग करून आधुनिक मानवानं जेव्हा एकाच ठिकाणी वस्ती करायला सुरवात केली, तेव्हा तो सतत पाण्याच्या शोधात होता. म्हणूनच तर त्यावेळच्या वस्त्या, गावं, शहरं कोणत्या ना कोणत्या नदीच्या काठी वसलेली होती. कोलंबसनं शोधलेल्या नव्या जगात राहण्यासाठी युरोपातले नागरिक गेले, तेव्हाही तिथल्या नद्यांच्या काठीच त्यांनी आपले तंबू रोवले. याचं कारण उघड होतं. माणूस एकवेळ अन्नाशिवाय राहू शकेल; पण पाणी नसेल तर त्याचं जगणं अवघडच नव्हे, तर अशक्‍यच होऊन बसेल. 

पाणी ही केवळ त्याचीच प्राथमिक गरज नाही. यच्चयावत सजीव सृष्टीची आणि पर्यायानं मानवप्राण्याच्या अन्न असलेल्या वनस्पतींची, प्राण्यांचीही ती मूलभूत गरज आहे. म्हणूनच तर जेव्हा आपल्या धरतीच्या पलीकडं नजर टाकून कुठंही जीवसृष्टी आहे की काय, याचा शोध घ्यायला सुरवात झाली, तेव्हा सर्वांत प्रथम कुठंकुठं पाणी आहे, याचा वेध घेतला गेला. त्याचीच परिणती आता चंद्रावर ‘पाणीच पाणी चहुकडे’ असल्याच्या निरीक्षणात झाली आहे.

मानवाला उपयोग काय?
ठीक आहे, आहे पाणी चंद्रावर. हा सारा केवळ कुतूहल शमविण्याचा स्वांतःसुखाय केलेला उद्योग आहे, की याचा आपल्याला काही उपयोग होणार आहे आणि असलाच तर नेमका काय आणि कसा, हा सवाल तुमच्याआमच्यासारख्या अनभिज्ञांना पडेलच. त्याविषयी अजून स्पष्टता नसली, तरी सध्या दोन प्रकारे या पाण्याचा विनियोग होऊ शकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. चंद्रावर स्वारी हे आता केवळ स्वप्न राहिलेलं नाही. आजवर मोजक्‍याच का होईना; पण काही अंतराळवीरांनी तिथवर मजल मारली आहे. मर्यादित वेळेपर्यंत तिथं फेरफटकाही मारला आहे. या प्रयासाला उभारी येऊन अधिकाधिक मंडळी तिथं नजीकच्या भविष्यात भेट देतील, याबद्दल संदेह नाही. काही खासगी कंपन्यांनी अशी पर्यटनं करण्याच्या योजनाही आखल्या आहेत. या पाहुण्यांना आपला शिधा, पाणी स्वतःबरोबर वाहून न्यावं लागणार होतं; पण आता निदान पाण्यासाठी तरी त्यांना हे ओझं बरोबर बाळगण्याची गरज पडू नये. अर्थात तिथलं पाणी हे काही तोटी फिरवली आणि प्याला भरला अशा स्वरूपातलं नाही; ते खडकांमध्ये, मृत्तिकाकणांमध्ये बंदिस्त आहे. मात्र, त्याला त्यातून मोकळं करणं अवघड नाही. ते तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. त्यामुळं निदान पिण्याच्या पाण्याची तरी सोय लागावी.

दुसराही एक उपयोग संभाव्य आहे. त्या पाण्याची रासायनिक फोड केली गेली, तर त्यातले ऑक्‍सिजन आणि हायड्रोजन सुटे करता येतील. यापैकी हायड्रोजनचा वापर इंधन म्हणून करता येतो. खासकरून अंतराळयानांच्या उड्डाणासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. तसं झालं, तर मग परतीच्या प्रवासासाठी इथून इंधन घेऊन जाण्याची कटकट वाचू शकेल. शिवाय जो मोकळ्या रूपातला ऑक्‍सिजन वायू मिळेल, त्याचा शरीराची गरज भागवण्यासाठी उपयोग होऊ शकेल. पाणी मिळाल्यामुळं तिथं शेती करणंही शक्‍य होईल. तसं झाल्यास आपली शिधासामग्रीही इथून वाहून नेण्याऐवजी तिथल्या तिथंच उपलब्ध करून देता येईल. एखाद्या विज्ञानकथेसारखं वाटणारं हे चित्र भविष्यात प्रत्यक्षात उतरणं अशक्‍य नाही, हे मात्र आता स्पष्ट झालं आहे. 

व्यावहारिक पैलूंमध्ये फरक 
तरीही फारसं हुरळून जाण्याचं कारण नाही, असाच सल्ला बहुतांश वैज्ञानिक देत आहेत. कारण आपल्या धरतीवरचं पाणी आणि चंद्रावरचं पाणी रासायनिक नजरेतून एकच असलं, तरी त्याच्या व्यावहारिक पैलूंमध्ये लक्षणीय फरक आहे. पृथ्वीवरचं बहुतांश पाणी वाहतं आहे- म्हणजेच द्रवरूपात आहे. दोन्ही ध्रुवांवरचं आणि पर्वतराजींच्या अत्युच्च शिखरांवरचं पाणी गोठलेल्या स्वरूपात म्हणजे हिमाच्या किंवा बर्फाच्या रूपात आहे. घनरूपात आहे. तरीही द्रवरूपातल्या पाण्याची टक्केवारी जास्त आहे. या द्रवरूपातल्या पाण्याचा आपण पिण्यासाठी; तसंच धुण्यासाठी किंवा इतर औद्योगिक प्रक्रियांसाठी सहजगत्या वापर करू शकतो. गोठलेल्या घनरूपालाही द्रवरूपात आणण्यासाठी फारसे प्रयास करावे लागत नाहीत. चंद्रावरचं पाणी असं वाहतं नाही. निदान तसं ते असल्याची कोणतीही खूण अजून मिळालेली नाही. खरं तर तिथल्या पर्यावरणात ते जलरूपात राहण्याची शक्‍यताच नाही.

त्याहूनही एक महत्त्वाचा पैलू आहे. मानवप्राण्यानं या पाण्याशी खेळ केला आहे. निसर्गानं शुद्ध रूपातलं पाणी आपल्याला दिलेलं असलं, तरी आपल्या अनेक, घरगुती; तसंच औद्योगिक, वैयक्तिक, सामुदायिक कारणांसाठी आपण ते नियमितपणे प्रदूषित, अशुद्ध करत असतो. निसर्ग तरीही आपले हे उपद्‌व्याप पोटात घालत त्या अशुद्ध पाण्याचं नियमितपणे शुद्धीकरण करतो. आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या रूपात आपल्याला शुद्ध पाण्याचा पुनर्रचित पुरवठा होत राहतो. हे जलचक्र अव्याहत चालू राहिल्यामुळंच आपण हे पाणी परतपरत वापरू शकतो, तसंच त्याच्या एकंदरीत साठ्यातही घट होत नाही. 

असं जलचक्र चंद्रावर असल्याचं दिसून आलेलं नाही. त्यामुळं तिथं असलेल्या पाण्याचा तिथं जाणाऱ्या पाहुण्यांनी इथल्या सवयीप्रमाणेच बेसुमार आणि बेलगाम वापर केला, तर तो साठा अशुद्ध होत राहील. त्याचं पुनर्शुद्धीकरण करण्याची जबाबदारी तिथला निसर्ग घेणार नाही. म्हणजे त्या पाण्याचा विवेकी वापर करायचा, तर त्याच्या शुद्धीकरणाची व्यवस्थाही करावी लागेल. ती खर्चिक तर असेलच; पण त्यासाठीचं तंत्रज्ञानही वेगळं असण्याची आणि त्यासाठी मग ते विकसित करण्याची व्यवस्थाही करावी लागेल.

हक्काची ‘खोड’
मानवप्राण्याची आणखी एक खोड या पाण्याच्या वापराच्या आड येण्याचीही दाट शक्‍यता आहे. अंटार्क्‍टिका खंडाकडं तसं आजवर दुर्लक्षच करण्यात आलं होतं; पण त्या खंडाच्या अंतरंगात काही महत्त्वाची खनिजं असण्याची शक्‍यता दिसून येताच, तिथं आपला झेंडा रोवण्याची लगबग अनेक देश करू लागले. त्यापायी मग त्या खनिजांवरच्या मालकीहक्काचा दावा करणं शक्‍य होईल, असाच विचार केला गेला. त्यापायी तिथल्या प्रदेशाच्या वाटण्या करण्याकडंही उद्या मजल जाऊ शकेल. 

हीच परिस्थिती चंद्रावरच्या पाण्यापायीही ओढवणार नाही कशावरून? त्या पाण्यावर आपला अग्रहक्क प्रस्थापित करण्यासाठी मग चांद्रजलमोहिमा आखण्याची एक नवीन स्पर्धाच उभी राहू शकेल. पृथ्वीवरच्या पाण्यावरून तिसरं महायुद्ध होण्याची शक्‍यता असल्याचं भीषण भाकीत वर्तवलं गेलंच आहे. चंद्रावरच्या पाण्यावरूनही अशी लठ्ठालठ्ठी कशावरून होणार नाही, अशी भीतीही काही वैज्ञानिकांना वाटते आहे. ‘बाजारात तुरी आणि...’ अशीच ही स्थिती असली, तरी ती भीती साकार होऊ नये म्हणून आताच काही सामंजस्य दाखवून एकत्रित प्रयत्न करणं मात्र आवश्‍यक होऊन बसलं आहे. 

तसा संयुक्त राष्ट्रांनी ‘आऊटर स्पेस ट्रिटी’ नावाचा एक करार केला आहे. त्या अंतर्गत अंतराळात कुठंही सापडलेल्या पाण्याचा विनियोग करण्यावर बंदी नाही; परंतु त्यावर कुणा एका देशानं मालकी हक्क सांगण्याचा किंवा त्याची वाटणी करण्याचा अधिकार मात्र काढून घेण्यात आला आहे. देशादेशांमधले असले करार एखाद्या देशातले सत्ताधारी बदलले, की कसे कस्पटासमान मानले जाऊ शकतात, याचं ठळक उदाहरण यंदाच पॅरिस इथं मिळालं आहे. जागतिक हवामानबदलाच्या संदर्भात बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष असताना झालेला करार अमेरिकेनं मान्य केला होता; परंतु आता डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्याबरोबर त्यांनी त्यातून अंग काढून घेतलं आहे आणि त्या करारानुसार केलेल्या तरतुदींना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. तीच परिस्थिती याही कराराबाबत उद्भवू शकते. शिवाय उद्या खासगी उद्योगांनी यात उडी घेतली, तर ते असले करार पाळतीलच याची शाश्वती नाही. शॅकलटन एनर्जी कंपनीनं तर आताच त्यांच्या प्रयत्नांमधून चंद्र किंवा लघुग्रह यांच्यावरून मिळवलेल्या खनिजांची मालकी आपल्याकडंच असेल, असा दावा केला आहे. म्हणूनच चंद्राकरता खास ‘मून ट्रिटी’ असा करार केला गेला आहे. त्यात कोणत्याही एका देशानं स्वतंत्रपणे चंद्रावरच्या नैसर्गिक संपत्तीचा- त्यात पाणीही आलं- उपसा करण्यावर निर्बंध घातले गेले आहेत; परंतु त्या करारावर अजूनही अनेक देशांच्या सह्या व्हायच्या आहेत. ग्यानबाची खरी मेख ती आहे.

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Marathi News Sakal saptranga esakal Bal Phondke Moon