जागर आदिशक्तीचा (मंगला सामंत)

Article in Saptaranga By Mangla Samat on Navratri
Article in Saptaranga By Mangla Samat on Navratri

नवरात्राच्या निमित्तानं दुर्गेच्या वेगवेगळ्या रूपांचं पूजन केलं जातं. पश्‍चिम बंगालमध्ये दुर्गामातेच्या मूर्तीसाठी लागणारी विशिष्ट माती म्हणजे एकूणच भारताच्या संस्कृतीमधल्या स्थित्यंतराचं, संक्रमणाचं एक प्रकारे प्रतीक आहे. देवीच्या ‘महिष’ या वाहनाचं मूळसुद्धा प्राचीन काळातल्या संघर्षात दिसतं. दुर्गामातेशी संबंधित प्रथांच्या निमित्तानं भारतातली प्राचीन ‘मातृ संस्कृती’ आणि कालौघात होत गेलेल्या बदलांचं विश्‍लेषण. 

दुर्गामाता हे भारतातल्या पश्‍चिम बंगाल राज्याचं पूजनीय दैवत मानलं जातं. देशातल्या विविध राज्यांमध्ये किंवा प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या मातृदेवतांची उपासना केली जाते. पुण्याची जोगेश्वरी, मुंबईची मुंबादेवी, महालक्ष्मी, कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी आदी; परंतु दुर्गामातेचं एक मोठं वैशिष्ट्य आहे. ती ‘महिष’ या (म्हैसवर्गीय) प्राण्याला आपलं ‘वाहन’ बनवून येते. तिला ‘महिषासुरमर्दिनी’ म्हटलं जातं- कारण ‘महिष’ हे टोळी-चिन्ह असणाऱ्या एका असुर टोळीचा तिनं दहा दिवस चाललेल्या युद्धात अखेर पराभव केला. दुर्गादेवीचं अन्य मातृदेवतांहून आणखी एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे दुर्गामातेच्या मूर्तीसाठी वापरली जाणारी माती. ही माती एकूणच भारताच्या संस्कृतींमधल्या स्थित्यंतराचं, संक्रमणाचं एक प्रकारे प्रतीक बनून राहिली आहे.

प्राचीन काळातल्या अनेक घडामोडी, लेखनकलेअभावी नोंदवून ठेवता येत नव्हत्या. मग अशा घटनांच्या आठवणी एखाद्या रिवाजातून, कथेतून जपल्या जात होत्या. मातेवरच्या आंतरिक श्रद्धेमुळं आणि पूजनीय भावनेमुळं अशा रिवाजांना, कथांना पुढं धार्मिक स्वरूप येत गेलं आणि मग अशा धार्मिक रिती पाळल्या गेल्या नाहीत, तर देवतेचा कोप होईल, अशा काल्पनिक भीतीतून हे रिवाज बंधनकारक होऊन गेले. दुर्गामातेच्या मूर्तीसाठी विशिष्ट माती वापरण्याच्या श्रद्धेमागं निश्‍चित काहीतरी घडलेलं असावं आणि याचं उत्तर भारताच्या गेल्या सुमारे दहा हजार वर्षांच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासात सापडतं. हेसुद्धा भारतामधलं विशेषच म्हणावे लागेल.

मातृसंस्कृतीचं प्राचीनत्व
‘माणूस’ म्हणून दोन पायांवर मनुष्यप्राण्याची वाटचाल सुरू झाली, तेव्हापासून निसर्गाचं ‘माता-मूल’ हे प्राथमिक स्वरूपाचं कुटुंब-संघटन जगामध्ये सर्वत्र होतं; पण मातृटोळ्या, मातृगण, मातृकुळ, मातृप्रधान समाज अशा रचनात्मक पद्धतीनं विकसित होत गेलेली मातृसंस्कृती भारतामध्ये इसवीसनपूर्व आठ ते दहा हजार वर्षांपासून अत्यंत प्रगतिपथावर होती, असं अनेक भारतीय आणि पाश्‍चात्त्य संशोधक मानतात. प्राचीन ग्रंथांतून असणारे मातृदेवतांचे उल्लेख, त्यांची वेगवेगळ्या ऋतूंमधली उपासना आणि त्यांची मंदिरं अन्य देशांच्या तुलनेत भारतात विपुल आहेत. यापैकी बऱ्याच मातृदेवता या कोणत्या तरी प्राणी-पक्ष्याचं वाहन घेऊन येण्याची कल्पना परंपरेनं शेकडो शतकं भारतात टिकून आहे, यावरूनच आपल्या मातृसंस्कृतीचं प्राचीनत्व आपल्या लक्षात यावं. 

वैष्णवी माता गरुडावरून येते, ब्राह्मीचं वाहन हंस पक्षी, माहेश्वरी माता वृषभावरून येते, सरस्वतीचं वाहन मोर असे मातांचे आणि विशेषतः फक्त स्त्रियांचे या संदर्भातले उल्लेख आपल्या प्राचीन साहित्यांत सापडतात. त्याप्रमाणं आपली दुर्गामाता ‘महिष’ या वाहनावरून येते. आता या ‘वाहन’ कल्पनेमागचं रहस्य असं सांगितलं जातं, की दोन टोळ्यांत संघर्ष होत होते, तेव्हा या संघर्षांत भाग घेणाऱ्या सर्व टोळ्या आपापल्या टोळी-चिन्हाला घेऊन युद्धात उतरत होत्या. त्यामुळं दोन विरोधी टोळ्यांमधला फरक स्पष्टपणे समजू शकत होता. कोणत्या टोळीचे किती जण मृत्युमुखी पडले, हेसुद्धा या चिन्हाद्वारे समजत होतं. या युद्धात विजयी होणारी टोळी; तसंच पराभूत होणारी टोळी समजावी, म्हणून विजयी टोळीची माता-प्रमुख पराभूत टोळीचं चिन्ह ‘वाहन’ म्हणून, ‘मांडलिक’ या अर्थानं दर्शवून टोळी-सभेत मिरवणुकीनं येत असे. बंगालच्या दुर्गामातेनं ‘महिष’ चिन्ह असणाऱ्या गणाचा पराभव करणं आणि तिला नंतर ‘महिष’ वाहनावरून मिरवणुकीनं आणणं ही प्रथा याच परंपरेला पुष्टी देते. 

योद्धा स्त्री, उपचार करणारी माता
आपल्या संस्कृतीत मातांचे उल्लेख योद्धा स्त्रिया म्हणून आहेत, तशा रोगराईवर उपचार करणाऱ्या माता म्हणूनही आहेत. गोवरावर उपचार करणारी गोराम्बामाता, पटकीवर उपचार करणारी मरिआई, देवीवर उपचार करणारी शीतलादेवी, अशा प्रकारे जंगलातून कंद, मुळे, पाले आणून त्यापासून औषधे बनवणाऱ्या माता त्या काळात होत्या, असं अनुमान निघतं. सत्यवानाच्या हृदयविकारावर उपचार करणारी सावित्री आपल्या परिचयाची आहे. दशरथ राजा, युद्धात घायाळ झाल्यावर जंगलातल्या वनस्पतीद्वारे त्याच्यावर उपचार करून त्याला वाचवणारी कैकेयी आपल्याला माहीत आहे. अशा असंख्य गणमाता अतिप्राचीन भारतात होत्या, ज्यांनी आपल्या अपत्यांवरच्या उपचारांसाठी विविध जंगली वनस्पतींवर संशोधन करत, आयुर्वेदाचा पाया घातला. भोवतालच्या समाजातसुद्धा उपचारासाठी या माता भ्रमंती करत होत्या, म्हणून त्यांचं सार्वत्रिक पूजन आपल्याला आढळतं. अशा मातांना रात्री दुसऱ्या गणामध्ये वास्तव्यासाठी राहावं लागे, त्यांचे उल्लेख ‘कुलस्था’ म्हणजे ‘कुळात वास्तव्य करणारी’ असं वर्णन केलेलं आपल्या साहित्यात आढळतं. टोळी किंवा गणाचं संरक्षण, अपत्यांचं पालन, त्यांचा औषधोपचार, कुळातली उत्पादनव्यवस्था, वस्तू-विनिमयातून व्यापार आदी जबाबदाऱ्या आपल्या भाऊ आणि मामांच्या मदतीनं या माता पाहत होत्या, तेव्हा त्यांना भारतीय संस्कृतीत अतिशय आदराचं आणि मध्यवर्ती स्थान होतं. या कालखंडात विवाहप्रथा अज्ञात होती. सर्व माता अविवाहित होत्या. म्हणून मातृमंदिरांत त्या एकट्याच उभ्या असलेल्या दिसतात. 

महिष कुळातल्या असुरांचा बंदोबस्त
अशाच काळातली आपली दुर्गामाता. तिनं स्त्रियांना उपद्रवी असणाऱ्या महिष कुळातल्या असुरांचा बंदोबस्त केला. हा संग्राम थोडे दिवस नाही, तर दहा दिवस चाललेला होता; पण हा संघर्ष इतका तीव्र असावा, की तिनं युद्धात केलेल्या पराक्रमानं नतमस्तक होऊन, तिच्या पश्‍चात तिची मूर्ती बनवण्यात कुळा-कुळांतून उत्स्फूर्त आदरानं स्वतःच्या अंगणातल्या मातीचा वापर करण्याचा अभिमान तेव्हापासून मातृकुळात रुजू झालेला असावा. त्यानंतर प्रतिवर्षी मातृकुळाच्या अंगणातून दुर्गेची मूर्ती घडवली जाण्याची परंपरा रुजू झालेली दिसते. 

परंतु, भारतीय मातृसंस्कृतीचा सामाजिक इतिहास एवढ्यावर संपत नाही. भारतात इसवीसनपूर्व सात-आठ हजार वर्षांपासून, बाहेरून आक्रमकांच्या टोळ्या येऊ लागल्या. त्यामध्ये सुरवातीला असिरीयन, सुमेरियन, मग आर्य आणि त्यानंतर बऱ्याच शतकांनी, शक, हुण, कुशाण असे लोक येत राहिले. हे लोक मध्य आशिया, म्हणजे आजच्या इराक-इराण या दिशेनं हिंदुकुश रांगा ओलांडून, तर काही ताझिकीस्तान, उझबेकिस्तान, किरगिझस्तान या दिशेनं खैबर खिंड ओलांडून आले. या सर्व आक्रमकांच्या भाषा आणि संस्कृती या वेगळ्या होत्या; पण सर्वांमध्ये एक साम्य होतं, की हे सगळे आक्रमक वर्णानं गोरे होते आणि त्यांच्या भटक्‍या स्थितीमुळं त्यांच्यात पुरुष हे ‘टोळीप्रमुख’ होते. अशा रितीनं या आक्रमकांचा गौरवर्ण आणि त्या टोळ्यांतलं ‘पुरुष-महत्त्व’ या दोन गोष्टी स्थानिक भारतीय मातृसंस्कृतीहून पूर्णपणे भिन्न होत्या. मातृगण काळे-सावळे आणि गणांत स्त्री-महत्त्व मानणारे होते. यामुळं आक्रमकांचे पुरुषगण आणि भारतीयांचे मातृगण यांच्यामध्ये संघर्ष पेटला. अतिप्राचीन देव-दानव युद्ध आणि नंतरचं राम-रावण युद्ध, महाभारतातलं युद्ध या संस्कृती-संघर्षाच्या कहाण्या आहेत, असं अलीकडचे संशोधक मानतात. लोकमान्य टिळक यांनी मांडलेल्या पुराव्यानुसार, आक्रमकांमधला आर्यवंश उत्तर ध्रुव दिशेकडून दक्षिणेकडं सरकला आणि युरोपातून पुढं इराण आणि तिथून भारतीय उपखंडात आला, तोच पुढं भारतातला प्रमुख शासक झालेला आपण पाहतो.

मातृगणविरोधी धोरण
भारतीय गणांच्या लोकांचा काळा-सावळा रंग आणि मुक्तपणा या आर्यांना तिरस्करणीय वाटणाऱ्या प्रमुख बाबी होत्या. मुक्त शरीरसंबंधांमुळे पिता अज्ञात राहत असे, त्यामुळं आर्यांच्या कल्पनेतल्या पुरुषप्रधान कुळरचना रूढ होण्यास अडथळे निर्माण होऊ  लागले. ही अडचण ओळखून संस्कृत भाषक आर्य शासकांनी, भारतीय समाजातलं स्त्री-प्राधान्य कलुषित करण्याचा, नष्ट करण्याचा विडा उचलला. मातांच्या चारित्र्यावरून छळाच्या कथा रंगवण्यात आल्या आणि त्यांना किती भयंकर शिक्षा होऊ शकतात, किंवा कशा शिक्षा केल्या गेल्या पाहिजेत याची उदाहरणं समाजासमोर पुराण-कथांतून ठेवण्यात आली. औषधोपचार आणि अन्य परोपकारी मातांची मंदिरं जी मातांनी ‘एकटी राहण्याची’ प्रतीकं होती, ती गावाबाहेर करण्यात आली, आणि राम-सीता, लक्ष्मी-विष्णू अशा मंदिरांची त्याऐवजी प्रतिष्ठापना करण्यात आली. पुढं धर्मग्रंथांचा आधार घेऊन, स्त्रियांमध्ये वर्गवारी करण्याचे कार्य आर्यांनी करून स्त्री-निंदेची परंपरा साहित्यात आणली. प्राचीन मातृगणाच्या मातृ-श्रद्धांना नैतिक, धार्मिक, सांस्कृतिक पातळीवर खच्ची करण्याचा प्रयत्न आर्य शासकांनी योजनापूर्वक केलेला दिसतो.

आर्य शासकांचं हे मातृगणविरोधी धोरण अपमानकारक आणि त्रासदायक झाल्यामुळं अनेक मातृगणांनी शासकाप्रमाणं आपापल्या चालीरीती बदलल्या आणि हळूहळू कुळातल्या ‘स्त्री-प्राधान्या’ऐवजी आर्यांची ‘पुरुषप्रधान्य प्रमाण’ मानणारी संस्कृती स्वीकारली गेली. त्यांचे सूर्य, इंद्र, वरुण, अग्नी हे पुरुष देव मान्य करण्यास सुरवात केली. साहजिक, दुर्गामातेची मूर्ती आपल्या अंगणातल्या मातीनं घडवणाऱ्या मातृकुळांची संख्या तेव्हापासून घटू लागली. 

तरीही, इतके प्रयत्न आक्रमक आर्यांकडून सुरू राहूनही, काही मातृगणांनी आपल्या मातृदेवतेच्या विश्वास आणि मुक्त संबंधांच्या परंपरा शिकस्तीनं चालू ठेवलेल्या होत्या. आपापल्या कुळातून या माता उत्पादनं निर्माण करीत होत्या आणि त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चाललेला होता. हीच मोजकी मातृकुळं आपल्या अंगणाच्या मातीतून दुर्गेची मूर्ती त्याच भक्तिभावानं घडवत राहिली. 

या मुक्त मातांची उत्पादनं आणि त्या उत्पादनाचा व्यापार ही त्यांच्या चारितार्थाची साधनं जोवर त्यांच्या हातात होती, तोवर या माता आपलं आदराचं स्थान समाजात टिकवून होत्या. परंतु, पुढची अनेक दशकं आणि शतकं, मातृगणातल्या या अविवाहित मातांची होत राहिलेली सततची निंदा, त्यांच्याबाबतच्या चारित्र्यहननाच्या खोट्या कथा, त्यांना त्याकरिता झालेल्या अघोरी शिक्षा, त्या शिक्षांबाबतची प्रवचनं आणि कीर्तनं या माध्यमातून केला जाणारा मातांविरोधी प्रचार आणि त्यांचा व्यापार-विनिमयासाठी चाललेला सामाजिक संचार रोखण्याच्या हेतूनं त्यांचं होणारं हनन या सर्व घटनांमुळं मातृकुळांबद्दल एक नकारात्मक मानसिकता उर्वरित समाजात तयार होऊ लागली आणि जिद्दीनं या परंपरा राखणाऱ्या मातृगणाच्या मातांसंबंधी सामाजिक तिरस्कार फैलावू लागला. त्यांची उत्पादनं नाकारली जाऊ लागली. इथंच त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याला जोरदार झटका मिळाला. चारितार्थाचं साधनच हातातून जायला लागल्यावर, आक्रमकांचे पुरुषी-रितीरिवाज, पुरुषदेव, निष्ठेचे पुरुष-संबंध मान्य करण्याला प्राचीन भारतीय लढाऊ मातृगणांपुढं दुसरा पर्याय राहिला नाही.  काही मातृगणांनी पुरुषांची काही काळ मदत घेतली; पण पैसा चलन रूढ होऊ लागलं, तेव्हा कालौघात, पुरुषांच्या या मदतीला शरीरविक्रयाचं स्वरूप कधी प्राप्त झालं, हे परिस्थितीच्या रेट्यापुढं त्या अविवाहित मातांना समजलंही नाही.

मातृगणातल्या एकेकाळच्या अत्यंत सन्मानित आणि पूजनीय माता, प्राचीन मातृदेवतांच्या वंशज, अखेर अपमानित अर्थानं पाहिल्या जाऊ लागल्या. दुर्गेच्या कालखंडातल्या माता आणि नंतरच्या या माता, यांच्यामधलं साम्य म्हणजे दोघीही ‘अविवाहित माता’ आहेत; पण फरक म्हणजे एकीला आजही प्रचंड सन्मान आहे, तिच्या मिरवणुका, आरती, पूजा आहेत, नृत्य आणि उपास-तापास आहेत, तिला प्रसाद आहे आणि दुसरीचा तितकाच प्रचंड अपमान आहे आणि तिला हलाखीचं, बहिष्कृत जिणं बहाल केलेलं आहे.

प्राचीन स्त्री-प्रधान पद्धती मानणारा मातृगण समाज आज भारतीय उपखंडात शिल्लक नसल्यानं, दुर्गा-मूर्तीसाठी विशिष्ट अंगणांतल्या मातीची निवड करण्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. सात-आठ हजार वर्षांपूर्वी, आपल्या कुळांना जोजवणाऱ्या, त्यांचं शत्रूपासून रक्षण करणाऱ्या, वस्तू-विनिमयानं व्यापार करणाऱ्या, वनस्पतींवर संशोधन करणाऱ्या, गावोगाव उपचारासाठी भ्रमंती करणाऱ्या, या परोपकारी मातांना, निव्वळ त्यांच्या मुक्त रिवाजामुळं पापिणी ठरवण्यात आलं आणि भारताची प्रगतिशील म्हणून दुमदुमणारी प्राचीन संस्कृती जमीनदोस्त झाली. आज फक्त दुर्गेचा उत्सव आला, की विशिष्ट मातीची आठवण येते; पण दुर्गेप्रमाणं या महिलांना ‘अविवाहित मातांचा’ प्राचीन सन्मान देण्याचा विचार मात्र कधीच होत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com