खादिमु आणि खादिपा

राजीव तांबे
रविवार, 11 जून 2017

समजा, माझी आणि पालवीची जोडी ठरली. मग मी पालवीला मला आवडणाऱ्या तीन भाज्यांची नावं सांगायची. पालवीनं पण तिला आवडणाऱ्या तीन भाज्यांची नावं मला सांगायची. प्रत्येकानं आपापल्या वहीत, आपल्या जोडीदाराच्या आवडीच्या तीन भाज्यांची नावं लिहून घ्यायची. पुढं तारीख-वार लिहायचा.

आज शंतनू, पालवी, पार्थ, वेदांगी आणि अन्वय हे सगळे नेहाच्या घरी जमले होते. आता शाळा सुरू झाली असल्यानं सगळ्यांच्या डोक्‍यात शाळेचेच वेगवेगळे विचार डोकावू लागले होते. त्यामुळं कुठंही आणि कधीही गप्पा सुरू झाल्या, की ‘आमची शाळा, माझ्या वर्गात, माझे मित्र आणि मैत्रिणी’ अशाच गप्पा सुरू होत.
आजही तसंच झालं.

शंतनू म्हणाला : ‘‘मला शाळा आवडते; पण मधल्या सुटीत वर्गात बाकावर बसून डबा खाणं मला नकोसं वाटतं...’’

‘‘ऑ...? का बरं?’’ नेहानं असं विचारताच तिला चिडवत शंतनू म्हणाला : ‘‘ऑगॉ, ऑसं कॉय करतेस? डबा म्हणजे फक्त पोळी-भाजी ना?’’ 

‘‘म्हणजे... तुला आणखी काय पाहिजे?’’
‘‘म्हणजे...लोणचं, दोन-तीन प्रकारच्या चटण्या, पापड, एखादी तळलेली मिरची आणि छोटीशी कुरडई...! हे काही शाळेत आणताच येत नाही ना रे..’’

अन्वय म्हणाला : ‘‘पण.. पण...पण...’’
‘‘अरे बोल ना. पण.. पण काय करतोयस?’’

‘‘मला एक सॉलिड आयडिया सुचतेय... एकदम टेस्टी आयडिया...’’
शंतनू पाय आपटत म्हणाला : ‘‘म...सांग लवकर. ती आयडिया चमचमीत आणि टेस्टी खाण्याबद्दल पाहिजे बरं का...’’

पालवी जोरात म्हणाली : ‘‘आणि ती आयडिया आमच्या शाळेत आणि माझ्या वर्गात वापरता आली पाहिजे बरं का...’’
पार्थ जोरात ओरडून म्हणाला : ‘‘आयडिया वर्गात ‘वापरता’ नाही तर ‘खाता आली पाहिजे’ बरं का...’’

आता मात्र सगळे ठुसठुसून हसत अन्वयकडं उत्सुकतेनं पाहू लागले.

‘‘आपल्या वर्गात सुमारे ४० मुलं असतात असं समजू या. म्हणजे काहींच्या वर्गात जास्त असतील, तर काहींच्या कमी. प्रत्येक आठवड्यासाठी दोन-दोन मुलांच्या जोड्या करायच्या. आठवडा बदलला की जोडी पण बदलेल आणि मुलांची विषम संख्या असेल तर एखाद्या जोडीत तीन मुलं असली तरी चालतील...’’

शंतनू वैतागून म्हणाला : ‘‘अरे बेटा अन्वय...जोड्या करून करायचं काय...? एकमेकांना खायचं?’’

नाक खाजवत पालवीनं विचारलं : ‘‘अरे अन्वया, जर एका जोडीत तीन मुलं असतील तर त्याला ‘जोडी’ कसं म्हणणार? तीन मुलं असतील तर ती ‘तिडी’ बरं का...!’’
डोळे बारीक करत आणि हात नाचवत अन्वय ओरडला : ‘‘आधी मला बोलू तर द्या.’’
बाबांनी मुलांना दटावलं आणि अन्वय पुढं बोलू लागला.

‘‘पुढच्या आठवड्यात कुठल्या दोन मुलांची जोडी असणार आहे, ते शनिवारीच ठरवायचं...’’

पार्थनं विचारलं : ‘‘पण कसं ठरवायचं?’’

‘‘सोपं आहे. वेगवेगळ्या प्रकारे ठरवता येईल. उदाहरणार्थ : चिठ्ठ्या टाकून ठरवता येईल. सम आणि विषम अंकांचा खेळ घेऊन ठरवता येईल. शनिवारी अर्धा दिवस शाळा असते. शाळा सुटल्यावर दहा मिनिटांत या जोड्या ठरतील. समजा, माझी आणि पालवीची जोडी ठरली. मग मी पालवीला मला आवडणाऱ्या तीन भाज्यांची नावं सांगायची. पालवीनं पण तिला आवडणाऱ्या तीन भाज्यांची नावं मला सांगायची. प्रत्येकानं आपापल्या वहीत, आपल्या जोडीदाराच्या आवडीच्या तीन भाज्यांची नावं लिहून घ्यायची. पुढं तारीख-वार लिहायचा. म्हणजे मी असं लिहीन : ‘पालवीला आवडते उकडलेल्या बटाट्यांची, हळद न घालता केलेली व लाल मिरच्यांची फोडणी दिलेली भाजी, भेंडीच्या कुरकुरीत काचऱ्या आणि हरभऱ्याची चमचमीत उसळ. पालवी लिहील : अन्वयला आवडते कांदा घातलेली आणि वरून लसणाची फोडणी दिलेली पालकाची भाजी, झणझणीत मेथीपिठलं आणि पांढऱ्या चवळीची सरसरीत उसळ.’

‘‘अरे, पण हे सगळं खायचं कधी..?’’

‘‘थांब रे शंतून. घरी गेल्यावर आपण आपल्या जोडीदाराच्या आवडी आपल्या आईला दाखवायच्या आणि बुधवारी पालवी तिच्या डब्यात माझ्या आवडीची भाजी आणेल आणि मी पालवीच्या आवडीची भाजी आणीन; पण तीनपैकी कुठली भाजी आणणार, हे मात्र सस्पेन्स ठेवायचं.’’

‘‘वा, वा! ही आयडिया मस्तच आहे.’’

बाबा म्हणाले : ‘‘याचे अनेक फायदे आहेत; पण मला सगळ्यात महत्त्वाचे दोन फायदे सांगावेसे वाटतात. एक म्हणजे, आपल्या आवडीची भाजी; पण वेगळ्या चवीची खाताना, चवीचवीनं खाताना आणि खाता खाता ती नवीन चव समजून घेताना तर खूपच मजा येईल...’’

उड्या मारत शंतनू म्हणाला :‘‘दुसरा फायदा मी सांगतो. एखाद्या वेळी हीच नवीन चवीची भाजी आपल्याला अधिक आवडायला लागेल...!’’

‘‘आणि मग, पुढच्या वेळी पण ‘हाच जोडीदार मिळावा’ यासाठी शनिवारी प्रार्थनाच करावी लागेल...हो की नाही?’’ असं वेदांगीनं म्हणताच सगळे ठसाठूस हसले.
‘‘म्हणजे दर बुधवारी आपल्याला पार्टीच की...’’

‘‘मेजवानी...मेजवानी.’’

‘‘बुधवार म्हणजे खाऊचा वार.’’

‘‘दर बुधवारी हौस करावी.’’

‘‘आवडीचं खाणार, तो वार बुधवार.’’

इतक्‍यात वेदांगीनं विचारलं : ‘‘खूप वेळा घरात काही अचानक अडचण असू शकते किंवा आवडीच्या तीन भाज्यांपैकी कुठलीच भाजी मिळाली नाही किंवा उसळीसाठी कडधान्य एक दिवस तरी अगोदर भिजत घालावं लागतं; पण नेमकं तेच लक्षात राहिलं नाही, तर अशा वेळी काय करावं...?’’

अन्वय बोलणारच होता; पण त्याला थांबवत बाबा म्हणाले : ‘‘वेदांगीनं खूप चांगला प्रश्‍न विचारला आहे; पण या प्रश्‍नाचं उत्तर तुम्ही सगळ्यांनीच द्यायचं आहे...एक ब्रेक के बाद. चला, थोडा खाऊ खाऊन घेऊ या.’’

खाताना सगळ्यांच्याच डोक्‍यात ‘तो प्रश्‍न’ घोळत होता.

खाऊ खाऊन ढेकर देत पार्थ म्हणाला : ‘‘मी फर्स्ट. जर त्यांना जमलं नाही तर त्यांनी काय करायचं, हे मी कसं सांगणार? पण मला वाटतं, त्यांनी काहीतरी वेगळं केलं पाहिजे.’’

पार्थला थोपटत नेहा म्हणाली : ‘‘आपण एकाच वर्गातले आहोत म्हणजेच आपण एकाच कुटुंबातले आहोत. अशा वेळी जोडीदारानं आपल्या जोडीदाराची अडचण समजून घेतली पाहिजे. त्यानं खट्टू होता कामा नये.’’

उड्या मारत पालवी म्हणाली : ‘‘नेहाच्या बोलण्यावरून मला एक आयडिया सुचते आहे. समजा, एखाद्या वेळी नाही जमलं तर आईनं आपल्या मुलाच्या जोडीदाराला एक ‘सॉरी-कार्ड’ द्यायचं आणि याच कार्डावर ‘ती आवडीची भाजी’ एका छोट्या डब्यातून कधी देणार तेही कळवायचं. काय, कशी आहे आयडिया?’’

सगळ्यांनाच ही आयडिया आवडली.

शंतनू पोटावर हात फिरवत म्हणाला : ‘‘खरं म्हणजे असं कधी व्हायलाच नको. मला तर ही कल्पनाच सहन होत नसल्यानं उत्तरच सुचत नाहीए. पण असं वाटतं, की हवं तर बुधवारचा गुरुवार करा. एक वार पुढं करा; पण आवडीची भाजी कराच करा.’’
वेदांगी म्हणाली : ‘‘पालवी, प्लीज रागावू नकोस; पण मला ती ‘सॉरी-कार्ड’ची कल्पना काही फारशी आवडली नाही. असं काही असावं, हेच मला पटत नाही. आपण एकमेकांना समजून घेतो, तेव्हा सॉरीचा प्रश्‍न येत नाही. अर्थात हे माझं मत आहे. प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं...’’

वेदांगीला थांबवत अन्वय म्हणाला : ‘‘खरंय तुझं; पण मला जरा वेगळंच सांगायचं आहे..’’

इतक्‍यात स्वयंपाकघरातून पदराला हात पुसत आई बाहेर येत अन्वयला म्हणाली : ‘‘एक मिनिट, अन्वय...मलाही काही वेगळं सांगायचं आहे. तू इथं ये. मी माझी कल्पना तुला सांगते...मग आपण दोघं मिळून एकच गोष्ट सांगू.’’

अन्वय उड्या मारत स्वयंपाकघरात गेला.

शंतनू हळूच पुटपुटला : ‘‘अन्वय स्वयंपाकघरात जा; पण तिथं काही खाऊबिऊ नकोस रे बाबा. नाहीतर आम्ही उपाशी आणि तू तुपाशी...’’

शंतनूचं दणदणीत पुटपुटणं ऐकून सगळे जण खसखसून हसले.
दोनच मिनिटांत आईला टाळी देत अन्वय बाहेर अला.

आता अन्वय काय सांगतो, याची सगळ्यांनाच उत्सुकता वाटू लागली.
‘‘गंमत म्हणजे जे माझ्या मनात होतं, खूपसं तसंच आईलाही वाटतं होतं. त्यामुळं आमचं लगेचच एकमत झालं; पण तरीही आईनं मला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या...’’

* हा ‘खाऊचा वार’ सुरू करण्याआधी शिक्षकांची परवानगी तर घेतली पाहिजेच; पण त्याचबरोबर पालकांचीही परवानगी घेतली पाहिजे.
* विशिष्ट वाराचा आग्रह न धरता, जोडीदारांच्या आयांनी एकमेकांच्या सोईनं आठवड्यातला एक दिवस निश्‍चित करावा.
* प्रत्येक घराची भाजी करण्याची पद्धत थोड्याफार फरकानं वेगळी असतेच. तसंच प्रत्येक घरातले मसालेसुद्धा वेगळे असतात. आईनं याबाबत एक भन्नाट कल्पना सुचवली आहे. ती म्हणाली : ‘समजा अन्वय आणि पालवीची जोडी आहे, तर अन्वयच्या आईनं पालवीला आवडणाऱ्या भाजीची रेसिपी तर शिकून घ्यायचीच; पण सोबत त्यांच्याकडून मसालाही घ्यायचा. पालवीच्या आईनंही तसंच करायचं. याचा मुख्य फायदा म्हणजे, दोन्ही घरांतल्या मोठ्या माणसांना ‘नवीन चवीची भाजी’ खायला मिळेल...पण मुलांना मात्र त्यांच्या ‘आवडीचीच भाजी’ मिळेल.

अन्वयला थांबवत बाबा म्हणाले : ‘‘कमाल आहे...फारच छान! अरे, अशा गोष्टींमुळं प्रत्येक आठवड्याला दोन घरं जोडली जातील. थोड्याच दिवसांत तुमची शाळा म्हणजे एक कुटुंबच होईल.’’ 

सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. आता आवडीची भाजी निश्‍चितच मिळणार, याची खात्री पटल्यानं शंतनू ‘ऊंओ ऊंओ’ ओरडला. 

इतक्‍यात आई म्हणाली : ‘‘मला आणखी एक आयडिया सुचते आहे.’’

‘‘सांगा.. सांगा. खाऊची असेल तर लगेचच सांगा.’’

‘‘वर्षातून दोनदा शाळेत ‘खाऊदिन’ म्हणजे ‘खादि-महोत्सव’ साजरा करता येईल. सुटीतल्या एका रविवारच्या ‘खाऊदिना’ला मुलं सगळ्या पालकांसाठी खाऊ तयार करतील. उदाहरणार्थ : भेळ करतील...डोसा करतील...सॅंडविच करतील...पॉपकॉर्न करतील. आणि दुसऱ्या खाऊदिनाला सगळे पालक मुलांसाठी त्यांच्या आवडीचा ‘खास खाऊ’ बनवतील. हा ‘खादि’ म्हणजे खाऊदिन सगळेच एंजॉय करतील आणि त्यामुळं केवळ दोन घरंच नव्हे, तर सगळं गावच एकमेकांशी जोडलं जाईल.’’
आता मात्र सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

‘‘या नवीन वर्षापासून आता शाळेत दोन नवीन उत्सव सुरू होतील. पहिला ‘खादिमु’ म्हणजे ‘खाऊदिन मुलांचा’ आणि दुसरा ‘खादिपा’ म्हणजे ‘खाऊदिन पालकांचा’. व्वा, मस्तम्‌ मस्त आयडिया.’’ बाबा म्हणाले.

‘‘बाबा...माझा ‘खादि-चळवळी’ला तोंडभरून पाठिंबा आहे,’’ हे कोण बोललं, हे तुम्ही ओळखलंच असेल म्हणा.

पालकांसाठी गृहपाठ :
* ‘कुठलंच काम फक्त मुलांचं नसतं आणि मुलींचंही नसतं’ हे एकदा समजूनच घ्या. सगळ्यांनी सगळी कामं करायची आणि याची सुरवात घरात पालकांनी करायची.
* एखादा पदार्थ करायला मुलांना स्वत:हून शिकू दे. याचे अनेक फायदे आहेत. मुख्य म्हणजे नवीन पदार्थ करण्यातली सर्जनशीलता त्यांना अनुभवू दे.
* मुलं नवी गोष्ट करत असतील, तेव्हा अनेक पालकांच्या जिभेला ‘सल्ला देण्याची खाज’ सुटते. अशा पालकांनी एकतर निग्रहानं तोंड बंद करून बसावं किंवा ‘परिसर-अभ्यास’ करण्यासाठी घरातून बाहेर पडावं.
* नवीन गोष्ट करत असताना मुलं चुकतीलही; पण अशा वेळी त्यांना त्यांच्या चुकांमधून शिकण्याची संधी द्या. मुलांनी विचारलं तरच त्यांना तुमचा सल्ला द्या. (आणि मुख्य म्हणजे, तुम्हाला जेवढं विचारलेलं असेल तेवढंच सांगा. उगाच भारंभार गोष्टी सांगून त्यांना ‘पकवू’ नका.)
* मुलांनी केलेल्या नवीन गोष्टींचं (तुमची इच्छा नसली तरी...) कौतुक करा. त्यांना शाबासकी द्या.
* ‘मोठ्या मनाचे पालकच मुलांना शाबासकी देतात’ ही चिनी म्हण लक्षात ठेवा!

'सप्तरंग'मधील सर्व लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Marathi News Sakal saptranga esakal Rajiv Tambe