देणाऱ्याचे हात हजार... (प्रवीण टोकेकर)

देणाऱ्याचे हात हजार... (प्रवीण टोकेकर)

विख्यात सिनेदिग्दर्शक सर रिचर्ड अटेनबरा यांनी ‘गांधी’ चित्रपट १९८२ मध्ये पडद्यावर आणला. त्यानं जगाची वाहवा मिळवली. चार्ली चॅप्लिनचाही चरित्रपट करायला हवा, अशी त्यांची फार पूर्वीपासून इच्छा होती; पण योग जुळून येत नव्हता. अखेर दशकभरानं म्हणजे १९९२ मध्ये तो योग आला. चित्रपटाचं नाव होतं ः चॅप्लिन. बस, फक्‍त चॅप्लिन. ‘गांधी’सारखाच एकशब्दी; पण त्यातही केवढा मोठा अवकाश सामावलेला आहे. चार्लीच्या मृत्यूला उद्या (२५ डिसेंबर) चाळीस वर्षं होत आहेत...

साधारणत: १९३१ च्या सुमारास महात्मा गांधी लंडनला गेले होते. तिथल्या लोकांना त्यांना भेटायची खूप इच्छा असायची. मोठमोठे विचारवंत त्यांना भेटण्यासाठी धडपडायचे. चार शब्द बोलण्यासाठी आतुर असायचे. गांधीजींना त्याचं सोयरसुतक नसायचं. पूर्व लंडनमधल्या एका घरात ते उतरले होते. त्यांना सांगण्यात आलं की चार्ली चॅप्लिन तुम्हाला भेटायचं म्हणतोय. त्यांनी विचारलं ः ‘‘कोण चार्ली चॅप्लिन?’’ 

‘‘तो एक बडा चित्रपट अभिनेता आहे,’’ कुणीतरी सांगितलं. गांधीजींनी ‘नको’ म्हटलं; पण ‘तो ब्रिटिश असला तरी भारतीय स्वातंत्र्याचा समर्थक आहे’, असं सांगितल्यावर ते ‘बरं, भेटू या’ म्हणाले. इकडं चार्ली गांधीजींना भेटायचं म्हणून भयंकर नर्व्हस झाला होता. त्यानं त्याच्या वाटच्या चार ओळी चक्‍क पाठ केल्या आणि गेला भेटायला. 

‘‘महात्माजी, माझा तुमच्या स्वातंत्र्यचळवळीला पूर्ण पाठिंबा आहे; पण यंत्रांशी असलेलं तुमचं भांडण काही पटत नाही मला. यंत्रांमुळं कितीतरी कामं चटकन होतात आणि वेळ वाचतो, असं नाही का वाटत तुम्हाला?’’ चॅप्लिन म्हणाला.

‘‘माझं यंत्रांशी काही वैर नाही रे बाबांनो; पण माणसांचं काम काढून घेऊन यंत्रांना देण्यात काय शहाणपणा आहे? यंत्रांनी केलेल्या तुमच्या उत्पादनांचं आम्हाला आकर्षण वाटतं, म्हणून तर आज आम्ही तुमचे गुलाम आहोत ना! तेच मूळ आहे सगळ्याचं...’’ गांधीजी म्हणाले.

१९४० साली चार्लीनं ‘द ग्रेट डिक्‍टेटर’ हा बोलपट केला, तेव्हा त्यातल्या क्‍लायमॅक्‍सच्या नितांतसुंदर भाषणात चक्‍क गांधीजीच डोकावतात. 

विख्यात सिनेदिग्दर्शक सर रिचर्ड अटेनबरा यांनी ‘गांधी’ चित्रपट १९८२ मध्ये पडद्यावर आणला. त्यानं जगाची वाहवा मिळवली. त्यांची फार पूर्वीपासून इच्छा होती की चार्लीचाही चरित्रपट करायला हवा; पण योग जुळून येत नव्हता. अखेर दशकभरानं म्हणजे १९९२ मध्ये तो योग आला. चित्रपटाचं नाव होतं-चॅप्लिन. बस, फक्‍त चॅप्लिन. ‘गांधी’ सारखाच एकशब्दी; पण त्यातही केवढा मोठा अवकाश सामावलेला आहे.

सर अटेनबरांचा ‘चॅप्लिन’ १९९२ मध्ये आला. त्याला ऑस्कर पुरस्काराची नामांकनं मिळाली; पण पुरस्कार नाही मिळाले. मात्र, फ्लॅशबॅकचं तंत्र किती सफाईनं वापरता येतं, याचा हा चित्रपट एक चांगला वस्तुपाठ आहे. एरवी ‘आयर्नमॅन’मधून पोराटोरांच्या खेळात घुसलेल्या रॉबर्ट डाउनी ज्युनिअरनं चार्लीचा अवतार धारण करताना आपल्या अत्यंत प्रगल्भ आणि समंजस अभिनयाचा हुन्नर इथं असा काही पेश केला आहे की बस. दृष्ट काढावी पठ्ठ्याची. रॉबर्ट डाउनीमध्ये अंगभूत चार्ली दडलेला आहे. त्याचे भिरभिरते डोळे. बुटकी चण. अल्पभाषी अभिनय. तो सर अटेनबरांनी अचूक बाहेर काढला. 

उद्या नाताळाचा दिवस. त्यानिमित्तानं ‘चॅप्लिन’चा हा चरित्रपट आळवणं, हा भक्‍तिभावाचा विषय आहे. एखादा भाविक गुरुचरित्र ज्या भावनेनं वाचतो, तसं रसिकांनी या पडद्यावरच्या चॅप्लिनगाथेचं पारायण करावं. पुण्य लाभेल. निश्‍चित. 

* * *

स्वित्झर्लंडमधल्या शानदार हवेलीत राहणाऱ्या वृद्ध चार्लीला हल्ली राहून राहून वाटत होतं, की आपण आत्मचरित्र लिहायला हवं. संध्याकाळचे रंग दिसू लागले की कलावंताला आपल्याच प्रवासाचं कुतूहल वाटायला लागतं. एवढं सगळं घडलं कसं? चार्लीनं जॉर्ज हेडन नावाचा एक लेखक-संपादक निवडला. जॉर्जसुद्धा साठी उलटलेलाच; पण चरित्राची मांडणी कशी असावी, या कलेत वाकबगार. जॉर्ज अचूक प्रश्‍न विचारायचा. त्याचं उत्तर शोधताना चार्लीच्या मनात आपोआप जुन्या आठवणींचं रिळ उलगडत जायचं...असं चरित्र सिद्ध होत होतं.

‘‘तुझ्या आईसंदर्भात फार त्रोटक लिहिलंयस तू. त्यात आणखी काही दडलेलं असावं, असं वाटतं...आहे तसं? थोडक्‍यात विचारतो, तुझ्या आईचं वेड हाताबाहेर नेमकं कधी गेलं?’’ जॉर्जनं एकदा विचारलं.

‘‘अवघड आहे तसं सांगणं...खरं तर ती चांगली होती. कधीतरीच तिचं बिनसायचं...’’ वृद्ध चार्ली सांगू लागला. त्याच्या डोळ्यासमोर तो क्षण उभा राहिला. आल्डेरशॉट गावातला. साल होतं १८९४. 

युद्धसैनिकांसाठीच्या एका कार्यक्रमात ती स्टेजवर गाण्याची ओळ विसरून वेंधळ्यासारखं बघत बसली. सैनिकांनी तिची हुर्यो उडवली. अंडी, बूट, चपलांचा मारा झाला. विंगेत उभ्या असलेल्या पाच वर्षांच्या चार्लीनं तेच गाणं अस्सं काही पेश केलं, की त्याच सैनिकांनी त्या चिमुरड्यावर नाणी फेकली, नाणी! 

तिथून सुरू झाला हा सिलसिला.

...‘म्हंजे तेव्हा मी आणि माझा मोठा भाऊ सिडनी मजूरगृहात गेलो, तेव्हा ती असायलममध्येच होती; पण आपल्या पोरांपासून दूर राहिल्यानं ती पार कामातून गेली,’’ चार्ली पटकन म्हणाला. एका खोलीत सिड आणि चार्लीला घेऊन राहणाऱ्या हॅना चॅप्लिनला चूल पेटती ठेवणं अवघड होऊन बसलेलं. त्यात खोलीचं भाडं थकलेलं; पण ती मुलांना एक दिवस तुम्हाला पेस्ट्री खाऊ घालीन अशी स्वप्न दाखवत असे. भाडं लवकर दिलं नाहीस, तर सामानासकट तुला उचलून घराबाहेर फेकीन, ही मालकिणीची धमकी तिला घाम फोडायची; पण मुलांसमोर ती मस्त नक्‍कल करून त्याला विनोदाची डूब द्यायची. मालकिणीनं अखेर डाव साधला. दारात पोलिस आले. सामान रस्त्यावर आलं आणि हॅना इस्पितळात. मुलं मजूरगृहाच्या आश्रयाला गेली.

...वाट्टेल ती कामं करतानाच चार्लीचे गुण दिसू लागले होते. त्याला कॉमेडीचं अंग चांगलं आहे, हे मोठा भाऊ सिडनी याच्या लक्षात आलं होतं. दोघंही टेन लॅंकेशर बॉइज्‌ नावाच्या गटात समाविष्ट झाले. चार्ली सुंदर नृत्य करायचा. कुठंही शिकला नव्हता तरीही. धाकट्या भावासाठी सिडनीची धडपड सुरू झाली होती. अशी काही वर्षं गेली. 

पुढं? पुढं काय?

‘‘पुढं काही नाही...एकदा एका कार्यक्रमात दारुड्याचा अंक केला. त्याचं असं झालं की सूत्रधार स्टेजवर आला. म्हणाला, ‘‘ लेडीज्‌ अँड जंटलमन, आता पुढच्या आयटमसाठी श्वास रोखून तयार राहा. एक आश्‍चर्य तुमच्यासमोर साकार होणार आहे...’’ चार्ली सांगत होता.

...कार्यक्रमाची घोषणा होत असतानाच प्रेक्षागाराच्या उजवीकडल्या बॉक्‍समध्ये एक अंमलदार आला. डोक्‍यावर हॅट. झकपक सूट. बुटबैंगण; पण गडी कंप्लीट टुन्न होता. त्याला भिंतीवरची हॅट अडकवायची खुंटी सापडेना. सिगार पेटवण्यासाठी काड्यापेटी गावेना. खुर्चीत नेम धरून बसणंही त्याला कर्मकठीण झालं होतं. दणादणा उलथ्यापालथ्या पडणाऱ्या त्या अंमलदारानं जेवढ्या टाळ्या काढल्या, तेवढ्या कुणालाही आजवर मिळाल्या नव्हत्या. ‘कसली कसली माणसं हल्ली नाटकाबिटकाला येतात’, असले शेरेही प्रेक्षकांमधून ऐकू येत होतेच. कार्यक्रमाचा सूत्रधार हतबल झालेला. त्यानं त्या अंमलदाराला आवरायचा प्रयत्न केला, पण कसलं काय...प्रकरण अगदीच हाताबाहेर गेलं. कार्यक्रमाला उशीर होतोय, हेसुद्धा प्रेक्षकांच्या लक्षात आलं नाही. सगळे लोटपोट हसत होते. अर्धा कलाक हा बेंगरुळ प्रकार सुरू राहिला. तेवढ्यात सूत्रधारानं जाहीर केलं : लेडीज्‌ अँड जंटलमन, प्लीज मीट मिस्टर चार्ली चॅप्लिन!...क्षणात दारुड्या अंमलदारानं सोंग टाकून अदबीनं टाचा जुळवत मानवंदना स्वीकारली.

ओह!! हाच आयटम होता तर...प्रेक्षक चक्‍क उठून उभे राहिले.

* * * 

स्लॅपस्टिक प्रकारच्या हसवाहसवीत चार्लीनं अल्पावधीत नाव कमावलं होतं. ठिकठिकाणी त्याला बोलावणी यायची. एखाद्या रंगारंग कार्यक्रमातला पंधरा-वीस मिनिटांचा आयटम; पण चार्ली तो इतक्‍या समरसून करायचा की बस. आपलीही एखादी नाटक कंपनी असायला हरकत नाही, असं चार्लीला वाटायला लागलं होतं. त्याच सुमारास एका उपहारगृहात त्याला एडना पर्वियन्स भेटली. तिनं त्याला ओळखही धड दाखवली नाही. चार्ली किंचित दुखावला.

‘‘मी एक अभिनेत्री शोधतोय माझ्या ग्रुपसाठी...पण ती बनचुकी नकोय,’’ चार्ली म्हणाला.

‘‘मला एक मिनिटाचाही अनुभव नाही. मी आदर्श निवड ठरेन तुमची.’’

‘‘वेल्‌, तसंच काही म्हणता येणार नाही मिस...तुमचं नाव?’’

‘‘पर्वियन्स’’

‘‘माझी ओळख करून द्यायला हवी का?’’

‘‘मला तुमच्या नावाशी काहीच देणं-घेणं नाही मिस्टर...चॅप्लिन!’’

एडना पर्वियन्स चार्लीच्या आयुष्यात आली ती अशी.

अमेरिकेत मॅक सेनेट नावाचा एक कॉमेडियन धमाल करत होता. तो मूकपट करायचा. त्याला किंग ऑफ कॉमेडी म्हटलं जायचं. त्यानं चार्लीचा तो दारुड्याचा आयटम पूर्वी बघितला होता. त्यानं तार करून चार्लीला बोलावून घेतलं. चार्ली अमेरिकेला नशीब काढायला निघाला. बरीच उठाठेव केल्यानंतर त्याची एकदाची सेनेटशी भेट झाली. तो कसलं तरी मूकपटाचं शूटिंग करत होता. चार्ली तिथं पोचला.

‘‘तूच तो? अशक्‍य!’ सेनेट किंचाळला. त्यानं बघितला तो दारुड्या बराच पिकलेला होता. हा तर लेकाचा कोवळा तरुण आहे. देखणाही आहे. उत्तरादाखल चार्लीनं तिथल्या तिथं धुळीत दोन-चारदा पडून दाखवलं. एक आयटमच करून दाखवला. काम मिळालं.

एक दिवस चित्रीकरणासाठी तयार होण्यासाठी चार्ली मेकप्‌ रूममध्ये गेला. आसपास अस्ताव्यस्त सामान, पोशाख पडलेले. तेव्हा घडलं ते गारुड. गारुड म्हणजे अक्षरश: गारुड. दुसरं-तिसरं काहीही नाही. 

कुठली नवी व्यक्‍तिरेखा साकारावी, याचा चार्ली विचार करत असताना त्याला वाढत्या अंगाची बेंगरुळ विजार सापडली. कोन्याकोपऱ्यात उसवलेला एक कोट मिळाला. आकारानं द्रोण झालेले जुनाट बूट मिळाले. एक काठी मिळाली. चेपलेली हॅट मिळाली...जणू या चिजा येऊन चार्लीला चिकटल्याच. आपोआप...ओठांवर एक माशीकट मिशी आली आणि आरशालाही खुदकन हसू फुटलं. 

अक्‍स है सर-ए-आईना, पस-ए-आईना कोई और है...

हा इथं आहे, आरशात दुसराच कुणीतरी दिसतो आहे. फेंगडं चालणारा एक बेंगरुळ इसम. चेहऱ्यावर अवकळा; पण नजरेत निरागस कुतूहल. चालीत थोडा खट्याळपणाही. दारिद्य्र ही अगदीच टाकाऊ गोष्ट नाही. अभावालाही भाव असतो राजा!

त्याच्या फेंगड्या पायातनं दिसत होतं की स्वार्थी, धनलोलुप जगात त्याचा निभाव लागणं कठीण आहे. कपड्यांच्या अवस्थेवरून लक्षात येत होतं, की बिचाऱ्याला घर-आसरा काहीच नाही. गडी अगदी एकटा आहे...एकटा. होय, तो अनिकेत आहे. भणंग. ट्रॅम्प.

...इथून पुढं जे काही घडलं त्याला कलेच्या क्षेत्रातच नव्हे, तर मानवी इतिहासातही खूप मोठं स्थान द्यावं लागेल.

* * *

सेनेटची बायको स्टुडिओचा कारभार पाहायची. ती पक्‍की व्यवहारी होती. चार्लीचं आणि तिचं पटायचं नाही. शेवटी सेनेटला सोडचिठ्‌ठी देऊन चार्लीनं आपल्या चित्रपटांसाठी वेगळा फायनान्सर शोधायला सुरवात केली. साथीला भाऊ सिडनी होताच. तसंच घडलं.

बघता बघता चार्ली नावाचं एक हसतं-खिदळतं वादळ अमेरिकेत घोंघावायला लागलं. चार्ली कमालीचा प्रतिभावान तर होताच; पण त्याला काहीतरी महत्त्वाचं सांगायचंही होतं. केवळ मनोरंजन म्हणून तो चित्रपट बनवत नसे. 

चार्ली डाव्या हातानं व्हायोलिन वाजवत असे. त्याला संगीत उत्तम कळायचं. अनेक वाद्यं अवगत होती त्याला. ऑपेरासारखं नृत्य बहारदाररीत्या पेश करत असे. पदलालित्य तर असामान्य होतं. कथाकथनाची शैली खुमासदार होती. तो स्वत: चांगला लेखकही होता. हे सगळं तो कुठंही शिकला नव्हता; किंबहुना तो काही शिकलाच नव्हता....

चार्लीचं एक साम्राज्य निर्माण झालं. आबालवृद्धांचा हा लाडका ट्रॅम्प देशांच्या सरहद्दी लीलया ओलांडून गेला. पैसा पायाशी लोळण घेऊ लागला. लोकप्रियता तर दिसामासानं वाढत होती. मूकपटाचा बोलपट झाला, तेही खरं तर चार्लीला पचलं नव्हतं; पण तरीही त्यानं बोलपटाची ताकद ओळखून आपल्या तंत्रात अचूक बदल केले. संगीत बदललं.

-मधल्या काळात त्याची तीन लग्नं झाली. मुलं झाली. एक तर त्याचं नसलेलं मूल त्याला वाढवावं लागलं. त्याच्या एका होऊ पाहणाऱ्या बायकोनं कमी वयात पोर जन्माला घातलं होतं. ‘ते माझं नाहीच,’ हे चार्ली छाती ठोकून सांगत होता. पालकत्वाच्या वैद्यकीय चाचणीतही ते सिद्ध झालं; पण कोर्टानं मानलं नाही. त्याला आठवड्याला भरभक्‍कम रक्‍कम त्या संतानासाठी द्यावी लागत असे. अमेरिकेच्या एफबीआयचा (फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) संस्थापक आणि संचालक जे. एडगर हूव्हरशी त्यानं विनाकारण पंगा घेतला आणि एक जबरदस्त लष्टक त्याच्या मागं लागलं. ‘तो कम्युनिस्ट आहे’, अशी भुमका उठवली गेली. ते दिवस रेड स्केअरचे होते. हूव्हरनं त्याला सळो की पळो करून सोडलं. १९५२ च्या सुमारास इंग्लंडला गेलेल्या चार्लीला परत अमेरिकेत येता आलं नाही. त्याचा अमेरिकी व्हिसाच रद्द ठरवण्यात आला. 

एका श्रीमंत भणंगाला घर उरलं नाही. चार्लीच्या लक्षात आलं की आपण इंग्लंडचेही नाही. अमेरिकेचेही नाही. आपला असा कुठलाच देश नाही. त्यानं स्वित्झर्लंडमधली एक हवेली विकत घेतली. तिथं तो चौथ्या पत्नीसमवेत राहू लागला. विख्यात लेखक युजिन ओ’नील याची कन्या ऊना ओ’नील हिनं उतारवयातल्या चार्लीशी लग्न केलं होतं. तेव्हा ती अवघी १८ वर्षांची होती.

त्याच हवेलीत चार्ली पंचवीस वर्षं राहिला.
* * *

त्यानंतर खूप वर्षांनी १९७२ मध्ये त्याला विशेष सन्माननीय ऑस्कर देण्याचं ठरलं. एव्हाना त्याच्यावर खूप अन्याय झालाय, हे अमेरिकनांना कळलं होतं. ब्रिटननं असंच पी. जी. वूडहाउसला छळलं होतं त्या काळात. ते ऑस्कर घेण्यासाठी चार्ली चाकाच्या खुर्चीतून आला. पुरस्कार देण्याआधी प्रेक्षागृहातले दिवे घालवण्यात आले. अंधार झाला. चार्लीला एका खास सज्जात बसवण्यात आलं.

पडद्यावर भणंगाची व्यक्‍तिरेखा दिसली. प्रेक्षकांचं भान हरपलं. त्याच्या चित्रपटांमधली क्षणचित्रं उलगडत राहिली. 

तो पाहा...‘सिटीलाइट्‌स’मधला तो पहिलाच सीन. अनावरणाच्या क्षणी पुतळ्याच्या कुशीत झोपला तो भणंग. त्या आंधळ्या फुलराणीत त्याचा जीव किती अडकलाय. 

‘द किड’ मधल्या त्या खोडकर, निरागस पोरासाठी जीव पाखडणारा तो अनिकेत. 

‘द गोल्ड रश’ मधला नूडलसारखी बुटाची लेस चवीनं खाणारा तो निराश्रित भुकेला. साता जन्मांची भूक त्याच्या डोळ्यात साकळलेली आहे. 

‘अ डॉग्ज लाइफ’मधल्या त्या ट्रॅम्पचं नशीब अधिक सडकछाप की त्याच्या निष्कपट उबेसाठी जवळ आलेलं ते कुत्र्याचं पिल्लू? 

‘मॉडर्न टाइम्स’मधला तो अवाढव्य चक्रांमधून सफाईनं फिरणारा कामगार. यांत्रिकतेच्या अतिरेकानं डोकं फिरलेल्या समाजाला तो कुठला संदेश देतोय? 

असे कितीतरी लाजबाब सीन. खळखळून हसवणारे. काळजाला हात घालणारे. क्षणात फुलबाजीसारखे अग्निफुलं उधळणारे. घशात मोठाला आवंढा आणणारे. हा माणूस खरंच माणूस होता की कुणी देवदूत? एकाच माणसाच्या पदरात देवानं प्रतिभेचं इतकं दान कसं काय टाकलं असावं?

...सरतेशेवटी ‘द ग्रेट डिक्‍टेटर’ मधलं ते हिटलरच्या पोशाखातलं एका सामान्यानं केलेलं कळकळीचं मानवतावादी आवाहन. 

ब्राव्हो चार्ली. थॅंक यू चार्ली. गॉड ब्लेस यू चार्ली.

...प्रेक्षागृहातला प्रत्येक हात टाळ्या वाजवत राहिला. प्रत्येक डोळा अश्रूंनी डबडबलेला होता. अचानक एक स्पॉटलाइट झपकन एका सज्जाकडं गेला. टक्‍कल पडलेला, वृद्ध चार्ली तिथं हसतमुखानं हात हलवत अभिवादन स्वीकारत होता. समोरच्या पडद्याकडं बोट दाखवून खुणेनं सांगत होता. बाबांनो, मी तिथं आहे, इथं नाही...इथं नाही.

* * *

पु. लं. देशपांडे यांनी ‘जावे त्यांच्या देशा’ या प्रवासवर्णनात व्हेनिसच्या महोत्सवात अचानक झालेल्या चार्लीदर्शनाचं केवळ अद्‌भुत असं वर्णन केलं आहे. सर अटेनबरांच्या चित्रपटातलं हे शेवटचं दृश्‍य पाहतानाही असाच अंगावर काटा येतो. कारण, थेट पुलंचीच आठवण सरसरून येते. अटेनबरांनी पुलं वाचले होते? जवळपास त्याच प्रसंगाच्या जवळ जाणारं हे दृश्‍य आहे. या दृश्‍याशी चित्रपट संपतो तेव्हा आईशपथ, खुर्चीत बसून राहणं अशक्‍य होतं. हा क्‍लायमॅक्‍स उभ्यानं बघायचा आहे. अशी दृश्‍य फार क्‍वचित बघायला मिळतात.

सर अटेनबरांनी ठरवून रॉबर्ट डाउनी ज्युनिअरची निवड केली होती, निर्मात्यांनी नाकं मुरडली, तरीही ते बधले नाहीत. रॉबर्ट डाउनीनंही प्रचंड मेहनत घेतली. ‘‘या चित्रपटासाठी तुला सर अटेनबरांनी विचारलं तेव्हा तुला काय वाटलं होतं?’’ असं त्याला एकदा मुलाखतीत विचारलं होतं. तो म्हणाला, ‘‘खरं तर जबरदस्त टरकलो होतो!’’

रॉबर्ट डाउनीनं अटेनबरांच्या सूचनेबरहुकूम ‘चॅप्लिन म्युझियम’मध्ये बराच काळ घालवला. चार्लीचा तो प्रसिद्ध मळका कोटही घालून पाहिला. त्याच्या खिशात त्याला जुनं सिगारचं थोटुक मिळालं. ते त्यानं आजही घरी काचकपाटात बंद करून जपून ठेवलं आहे म्हणे. 

जेराल्डिन चॅप्लिन या चार्लीकन्येनंच या चित्रपटात चार्लीच्या आईची छोटीशीच; पण प्रभावी भूमिका केली आहे. अटेनबरांची चित्रपटनिर्मिती बरीच पारंपरिक पद्धतीची; त्यामुळं हा चरित्रपट स्वादतृप्ती करतो; पण कलात्मक भूक भागवत नाही. चार्लीभक्‍तांनाच तो चिक्‍कार आवडेल, अशी त्याची सरधोपट मांडणी आहे. एक काल्पनिक लेखक-संपादक मुलाखत घेतोय आणि त्यातून फ्लॅशबॅक तंत्राद्वारे कहाणी उलगडतेय, ही पठडी तशी कंटाळवाणी आहे; पण कथाविषय असा ताकदीचा असला की या बाधा दुर्लक्षणीय वाटू लागतात. त्या लेखक-संपादकाच्या, जॉर्ज हेडनच्या भूमिकेसाठी अँथनी हॉपकिन्ससारखा अफलातून नट अटेनबरांनी खर्ची घातला आहे. 

* * *

स्वित्झर्लंडमधल्या कॉख्सिए स्यू वेवे या अतिनिसर्गरम्य गावात एक शानदार बंगला आहे. लेक जेनेवापासून थोड्याच अंतरावर आहे. पुढं निळाशार तलाव, मागं द्राक्षमळ्यांनी लगडलेले आल्प्सच्या डोंगरांचे उतार. पिवळीधम्म उन्हं आणि पक्ष्यांचा मनोहारी कलरव संपूर्ण परिसराचं पावित्र्य अधोरेखित करतो. त्या शानदार बंगल्याचं नाव मॅनॉर द बान. पस्तीस एकरांत पसरलेल्या बंगल्याच्या आवारात प्रशस्त हिरवळ. सावली देणारे मोठमोठाले वृक्ष आहेत.  

इथंच २५ डिसेंबर १९७७ रोजी चार्ली चॅप्लिननं वयाच्या ८८ व्या वर्षी शेवटला श्‍वास घेतला. या वास्तूपासून जवळच असलेल्या एका खासगी दफनभूमीत त्याचं स्मृतिस्थळ आहे. त्या दफनभूमीत पोचायलाही बरंच हिंडावं लागतं. 

एका भणंग अनिकेताची ही अखेर झाली, त्याला उद्या चाळीस वर्ष होतील. फक्‍त चाळीस! माणूस भणंग होता, अनिकेत होता, तरीही त्यानं केवढं अपार अपार उधळलं रसिकांवर. त्याच्या फाटक्‍या खिशात त्रिखंडाला पुरून उरेल इतकी माया होती. त्यापुढं चाळीस वर्षं म्हणजे काहीच नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com