नितीशबाबूंचं व्यवहारी राजकारण (श्रीराम पवार)

Article in Saptraga by Shriram Pawar
Article in Saptraga by Shriram Pawar

राजकारण नित्य बदलत असतं. कालची समीकरणं आज लागू पडत नाहीत. लोकसभा जिंकणारी मोदी-शहा जोडी देशात अजिंक्‍य वाटत असतानाच दिल्ली-बिहारचा पराभव होतो आणि त्यांचा अश्‍वमेधही रोखता येतो, असं वातावरण तयार होतं, तर उत्तर प्रदेशच्या विजयानं आत्ताच २०१९ च्या लोकसभेचा निकाल लागल्यासारखं वाटायला लागतं. या बदलत्या वातावरणात राजकारणातला शत्रु-मित्रविवेक बदलणार हे उघड आहे. ज्याना भूमिकांचं, विचारसरणीचं वगैरे पडलं आहे, त्यांनी खुशाल त्यावर चर्चा करत बसावं. राजकारण मूलतः सत्तेसाठी असतं आणि आपल्या सोईनं सत्ता राबवता यावी, यासाठीच्या तडजोडी व्यवहारी राजकारणात अनिवार्य ठरतात. नितीशकुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन धक्का दिला असला, तरी तो नितीशकुमार यांच्या आजवरच्या व्यवहारी राजकारणाशी सुसंगत असाच धक्का आहे. आता ज्यांनी नितीशबाबूंवर आशा लावल्या होत्या, त्यांच्या मनोरथांचा पायाच उखडला गेला आणि काहीही करून सगळी राज्यं पंखाखाली आणायचा खेळ मांडलेल्या भाजपच्या धुरिणांसाठी आख्खा हिंदीभाषक पट्टा आता प्रत्यक्ष किंवा सत्तेतला वाटेकरी म्हणून ताब्यात आला, याचा आनंद स्पष्ट आहे. या एका राजकीय खेळीनं नितीशकुमारांविषयीचं आकलन दोन्ही बाजूंनी या टोकाकडून त्या टोकाला गेलं, ही प्रतिमा चमकवण्याच्या राजकारणातली गंमत आहे.  

बिहारच्या राजकारणात मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राजीनामा देऊन १४ तासांत पुन्हा मुख्यमंत्री बनण्याच्या खेळीनं एक वर्तुळ पूर्ण झालं आहे. नितीशबाबू जुन्या छावणीत परतले आहेत. उगाचच अनेकांना नितीशकुमार यांच्यात धर्मनिरपेक्षतेचा रक्षणकर्ता, देशभर आपलं प्रभुत्व साकारत निघालेल्या मोदी-शहा जोडीला थोपवू शकणारा नेता दिसत होता आणि आता नितीशकुमारांनी अपेक्षाभंग केल्यानं  लालूप्रसाद-काँग्रेस आदी त्यांना शिव्याशाप देणार हे उघड आहे. मात्र, याच नितीशकुमारांनी अशीच अचानक भाजपची साथ सोडून धर्मनिरपेक्ष कळपात सहभागी व्हायचं ठरवलं होतं, तो काही फार लांबचा इतिहास नाही. नितीशकुमार दोन्ही वेळा बिहारमधली आपली सत्ता आणि वर्चस्व टिकवण्याचं राजकारणच करत होते. 

नितीशकुमार यांनी राजकीय वाटचालीत मित्र-शत्रू अनेक वेळा बदलले आहेत. हे करत असताना आपली प्रतिमा जपण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला. प्रत्येक वेळी सोईचं समीकरण मांडण्यात त्यांचा हातखंडा आहे. अचानक भ्रष्टाचाराच्या विरोधात उभं राहण्याची नितीशकुमारांची आताची भूमिका आणि त्यासाठी ज्या भाजपच्या विरोधात टोकाला जाऊन लढले, त्याच भाजपच्या गळ्यात गळे घालण्याचं राजकारण हा संधिसाधू राजकारणाचाच नमुना आहे. मात्र, यासाठी केवळ नितीशकुमार यांनाच दोष का द्यावा? ही राजकारणातली रीतच बनते आहे. राजीनाम्यासाठी त्यांनी निमित्त केलं ते लालूपुत्र तेजस्वी यादव यांच्याविरोधात सीबीआयनं सुरू केलेल्या चौकशीचं. लालूप्रसाद यादव आणि कुटुंबाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न उघडपणे सुरू आहे. यात लालूंसारख्या नेत्याच्या कृत्यांवर पांघरुण घालायचं काहीच कारणही नाही. त्यांना न्यायालयानंही सजा सुनावली आहे आणि चारागैरव्यवहारापासून अनेक गैरव्यवहारांच्या प्रकरणात लालूंचं नाव आधीच बदनाम झालेलं आहे. मात्र, त्याच लालूंच्या गळ्यात गळे घालताना आणि भाजपच्या विरोधात हल्लाबोल करताना नितीशकुमारांना काही महिन्यांपूर्वीपर्यंत काही वाटत नव्हतं. मुळात लालूप्रसाद यादवांचा इतिहास ते देशातल्या भ्रष्ट राजकारण्यांचे शिरोमणी शोभावेत असाच आहे. तो नितीशकुमारांना आधी माहीत नव्हता काय? लालूप्रसादांवर ‘जंगलराज’चा आरोप करणारे नितीशकुमारच तर होते. लालूंच्या विरोधात धडाका लावताना त्यांना भाजपची मदत घेण्यात काहीही वावगं वाटत नव्हतं. दोन्ही वेळेस मुद्दा जमिनीवर जिंकणारं राजकीय समीकरण आणि जातगठ्ठ्यांचं गणित बसवण्याचा होता आणि याबाबतीत आजमितीला देशांतल्या सगळ्यात धूर्त राजकारण्यांमध्ये नितीशकुमार यांचं नाव घ्यावं लागेल. २०१४ च्या निवडणुकीआधी नितीशकुमारांनी भाजपशी काडीमोड घेतला, तेव्हा कारण होतं मोदींचं नेतृत्व. लोकसभा निवडणुकीत एक तिसरं समीकरण मांडायचा अल्पजीवी प्रयत्नही त्यांनी करून पाहिला. त्या निवडणुकीत मोदींची जादू चालली. नितीशकुमार-लालूप्रसाद दोघांनाही टिकायचं तर एकत्र यावं लागेल, याची जाणीव झाली. मोदींच्या धडाक्‍यासमोर एकटं टिकण्याची शक्‍यता नाही, याचा अंदाज आल्यानंतरच बिहारची विधानसभा नितीशकुमार-लालूप्रसाद आणि काँग्रेस अशा महाआघाडीद्वारे लढायचा घाट घातला गेला व तो यशस्वी ठरला. तेव्हा नितीशकुमार यांना स्वतःची प्रतिमा आणि तुलनेत बिहारला विकासाच्या वाटेवर नेणाऱ्या कारभारासोबतच बिहारमधल्या जातीची समीकरणं आपल्या बाजूनं आणणं महत्त्वाचं वाटत होतं. अगदी दणकून पराभव झाला तरी लालूंचा त्यांच्या मूळ मतपेढीवरचा प्रभाव कायम राहिल्याचं लोकसभेची आकडेवारी सांगत होती. मोदीविरोधी भूमिका घेताना तेव्हा नितीशकुमारांनी लालूप्रसादांच्या पूर्वेतिहासाकडं दुर्लक्ष करणं सोईचंचं होतं. साहजिकच ‘आता भ्रष्टाचार अजिबात खपवून घेणार नाही’ व त्यासाठीच सत्ता सोडल्याचं आणि भाजपशी घरोबा केल्याचं समर्थन हा प्रतिमानिर्मितीच्या खेळाचा एक भाग आहे. मोदींच्या विरोधात काँग्रेसशी हातमिळवणी करताना काँग्रेसचं पतन भ्रष्टाचारांच्या आरोपांनीच झाल्याचंही नितीशबाबूंना विस्मरण झालंच होतं. 

बिहारच्या निवडणुकीत ज्या रीतीनं नितीशकुमार आणि मोदी एकमेकांवर तुटून पडले होते, त्याचं तर आता स्मरणही करू नये, असं दोघांनाही वाटत असेल. बिहारमधली ताजी उलथापालथ अतिशय नियोजनबद्ध होती हे तर स्पष्टच दिसतं. नितीशकुमार यांनी राजीनामा दिला नाही तोवर मोदी ट्विट करतात आणि त्यांचं अभिनंदन करतात व त्याच वेळी भाजपच्या सांसदीय मंडळाची बैठक होते...बिहारमधून भाजपचे नेते नितीशकुमार यांना पाठिंबा जाहीर करतात...बिहारच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार असलेले केसरीनाथ त्रिपाठी नेमके पाटण्यात असतात...हा सगळा घटनाक्रम काय सांगतो? नितीशकुमार यांचा विधानसभा निवडणुकीतला मोदींविषयीचा संताप आणि आताचं प्रेमाचं भरतं दोन्हीमागं सत्तेचं राजकारणच होतं. तसंच मोदींना ज्या नितीशकुमारांच्या डीएनएतच खोट असल्याची खात्री वाटत होती, ते अचानक पवित्र वाटायला लागले, याचं कारणही कोणत्या विचारसरणीत शोधायचं कारण नाही. मोदींनी डीएनएची उठाठेव केल्यानंतर नितीशकुमार यांनी बिहारमधल्या जनतेचे हजारो डीएनए नमुने मोदींकडं पाठवून तो निवडणुकीत प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला होता. नितीशकुमार यांचा विजय म्हणजे भाजपवाल्यांना एवढं मोठं संकट वाटत होतं, की त्यामुळं पाकिस्तानात फटाके उडतील याची त्यांना खात्री होती. ज्यांच्या डीएनएविषयीच शंका आहे, राष्ट्रावादाविषयी साशंकता आहे अशा नेत्यांसोबत सत्तेत बसताना आता भाजपला भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या लढाईचं अप्रूप वाटायला लागलं आहे. दुसरीकडं, नितीशकुमार हे भाजपचा उल्लेख ‘बडी झूठी पार्टी’ असा करत होते. आता त्याच खोट्यांसोबत सत्तास्थापनेचं समर्थन त्यांना करायचं आहे. बिहारमधली महाआघाडी धर्मनिरपेक्षतेच्या बाजूनं भाजपच्या जातीय-धार्मिक ध्रुवीकरणाच्या विरोधात झाली असं सांगितलं जात असलं, तरी तो मुखवटा होता. त्यात मुस्लिमांची मतं मिळवायची सोय होती आणि मुस्लिम, यादव यांच्यासोबत नितीशकुमार यांच्या पाठीशी असलेली महादलित मतपेढी यांचं एकत्रीकरण भाजपला पराभूत करणारं ठरतं, हे गणित त्यामागं होतं. नितीशकुमार यांचा तेव्हाचा जातीयवादाला विरोध राजकीय होता आणि आताची भ्रष्टाचाराच्या विरोधातली संवेदनशीलताही राजकीयच आहे. २००२ च्या गुजरातच्या दंगलीनंतरही हेच नितीशकुमार भाजपच्या आघाडीत कायम होते, हे विसरायचं कारण नाही. १७ वर्षं भाजपसोबतच्या आघाडीत नितीशकुमार होते. मोदींच्या विरोधात जातना ते सेक्‍युलर मंडळींचे डार्लिंग बनतात, हा भोंगळपणाच होता. त्यामुळं आता काँग्रेसनं गळा काढण्यात काही अर्थ नाही. नितीशकुमारांनी लालूप्रसादांसह काँग्रेसला सोडून दिल्यानंतर राहुल गांधी यांनी ‘याची चार महिने आधीच माहिती होती’ असं सांगितलं आहे. हे खरं असेल तर चार महिने काँग्रेस आणि पक्षाचे युवराज झोपा काढत होते काय? गोवा आणि मणिपुरातली सत्ता केवळ आळशीपणानं सोडावी लागलेली काँग्रेस भूतकाळातल्या ‘निवांतछाप निर्णयप्रक्रिये’तून बाहेर यायला तयार नाही, याचंच हे निदर्शक आहे. नितीशकुमार हे मोदींच्या विरोधातले मोहरे बनले, ते राजकीय गरजेपोटी. मात्र, ते मुळात लोहियाप्रणित बिगरकाँग्रेसवादी पठडीतले. त्यामुळं त्यांना कायम गृहीत धरणं आणि काँग्रेसची किंवा यूपीएची लढाई ते लढत राहतील, असं मानणं बावळटपणाचंच. नितीशकुमारांनी विश्‍वासघात केल्याचा गळा लालूप्रसादांनी काढला असला तरी सत्ता आल्यानंतर आपल्याच मुला-बाळांसाठी ती राबवायची आणि आपल्या भ्रष्ट व्यवहारांवर पांघरूण घालण्यासाठी सत्तेचा आश्रय घ्यायचा, हा मोह त्यांना तरी कुठं आवरला? धर्मनिरपेक्षतेसाठी महाआघाडी टिकवण्याची इतकीच गरज होती तर मुलाचा राजीमाना घेऊन नितीशकुमार यांची कोंडी करता आली असती. मात्र, लालूप्रसाद असोत की राहुल गांधी, एकदा मोदींच्या विरोधात गेलेले नितीशकुमार पुन्हा तिकडं जाणार नाहीत आणि भाजपही त्यांच्याशी जवळीक करणार नाही, या भ्रमात राहिले.  

आताच लालूप्रसाद आणि कुटुंब यांच्या विरोधातल्या चौकश्‍या नितीशकुमारांचा ‘आतला आवाज’ संवेदनशील बनवणाऱ्या कशा झाल्या, याचं उत्तर गेले काही महिने नितीशकुमारांची सुरू असलेली वाटचाल देते आहे. बिहारचा निकाल लागल्यानंतर नितीशकुमार हे मोदींना रोखू शकणारं नेतृत्व म्हणून प्रस्थापित व्हायला सुरवात झाली होती. त्या निवडणुकीत जंग जंग पछाडूनही मोदी-शहा जोडीच्या हाती काही लागलं नव्हतं. या जोडीला निर्णायकरीत्या रोखता येतं, याची जाणीव त्या निकालांनी करून दिली होती. तेव्हापासूनच भाजप काहीही करून बिहारच्या सत्तेत परतण्याचा मार्ग शोधत होता आणि हळूहळू नितीशकुमार भाजपच्या गळाला लागले. याचं कारणही नितीशकुमारांच्या राजकीयदृष्ट्या व्यवहारी वाटचालीत सापडेल. हातची सत्ता आणि प्रभाव सोडायचा नाही, हे सूत्र अवलंबत आणि मोठ्या स्वप्नामागं उगाचच धावून हाराकिरी करण्यापेक्षा तडजोड स्वीकारून आहे ते स्थान बळकट करण्याला 

त्यांनी प्राधान्य दिलं. काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष मोदी सरकारच्या प्रत्येक कृतीवर टीका करत असताना नितीशकुमार यांनी लोकभावनेची दिशा नेमकी ओळखली होती. सर्जिकल स्ट्राईकचा मुद्दा असो की सगळे विरोधक एकमुखानं झोडपत असलेला नोटबंदीचा मुद्दा असो, नितीशकुमार भाजपचं समर्थन करताना दिसत होते. नोटबंदीचा निर्णय लोकांनी स्वीकारला आहे, याची जाणीव नितीशकुमारांना सगळ्यात आधी झाली होती आणि विरोधी ऐक्‍यापेक्षा लोकभावनेसोबत जाण्याचं शहाणपण त्यांनी दाखवलं होतं. तेव्हापासून ते हळूहळू भाजपकडं झुकत चालले होते. विरोधात राहण्यात असलाच तर एकच लाभ होता. येत्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या विरोधात सर्वसहमतीचा चेहरा म्हणून पुढं यायचा. नितीशकुमार यांची राष्ट्रीय पातळीवरची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. मात्र, उत्तर प्रदेशच्या निवडणुकीनंतर तूर्त त्यासाठी योग्य वेळ नाही, याची जाणीव त्यांना झाली. विरोधी ऐक्‍यापायी लालूप्रसादांचा जाच सहन करण्यापेक्षा मोदींशी हातमिळवणी करून तुलनेत मवाळ सुशीलकुमार मोदींशी सत्तेची वाटणी करणं अधिक लाभाचं असल्याचं गणित त्यांनी मांडलं. मोदींच्या विरोधात सर्व विरोधकांनी एकत्रपणे लढलं पाहिजे, असं सांगणारे नितीशकुमारच होते. यासाठी पहिल्यांदा पुढाकार घेणाऱ्यांत त्यांचा समावेश होतो. मात्र, राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधी ऐक्‍य दाखवून देण्याची वेळ आली तेव्हा नितीशकुमारांनी संयुक्त जनता दलाला भाजपचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्यासोबत उभं केलं. नितीशकुमार हे भाजपच्या गोटात चालल्याचं हे निदर्शक होतं. मात्र, मोदीविरोधकांचा भाबडेपणा इतका, की हेच नितीशकुमार येत्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या विरोधात उभे राहतील आणि अंतिमतः विरोधकांसोबतच राहतील, असं त्यांना वाटत राहिलं.  

भाजपला भ्रष्टाचाराचं पडलं आहे किंवा काँग्रेसला धर्मनिरपेक्षतेचं, हेच मुळात चुकीचं गृहीतक आहे. सत्तापंढरीच्या वारकऱ्यांना भूमिका तोंडी लावण्यासाठी हव्या असतात. भाजपला अन्य पक्षातले गणंग पक्षात येताच पावन झाल्याचं वाटतं आणि कुणी मोदींच्या विरोधात बोलला की तो लगेच काँग्रेसप्रणित सेक्‍युलरपंथात पावन होतो, हे वास्तव आहे. भारतातलं व्यवहारी राजकारण हे असंच मतपेटी डोळ्यांसमोर ठेवून चालतं. नितीशकुमारांच्या यू टर्नमुळं हेच सूत्र अधोरेखित होतं. नितीशकुमार असं वागलेच कसे, असं वाटणारी जमात भाबडी आहे. नितीशकुमार यांचा इतिहासच सत्तेकडं जाणारा आणि आपली प्रतिमा सांभाळणारा आहे. लालूप्रसाद असोत की भाजप, त्यांच्याशी मैत्री किंवा वैर ही त्या त्या वेळची नितीशकुमार यांची गरज असते इतकंच. साहजिकच, ज्यांच्या डीएनएवरच शंका होती, त्यांच्याशी डीएनए जुळतोच कसा, असले प्रश्‍न विचारण्यात अर्थ नाही. त्याहून महत्त्वाचं म्हणजे, यात तत्त्व वगैरे शोधायच्या फंदात पडू नये!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com