यंत्रमानवाचं ‘नागरिक’शास्त्र (राजेंद्र आकेरकर)

यंत्रमानवाचं ‘नागरिक’शास्त्र (राजेंद्र आकेरकर)

सोफिया या यंत्रमानवाला सौदी अरेबियानं नागरिकत्व प्रदान केल्यामुळं जगभरात ती चर्चेचा विषय ठरली आहे. एकीकडं ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’चं प्राबल्य वाढत असताना या यंत्रमानवाला नागरिकत्व मिळाल्यानं त्याचे पुढं काय पडसाद उमटत राहतील, याबाबत उत्सुकता आहे. ही सोफिया नक्की आहे कशी, तिला मिळालेली ‘बढती’ निरुपद्रवी आहे की भविष्यात यंत्रमानव बलशाली होण्याची ही एक चुणूक आहे, मानव आणि यंत्रमानव यांच्यातला भविष्यकालीन सामना कसा असेल आदी अनेक गोष्टींचा ऊहापोह.  

सोफिया या यंत्रमानवाला (रोबो) सौदी अरेबियात नुकतंच नागरिकत्व देण्यात आलं आहे. रियाधमधल्या एका कार्यक्रमात सोफियाला नागरिकत्व देण्यात आलं. हा यंत्रमानव हाँगकाँगमधल्या ‘हॅन्सन रोबोटिक्‍स’चे संस्थापक डेव्हिड हॅन्सन यांनी तयार केला. ही कंपनी मानवांसारखे दिसणारे आणि काहीप्रमाणात कार्य करणारे रोबो तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. सोफिया प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री ऑड्री हेपबर्नसारखी दिसणारी आहे. या सोफियामुळं साऱ्या जगाचं लक्ष पुन्हा एकदा कृत्रिम बुद्धिमत्ता या विज्ञान-तंत्रज्ञान शाखेकडं गेलं आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजे एआय) ही संगणकविज्ञान आणि तंत्रज्ञानाचीच एक शाखा. थोडक्‍यात, संगणक किंवा संगणकनियंत्रित यंत्रमानव किंवा सॉफ्टवेअर विकसित करण्याची प्रक्रिया म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली. तत्त्वज्ञान, माहिती-तंत्रज्ञान, मानसशास्त्र, भाषाशास्त्र, न्युरोसायन्स, संज्ञानात्मक विज्ञान (कॉग्निटिव्ह सायन्स), नियंत्रण सिद्धांत (कंट्रोल थेरी), संभाव्यता सिद्धांत (प्रोबॅबिलिटी थेरी), ऑप्टिमायझेशन आणि तर्कशास्त्र या विभिन्न ज्ञानशाखांवर कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाचं संशोधन आणि विकास एकत्रितपणे अवलंबून आहे.

कारखान्यांमध्ये अनेक यंत्रं एकच काम सतत करत असतात. मात्र, त्यांना ‘बुद्धिमान यंत्रं’ म्हटलं जात नाही. जे यंत्र माणसाच्या सूचना समजू शकेल, चेहरा ओळखेल, स्वतः वाहन चालवण्यासारखं काम करेल किंवा एखादा खेळ जिंकण्यासाठीच खेळेल, त्याला ‘आर्टिफिशिअल इंटेलिजंट’ म्हटलं जातं. सध्या अनेक स्वयंचलित वाहनांची निर्मिती युरोप, अमेरिकेत होत आहे. त्यामध्ये अनेक काँप्युटर प्रोग्रॅम आहेत जे अनेक निर्णय घेण्यासाठी माणसाला मदत करतात. भविष्यात यापेक्षाही आश्‍चर्यकारक कामगिरी करणारी यंत्रं निर्माण होऊ शकतील!

आर्टिफिशियल इंटेलिजन्स पुढची औद्योगिक क्रांती म्हणून आकार घेत आहे. एकेकाळी विज्ञानकथालेखकांचा हा कल्पनाविलास होता; मात्र आता ही कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्यक्षात येताना दिसत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ताप्रणालीनं गेल्या काही वर्षांपासून आपल्या आयुष्यावर मोठा प्रभाव पाडायला सुरवात केली आहे, असं दिसतं. दैनंदिन हवामानाचा अंदाज, ई-मेल स्पॅम फिल्टर करणं, गुगलचं सर्च इंजिन आणि आवाज ओळखणं (स्पीच रेकग्निशन), ॲपलचा ‘सिरी’ अशी उदाहरणं घेता येतील. या तंत्रज्ञानामध्ये महत्त्वाचं म्हणजे मशिन-लर्निग अल्गोरिदम संगणकाला आणि यंत्रमानवाला प्रत्यक्ष वेळेमध्ये (रिअल टाइम) प्रतिसाद देण्यासाठी आणि घेण्यासाठी सक्षम करतं. कृत्रिम बुद्धिमत्ताप्रणाली विकसित किंवा उत्क्रांत होत असताना थोड्याफार प्रमाणात विविध स्तरांवर चर्चा आणि विरोध होतील; परंतु कार्यक्षमतेच्या दृष्टीनं समाजावर सकारात्मक नक्कीच प्रभाव पडणार हे निश्‍चित.

कृत्रिम बुद्धिमत्तेची पायाभरणी
१९३१मध्ये ऑस्ट्रियन गणिततज्ज्ञ कुर्ट गोडेल यांनी सैद्धांतिक संगणकशास्त्र आणि एआयची पायाभरणी केली. दुसऱ्या महायुद्धातल्या नाझी एनग्मा कोडची उकल करणाऱ्या ब्रिटनच्या यशस्वी प्रयत्नांचं नेतृत्व करणारे ॲलन ट्युरिंग यांनी संगणकशास्त्रांमध्ये अनेक कल्पना मांडल्या आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राची रुजवात करण्यास मदत केली. १९५०मध्ये ॲलन ट्युरिंग यांनी ‘विचार’ (thinking) मशिनची चाचणी कशी करावी यासंबंधीचा एक पेपर प्रसिद्ध केला. एक मशिन टेलिप्रिंटरद्वारे एखाद्या व्यक्तीबरोबर संभाषण करू शकेल, यावर त्यांचा विश्‍वास होता. त्यांच्या चाचणीला ‘ट्युरिंग चाचणी’ असं म्हणतात.

१९५०च्या दशकात जॉन मॅकार्थी यांनी ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय)’ या शब्दाला जन्म दिला. १९५६च्या उन्हाळ्यात न्यू हॅम्पशायरमधील डार्टमाऊथ महाविद्यालयात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावर एक परिसंवाद जॉन मॅकार्थी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केला. आयोजक जॉन मॅकार्थी, मार्विन मिनस्की, क्‍लाऊड शॅनन, नथानिएल रॉचेस्टर हे सर्वजण या क्षेत्रासाठी भरपूर योगदान देणारे ठरले. डार्टमाउथ कॉन्फरन्सच्या वर्षांमध्ये आणि नंतर एआयमध्ये प्रभावी प्रगती झाली. संगणकाला अशा प्रकारे विकसित करण्यात आलं, की शालेय गणिती प्रश्नांचं निराकरण करू शकण्यापर्यंत त्यांची प्रगती झाली. ‘एलिझा’ नावाचा प्रोग्रॅम जगातला पहिला ‘चॅट-बोट’ बनला. साठच्या दशकात, एआयची सुरवात सोलोमोलॉफच्या सार्वत्रिक अंदाज सिद्धांताच्या रूपानं (युनिव्हर्सल प्रेटिक्‍टर्स) झाली. साठ-सत्तरच्या दशकातलं एआय विषयातलं संशोधन हे नियम-आधारित तज्ज्ञप्रणाली (एक्‍स्पर्ट सिस्टिम्स) आणि लॉजिक प्रोग्रामिंग यांच्यावर आधारित होतं.

वेगवेगळ्या प्रकारे विकास 
अर्थात हे सगळं सुरू असलं, तरी कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाचा विकास सुव्यवस्थित आणि कार्यक्षम नव्हता. १९५६मध्ये एक रोमांचक, कल्पनारम्य संकल्पना म्हणून सुरवात झाली; पण १९७०च्या दशकात अनेक कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधीच्या प्रकल्पांमध्ये प्रगतीचा अभाव असल्याची टीका झाल्यानंतर संशोधन निधी कापला गेला. मात्र, या क्षेत्रातले संशोधक त्यांचं ध्येय प्रस्थापित करण्यासाठी अतिशय आशावादी होते. साधारण याच काळात फझी लॉजिक, कृत्रिम उत्क्रांती, न्यूरल नेटवर्क इत्यादी उपशाखांचा पाया घातला गेला. १९८० ते ९०च्या दशकात एआयचा प्रवास मुख्यतः संभाव्यता सिद्धांताचा आधारे सुरू होता. 

साधारणपणे १९९० ते २०००च्या दशकामध्ये, व्यावहारिक (प्रॅक्‍टिकल) एआयमध्ये अधिक प्रगती चांगल्या प्रगत हार्डवेअरमुळं झाली. १९९५मध्ये डिकमन्सनं एक द्रुतगती दृष्टी-आधारित रोबो कार बनवली. ती स्वयंचलितपणे एक हजार मैलांचं अंतर ताशी १२० मैलच्या वेगानं धावू लागली. जपानी संशोधन संस्थांनी (होंडा, सोनी) यंत्रमानव (रोबो) बनवले. बुद्धीबळ विश्वविजेता गॅरी कास्पारोव्हला वेगवान आयबीएम काँप्युटरनं हरवलं. याच काळात वेगवान संगणकावर भाषण ओळखणं, संख्याशास्त्रीय मशीन अनुवाद, संगणकदृष्टी, ऑप्टिमायझेशन इत्यादी गोष्टी सहजपणे करणं शक्‍य झालं. सामान्यतः नव्वदच्या दशकातल्या मज्जासंस्थांच्या जाळ्यांशी (न्युरल नेटवर्क) संबंधित असलेल्या मूलभूत सिद्धांतांना  मात्र जलद संगणकांची प्रतीक्षा २०००पर्यंत करावी लागली. नवीन सहस्रकात कृत्रिम बुद्धिमत्तेचे गणिती सिद्धांत उदयास आले, तर तर्कशास्त्रविषयक संगणकविज्ञान आणि संभाव्यता सिद्धांताचा एकत्रितपणे वापर करून ‘इंटेलिजंट एजंट’ बनवण्यात आले. चालू दशकात ‘डीप लर्निंग’सारख्या नवीन संशोधनामुळं औद्योगिक क्षेत्रात क्रांती घडून येत आहे.

रोबोंचा ‘खेळ’
बऱ्याच काळापासून, गो (Go) किंवा बुद्धीबळासारख्या खेळामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग संगणकाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी होत होता. बुद्धीबळ खेळण्यासाठीचे इंटेलिजंट प्रोग्रॅम बनवण्यासाठी एआय संशोधकांचे प्रयत्न खूप वर्षं सुरू होते. १९९७मध्ये आयबीएमनं बनवलेला डीप ब्लू संगणक गॅरी कास्पारोवशी बुद्धीबळ खेळत सहा गेम जिंकला. या विजयामुळं प्रेरित होऊन आयबीएम रिसर्चने इंटेलिजंट काँप्युटर तयार करण्याचं ठरवलं आणि वॉटसन नावाची यंत्रणा (आयबीएमचे संस्थापक थॉमस जे. वॉटसन यांच्या नावानं) जन्मास आली, जी कोणत्याही-तुलनेनं कठीण विविध क्षेत्रासंबंधीची प्रश्‍नोत्तरं करू शकेल. ‘जिओपार्डी’ या प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही क्विझ शोमध्ये वॉटसन संगणकानं शोमधल्या विजेत्यांबरोबर स्पर्धा केली आणि त्यात विजय मिळवला. अर्थात हे मानवावर विजय मिळवणाऱ्या संगणकाचं पहिलं उदाहरण नाही. १९७९मध्ये, बीकेजी ९.८ नामक एका संगणक प्रोग्रॅमनं जगातल्या बॅकगॅमन चॅंपियनला मोंटे कार्लोमधल्या सामन्यात हरवून पाच हजार डॉलरचं पारितोषिक मिळवलं होतं.

अनेक कंपन्यांकडून वापर
२०१७पर्यंत, जगातल्या चार सर्वांत मोठ्या सार्वजनिक कंपन्यांच्या- ॲपल, गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन- उत्पादनांमध्ये कृत्रिम बुद्धिमतेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला. अलीकडंच आपण ॲमेझॉनच्या ‘ॲलेक्‍सा’ आणि ‘गुगल होम’सारखे संवादात्मक संगणकीकृत स्वीय सहायक पाहिले आणि अनुभवले. सध्याच्या प्रगतीचा वेग पाहता, २०२०पर्यंत सर्वसाधारण संगणकांमध्ये कच्च्या (raw) काँप्युटिंग पॉवर उपलब्ध होतील.

मोठ्या उद्योगांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पाठबळामुळं मोठ्या संधी निर्माण होत आहेत. उदाहरणार्थ, बायडूसारखे उद्योग खूप मोठ्या प्रमाणात ऑनलाइन अन्न-वितरण सेवा चालवतात. ग्राहक ऑनलाइन ऑर्डर देतो, तेव्हा कंपनी एआयचा वापर करते आणि अन्नपदार्थ तयार करण्यासाठी किती काळ लागेल याचा अंदाज घेते. त्यानुसार मग कोणत्या मोटरसायकलनं अन्नपदार्थ देण्यास पाठवले पाहिजे, याचा निर्णय घेण्यात येतो. त्यामुळं ऑर्डर देणाऱ्यांच्या दरवाज्यांपर्यंत शक्‍य तितके ताजे, गरम अन्नपदार्थ पोचले जातात. व्यवसायास बळकटी करण्याव्यतिरिक्त एआय नवीन संधीही तयार करत आहे. सुमारे शंभर वर्षांपूर्वी विद्युतीकरणानं प्रत्येक मोठ्या उद्योगात बदल केला. आज आपण अशा ठिकाणी आहोत, की एआय अशाच प्रकारे प्रत्येक प्रमुख उद्योगाच्या मीती अतिशय वेगानं बदलेल.

अमेरिकेबरोबरच युरोपमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. नॉर्वेमध्ये काही संशोधन प्रकल्पांमध्ये आम्ही विविध युरोपियन विद्यापीठं आणि उद्योगांबरोबर कृत्रिम बुद्धिमत्तेचा आणि बिग डेटा ॲनालिटिक्‍सचा वापर दळणवळणाच्या; तसंच आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात करत आहोत. बिग डेटा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून आम्ही आपत्तीनिवारण करण्याच्या उपायांचाही शोध घेत आहोत. या संशोधनामध्ये नैसर्गिक किंवा मनुष्यनिर्मित आपत्तींचा आढावा घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणं, सरकारी यंत्रणेला पूर्वी घडलेल्या आपत्तीची माहिती प्राप्त करण्यास मदत करणं, आपत्ती कुठं, कशी येऊ शकते, याचा पूर्वअंदाज बांधणं आणि सुरक्षेसाठी लवकर आणि सुरवातीच्या काळातच उपाय करणं, असे अनेक विषय हाताळत आहोत. भविष्यात, या तंत्रज्ञानाचा उपयोग प्रत्येक व्यक्तीच्या गरजा ओळखून आपत्तीनिवारणाची माहिती देण्यासाठीची सर्वोत्तम सेवा विकसित करण्यासाठी केला जाऊ शकतो.

वैद्यकीय क्षेत्रामध्येही कृत्रिम बुद्धिमत्ता मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहे. लंडनच्या इंपिरियल कॉलेजमध्ये एक टीम फुफ्फुसांच्या उच्चरक्तदाबाचं निदान करणाऱ्या एआयचा विकास करत आहे. हृदयरोगतज्ज्ञांकडं सुमारे साठ टक्के अचूकता आहे. ही प्रणाली ऐंशी टक्के अचूकता देते. याच वर्षी जानेवारी महिन्यात कार्नेजी मेलॉन विद्यापीठातून टुमास सॅंडहोल्ड आणि नोम ब्राउन यांनी एक पोकर (लिब्रिटसस) खेळणारा संगणक तयार केला, ज्यानं चार जागतिकविजेत्या पोकर खेळाडूंना पराभूत केलं. वीस-दिवसीय स्पर्धेच्या समाप्तीनंतर, लिब्रिटससला विजेता घोषित करण्यात आलं. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दृष्टीनं हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

उत्क्रांतीचं नवं पाऊल
आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा उद्देश हा ‘टेलिटाइपसह मानवी संभाषणाचं अनुकरण करण्यास सक्षम’ स्मार्ट मशिन, एवढाच यापुढं राहणार नाही. बिग डेटाच्या उपयोगानं एआयला उत्क्रांतीचं पुढचं पाऊल टाकण्याची संधी मिळाली आहे. आता कृत्रिम बुद्धिमत्तेचं उद्दिष्ट इंग्लिश भाषेप्रमाणं नैसर्गिक भाषेत  (नॅचरल लॅंग्वेज) बोलण्यास आणि माणसाचा आभासी सहायक (व्हर्चुअल असिस्टंट) म्हणून काम करण्यास सक्षम असलेले सॉफ्टवेअर प्रोग्रॅम विकसित करणं हे आहे. हे आभासी सहायक आश्वासक संशोधनाचं भविष्य दर्शवतात. ज्येष्ठ नागरिक आणि आजारी लोकांच्या मदतीसाठी ते रोबोंचं स्वरूप धारण करू शकतात. व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी मदत करणं किंवा त्यांना एखाद्या व्यवसायाच्या ग्राहकसेवा देण्याचं काम करणं, फोनला उत्तर देणं अशाही गोष्टी ते करू शकतात. कृत्रिम बुद्धिमत्ता अद्यापही विकसित होत आहे आणि नवीन उपयोग शोधत आहे. गेल्या काही वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निगमध्ये प्रगती प्रभावशाली झाली आहे; परंतु अजूनही प्रगती करण्यासाठी बरंच संशोधनकार्य करण्याची गरज आहे.

आज जगभरात अनेक क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात आहे. ‘सिरी’ आपल्या दिनदर्शिकेचं व्यवस्थापन करते. ‘फेसबुक’ आपले मित्र सूचित करतं. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून संगणक शेअर बाजारातसुद्धा व्यापारास मदत करतो. स्वतःहून पार्क करणाऱ्या गाड्या विकसित झाल्या आहेत; तसंच एअर ट्रॅफिक कंट्रोलही जवळजवळ पूर्णपणे स्वयंचलित बनलं आहे. थोडक्‍यात सांगायचं, तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रगतीतून प्रत्येक क्षेत्राला-अगदी लष्करी साधनांपासून औषध उत्पादनापर्यंत सगळ्या-  लाभ झाला आहे. 

अनेक अनुत्तरित प्रश्‍न
कृत्रिम बुद्धिमत्तेचा आवाका वाढत आहे, तसे अनेक प्रश्‍नही निर्माण होऊ लागले आहेत. यामुळं माणसं बरोजगार होतील का? कृत्रिम बुद्धिमत्तेच्या यंत्रमानवांमुळं वा संगणकांमुळे अराजक तर माजणार नाही ना? किंवा माणसाच्या बुद्धिमत्तेवर आघात तर होणार नाही ना?...असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्‍नांचं ठोस उत्तर अजून मिळालं नसलं, तरी कृत्रिम बुद्धिमत्तेमुळं माणसाचं कोणतंही नुकसान होणार नसून फायदाच होईल, असं आतापर्यंतच्या अनुभवातून आपण म्हणू शकतो.

अनेक समस्यांवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे उत्तर मिळवता येऊ शकतं. इतकंच काय तर शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठीही कृत्रिम बुद्धिमत्ता मदत करू शकेल. मात्र, हे सर्व करण्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली मानसिकता बदलणं आवश्‍यक आहे. त्यासाठी बुद्धिमान यंत्राबद्दलची (इंटेलिजंट मशिन) भीती घालवणं आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com