रोज एक दिवस... (प्रवीण टोकेकर)

रविवार, 5 नोव्हेंबर 2017

बिफोर आय गो टू स्लीप...हा संपूर्ण चित्रपट एक भन्नाट सायकोथ्रिलर आहे. अतर्क्‍याच्या गूढ सावल्यांसारखा काहीसा गडद. चित्रपट लक्षात राहणारा आहे; पण त्याची मध्यवर्ती कल्पना अधिकच विस्मयचकित करणारी आहे. एस. जे. वॉटसन नावाच्या एका लेखकानं २०११ मध्ये याच नावाची एक कादंबरी लिहिली होती. त्यावर बेतलेला हा चित्रपट. कादंबरी पकड घेणारी आहे. गमतीचा भाग म्हणजे ती चक्‍क डायरीसारखी लिहिलेली आहे. रोज एक दिवस जगणाऱ्या एका बाईची डायरी. या चमत्कारिक प्रयोगासाठी ही कादंबरी वाचावी आणि चित्रपटही पाहावा.

बिफोर आय गो टू स्लीप...हा संपूर्ण चित्रपट एक भन्नाट सायकोथ्रिलर आहे. अतर्क्‍याच्या गूढ सावल्यांसारखा काहीसा गडद. चित्रपट लक्षात राहणारा आहे; पण त्याची मध्यवर्ती कल्पना अधिकच विस्मयचकित करणारी आहे. एस. जे. वॉटसन नावाच्या एका लेखकानं २०११ मध्ये याच नावाची एक कादंबरी लिहिली होती. त्यावर बेतलेला हा चित्रपट. कादंबरी पकड घेणारी आहे. गमतीचा भाग म्हणजे ती चक्‍क डायरीसारखी लिहिलेली आहे. रोज एक दिवस जगणाऱ्या एका बाईची डायरी. या चमत्कारिक प्रयोगासाठी ही कादंबरी वाचावी आणि चित्रपटही पाहावा.

Finish every day and be done with it.
You have done what you could.
Some blunders and absurdities, no doubt crept in.
Forget them as soon as you can, tomorrow is a new day;
begin it well and serenely, with too high a spirit
to be cumbered with your old nonsense.
This new day is too dear,
with its hopes and invitations,
to waste a moment on the yesterdays. 
- राल्फ वाल्डो इमर्सन, 
अमेरिकी कवी, निबंधकार, लेखक (१८०३-१८८३)

रो  ज नवा सूर्य. नवी सकाळ. नवा दिवस. नव्या आशा-आकांक्षांनी भारलेला. भरलेला. ‘जुने जाउ द्या मरणालागुनि’ असं स्वत:लाच बजावत उठायचं. अंथरुणासकट सगळ्या भूतकाळाची घडी करायची आणि नव्या दिवसाला भिडायचं. लहानपणी नाकतोडा आणि मुंगीची गोष्ट ऐकली होती ना? गुलछबू नाकतोडा गाणी गात, उड्या मारत हिंडतोय आणि मुंगीताई आपली वाहतेय अन्नाचा भार. आज काय पावसाळ्याची तयारी, उद्या काय हिवाळ्याची चिंता, परवा काय उन्हाळ्याची काळजी. माणसानं कसं गाणी गात रोजचा दिवस निभावावा. वरना इस जिंदगी में रख्खाही क्‍या है?

खरंच असं लाइफ पाहिजे. रोज सकाळी उठताना नवा दिवस. कालपर्यंतचं आयुष्य एकदम डिलिट. दिवसभरातल्या उसाभरीनंतर अंथरुणाला पाठ टेकली की आख्खा दिवस मेमरीतून डिलिट. कायमचा. भूतकाळाचं कसलं बॅगेज नको. वाईट घटनांचा आठव नको. सुखद प्रसंगांची आळवणी नको. सिर्फ एक दिन की जिंदगी. असे अनेक दिवस. किती मस्त. ना?

...पण हे तितकंसं मस्त नाही. तितकंसं सोपंही नाही. रात्रीच्या झोपेत आदला दिवस डिलिट करण्याची सोय अजून वैद्यकशास्त्रानं उपलब्ध करून दिलेली नाही. शिवाय यदाकदाचित तसं घडलंच तर जगणार कसं? आणि कशासाठी? माणसाच्या आयुष्यातून स्मरण नावाची गोष्ट वजा झाली की संपलंच की सगळं. मग कसली उत्क्रांती नि कसलं काय...

सुमारे तीनेक वर्षापूर्वी सन २०१४ मध्ये एक चित्रपट आला होता. नाव होतं ः बिफोर आय गो टू स्लीप. 

The woods are lovely, dark and deep   
But I have promises to keep   
And miles to go before I sleep   
And miles to go before I sleep

...विख्यात कवी रॉबर्ट फ्रॉस्टच्या या सुप्रसिद्ध ओळींचा प्रभाव चित्रपटाच्या शीर्षकावर आहे हे उघड आहे; पण तेवढं सोडलं तर बाकी संपूर्ण चित्रपट एक भन्नाट सायकोथ्रिलर आहे. अतर्क्‍याच्या गूढ सावल्यांसारखा काहीसा गडद. चित्रपट लक्षात राहणारा आहे; पण त्याची मध्यवर्ती कल्पना अधिकच विस्मयचकित करणारी आहे. एस. जे. वॉटसन नावाच्या एका लेखकानं २०११ मध्ये याच नावाची एक कादंबरी लिहिली होती. त्यावर बेतलेला हा चित्रपट. कादंबरी पकड घेणारी आहे. गमतीचा भाग म्हणजे ती चक्‍क डायरीसारखी लिहिली आहे. रोज एक दिवस जगणाऱ्या एका बाईची डायरी. या चमत्कारिक प्रयोगासाठी ही कादंबरी वाचावी आणि चित्रपटही पाहावा.
* * *

एका रम्य सकाळी क्रिस्तिन ल्युकसनं डोळे उघडले. उजेडाची एक तिरीप तिच्या डोळ्यात गेली. शेजारी एक माणूस उघडा झोपलाय. हा कोण आहे? ती घाबरून ताडकन उठली. समोर दार आहे. बाथरूम असावं. हे कुठलं घर आहे? आपण कुठं आलोय? 
‘‘क्रिस्तिन...मी बेन. तुझा नवरा. १९९९ मध्ये आपलं लग्न झालं.’’ बिछान्यातला माणूसही तिच्या हालचालीनं आता जागा झाला होता. क्‍काय? हा आपला नवरा आहे? क्रिस्तिनच्या नजरेत ओळखीचं चिन्हही नाही.

‘‘दहा वर्षांपूर्वी तुला अपघात झाला होता; त्यामुळं तुला काही गोष्टी आठवत नाहीत...’’ तो पुन्हा मृदू आवाजात म्हणाला. त्यानं तिला अंग झाकायला एक गाऊन दिला. ‘माझ्यावर विश्‍वास ठेव’ असंही सांगितलं. त्याच्या आवाजात दिलासा होता; पण तिला आठवत मात्र काहीच नाही. क्रिस्तिन ल्युकसचा हरेक दिवस असाच सुरू होतो.रोज तिला तिच्या अस्तित्वाची जाणीव करून द्यावी लागते. जगण्याचे संदर्भ द्यावे लागतात. तिला सायकोजेनिक ॲम्नेशिया आहे ः स्मृतिभ्रंश. मात्र, तोही विशिष्ट प्रकारचा. अपघातात तिच्या मेंदूला मार लागला. त्यात स्मृतिकेंद्रांचं नुकसान झालं. तिच्या मेंदूला फक्‍त दिवसभराची स्मृती साठवता येते. रात्री झोपली की संगणक शटडाऊन व्हावा, तसं काहीतरी होतं. सकाळी उठायचं ते कोऱ्या मेंदूनंच. काही जुन्या स्मृती उरल्या आहेत; पण त्या विसाव्या वर्षापर्यंतच्याच. म्हणजे सध्या ती चाळिशीची असली तरी रोज दिवस उजाडला की ती थेट वीस वर्षांची होते. मनानं!

बेननं तिला सैपाकघराकडं नेलं. तिथं एक बोर्ड लिहिलेला आहे. तिची औषधं, दैनंदिन वस्तूंच्या नोंदी, काही जुने फोटो. अर्थात बेनसोबतचे टिपलेले सुंदर क्षण. सगळं लिहिलंय. एवढ्या सूचना पाळल्या तरी दिवस नीट निघून जाईल. बेन खूप प्रेमळ आहे. तिचा काळजीकाट्यानं सांभाळ करतो आहे. रोज या दिव्यातून जाणं सोपं नाही; पण बेननं ते बहुधा स्वीकारलं आहे. 

‘‘तुला स्ट्रॉबेरीची ॲलर्जी आहे,’’ बोर्डावरच्या सूचनेकडं बोट दाखवत बेन म्हणाला. त्याला कामाला जाण्याची घाई होती. भराभरा तयार होऊन तो निघाला.
लंडनपासून पाच-दहा मैलांवर ग्रीनविच आहे. मोठं रम्य गाव. तिथल्या त्या शानदार घरात आता क्रिस्तिन एकटीच उरली. सोबत आठवणारं फक्‍त काही तासांचं आयुष्य. तेवढंच बॅगेज. बाकी संदर्भ पुसले गेलेले.

...इतक्‍यात फोन वाजला. 

‘‘हलो, मी डॉ. नॅश....क्रिस्तिन? गुड मॉर्निंग. मी तुझा मानसोपचारतज्ज्ञ आहे. गेले काही आठवडे मी तुझ्यावर उपचार करतोय...बरं वाटतंय ना? तुला आठवण करून द्यायला फोन केलाय. आज अपॉइंटमेंट आहे ना?’’

दिवस जसजसा वर येत होता, क्रिस्तिन तसतशी स्वत:ला सावरत होती. दररोज निम्माशिम्मा दिवस या भानगडीतच जात असेल का आपला? गोंधळलेल्या मनःस्थितीतच ती डॉ. नॅशना भेटली. डॉक्‍टरही बरा वाटला.
* * *

कसले तरी फ्लॅशेस चमकतात. काही धूसर दृश्‍यं दिसतात. उजळतात. मिटून जातात. विमानाचा कर्णकर्कश घरघराट. चेहऱ्यावर व्रण असलेल्या एका माणसाचा अर्धामुर्धा चेहरा. 

काही तप्त क्षण. लहान मुलाची बडबड...हे काय असावं? आपल्याच जुन्या स्मृती तर नव्हेत? पण त्यांचा काही अर्थ लागत नाही. चेहरे नीट दिसत नाहीत. काही अगम्य आवाज कानात गुंजतात. क्रिस्तिन काळवंडून गेली.

एक दिवस बेन म्हणाला ः ‘‘बाहेर जेवायला जाऊ. ठीक आहे?’’

ग्रीनविचची वस्ती तुरळक; पण तशी सधन. आसपास हिरवळ भरपूर. उंच झाडं. हिरव्यागार टेकड्या. काही नवी घरं. काही जुनी जॉर्जियन धाटणीची. इथून जवळच एक वेधशाळा आहे. ‘ग्रीनविच टाइम’ इथंच मोजतात.

...बेन आहे चांगला; पण त्याचा सारखा संशय येतो क्रिस्तिनला. ज्याच्याबरोबर राहायचं, शेजारी झोपायचं तो मुळात काही तासांच्या ओळखीचा. विश्वास कसा ठेवावा? मुळात हा सगळं खरं सांगतोय हे कशावरून? तिला हेच कळत नव्हतं. डॉ. नॅशना भेटून विचारलं पाहिजे. डॉक्‍टरांनी तिला एक ल्युमेक्‍स कंपनीचा छोटा व्हिडिओ कॅमेरा दिला होता. ‘‘रोज बटण दाबून त्याच्यावर दिवसभरातल्या घडामोडी, शंका, प्रश्‍न बोलून ठेवायचे. प्रसंगांचं वर्णन करायचं. नंतर त्याचं विश्‍लेषण करू या.’’

‘‘अर्थात या कॅमेऱ्याबद्दल बेनला काही सांगू नकोस. तुझं तुलाच कळलं पाहिजे. मुख्य म्हणजे तुझा तुझ्यावर विश्वास बसला पाहिजे. कॅमेरा कपाटात पार तळाच्या खणात ठेवून दे. मी रोज सकाळी तुला कॅमेऱ्याची आठवण करत जाईन,’’ डॉक्‍टर म्हणाले. ही योजना क्रिस्तिनलाही पटली. सकाळी रेकॉर्डिंग ऐकलं की कालचा दिवसही पदरात पडतो. किती सोपं होतं!

एक दिवस डॉ. नॅशनी तिच्यावर बॉम्बच टाकला. 

‘‘क्रिस्तिन तुला अपघात झालेला नाही. मारहाण झाली होती...’’ ते म्हणाले. या गौप्यस्फोटानं क्रिस्तिन पार हादरून गेली. बेनचं वागणं कुठंच खटकत नव्हतं; पण तो काहीतरी लपवतोय, हे तर कळत होतं. तिनं शेवटी त्याला छेडलंच. बरेच आढेवेढे घेत तो शेवटी बोलला.

‘‘एका माणसाबरोबर तुझं लफडं होतं. विमानतळाजवळच्या हॉटेलानजीक तू रक्‍ताच्या थारोळ्यात सापडलीस. त्यानंच तुला जवळजवळ संपवलं होतं...’’

‘‘कोण तो माणूस?’’तिनं विचारलं.

‘‘माइक त्याचं नाव...तो गायब आहे.’’

आपण लफडेबाज बाई आहोत, या कल्पनेनं तिच्या अंगावर शहारा आला. शक्‍यच नाही. आपण अशा नाहीओत. तिचा विश्वास बसेना. हा बेन नावाचा माणूस काहीही सांगतोय.
डॉ. नॅशशी बोलताना तिला कळलं, की क्‍लेअर नावाची एक तिची मैत्रीणही होती. तिनंच तिला ॲडमिट केलं. क्‍लेअरचा नंबरसुद्धा डॉक्‍टरांनी तिला दिला.  क्रिस्तिन तिला वेळ न घालवता भेटली. ‘मी स्वत:च बेनमध्ये गुंतले होते, म्हणून तुला सोडून निघाले...’ अशी कबुली क्‍लेअरनं दिली. देवा, एवढुशा आयुष्याला हा आणखी एक पीळ.

क्रिस्तिनला कळलं की आपल्याला मूलही होतं. मुलगा. त्याचं नाव ॲडम; पण सात वर्षांचा असताना तो मेनिन्जायटिसनं गेला. बेननं हेसुद्धा तिच्यापासून लपवून ठेवलं होतं. खूप मागं लागल्यावर अखेर त्यानं गॅरेजमधून एक डबा आणला. त्यातून ॲडमचे फोटो काढून दाखवले. गोड छोकरा होता. मम्माच्या गालाला गाल लावणारा. खळखळून हसणारा. गार्डनमध्ये खेळणारा. वडिलांनी, बेननं त्याला हवेत छान उडवतानाचा फोटो पाहून क्रिस्तिनचा बांधच फुटला. काय हे भयानक आयुष्य. तेही असं तुकड्यातुकड्यात वाट्याला येतंय. 

पुढं घटनाच अशा घडत गेल्या, की डॉ. नॅशवरचा तिचा विश्वासही उडू लागला. बेन निदान खूप समंजस वागताना दिसत तरी होता; पण नॅश... क्रिस्तिनच्या मनात स्फोटांवर स्फोट होत राहिले. तिनं या सगळ्याच शंका-कुशंकांचा सोक्षमोक्ष लावायचं ठरवलं. बेनला थेट बोट रोखून विचारलं. अखेर बेननं तिला विमानतळानजीकच्या त्या हॉटेलात नेलं आणि सगळं सांगून टाकलं...

काय सांगून टाकलं? पुढं काय घडलं? बेन खरंच बेन होता का? की तो बेन नव्हताच? डॉ. नॅश तरी डॉक्‍टर होता का? ॲडम गेलाय असं हे सांगताहेत, पण मग...
क्‍लायमॅक्‍सला सगळं कोडं उलगडत जातं. ताण जरा हलका होतो. खरं तर हे सगळं पडद्यावर पाहण्यात किंवा एस. जे. वॉटसनच्या डायरीवजा कादंबरीत वाचण्यात खरं थ्रिल आहे. त्याचं सुविहित कथानक सांगणं तसं शक्‍य नाहीच. 
* * * 
काही वर्षांपूर्वी ख्रिस्तोफर नोलान या प्रतिभावंत दिग्दर्शकानं ‘मोमेंटो’ नावाचा एक चित्रपट केला होता. गाय पीअर्सची त्यात जबरदस्त भूमिका होती. त्याचा हिंदी अवतारही आमीर खाननं ‘गजिनी’ या नावानं केला होता. मध्यवर्ती कल्पना याच छापाची. अर्थात ‘मोमेंटो’ ही अद्भुत सूडकथा होती. ‘बिफोर आय गो टू स्लीप’ हा चित्रपट सायकोथ्रिलर आणि रिलेशनशिपच्या परिघावर रेंगाळतो. निकोल किडमन या गुणी अभिनेत्रीनं क्रिस्तिन साकारताना खूप मेहनत घेतलेली जाणवते. निकोलसोबत कॉलिन फर्थ आणि मार्क स्ट्राँग अशी तगडी स्टारकास्ट आहे. निकोल आणि कॉलिन हे दोघंही ऑस्करवाले. मार्क स्ट्राँगनंही बाफ्टा सन्मान मिळवलाच आहे. अशी महागडी स्टारकास्ट, रिडली स्कॉटसारखा निर्माता आणि रोवान जोफेचं दिग्दर्शन असा सुवर्णकांचन योग जमूनही चित्रपट काही धड चालला नाही. समीक्षकांनी तर हा चित्रपट चांगलाच ठोकून काढला. ‘गुणाढ्यांनी एकत्र येऊन केलेला चुथडा’ अशी त्याची संभावना झाली. ‘एस. जे. वॉटसनचं कथानक म्हणजे मुळात निव्वळ एक समुद्रकिनाऱ्यावर वेळ घालवायचं साधन आहे, त्याचं पिक्‍चर करून काय साधलंत?’ असा सवाल काही समीक्षकांनी केला; पण वाचकांनी मात्र ही कादंबरी तशी बऱ्यापैकी उचलली. तब्बल ४० देशांमध्ये ती तडाखेबंद खपली.

काहीही असलं तरी डेली बेसिसवर जगण्याच्या कल्पनेशी असं खेळणं ही काही सोपी गोष्ट मानण्याचं कारण नाही. ‘रोज नई सुबह’ वगैरे शेरोशायरीत बरं वाटतं. तो आशावाद मनाला क्षणभर हुरूप देतोसुद्धा; पण खरोखर तसं घडलं तर सर्वप्रथम हत्या होते ती ‘परस्परविश्‍वास’नावाच्या एका बहुमूल्य गोष्टीची. हीच बाब ‘बिफोर आय गो टू स्लीप’ हा चित्रपट अधोरेखित करतो. जगण्याचे संदर्भ नष्ट झाले तर संपूर्ण जगणंच निरर्थक ठरतं. चित्रपट अस्वस्थ वगैरे करत नाही; पण आपलीही अवस्था क्रिस्तिनसारखीच झाली तर...? असा काल्पनिक सवाल मनात घोळायला लागतो. मग मात्र आपण आजवरच्या आयुष्यात घातलेले घोळ आठवायला लागतात आणि यापेक्षा टोटल स्मृतिभ्रंश परवडला, असं वाटू लागतं. वास्तवाचे चावे जरा जास्तच जहरी असतात हे खरंच; पण एवढा कशाला विचार करायचा? आपण शांत झोपावं. रोज सकाळी आपल्याला उठायचं असतंच. आपल्या संदर्भसंचितासकट. तेच आपलं खरं संचित!

Web Title: Marathi News Sakal saptranga esakal Pravin Tokekar