जरासं वेगळं!

Saptranga Article by Rajiv Tambe
Saptranga Article by Rajiv Tambe

ज सुमारे १५ दिवसांनी सगळी मुलं एकत्र भेटत होती. या सुटीत काय करायचं ठरवलं होतं? काय काय केलं? कसं कसं केलं? आणि काय काय राहिलं, याबाबत गप्पा मारायचं ठरलं होतं. म्हणजे, देवांगीच्या आईनं तसं ठरवलं होतं. कारण, त्यांच्याकडंच सगळे जमणार होते.

अन्वय, नेहा, पार्थ, पालवी आणि शंतनू हे अगदी वेळेवर जमले. आल्याआल्याच मुलं म्हणाली : ‘‘आज ठरवलेली कुठलीच गोष्ट करायची नाही आणि ठरवूनही कुठली गोष्ट करायची नाही.’’

आईला काही समजेचना. ‘‘हे कुठलं भलतंच खूळ? म...करायचं तरी काय?’’

‘‘अं...म्हणजे नेमकं काय करायचं ते आम्हाला माहीत नाही; पण ठरवून काही करायचं नाही, असं आम्हाला वाटतंय,’’ मुलांनी असं म्हणताच मुलांचा झालेला गोंधळ आईच्या लक्षात आला.

आई म्हणाली : ‘‘मी तुम्हाला माझ्या लहानपणीची एक गंमत सांगते. माझ्या वडिलांचे एक मित्र शिल्पकार होते; पण ते दगडात नव्हे तर फळात कोरीव काम करायचे. त्यांनी एका मोठ्या कच्च्या पेरूमध्ये सुंदर ताजमहाल कोरला होता; विशेषत: कलिंगडामध्ये ते इतकी छान फुलं कोरायचे की गुलाबाची खरीच फुलं कुणीतरी कलिंगडात ठेवली आहेत असं वाटायचं. एक दिवस मी वडिलांकडं हट्ट केला : ‘मलाही करायचं आहे असं कोरीव काम. हे अगदी सोपं असतं...’ वडिलांनी मला एक कलिंगड आणून दिलं आणि मी सुरूच केलं कोरीव काम...’’

‘‘आई काय केलंस तू? ताजी फुलं? की लालेलाल ताजमहाल?’’

‘‘या दोन्हींपैकी काहीच नाही.’’

‘‘म...काय केलं...?’’

‘‘मी त्या कलिंगडात इतकं काही कोरलं, की आत काही राहिलंच नाही. शेवटी आम्ही माझ्या ‘कोरीव कामा’चा रस काढून प्यायलो!’’

‘‘हे तर लई भारी.’’

‘‘माझी गंमत तर आणखीच भारी आहे,’’ शंतनू सांगू लागला : ‘‘दोन वर्षांपूर्वी मी सायकल शिकलो; पण मला खरी सायकल कुणी शिकवली असेल, याचा तुम्ही अंदाजच करू शकणार नाही. पहिले चार दिवस बाबा मला मैदानावर घेऊन जायचे आणि माझ्या मागं मागं धावून थकून जायचे. त्यांनी माझा सायकलचा हात सोडला की मी घाबरून खालीच पडायचो. नंतर दोन दिवस आमच्या बाजूचा दादा आला होता; पण तोही कंटाळला. त्याच वेळी बाबांचे मित्र म्हणाले : ‘शंतनू, तू काही काळजी करू नकोस. आज तू माझ्यासोबत चल. उद्या पहाटे पाच वाजता आपण आमच्या गल्लीत सायकल चालवू. तू दोन तासांत शिकशील.’ गेलो त्यांच्याबरोबर. मी सायकलवर बसलो. काकांनी मागून सायकल धरली. मी जोरात पायडल मारलं आणि त्या क्षणी दोन कुत्रे भुंकत माझ्या दिशेनं येऊ लागले. मी जोरात सायकल मारली. कुत्रे पाठलाग करतच होते. मी रस्त्यावरून आडवीतिडवी सायकल चालवत सरळ आमच्या घरीच आलो. बेल वाजवली तर दार उघडून भूत बघावं तसं बाबा माझ्याकडं पाहतच म्हणाले : ‘‘ये घरात. बरा आहेस ना?’’

मी बाबांना सगळी गोष्ट सांगितली आणि जोरात ओरडून म्हणालो : ‘‘बाबा ऐका, मी एकटाच सायकल चालवत आलो.’’

बाबा म्हणाले, ‘अरे, मूर्खा ओरडू नकोस. अपरात्री, पहाटे अशा भलत्याच वेळी जर अनोळखी मुलगा गल्लीत सायकल चालवू लागला तर कुत्रे भुंकणार नाहीत तर काय तुझे पाय चाटणार?’’

सगळ्यांची हसून हसून पोटं दुखू लागली.

***

पालवी म्हणाली : ‘‘माझी लहानपणीची एक सॉलिड गंमत आहे. आम्ही कोकणात जात होतो. जेवण्यासाठी गाडी महाडला थांबायची. आम्ही भराभर जेवलो. पळतच निघालो. तेवढ्यात कुठल्यातरी यात्रेकरूंचा मोठा लोंढा आला आणि अगदी दहा पावलांसाठी माझी आणि आईची चुकामूक झाली आणि मी भलत्याच बसमध्ये चढले. पण मला आई-बाबा दिसेनात. मला रडू येऊ लागलं. एका बाईनं मला जवळ घेतलं आणि म्हणाली : ‘घाबरू नकोस हं. ते जेवायला गेले असतील. येतीलच एवढ्यात.’ दुसरा माणूस म्हणाला : ‘या मुलीचे आई-वडील विचित्रच आहेत. या लहान मुलीला वाऱ्यावर सोडून स्वत: मात्र गेले जेवायला. कमालच आहे.’ हे ऐकल्यावर तर मला आणखीच जोरात रडू येऊ लागलं. ‘माझे आई-वडील असे नाहीत’ असं पण त्यांना सांगता येईना. इतक्‍यात एक माणसानं विचारलं : ‘इथं बसलेले ते दाढीवाले तुझे वडील का?’ आणि मी जोरात ओरडले : ‘‘नाही, नाही... या गाडीत माझे वडीलच दिसत नाहीत.’’ त्यानंतर कंडक्‍टर माझ्याकडं पाहत म्हणाला : ‘‘ही मुलगी आपल्या गाडीतलीच नाही. चला, आपण हिची गाडी शोधू या.’’

कंडक्‍टरनं मला खांद्यावर बसवलं. मागून सगळी गाडीतली माणसं. अशी माझी वरात निघाली आणि आम्ही दहा पावलं जात नाही तोच आमच्या स्वागताला आमच्या गाडीतली वरात आली! मला पाहून आईनं हंबरडा फोडला. मी किंचाळत कंडक्‍टरच्या खांद्यावरून उडीच मारली. बाबांनी कॅच पकडला. नंतर ‘थॅंक यू-फॅंक यू’, ‘नमस्कार-चमत्कार’ झाले. मग आईची बोलणी खात पुढचा कोकणप्रवास छानच झाला.’’

***

नेहा म्हणाली : ‘‘अय्या कमालच आहे. मीसुद्धा लहानपणी हरवले होते; पण मी हरवले आहे, हेच मला कळलं नव्हतं.’’

‘‘का कळलं नव्हतं?’’

‘‘म्हणजे? तेव्हा मला काही कळतंच नव्हतं, इतकी लहान होते मी.’’

‘‘म्हणजे किती लहान?’’

‘‘अरे, तेव्हा ती अगदी कुकुलं बाळ असणार, हो ना?’’

‘‘एकदम बरोबर. मी तेव्हा होते फक्त दोन दिवसांची.’’

‘‘ऑ...? तरी पण तुला सगळं आठवतंय?’’

‘‘काहीतरीच काय? मी मोठी झाल्यावर मला आईनं सांगितलं.’’

‘‘आता काय ते सांग लवकर...’’

‘‘हो. मी ज्या हॉस्पिटलमध्ये होते, तिथं आणखी चार मुलं होती. आम्हा सगळ्यांना एकाच खोलीत ठेवायचे. दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ होती. माझे आजी-आजोबा मला बघायला आले होते. आई नर्सला म्हणाली : ‘बाळाला घेऊन या.’ नर्स चुकून दुसऱ्याच बाळाला घेऊन आली आणि तिनं ते बाळ आजीच्या हातात दिलं. आजी त्या बाळाला खेळवू लागली.

दुसऱ्या बाईची निघायची तयारी सुरू होती. नर्सनं मला त्या बाईकडं सोपवलं. ती बाई निघायच्या घाईत. तिनं मला जोरजोरात थोपटत झोपवायला सुरवात केली. ती सारखं म्हणायची : ‘अरे झोप रे, ठोंब्या...’

पाचच मिनिटांत ती बाई निघणारच होती.

इतक्‍यात माझ्या आजीच्या हातातल्या बाळानं शू...शू केली. आजीची साडी भिजली. तिनं नर्सला हाक मारली. नर्स धावतच आली. तिनं त्या बाळाचं दुपटं सोडलं आणि त्या क्षणी माझी आई जोरात ओरडली : ‘हे बाळ माझं नाही. माझी मुलगी आहे. गुणाची मुलगी. हा तर मुलगा आहे... मुलगा...’’

आणि ती निघालेली बाई म्हणाली : ‘तरीच ही झोपत नाहीए. आमचा ठोंब्या तुमच्याकडं आला वाटतं...द्या त्याला इकडं. घ्या हो तुमची ही गुणाची पोर.’’

‘‘त्यानंतर आईनं मला एक क्षणही लांब ठेवलं नाही.’’

‘‘बाप रे! नाहीतर काय झालं असतं कल्पनाच करवत नाही.’’

‘‘अशीच गोष्ट सुनील गावसकरचीही आहे. मी वाचली आहे एका पुस्तकात,’’ शंतनू म्हणाला.

***

मघाचपासून अन्वय काहीच बोलत नव्हता.

आई म्हणाली : ‘‘अन्वय, तुला काही वेगळं सांगायचं आहे का? सांग ना. अगदी मोकळेपणानं सांग.’’

अन्वयनं इतरांचा अंदाज घेतला आणि म्हणाला : ‘‘खरंच मला वेगळं तर सांगायचं आहेच; पण काही विचारायचंही आहे.’’

सगळेच सावध होऊन ऐकू लागले.

‘‘मला लहानपणापासून अंधाराची कधी भीती वाटली नाही. कारण, मला लहानपणापासून माझ्या आई-वडिलांनी मला कशाचीच भीती दाखवली नाही. उलट, मला कधी भीती वाटली तर आई म्हणायची : ‘हॅ, घाबरतोस काय? जा बिनधास. काही नाही होत.’ आणि मी जात राहिलो; पण गेले काही महिने मला अंधाराची भीती वाटू लागली होती. विशेषत: मी जेव्हा रहस्यकथा, भूतकथा, गूढकथा असं काही वाचलं, की मी काळोखात जायला घाबरायचो. इतकंच नव्हे तर, आपल्याच घरातल्या या खोलीतून त्या खोलीत जायलाही घाबरायचो. मला सारखं वाटायचं, की माझी वाट पाहत कुणीतरी काळोखात बसून आहे. मी गेलो की ते मला पकडणार...

एकदा मला खूपच भीती वाटली. दुसऱ्या खोलीतल्या अंधाऱ्या कोपऱ्यात कुणीतरी बसलंय, असं मला वाटत होतं. मी आईला सांगितलं, तर तिचा विश्वास बसेना. मी आईचा हात धरून थरथरत त्या खोलीपर्यंत आलो. आईनं लाईट लावला; पण तोपर्यंत ‘तो’ तिथून पळून गेला होता. आई म्हणाली : ‘हे तुझ्या मनाचे खेळ आहेत. घाबरू नकोस.’ तेव्हापासून मी रोज संध्याकाळीच घरातले सगळे दिवे लावून ठेवतो.

आठ दिवसांपूर्वीची गोष्ट. मी घरात एकटाच होतो. घरातले दिवे लावलेले होते...आणि तितक्‍यात दिवे गेले. सगळीकडं फक्त गच्च काळोख. त्या वेळी...’’

पार्थ वेदांगीच्या मांडीवर जाऊन बसला. त्यानं दोन्ही हातांनी कान बंद करून घेतले. बाकीचे सगळे एकमेकांच्या जवळ सरकत कानात प्राण आणून ऐकू लागले.
अन्वय सांगू लागला : ‘‘मी घाबरायचं नाही असं ठरवलं. धीर करून उठलो. आता हळूहळू काळोखात दिसू लागलं होतं. आतल्या खोलीच्या दिशेनं मी जाऊ लागलो. आत पाहिलं. माझ्या डोळ्यांवर माझाच विश्वासच बसेना. मी पुन:पुन्हा खात्री केली. कोपऱ्यातल्या खुर्चीवर एक माणूस मान मागं टाकून बसला होता. त्याला मान होती; पण डोकं नव्हतं. हात होते; पण हाताला पंजे नव्हते. डोकं आणि पंजे नसलेलं ते ‘धड’ होतं.
माझे पाय भीतीनं लटलटू लागले.

घशाला कोरड पडली.
पोटात बाकबूक होऊ लागलं.
तळहात घामानं भिजला.
मी आधारासाठी दरवाजा धरला.

आणि इतक्‍यात लाइट आले. खोलीत भक्कन प्रकाश पडला.

मला माहीत होतं आता ‘तो’ उठून गेला असणार; तरीपण मी तिथं पाहिलं आणि...’’
‘‘अरे लवकर सांग काय ते? मी मगाचपासून मनातल्या मनात देवाचं नाव घेतोय. सांग...’’

‘‘आणि मी पाहिलं तर, खुर्चीवर बाबांनी त्यांचा पांढरा फुलशर्ट वाळत घातला होता.’’
सगळ्यांनी सुस्कारा सोडला. शंतनू म्हणाला : ‘‘मी तर जाम टरकलो होतो; पण आता नाही हं.’’

‘‘आम्ही पण जराशा घाबरल्या होतो; पण फार नाही हं.’’ नेहा आणि पालवी म्हणाल्या.
‘‘आई म्हणाली तेच खरं होतं. हे सगळे आपल्या मनाचेच खेळ असतात. अंधाराला घाबरण्याचं काहीच कारण नाही.’’

पण मला सांगा तुम्ही अशा वेळी काय केलं असतं?’’

शंतनू हात वर करत म्हणाला : ‘‘आत्ता तसं काहीच ठरवता येणार नाही आणि आता जे ठरवलं असेल, ते ठराविक वेळी करताच येणार नाही; पण एक नात्र नक्की...’’
आणि सगळेच म्हणाले : ‘‘अंधाराला घाबरणार नाही हे नक्की. ओकी बोकी पक्की आणि हे शंभर टक्के नक्की.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com