‘पिच’वरची महिलाशक्ती (सुनंदन लेले)

रविवार, 30 जुलै 2017

भारतीय महिला क्रिकेट संघ विश्‍वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोचल्यामुळं देशभरात चैतन्य निर्माण झालं. महिला क्रिकेटला आतापर्यंत कधीही मिळाला नव्हता, इतका प्रतिसाद अगदी सेलिब्रिटींपासून सर्वसामान्यांपर्यंत सगळ्यांनी दिला. हे चैतन्य कशामुळं निर्माण झालं, ते पुढं टिकण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, महिला क्रिकेटची वाटचाल नेमकी झाली कशी आणि अंतिम सामन्यातल्या पराभवाची नेमकी कारणं कोणती या साऱ्या गोष्टींचा वेध.
 

भारतीय महिला संघ विश्‍वकरंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोचला आणि सगळ्यांच्या माना वळाल्या. ब्रिटनमध्ये झालेल्या स्पर्धेत पहिल्या सामन्यापासून मिताली राजच्या संघानं चमकदार कामगिरी केली होती. स्पर्धा जसजशी पुढं सरकू लागली, तशी लोकांची उत्सुकता वाढू लागली. उपांत्य सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाला भारतीय संघानं पाणी पाजलं, तेव्हा उत्साहाला उधाण चढलं. नेमकं त्या वेळी इतर खेळांच्या स्पर्धा कमी होत्या, ज्यामुळं टीव्हीवर बाकी खेळांपेक्षा महिला क्रिकेट विश्‍वकरंडक स्पर्धेतल्या सामन्यांना जास्त प्रेक्षक मिळू लागले. बघताबघता वणवा पेटला आणि संपूर्ण भारत देश महिला क्रिकेट संघाच्या पाठीशी उभा राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत आणि सचिन तेंडुलकरसारख्या क्रिकेटपटूपासून ते लिएंडर पेससारख्या टेनिसपटूपर्यंत सगळे महिला संघाला प्रोत्साहन देऊ लागले. माध्यमांनासुद्धा अचानक महिला संघाची कणव आली. त्यांनी नुसता पाठिंबा दिला नाही, तर पुरुष संघ आणि महिला संघांत बीसीसीआय कसा दुजाभाव करत आहे, याची उदाहरणं देत कार्यक्रमही सादर केले. २३ जुलैला लॉर्डस मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात भारताला निसटता पराभव स्वीकारावा लागला. विश्‍वविजेतेपदाचं स्वप्न अधुरं राहिलं, तरी भारतीय महिला क्रिकेट संदर्भात आलेली जाग मोठं काम करून गेली.

इतिहास जुनाच
दोन देशांच्या महिला क्रिकेट संघांत पहिला कसोटी सामना १९३४मध्ये खेळला गेला. तेव्हा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे संघ एकमेकांना भिडले होते. त्यानंतर जवळपास तब्बल चाळीस वर्षांनी म्हणजे १९७३मध्ये भारतात महिला क्रिकेट संघटनेची स्थापना झाल्याची नोंद मिळते. १९७६मध्ये भारतीय महिला संघाचा पहिला कसोटी सामना खेळला गेला. भारतीय संघात प्रवेश मिळवलेल्या शुभांगी कुलकर्णी, नीलिमा बर्वे या मुली क्रिकेटचा ध्यास उराशी बाळगून होत्या. लेचंपेचं क्रिकेट खेळणं त्यांना पसंत नव्हतं, म्हणून त्या जाळ्यातल्या सरावादरम्यान मुलांना सामावून घ्यायच्या. १९८२मध्ये महाराष्ट्राच्या महिला संघातल्या खेळाडूंना तगडा सराव मिळावा म्हणून पुण्यातल्या एसपी कॉलेजच्या मैदानावर आम्ही एक एकत्र सामना खेळलो होतो. आमच्या प्रशिक्षकांना महिलांसोबत आम्ही क्रिकेट सामना खेळलो हे अजिबात रुचलं नव्हतं. ‘क्रिकेट हा महिलांनी खेळायचा खेळच नाही,’ असं त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं. बऱ्याच लोकांना अजूनही महिलांनी क्रिकेट खेळणं पसंत नाही, हे सत्य आहे. ‘‘जुनं जाऊदेत रे...निदान आता लोकांना महिला चांगलं क्रिकेट खेळतात, हे पटू लागलं आहे, ही मोठी प्रगती मानते मी! २०१७ वर्ल्डकपचा तो मोठा फायदा महिला क्रिकेटला होणार आहे...नुसता लोकांचाच नाही, तर भारतीय क्रिकेट मंडळाचा म्हणजे बीसीसीआयचा दृष्टिकोन बदलणार अशी आम्हांला आशा आहे,’’ माजी कर्णधार शुभांगी कुलकर्णी हसतहसत म्हणाली.

मोठ्या घरची सून
भारतीय महिला क्रिकेट संघटनेची स्थापना १९७३मध्ये झाली. पुढची तीस वर्षं महिला क्रिकेटचा प्रवास ठेचकाळत झाला. एकएक स्पर्धा भरवायला नाकी नऊ येत होते संघटकांना. परदेश दौरा करायचा असेल, तर आर्थिक परिस्थिती अजून नाजूक व्हायची. पाहुण्या संघाला भारतात दौरा करायचं निमंत्रण द्यायचं असेल, तर समस्यांचा आवाका वाढायचा. अशा वेळी मंदिरा बेदीनं महिला क्रिकेटला नुसता आवाजी पाठिंबा दिला नाही, तर मंदिरानं जातीनं कार्यक्रमात भाग घेत महिला क्रिकेटकरता पैसा जमा करायला धडपड केली. 

शरद पवार बीसीसीआयचे अध्यक्ष झाल्यावर त्यांनी महिला क्रिकेटला बीसीसीआयच्या छताखाली घेण्यासाठी पावलं उचलली. २००६मध्ये महिला क्रिकेट संघटना बीसीसीआयमध्ये विलीन झाली. शरद पवार यांनी पुढचे विचार करताना माजी महिला खेळाडूंना पेन्शन देणं चालू केलं. जी आस्था पवार यांनी महिला क्रिकेटची प्रगती व्हावी म्हणून दाखवली, ती श्रीनिवासन किंवा शशांक मनोहर यांनी दाखवली नाही. परिणामी पवार यांची बीसीसीआयमधली कारकीर्द संपल्यावर महिला क्रिकेटला अपेक्षित प्रोत्साहन लाभलं नाही. २००६ ते २०१६ या काळात महिला क्रिकेट म्हणजे ‘मोठ्या घरची सून’ होतं. बीसीसीआयच्या घरात लग्न होऊन गेलेल्या महिला क्रिकेटला म्हणावा तसा मान किंवा सक्रिय पाठिंबा मिळाला नाही. गेल्या वर्षी भारतीय महिला संघानं ऑस्ट्रेलियन संघाला मालिकेत पराभूत केलं, त्यानंतर दृष्टिकोन हळूहळू बदलायला लागला. यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेतल्या चमकदार सातत्यपूर्ण कामगिरीनंतर दृष्टिकोनात लक्षणीय बदल होण्याची शक्‍यता आहे. 

सामन्यांची कमतरता
भारतीय महिला क्रिकेटची अपेक्षित प्रगती झपाट्यानं न होण्याचं एकच कारण आहे ते म्हणजे सामन्यांची कमतरता. बीसीसीआयकडं पोत्यानं पैसे पडून असले, तरी महिला क्रिकेटचे सामने भरवण्यासाठी बीसीसीआय ठोस पावलं उचलत नाही. स्थानिक संघटना महिला क्रिकेटकरता फार उत्साहानं योजना आखताना दिसत नाहीत. सराव सुविधा निर्माण करण्यासाठी किंवा शाळा-कॉलेजेसमध्ये मुलींच्यात क्रिकेटचा प्रसार व्हावा म्हणून प्रयत्न करणं नितांत गरजेचं आहे. उत्साही महिला क्रिकेटपटूंकरता शहर, जिल्हा, राज्य पातळ्यांवर सामने सातत्यानं भरवले जाणं हीच प्रगतीची वाट आहे. राष्ट्रीय स्तरावर बीसीसीआयनं महिलांच्या स्पर्धा नियमित भरवणं आता तरी शिस्तबद्ध प्रकारे चालू होणं गरजेचं आणि अपेक्षित आहे. महिला क्रिकेटपटूंना वर्षातून सातत्यानं सामने खेळायला मिळायला हवेत, इतकीच खेळाडूंची रास्त मागणी आहे. 

अनुभवाच्या कमतरतेमुळं पराभव
२३ जुलैला लॉर्डस मैदानावर सामना बघणाऱ्या शुभांगी कुलकर्णीनं पराभवाची कारणमीमांसा करताना सांगितलं: ‘‘अनुभवाची कमतरता हीच नाशाला कारण ठरली. मिताली राज आणि झुलन गोस्वामी २००५मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात खेळल्या होत्या. त्या दोघींचा अपवाद वगळला, तर बाकी मुलींना विश्‍वकरंडकासारख्या सर्वांत मानाच्या मोठ्या स्पर्धेत अंतिम सामन्यात खेळायचा अनुभव नव्हता. तसं बघायला गेलं, तर सामना हातात होता. अशा परिस्थितीत डोकं शांत ठेवून कसं खेळायचं याचा अनुभव नसल्यानं हातातला विजय निसटला. शेवटच्या टप्प्यात धावांचा पाठलाग करताना मुलींनी थोडी घाई केली. हातातलं विश्‍वविजेतेपद लांब गेल्याचं दु:ख असलं, तरी महिला क्रिकेटला जो मान, जी प्रसिद्धी मिळायला हवी ती लाभल्यानं आनंद, अभिमान वाटतो आहे. प्रगतीच्या टप्प्यातलं हे पहिलं पाऊल ठरावं, अशी आशा मला वाटते आहे.’’

प्रसिद्धीचा झोत
स्टार स्पोर्टस चॅनेलचं थोडं कौतुक करायला हवं. आर्थिक फायदा कमी असताना त्यांनी भरपूर पैसे गुंतवून दहा सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं. भारत विरुद्ध न्यूझीलंडदरम्यानचा साखळी सामना मूळ योजनेत थेट प्रक्षेपण करायच्या यादीत नव्हता. परंतु तो सामना जीवन-मरणाचा ठरणार आणि विजेता संघ उपांत्य फेरी गाठणार, असं समीकरण तयार झाल्यानं त्या चॅनेलनं तो सामनाही थेट प्रक्षेपित केला. कोणाच्याही अपेक्षेपलीकडची व्ह्युअरशिप यंदाच्या महिला विश्‍वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्याला लाभली. मिताली जरा प्रसिद्ध  होती; पण तिच्यासोबत हरमनप्रत कौर, पूनम राऊत, स्मृती मंधाना इत्यादी नावंही क्रिकेटरसिकांच्या तोंडी यायला लागली. माध्यमांनी आपले कॅमेरे सांगलीला पाठवून स्मृती मंधाना राहते त्या गल्लीत अंतिम सामन्याअगोदर काय वातावरण आहे, हे टिपलं. या सगळ्या गोष्टी पहिल्यांदाच घडल्या. महिला क्रिकेटला त्यांची हक्काची, रास्त प्रसिद्धी मिळाली. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडू ‘राष्ट्रीय हिरॉईन’ झाल्या. महिला क्रिकेटचं जनजागरण गेल्या पंधरवड्यात जितकं झालं, तितकं महिला क्रिकेट संघटनेची स्थापना झाल्यापासून गेल्या चार दशकांतसुद्धा झालं नव्हतं.

सुधारणेला वाव भरपूर
महिला क्रिकेट प्रसिद्धीच्या झोतात न्हाऊन निघत असताना अंतिम सामन्याआधी आणि नंतर भारतीय महिला संघाचा प्रशिक्षक तुषार आरोठे; तसंच बऱ्याच माजी महिला खेळाडूंबरोबरही बोलणं झालं. भारतातील महिला क्रिकेट सुधारण्याकरता बरीच पावलं बीसीसीआयनं उचलणं अपेक्षित आहे; तसंच खेळाडूंना काही बदल करणं गरजेचं असल्याचं सगळ्यांनी मान्य केलं. तगड्या अंगकाठीची हरमनप्रीत कौर सहजी षटकार मारते, तसाच सहजी षटकार लहान चणीची पूनम राऊतही लगावते, हे आपण सगळ्यांनी बघितलं. याचा अर्थ असा आहे, की भारतीय महिला क्रिकेटपटूंमध्ये ताकद किंवा कौशल्याचा अभाव नक्कीच नाही. 

डोळ्याला जाणवणारी कमतरता फिटनेसच्या प्रांतात आहे. धावा काढण्यासाठी पळताना बऱ्याच खेळाडू दुसऱ्या एंडला पोचताना वेग कमी करून वळून परत तेवढ्याच वेगानं पळताना दिसल्या नाहीत. बऱ्याच वेळेला दुसरी धाव शक्‍य असली, तरी फिटनेसच्या अभावामुळं खेळाडू एकेरी धावेतच समाधान मिळवत असल्याचं दिसलं. भारतीय पुरुष संघातल्या प्रत्येक खेळाडूचा फिटनेस एकदम वरच्या पातळीचा आहे. त्यापासून महिला खेळाडूंनी धडा घ्यायला हवा.

महिला क्रिकेट बघताना लोकांना ते थोडं कंटाळवाणं वाटायचं कारण सरळ-साधं आहे. महिला क्रिकेटच्या सर्वोत्तम सामन्यातही धावेविना म्हणजेच ‘डॉट बॉल्स’चं प्रमाण खूप जास्त आहे. एकीकडं भारतीय मुली पाय पुढं टाकत सहजी षटकार खेचू शकतात, तर मग त्या मोकळ्या जागेत चेंडू ढकलून एकेरी धावा काढायचं प्रमाण का नाही वाढवू शकत, हा प्रश्‍न क्रिकेटरसिकांना भेडसावत आहे. नवा जमाना असा आहे, की टी-२० क्रिकेट प्रकार तर सोडाच, पाच दिवसांच्या कसोटी सामन्यांतही लोकांना खेळाची वाढती लय हवी असते. सामना बघणाऱ्या प्रेक्षकांना मैदानात सतत काहीतरी चांगली घटना घडणं अपेक्षित असतं. त्याचा विचार करता बहुतांश वेळेला महिला फलंदाजी करताना चेंडू नुसताच बॅटनं टोलवतात आणि धाव घेण्याचा सुतराम प्रयत्न करत नाहीत, ही गोष्ट खटकते. 

‘‘चालू स्पर्धेतल्या यशानं आपल्या खेळाडूंच्यात नवचैतन्य आलं आहे. त्यांच्या खाण्याच्या सवयी बदलत आहेत; तसंच सर्वोच्च फिटनेस ठेवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना चालना मिळाली आहे. हे बदल एकदम घडत नसतात. त्याकरता सातत्य राखावं लागतं, हे मुलींना कळलं आहे. गेले चार महिने खूप बदल होताना दिसत आहेत. ही फक्त सुरवात आहे,’’ प्रशिक्षक तुषार आरोठे म्हणाला.

महिला क्रिकेट संघटना २००६मध्ये बीसीसीआयमध्ये विलीन झाली. एक दशकाच्या काळात जी प्रगती झाली नाही, ती आता महिला संघाच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळं होताना दिसत आहे. आता यात खंड पडू नये, यासाठी बीसीसीआयला जसे सातत्यपूर्ण प्रयत्न करावे लागतील, तसेच प्रयत्न महिला खेळाडूंनाही करावे लागतील. ही प्रयत्नांची टाळी दोनही हात एकत्र येत जोरानं वाजली, तर अशक्‍य काहीच नाही.

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा 

Web Title: Marathi News Sakal saptranga esakal cricket Women's World Cup Sunandan Lele