अंताकडून प्रारंभाकडं... (प्रवीण टोकेकर)

अंताकडून प्रारंभाकडं... (प्रवीण टोकेकर)

कोऽ  हम? मी कोण आहे? इथं का आलो? माझ्या अस्तित्वाचं प्रयोजन काय? श्‍वासोच्छ्वासांच्या या प्रदीर्घ आणि अखंड मालिकेला आयुष्य का म्हणायचं? 
कुठल्यातरी दोन जिवांच्या मीलनातून बीज रुजतं. जीव धरतो. चिमुकलं हृदय स्पंदू लागतं. आता हे मरेपर्यंत असंच धडधडत राहणार. मातेच्या उदरातल्या लालिम गर्भकुहरात नवमास गुजरल्यानंतर एक दिवस जन्मदात्रीलाच असह्य मरणकळा देत या पृथ्वीतलावर यायचं. मग श्‍वास सुरू...जीवन वाहतं होतं.

...दूध पिणं, काऊचिऊचे घास, रांगणं, धडपडत चालणं, धावणं, शिक्षण, मिळकत, प्रेम, नातीगोती, संसार, स्थैर्य, वार्धक्‍य...आणि मग पुन्हा प्रस्थानाच्या तयारीत.
आयुष्य म्हणजे हे एवढंच आणि असंच असतं? नसावं.

एफ. स्कॉट फिट्‌झगेराल्ड हे अमेरिकी आधुनिक वाङ्‌मयातलं एक अजरामर नाव. सेहेचाळीस वर्षांच्या आयुष्यात त्यानं फक्‍त साडेचारच कादंबऱ्या लिहिल्या. ‘धिस साइड ऑफ दि पॅरडाइज’, ‘द ब्यूटीफुल अँड द डॅम्ड्‌’, ‘द ग्रेट गॅट्‌स्बी’, ‘टेंडर इज द नाइट’ आणि पाचवी अर्धवट लिहिलेली- ‘द लास्ट टायकून’. पैकी ‘द ग्रेट गॅट्‌स्बी’नं इतिहास घडवला; पण याव्यतिरिक्‍त आणखी दोन जमेच्या गोष्टी फिट्‌झगेराल्डनं केल्या. एक म्हणजे, एकंदर पावणेदोनशे कथा लिहिल्या आणि दुसरं, अर्नेस्ट हेमिंग्वेसारख्या समकालीन लेखकाशी मस्त दोस्ती केली. त्याला जिवंतपणी फार भाव मिळाला नाही; पण मरणोत्तर सन्मान अपरंपार मिळाले.

फिट्‌झगेराल्डच्या हस्तलिखितांच्या चोऱ्या आणि छुप्या लिलावातल्या त्यांच्या कोट्यवधी डॉलर्सच्या किमती हाच मुळी आधुनिक कादंबऱ्यांचा एव्हाना विषय झाला आहे. फिट्‌झगेराल्डची एक छोटीशी कथा होती ः ‘द क्‍युरिअस केस ऑफ बेंजामिन बटन’. या कथेनं त्या काळी साहित्यवर्तुळात विशेष उत्पात घडवला नाही; पण त्याचं रुपेरी पडद्यावरचं रूप मात्र रसिकांना खलास करून गेलं. त्याच्या कथेचा नायक इतर सर्व प्राणिमात्रांप्रमाणे जन्मापासून मृत्यूपर्यंत जगला; पण एक अतर्क्‍य घडलं होतं.
बाल्टिमोरच्या बेंजामिन बटनच्या आयुष्याच्या घड्याळाचे काटे उलटे फिरले. तो जन्माला आला तेव्हाच ऐंशीच्या पलीकडचा होता. प्रोजेरिया नावाची एक दुर्मीळ बिमारी असते. या आजाराचं बालक जन्माला येतं तेच वार्धक्‍याच्या खुणा घेऊन. अमिताभ बच्चनचा ‘पा’ नावाचा सिनेमा कुणी पाहिला असेल तर कल्पना येईल. अशी बालकं कमी जगतात. वृद्ध म्हणूनच जन्माला आल्यानंतर काय होणार?

पण बेंजामिन बटन वृद्धाचा मध्यमवयीन झाला. मध्यम वयातून तारुण्यात आला. तारुण्यातून पौगंडात, पौगंडातून बाल्यात आणि बाल्यातून पुढं अजन्मावस्थेत. विसावं शतक उजाडताना युरोपातल्या अनेक लेखकांना या रिव्हर्स लाइफच्या संकल्पनेनं पछाडलं होतं. बऱ्याच लेखकांनी या मध्यवर्ती कल्पनेभोवती कथा-कादंबऱ्या रचल्या; पण फिट्‌झगेराल्डची कथा सगळ्यात सरस आणि वास्तववादी ठरली. इतकी की पुढं २००८ मध्ये त्यावर आधारित असलेला चित्रपट आला, त्याहीपेक्षा त्याची कथाच अधिक स्तिमित करणारी ठरली. अर्थात चित्रपटीय मागणीनुसार या जुनाट कथेत बरेच बदल करण्यात आले. १९२२ मधली कहाणी २००५ मध्ये सांगितली जात होती.बेंजामिन बटनची ही जगावेगळी केस मेंदूच्या ठिकऱ्या करते. आपल्या नात्यागोत्यांची गणितं नव्यानं मांडायला लावते. ‘बालपण उतू गेले, अन्‌ तारुण्य नासले, वृद्धत्व साचले...उरलो बंदी असा मी...’ ही विलापिका उलटी म्हटली तरी अर्थ तोच निघतो की वेगळा? या यक्षप्रश्‍नाचं उत्तर हवं असेल तर ‘क्‍युरिअस केस ऑफ बेंजामिन बटन’ हा चित्रपट बघणं बंधनकारक आहे.
* * *

न्यू ऑर्लिन्समध्ये कॅटरिना चक्रिवादळाची चाहूल लागली होती. जोरकस वारं वाहू लागलं होतं. खिडक्‍या-दारं खडखड करू लागली होती. तसल्या त्या हवेत इस्पितळातल्या मरणशय्येवर डेझी पहुडली आहे. वृद्ध डेझीला हातसुद्धा उचलता येत नाहीए. मोठ्या कष्टानं तिनं आपल्या मुलीला, कॅरलिनला जवळ बोलावलं. आपली जुनी डायरी काढायला लावली. ‘मोठ्यांदा वाच’ असं सांगितलं.
चिकटवलेली, पिवळी पडलेली ती डायरी कॅरलिननं वाचायला घेतली. ती गोष्ट होती बेंजामिन बटनची.

१९१७-१८ चा सुमार असणार. न्यूयॉर्कच्या ग्रॅंड सेंट्रल इमारतीवर तेव्हा एक प्रचंड मोठं घड्याळ बसवायचं होतं. एका अंध घड्याळजीनं ते बनवायला घेतलं. तो हे घड्याळ बनवत होता, तेव्हा त्याचा मुलगा पहिल्या महायुद्धात लढण्यासाठी रणभूमीवर गेला; पण तो परत आलाच नाही. आपल्या हुतात्मा मुलापायी अश्रू ढाळतच त्या अंध घड्याळजीनं ते अवाढव्य घड्याळ उभं केलं. ते ग्रॅंड सेंट्रलवर बसवण्याच्या शुभारंभाच्या सोहळ्याला राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट जातीनं हजर होते; पण घोटाळा असा होता की घड्याळजीनं बनवलेल्या त्या घड्याळाचा सेकंद काटा उलटा फिरत होता.

घड्याळात बारानंतर अकरा वाजत होते, एक नव्हे! लोक बुचकळ्यात पडले.
‘हे घड्याळ उलटं फिरावं. काळ उलटा चालावा आणि युद्धात कामी आलेली आमची मुलं परत यावीत,’ असं भावनिक आवाहन त्या घड्याळजीनं केलं. नंतर तो आपलं दुकानबिकान बंद करून बेपत्ताच झाला.

१९१८ मध्ये ऑगस्ट महिन्यात पहिलं महायुद्ध संपलं. रस्त्यारस्त्यावर जल्लोष झाला. त्याच दिवशी बेंजामिन बटनचा जन्म झाला. नवजात पोर; पण जख्ख म्हातारं. प्रचंड रक्‍तस्राव होऊन आई तिथल्या तिथं गेलीच. आपल्या पोराचं हे रूप पाहून त्याच्या बापाचं, थॉमसनं किंचाळीच फोडली. ही काय भुताटकी? याला पोर कसं म्हणणार? 
आईवेगळ्या पोराला त्यानं कुठंतरी कचरापेटीत टाकून देण्याचाच विचार केला; पण कुठं टाकणार? शेवटी एका वृद्धाश्रमाच्या पायरीशी हे पोरगं ठेवून तो पसार झाला. एक कृष्णवर्णीय देवभोळं जोडपं हा वृद्धाश्रम चालवत होतं. क्‍वीनी आणि तिचा नवरा. पदरी मूल-बाळ नव्हतं. साहजिकच क्‍वीनीनं हे पोरगं पत्करलं. तान्हं असलं तरी मूल म्हातारंच होतं. ‘ओल्ड एज होम’मध्ये खपून गेलं असतंच.

क्‍वीनीनं आधी डॉक्‍टर बोलावला. डॉक्‍टरनं पोराला तपासलं आणि सांगितलं ः ‘‘त्याला संधिवात आहे. हाडं ठिसूळ झालीयेत. शिवाय दोन्ही डोळ्यांत मोतीबिंदूसुद्धा आहेत. पोरगं जगणार नाही. नाद सोडा!’’

क्‍वीनीनं नाद नाही सोडला. कसंही असलं तरी हे देवाचं मूल आहे. तिनं त्याचं नाव ठेवलं बेंजामिन.

त्याच सुमारास क्‍वीनीबरोबर काम करणाऱ्या सेविकेलाही तेव्हा एक मुलगी झाली होती. त्या चिमुकलीचं नाव डेझी. सेविकेची आई तिथंच वृद्धाश्रमात राहायची. डेझी आणि बेंजामिन एकाच दिवशी जन्माला आलेले; पण एक खरीखुरी तान्ही. दुसरा खराखुरा म्हातारा.
* * * 

क्‍वीनी देवभोळी होती. बेंजामिन पाच वर्षांचा झाला तरी चष्मिष्ट म्हाताऱ्यासारखा दिसायचा. हाता-पायाच्या काड्या. धड चालताही यायचं नाही. कायम चाकाच्या खुर्चीत. क्‍वीनीनं त्याला शेवटी एका येशूच्या मंत्रजागरानं ‘लूले, लंगडे, अपाहिजों को तंदुरुस्त करणाऱ्या’ एका धर्मोपदेशकाच्या दरबारात नेलं. असली बुवाबाजी ही काही भारताची मिरास नाही. जगभर चालत असते ती. तिथं धर्मोपदेशकानं त्याला चालण्याची आज्ञा केली आणि बेंजामिन खरंच चालू लागला! ते पाहून तो धर्मोपदेशकच जागच्या जागी कोसळला.घड्याळाचे काटे उलटे फिरत होते. बेंजामिनची चाकाची खुर्ची सुटली. कुबड्यांच्या साह्यानं तो चालत होता. एका बुटक्‍या दोस्ताबरोबर त्याला तारुण्यसुलभ उद्योग करण्याच्या ऊर्मीही येऊ लागल्या. शरीर जराजर्जर असलं तरी त्याचा आत्मा पौगंडावस्थेतलाच होता. एका मेजवानीत त्याला डेझी भेटली. तीच ती डेझी. उत्फुल्ल. टप्पोऱ्या डोळ्यांमधून हसणारी. एक वृद्ध आपल्या प्रेमात पडतोय, हे पाहून तिला गंमतच वाटली. डेझी आणि बेंजामिनचं नातं गहिरं होत गेलं. बेंजामिनसारखा म्हातारा इतक्‍या कोवळ्या पोरीबरोबर गुटर्गू करतो आहे, हे लोकांना बघवलं नाही. हा कुठला म्हातारचळ? पण डेझीच्या लक्षात आलं होतं की बेंजामिनचं म्हातारपण सरळ नाही. तो हळूहळू तरुण होत चालला आहे. ते खरंही होतं.

बेंजामिन आता स्वत: आंघोळ करायचा. त्याच्या चष्म्याचा नंबर कमी होत होता. दात मजबूत होत होते. स्नायूंमध्ये शक्‍ती भरत होती. 

‘‘मला रोज तरुण झाल्यासारखं वाटतंय...ॲम आय ग्रोइंग यंगर?’’ केस कापून घ्यायला बसलेल्या बेंजामिननं कारागीर बाईला, मिस मेपलना विचारलं.

‘‘तसं असेल तर किती वाईट...आपल्याच माणसांना म्हातारं होत मरून जाताना पाहण्यात कसलं आलंय तारुण्य?’’ मिस मेपल म्हणाली. बेंजामिन विचारात पडला.
बेंजामिननं गोदीत एका बोटीवर साफसफाईची नोकरी धरली. ‘हा म्हातारा काय काम करणार?’ असं म्हणत बोटीचा कॅप्टन माइक यानं त्याला बोट घासून काढायला लावली. बेंजामिन आणि माइकची दोस्ती जमलीच. हा तरुण म्हातारा कॅप्टन माइकला पटला होता.

‘‘क्‍काय? अजून तू व्हर्जिन आहेस? छट्‌,’’ कॅप्टन माइकनं अविश्‍वासानं विचारलं. बेंजामिनचा हा उपास मोडण्याचा त्यानं जणू ‘पण’ केला. जवळच्या एका वेश्‍यागृहात दोघंही जोडीनं शिरलं. या म्हाताऱ्याशी कोण संग करणार? तिथल्या वारांगनांनीही नाकं मुरडली. एका वारांगनेनं मात्र तयारी दाखवली. बेंजामिन दिसायला म्हातारा होता; पण तारुण्याचा जोम ऐन भरात होता.

...‘रोज येत जा रे’ अशी दाद मिळवत मर्द बेंजामिन परतला. परतताना त्याच वेश्‍यागृहात त्याला एकानं ओळखलं. ‘आपल्या कारनं घरी सोडतो’ म्हणाला. मध्येच एका बारमध्ये दोघंही भरपूर दारू प्यायले. तो मनुष्य बेंजामिन बटनचा बाप थॉमस बटन होता. बेंजामिननं त्याला ओळखलं नाही; पण बापानं पोराला ओळखलं होतं.
* * *

बेंजामिननं निर्णय घेतला. घरातून बाहेर पडायचं. कॅप्टन माइकच्या बोटीतून सफरींवर जायचं. खलाश्‍याचं आयुृष्य जगायचं. तेव्हा बेंजामिन होता १७ वर्षांचा, डेझी १२ वर्षांची. डेझीनं त्याला रोखलं नाही; पण ‘जिथं कुठं फिरशील, तिथून मला नियमित पत्र पाठव,’ अशी अट मात्र घातली. बेंजामिननं ती अट आयुष्यभर पाळली. बेंजामिन बंदर दरबंदर हिंडत राहिला. त्याचं वय दिसामासानं कमी होत होतं. इकडं डेझीचं रूपांतर एका देखण्या बॅले नर्तिकेत होत होतं. अशाच एका बंदरावरच्या हॉटेलात बेंजामिनला इलिझाबेथ भेटली. 

विवाहित होती; पण आकर्षक वगैरे. एका रात्रीतली ही मैत्री अनेक रात्री टिकली. इलिझाबेथला कधी काळी इंग्लिश खाडी पार करण्याची महत्त्वाकांक्षा होती; पण त्या प्रयत्नात ती अपयशी ठरली. इलिझाबेथनं बेंजामिनला जीवनकलेचे पाठच दिले. गाभोळीचा आस्वाद कसा घ्यावा, व्होडका कशी प्यावी, हे सगळं शिकवलंच; पण मधुर असा सहवासदेखील देऊ केला. आपण प्रेमात पडलोय, हे बेंजामिननं डेझीला पत्रातून तत्काळ कळवलंच.

...पण एक दिवस चिठ्‌ठी ठेवून इलिझाबेथ त्याच्या आयुष्यातून निघून गेली. चिठ्‌ठीत एक कोरडी ओळ लिहिलेली होती : ‘तुझ्यासोबत दिवस बरे गेले. भेटलो ते छान झालं.’ बस. इतकंच.

पुढे लवकरच जपाननं पर्ल हार्बरवर हल्ला चढवला. अमेरिका महायुद्धात उतरली. कॅप्टन माइकच्या बोटीला अमेरिकी नौदलानं सहायक कर्तव्य बजावायला सांगितलं. अन्नपुरवठा करणं, सामानसुमान किंवा माणसांची ने-आण वगैरे. अशाच एका कामगिरीत शत्रूच्या पाणबुडीनं कॅप्टन माइकची पाणबुडी हेरली; पण कॅप्टननं हाराकिरी करत आपली बोट थेट त्या पाणबुडीवर आदळवून तिच्यासकट स्वत:ही जलसमाधी घेतली. त्या भयानक हाहाकारात अतुलनीय कामगिरी बजावणारा बेंजामिन मात्र कसाबसा वाचला. 

महायुद्धातल्या कामगिरीनंतर बेंजामिन क्‍वीनीच्या घरी परतला. तिथं डेझी भेटली. डेझीनं पन्नाशीतल्या बेंजामिनला प्रारंभी ओळखलंच नाही; पण नंतर गप्पा झाल्या. डेझी पूर्णवेळ तिच्या बॅले नृत्याबद्दलच बोलत राहिली. सूर कुठं तरी बिघडला होता. ताल हरवला होता. बेंजामिनचे वडील थॉमस त्याला पुन्हा भेटले. पायाला झालेल्या इन्फेक्‍शनमुळं ते कुबड्यांच्या आधारानं चालत होते. आपला बटनांचा कारखाना त्यांनी मुलाला दाखवला....आणि तू माझाच मुलगा आहेस, हे सांगून टाकलं. पुराव्यादाखल फोटोंचा जुना आल्बम दाखवला. बेंजामिनला हे सगळं स्वीकारणं जड गेलं.
* * *

घड्याळ कुणासाठी थांबत नसतं. बेंजामिनसाठी ते उलटं फिरत होतं, इतकंच. बॅलेच्या कैफात बुडालेली डेझी, दिसामासानं तरुण होत जाणारा बेंजामिन. दररोज थकत गेलेली क्‍वीनी. आयुष्यभर कोसभर दूर राहून अखेर थडग्यात गेलेला बाप थॉमस...आणि ज्याचा मागमूसही लागला नाही तो कॅप्टन माइक आणि अचानक विरून गेलेलं इलिझाबेथ नावाचं मधुर स्वप्न. डेझीनं नवा बॉयफ्रेंड गाठला होता. तरीही बेंजामिन तिच्याकडं जातच राहिला. पॅरिसमधल्या एका सडक-अपघातात डेझी जायबंदी झाली. तिची बॅले-नर्तिकेची कारकीर्द संपुष्टात आली. दोघंही क्‍वीनीच्या घरी भेटू-राहू लागले. पुन्हा सूर जुळले. नातं गहिरं होतंच, त्याला एक शाश्‍वत रूप आलं. डेझीनं बॅले-प्रशिक्षणाची नृत्यशाळा उघडली. बापाकडून आलेला पैसा, कॅप्टन माइकची बोट याच्या जोरावर बेंजामिन बटनही तसा सधन झाला होता. याच काळात तो क्षण आला, ज्याची दोघंही आतुरतेनं वाट पाहत होते. एका टोकापासून निघालेली डेझी, दुसऱ्या टोकापासून धावत निघालेला बेंजामिन. एकतरी वेळ अशी येईल की आपण समवयस्क ठरू. शरीरानं, मनानं आणि नात्यानं. बेंजामिनच्या चाळिशीत ते शक्‍य झालं. 

 ‘‘मी म्हातारी झाले, दातबीत पडले, अपंग झाले तरीही तू माझ्यावर असंच प्रेम करशील?’’ तिनं विचारलं.

‘‘मी तरुण झालो, तारुण्यपीटिका आल्या तर? जिन्याखाली काय आहे या भीतीनं अर्धमेला झालो तर? गादीत शू केली तर?...तर तू करशील प्रेम?’’ त्यानं विचारलं. काही दिवसांतच डेझीनं त्याला सांगितलं की ती गरोदर आहे. यथावकाश तिला छान छोकरी झाली. नाव ठेवलं कॅरलिन.
* * *

व्हायचं होतं ते घडलंच. डेझी म्हातारी होत गेली. बेंजामिन लहान होत गेला. हळू हळू त्याला नीट बोलता येईनासं झालं. तो एकटा राहीनासा झाला. एक बोट तोंडात आणि दुसरं डेझीच्या मुठीत...हा आपला नवरा आहे, हे सांगणार कुणाला? डेझीचा हा कसोटीचा काळ होता. बेंजामिन आक्रसत पाळण्यात गेला. एक दिवस आपलं बोट डेझीच्या मुठीत ठेवून तो शांतपणे तिच्याकडं बघत राहिला. त्या नजरेनं डेझीला सारं काही स्वच्छ सांगितलं. डेझीनं मान हलवली. बाळानं डोळे मिटले.

...कॅरलिननं डायरी वाचून विषण्ण मनानं खाली ठेवली. तेव्हा डेझीनंही डोळे मिटलेले होते आणि कॅटरिना चक्रीवादळानं थैमानाला सुरवात केली होती...
* * * 

ब्रॅड पिट नावाच्या तरण्याबांड अभिनेत्यानं दाखवलेली तडफ बेंजामिन बटनच्या व्यक्‍तिरेखेला कमालीची जिवंत करते. केट ब्लांचेटची डेझी तर असामान्य तोडीची आहे. कालानुरूप बदल करण्यात आल्यानं फिट्‌झगेराल्डचं कथानक थोडं दूर जातं हे खरं आहे; पण ब्रॅड पिट हा निव्वळ अँजेलिना जोलीचा माजी नवरा नसून खरोखर गुणी अभिनेता आहे, याची खात्री पटते. एकतर या वयात असले वृद्धाचे मेकप करणं स्टारमंडळी टाळतात; पण त्यानं मुलाहिजा केला नाही. या प्रोस्थेटिक मेकपला तयार व्हायला त्याला सहा तास लागायचे म्हणे. अर्थात त्याच्या जोडीला ग्राफिक तंत्र आणि अन्य अभिनेते होतेच. दिग्दर्शक डेव्हिड फिंचर यांनी फिट्‌झगेराल्डच्या कथेत बदल केला; पण तो केवळ काळापुरताच. मूळ कथानकाची मोडतोड नाही केली. कॅप्टन माइकच्या देहावर गोंदवलेला हमिंगबर्ड आणि त्याचं प्रत्यक्षात वापरलेलं रूपक ही तर फिंचर यांची लाजबाब दिग्दर्शकीय खेळी मानावी लागेल. हमिंगबर्ड हा जगातला एकमेव पक्षी आहे, जो पाठमोरा किंवा उलटा उडू शकतो. गंमत म्हणजे फिट्‌झगेराल्डची कथा फिंचर यांनी आधी वाचलीच नव्हती. चित्रपटलेखक एरिक रॉथ यांनी त्यावरून लिहिलेली २४० पानांची संहिता वाचूनच त्यानं कामाला सुरवात केली. या चित्रपटाला तेरा ऑस्कर नामांकनं होती. त्यापैकी तीन ऑस्कर पुरस्कार मिळाले, ते उत्कृष्ट मेकप, उत्कृष्ट निर्मितिसंकल्पन आणि उत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्‍ट्‌सचे!
चित्रपट संपल्यानंतर उगीचच आदि शंकराचार्यांची चर्पटपंजरिका आठवते. 

पुनरपि जननम पुनरपि मरणं
पुनरपि जननीजठरे शयनम्‌
इह संसारे बहुदुस्तारे
कृपयाऽपारे पाही मुरारे।।

कस्त्वं कोऽहम कुत आयात:
का मे जननी को मे तात:
इति परिभावय सर्वमसारम्‌
विश्वं त्यत्त्वा स्वप्नविचारम्‌।।

...पुन्हा जन्म घेणं. पुन्हा मरणं. पुन्हा पुन्हा मातेच्या उदरात रुजणं. हे मुरारी, या दुस्तर संसारचक्रातून सोडव रे बाबा...आपण कोण? मी कोण? मी कुठून आलो? माझी आई कोण? बाप कोण? छे, हा विश्वाचा पसारा हे एक स्वप्न आहे, असं म्हणून सोडून द्यावं हे खरं.

...पण नकोच. हे सोडून देणं फार अवघड आहे. या स्वप्नवत्‌ इहलोकातच किती चांगल्या लेखनकृती निर्माण होतात. चांगले चित्रपट निर्माण होतात. ते कसे सोडावेत?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com