या झोपडीत माझ्या... (प्रवीण टोकेकर)

Article by Pravin Tokekar in Saptaranga
Article by Pravin Tokekar in Saptaranga

जगात देव नाही. असलाच तर तो आपल्यासाठी उभा नाही. देव असं का वागतो? कुणाचंही कधीही काहीही वाकडं न करणाऱ्यालाही देव शिक्षा का देतो? दु:खाचे डोंगर का रचतो? देव असता तर इतकी निरपराध माणसं हकनाक का मेली असती? युद्धबिद्ध माणसं करतात, कबूल. अतिरेकी हल्ले हेसुद्धा आमचंच कर्तृत्व, कबूल. पण मग भूकंप, पूर, अपघात असल्या भयानक दुर्घटितांमध्ये साधीसुधी माणसं का किडा-मुंगीसारखी मरतात? भोपाळ-दुर्घटनेनंतरचं ते छायाचित्र आठवतंय? अर्धवट पुरलेलं ते बाळ...किंवा गेल्या वर्षी ॲलन कुर्दी नावाच्या तीन वर्षांच्या एक सीरियन निर्वासित पोराचं समुद्रकिनाऱ्याशी वाहत आलेलं शव...अवघं जग हळहळत होतं. ही काय देवाची करणी म्हणायची?

या भयानक शोकान्तिका खरंच देव घडवून आणतो? देव जाणे. विल्यम पॉल यंग नावाच्या कॅनडातल्या एका लेखकानं एक चिमुकली कादंबरिका लिहिली. ‘द शॅक’ नावाची. ‘शॅक’ म्हणजे झोपडी. त्या झोपडीत घडलेली ही गोष्ट आहे. श्रीयुत यंग हे सद्‌गृहस्थ. आयुष्यभर बरेच उद्योग केल्यानंतर सन २००६ मध्ये चक्‍क दिवाळखोर जाहले. गाड्या-घोडे विकून लोकलगाडीनं चाकरीला जाण्याची पाळी आली. मेट्रोरेलच्या रोजच्या ४० मिनिटांच्या प्रवासात त्यांनी काहीबाही कागदावर गिरबटून काढलं. ती ही छोटीशी गोष्ट. मग त्याचं चिमुकलं पुस्तक करून आपल्या लाडक्‍या मुला-मुलींना (फक्‍त सहा!) वाढदिवसाची गिफ्ट म्हणून दिलं. पोरं खूश झाली. मग नातलगांमध्ये वाटलं. त्यांनाही आवडलं. मग त्यांना वाटलं की याचं एक भलं-बुरं पुस्तक करून विकू का नये?-विकलं. 

आज या ‘ द शॅक’च्या तब्बल २५ लाख प्रती विकल्या गेल्या आहेत. बेस्ट सेलर! 

आता या पुस्तकाच्या पानापानात ‘बायबल’मधल्याच पुराण्या व्यक्‍तिरेखा भेटतात आणि त्या पवित्र ग्रंथातलीच वचनं निराळ्या पद्धतीनं समोर येतात, ही बाब अलाहिदा; पण त्या पुराण्या दैवी व्यक्‍तिरेखांना इथं चक्‍क मॉडर्न रूप आहे. त्यांची भाषाही आत्ताच्या जमान्यातली आहे. संदर्भही नवीन युगाचे आहेत. काही कळलं? नाही ना? मग त्याच्यावर आधारित एक चित्रपटही गेल्या मार्चमध्येच आला, तो आवर्जून बघा. सिनेमा ग्रेट नाही; पण डोक्‍याला १०० टक्‍के मुंग्या आणतो. काही ठिकाणी तर हडबडवून टाकतो. हा चित्रपट बघितल्यानं नास्तिकाचं मत बदलणार नाही, श्रद्धावंतांच्या मानसपंचायतनालाही ढका लागणार नाही; पण माणूस म्हणून स्वत:त डोकावण्याची एक मस्त संधी मिळेल.
* * *

मॅकेंझी ॲलन फिलिपचं आयुष्य सध्या तसं सुखाचं आहे. तीन गुणी मुलं. केट, जोश आणि शेंडेफळ मिस्सी. एक गोड बायको. तिचं नाव नॅन. कमालीची श्रद्धाळू. घरकामात टेरिफिक. मध्य-पश्‍चिमेकडच्या अमेरिकेत एका आटोपशीर नगरातलं एक टुमदार घर त्यांचं आहे. दारात हिरवळ. घरात सुख.

मॅकचा देवावर काडीचा विश्‍वास नाही. म्हणजे बायकोच्या आग्रहास्तव तो चर्चमध्ये जातो. प्रार्थनेला उभाही राहतो, म्हणत मात्र नाही. कारण देव असल्या बंडल प्रार्थना ऐकत नाही, हे त्याला अनुभवातून कळून चुकलंय. मॅक थोडासा अबोल आणि उदासच आहे. एखादी भयंकर गोष्ट मनात खूप खोलवर गाडून टाकून जगत राहिल्यासारखा. लहानपणीची गोष्ट. त्याचा बाप अत्यंत भिक्‍कार** होता. दारू पी पी प्यायची आणि मग आईनं मरेस्तोवर मार खायचा. पोरगंही कधी कधी वेडावाकडा मार खायचं. घरातल्या या कोळिष्टकांनी मॅक हा पार कोलमडलेला शाळकरी पोरगा होता. 

शेजारच्या घरातल्या एका आंटीनं त्याला अचानक बोलावलं. कोण ही आंटी? मॅक ओळखत नव्हता; पण तरीही गेला. तिनं त्याला खाऊ दिला. शांतपणे सल्ला दिला : ‘हे बघ, मला माहितीये तुझ्या घरात आणि मनात काय चाललंय. तू देवाकडं जाऊन बोल बिनधास्त...आय मीन चर्चमध्ये जा.’

मॅकनं चर्चमध्ये फादरना रडत रडत सांगितलं: ‘‘मला क्षमा हवी आहे...मी आईला वाचवू शकत नाहीए त्या हैवानापासून. मी हरतोय...’’ घरी आल्यावर बापानं त्याला चामडीच्या पट्ट्यानं हाणला. देवाला भेट म्हणे...हड्‌!!

...एक दिवस बापाच्या दारूत त्यानं गपचूप स्ट्रिचनाइन हे विष मिसळलं आणि विषय कायमचा संपवून टाकला. मर लेका! हाच तो मॅकच्या उरातला सल.
* * *

काळ पुढं वाहत राहिला. वीकेंडला जवळच कुठंतरी डोंगरात सहलीला जायचं ठरलं. बायको-मुलं उत्साहानं तयार झाली. छानदार तळ्याकाठी तंबू ठोकून दोन दिवस राहायचं. राना-वनात हिंडायचं. जवळच एक धबधबासुद्धा होता. कोणे एके काळी, एका राजकन्येनं प्रजेचं रक्षण करण्यासाठी इथून जीव दिला. तिच्या वडिलांचे अश्रू म्हणजे हा धबधबा...अशी एक गोष्ट मॅकनं चार वर्षांच्या मिस्सीला सांगितली. मिस्सी निष्पाप होती. ती देवाला ‘पापा’ म्हणायची. तिच्या आईनंच ते नाव देवाला दिलं होतं ः पापा. ‘संडे मास’ला पापाकडं जायचं, पापाला सांगून मगच जेवायचं, अशी सगळी तिची भाषा.
...पण तळ्यातली होडी उलटली आणि मिस्सी गायब झाली. राना-वनात शोधलं. नाही मिळाली. एका डोंगरातल्या झोपड्यात तिचे रक्‍ताळलेले कपडे तेवढे मिळाले. मिस्सी गेली? मिस्सी गेली?...कुठल्या हैवानानं डाव साधला? मिस्सी, मिस्सी, मिस्सी गंऽऽऽ...

मॅक आणि त्याचं कुटुंब साफ कोलमडून पडलं. मिस्सी अशी जाऊ कशी शकते? एवढी निरागस पोर...तिचा काय अपराध होता? तरीही देवानं तिला न्यावं? एक निष्पाप जीव फुकाचा बळी गेला. आग लागो असल्या देवाला. मॅक मनात पुरता घायाळ झाला.

...हे काय होऊन बसलं?
* * *
 

एक दिवस हिरवळीवरचं बर्फ साफ करताना मॅकला टपालपेटीत एक पाकीट दिसलं. त्याच्याच नावाचं. 

‘‘डिअर मॅक, लाँग टाइम नो सी. मिसिंग यू अ लॉट. भेटायचं असेल तर त्या झोपडीत ये: पापा.’’

...हा पापा कोण? मिस्सी ज्याला पापा म्हणायची तो देव? छे, भलतंच. तिला उचलून नेणारा हैवान तर नसेल? वाटाघाटी करायला बोलावत नसेल? मिस्सी अजून जिवंत असेल? मॅक हादरून गेला. 

मॅकनं मात्र त्या डोंगरातल्या झोपडीत जायची तयारी केली. मित्राकडून त्याचा मिनी ट्रक घेतला. बंदूक घेतली, निघाला. रस्त्यात एका अवाढव्य ट्रेलर ट्रकची धडक चुकवताना मरता मरता वाचला; पण डोंगरात गेलाच.

बर्फाच्या वेढ्यात ती चंद्रमौळी झोपडी उभी होती. निर्मनुष्य. गूढ. मॅकनं तिथं जाऊन त्वेषानं हाका मारल्या : ‘साल्या, पुढं ये. कोण आहेस तू? कुणीही आलं नाही. तो ढसाढसा रडायला लागला. बंदूक ताणून संतापानं तो गोळी चालवणार, इतक्‍यात एक तरुण पायवाटेनं येताना दिसला. जीन्स. स्पोर्टस शूज. मस्त टी शर्ट. कोपरापर्यंत बाह्या दुमडलेला झक्‍क शर्ट. थोडीशी दाढी. चेहऱ्यावर प्रसन्न हसू. डोळ्यात स्वागत.
‘‘इथं कुणीही नाही; पण तिथं चल. थोडा फ्रेश हो...तिथं कुणीतरी तुझी वाट पाहतंय,’’ असं सांगून तो तरुण सहज चालायलाही लागला. मागोमाग बुचकळ्यात पडलेला मॅक.
थोडीशी वाटचाल झाल्यावर अचानक हिवाळ्याचा बर्फ दिसेनासा झाला. पिवळंरंजन ऊन्ह पडलं. पक्ष्यांची किलबिल. पायवाटेच्या दुतर्फा अद्भुत रानफुलं. आसमंत नुसता खिदळतोय जणू. समोर एक छान कौलारू घर उभं होतं.

आणि दारात ती आंटी. काळी-सावळी. तद्दन घरेलू पोशाखात. ओठांवर प्रेमळ हास्य.
‘‘ओह मॅक, किती वाट पाहिली तुझी. आलास? ये. बस. तू मला ओळखण्याचं काही कारण नाही. पण अरे, मी पापा!’’ ती बाई मायेनं म्हणाली. तिच्या शेजारी उभा असलेला तो तरुणही मस्त हसला. आणखी एक छान, सुशिक्षित तरुणी तिथं होती.

‘‘ हा माझा मुलगा आणि ही...’’ पापानं ओळख करून देण्याआधीच ती तरुणी पुढं झाली.
‘‘मी शरयू!’’ तिच्या हातात फुलझाडं होती. डोळ्यात निसर्गाची जादू साकळली होती.  
‘‘सारा हू?’’ मॅकचं डोकं भंजाळून गेलं होतं.

‘‘शरयू...हिंदी नेम. त्याचा अर्थ ‘वाऱ्याचा नि:श्‍वास’ असं काहीतरी! गॉड नोज!!’’ तो तरुण गमतीदार हसत म्हणाला.

‘‘पापा म्हंजे?

‘‘अरे, मी बापाच्या रूपात असते तर तुलाच झेपलं नसतं. तुझा राग ना बापावर...मग मी आई झाले. दॅट्‌स इट,’’ पापा म्हणाली. पापाच्या डोळ्यात मॅकबद्दल अपरंपार प्रेम होतं. ‘तुला कल्पना नाही, माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते...’ हे वाक्‍य तिनं इतक्‍या वेळा उच्चारलं की बस.

ओह गॉड, ही देव आहे म्हणे. हा तरुण म्हणजे देवाचा पुत्र. साक्षात जीझस...आणि हा तो पवित्र आत्मा. एकूण ही ‘बायबल’मधली पवित्र त्रिमूर्ती, होली ट्रिनिटी आहे. म्हणजे तसा त्यांचा दावा आहे.

‘‘मीच ते पत्र टाकून आलो तुझ्या टपालपेटीत,’’ देवाच्या पुत्रानं खांदे उडवत सांगून टाकलं.

‘‘मी झटकन स्वयंपाक करते. जेवून घेऊ. मग बोलू. इथं पाहिजे तितके दिवस राहा. जायचं असेल तर जाऊसुद्धा शकतोस. इथं कसलंच बंधन नाही. ओके?’’ पापानं घाईघाईत पीठ भिजवायला घेतलं. ‘मला मदत करू लाग’ असंही मॅकला सांगितलं. एकंदरीत कुटुंब कमालीचं लाघवी होतं. प्रेमळ होतं; पण इथं रानात काय करतात हे? हे खरंच देव आहेत?
* * *
‘‘पापा, तू तुझ्या मुलांना कधी शिक्षा देतेस?’’
‘‘अर्थात!’’
‘‘ रागावतेस त्यांच्यावर?’’
‘‘कुठली आई रागावत नाही, बाबा?’’
‘‘मग माझ्या मिस्सीला का शिक्षा दिलीस? तिची काहीच चूक नव्हती...जीव घेणं ही काय शिक्षा आहे? खून आहे तो खून!’’
‘‘ मी नाही केलं ते!’’ पापाचे डोळे भरून आले होते. ती म्हणाली ः ‘‘ अरे, हातून पाप घडलं हीच शिक्षा नाही का रे? याहून मोठी शिक्षा काय असू शकते?
‘‘ ऐनवेळेला मला गरज होती, त्याच काळात तू सोडलंस मला वाऱ्यावर...’’
‘‘नाही बेटा, मी तर सतत तुझ्याबरोबर तर आहे. हे बघ, तू एकाच कोनातून बघतोयस सगळं. लुक ॲट द होल पिक्‍चर...’’
...संतापून मॅक तिच्यासमोरून उठलाच.
* * *

‘‘निघाला असशील तर वाट त्या दिशेला आहे. आणि ही तुझ्या मिनी ट्रकची किल्ली...’’ शरयू त्याच्या रस्त्यात उभी होती. पापावर भडकलेला मॅक खरोखर निघून चालला होता. शरयूचं बहुधा काही बागकाम सुरू असावं. हाताला माती होती. हातात खुरपं होतं. ‘जाण्यापूर्वी मला जरा थोडी मदत करून जा, प्लीज’ असं आर्जवानं म्हणत ती बागेकडं निघाली. पाठोपाठ मॅक.

‘‘हे झुडूप उपटून इथं जागा करायची आहे मला. खणून दे मला...देतोस?’’

-मॅकनं अशी बाग आयुष्यात कधी बघितली नव्हती. रंगांचा उत्सव होता तो. 
‘‘नवं रुजवण्यासाठी जागा करावी लागते सारखी...’’ ती म्हणाली. ही खरंच सृजनाची देवता असावी. किती निर्मितिक्षम आहेत हिची बोटं...मॅक निवळला.

घराजवळ एक सुंदर तळं होतं. दूरवर डोंगरराजी. तळ्याच्या पल्याडच्या अंगाला एक पहाड दिसत होता. देवाच्या पुत्रानं मॅकला सांगितलं. ‘‘तिथं जाऊ या फिरायला...होडीतून? मी येतो मागोमाग. तू हो पुढं.’’

-मॅक निघाला. होडीतून जाताना त्याला ती स्थिती झाली. अचानक तळ्याचं पाणी डांबरासारखं काळं झालं. होडीतून वर येऊ लागलं. मॅक घाबरला. तेवढ्यात त्याला आवाज आला ः ‘घाबरू नकोस. माझ्यावर लक्ष केंद्रित कर. तुला काहीही होणार नाही. हा निव्वळ एक भ्रम आहे...’ पाण्यावरून चालत येत देवाचा पुत्र जीझस सांगत होता. 
मॅकच्या ध्यानी आलं. पाणी निवळत-ओसरत चाललं होतं.

त्याला त्या पहाडाशी सोडून जीझस म्हणाला ः ‘‘मी इथंच थांबतो. पहाडाशी तुला कुणीतरी दुसरं भेटणार आहे.’’ पहाडाच्या अंतर्भागात त्याला सोफिया भेटली. शहाणिवेची देवता. गॉडेस ऑफ विस्डम.

तिनं त्याला सांगितलं : ‘‘तुला आज न्यायाधीश व्हायचंय. तूच ठरवायचं आहेस गुन्हेगार कोण आहे ते. वडिलांना गुन्हेगार मानतोस नं तू? त्यांचं बालपण कसं गेलं हे माहीत आहे तुला? पापाला दोष देऊ नकोस. मिस्सी गेल्यावर तुला जे वाटलं नं, त्यातून ती प्रत्येक क्षणाला जात असते. केवढं दु:ख भोगते ती एकटी, कल्पना आहे तुला? अरे, तिनं कसलीच बंधनं घातली नाहीत कुणावर. म्हणून दुष्ट शक्‍तींचं फावतं. जरा कुठं फट दिसली की हे वाईट वारं घुसतंच...तुला समजा पर्याय दिला की तुझ्या तीन मुलांपैकी एकाला स्वर्गात पाठव आणि बाकी दोघांना नरकात...तर काय उत्तर असेल तुझं?’’

‘‘ नॉन्सेन्स...त्यांना कशाला? त्यांच्याऐवजी मी जातो हवं तर नरकात. मी भोगतो...’’ चाचरत मॅक म्हणाला.

‘‘एक्‍झॅक्‍टली, हेच पापा करत असते. कळलं?’’

त्याला बाप दिसला. मिस्सी दिसली. दोघंही खुशीत दिसले. मॅकचा राग पळाला. पापाची माया, जीझसची सोबत आणि शरयूचं जीवनेच्छेनं भरलेलं बोलणं यानं त्याच्या भाव-भावनांचा पार निचरा झाला. ‘हर्ष खेद ते मावळले, कंटकशल्ये बोथटली’ अशी अवस्था आली. मन शांत झालं.

पुढं काय झालं? मिस्सीच्या दु:खात पिचलेल्या मॅकेंझीला पडलेलं हे स्वप्न होतं की वास्तव?
* * * 
‘द शॅक’ हा काही रहस्यपट नाही. त्याला गूढाची डूब जरूर आहे. काही ठिकाणी तो प्रवचनाच्या अंगानं जातोसुद्धा; पण त्यातल्या व्यक्‍तिरेखा फॅंटास्टिकच आहेत. विशेषत: ‘पापा’ची व्यक्‍तिरेखा. ऑक्‍टाव्हिया स्पेन्सर या कृष्णवर्णीय पोक्‍त अभिनेत्रीनं साकारलेली पापा डोळ्याच्या कडा भिजवते. तिच्या कुशीत दमून गाढ झोपून जावं, असं वाटू लागतं. जीझस तर चक्‍क स्मार्ट तरुणाच्या आविर्भावात सामोरा येतो. अव्राहाम अवीव आलुश या तरुण इस्रायली अभिनेत्यानं जीझस साकारला आहे, तर शरयूच्या रूपात जपानी अभिनेत्री सुमिरे मात्सुबारा आपल्याला भेटते. शरयू हे हिंदी नाव सृजनदेवतेला देण्याची कल्पकता आपल्या भारतीय मनाला भावून जाते. सॅम वर्दिंग्टन या तगड्या अभिनेत्यानं रंगवलेला मॅकेंझी लक्षणीय आहे. या कलाकृतीचे लेखक विल्यम पॉल यंग यांचे वडील न्यू गिनी इथं पाद्री होते. साहजिकच खिस्ती-विचारांचा पगडा त्यांच्यावर आहेच आहे. देव म्हणजे काय, याची नेमकी आयडिया पोरांना यायला हवी, या हेतूनं त्यांनी हे लेखन केलं. त्याचा चित्रपट केला ब्रिटिश दिग्दर्शक स्टुअर्ट हॅझलडाइन यांनी. पुस्तकातली पानं जिवंत करणं तितकंसं सोपं नव्हतं. एकतर देव-देवतांना मॉडर्न रूपात दाखवणं हा फक्‍त भारतातलाच नव्हे, तर जगभरातला समाज गुन्हाच मानत आला आहे; पण तरीही हॅझलडाइननं डेअरिंग केलं. अर्थात समीक्षकांच्या मजबूत शिव्या खाल्ल्या!! ‘पोरांना भजनी लावण्याचे हे असले बाजारू उद्योग बंद करा’ अशीही प्रतिक्रिया आली. ‘अ सर्मन इन अ सिनेमा हाऊस’ अशीही संभावना झाली. गेल्या मार्चमध्येच हा चित्रपट रिलीज झाला; पण तीन-चार महिन्यांत भरपूर उलटसुलट चर्चा या चित्रपटावर झाली आहे; पण टीकेचं सोडून द्या. थोडीशी धार्मिक झापडं बाजूला ठेवून हा चित्रपट पाहिला तर देव आणि माणसातलं नेमकं नातं कसं आहे, यावरचा धुक्‍याचा पदर किंचित हटल्याचा भास होतो. 

...चित्रपट संपल्यानंतर जाणवतं, अरेच्चा, हे तर आपण आधीही ऐकलं-वाचलं होतं. देव अल्पधारिष्ट तेवढं पाहतो. तो मायेचा सोयरा, कृपेचा कोयरा आहे. भावाचा भुकेला आहे. आपल्या पोरांना तो शिक्षा कशी देईल? वगैरे. मनोमन ओळख पटून जाते. ‘बाळकाचे हित। वाहे माउलीचे चित्त।’ हा अभंग आठवतो. आणि मग अचानक टाळ-मृदंगांचा परिचित कल्लोळ मनाची चंद्रमौळी झोपडी उजळून टाकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com