वीजविरहित रोटो-चार्जर

Roto Mobile Charger
Roto Mobile Charger

गेल्या दशकात आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एका अगदी छोट्याशा वस्तूमुळं प्रचंड बदल घडून आलेले आहेत. संवाद, माहिती, ज्ञान, मनोरंजन, दळणवळण, चित्रीकरण, प्रसारण अशा वैविध्यपूर्ण गोष्टी त्या छोट्या वस्तूत सामावल्या आहेत. आता तर अशी वेळ आली आहे, की आपलं रोजचं जगणंच त्या वस्तूशिवाय अपूर्ण राहील. ती वस्तू आपल्यासाठी खूप उपयुक्त असली, तरी आपणही तिचे गुलाम झालो आहोत की काय, असा प्रश्‍न पडावा, अशी स्थिती आहे. लक्षात आलंच असेल, की मी मोबाइल फोनविषयी अर्थात स्मार्ट फोनविषयी सांगते आहे. स्मार्टफोनशिवाय पूर्वी जग कशा प्रकारे चालायचं, हे आता आठवणारही नाही, इतका हा फोन आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनून गेला आहे. 

मात्र, ही जादूई वस्तू चार्ज केली नाही किंवा करता आली नाही, तर तिची किंमत काड्यापेटीहूनही कमी! बॅटरी संपली तर तो नुसताच महागडा डबा होऊन जातो.

निरुपयोगी डबा! प्रत्येकावर अशी वेळ कधीतरी येतेच, जेव्हा एखादा महत्त्वाचा कॉल करायचा असतो; पण बॅटरी डाऊन असते आणि अक्षरशः नैराश्‍य येतं. अशा वेळी मग पॉवर प्लगही सापडला नाही तर आणीबाणीच.  

आता विचार करा अशा सगळ्यांचा, की ज्यांना दिवस दिवस फिरतीची कामं असतात किंवा बसचा अथवा रेल्वेचा लांबलचक प्रवास करायचा असतो किंवा हजारो फिरते विक्रेते, फेरीवाले, भाजीविक्रेते, फळविक्रेते, शेतात किंवा बांधकामाच्या जागी मजुरी किंवा देखरेखेची कामं करणारे जे असतात, हे सगळे लोक त्यांचा फोन कसा चार्ज करत असतील?आणि विचार करा त्या हजारो गावांचा, जिथं मोबाइल टॉवर पोचले आहेत; पण दिवसभरात जेमतेम तीन-चार तासच वीजपुरवठा असतो, त्या गावांमधले लोक फोन कसा चार्ज करत असतील? जरी एखादी जास्तीची पॉवर बॅंक ठेवली तरीही २४ तास फोन चालू राहणं या सगळ्यांसाठी अशक्‍यच. या समस्येवर वेगवेगळे उपाय शोधले गेले आहेत. कित्येक दिवस पुरू शकणाऱ्या चार्ज असलेल्या बॅटरीज्‌ किंवा अगदी त्वरेनं चार्ज होऊ शकणाऱ्या बॅटरीज्‌ हे उपाय तर आहेतच; पण असेही काही मार्ग आहेत, ज्यांना बॅटरी चार्ज करायला विजेची गरजच पडत नाही. 

काही वर्षांपूर्वी तरुण इंजिनिअर्सची एक टीम अशीच काहीशी कल्पना घेऊन आमच्याकडं आली. केवळ ‘मेकॅनिकल’ ऊर्जा वापरून फोन तात्पुरता, निदान एखादा महत्त्वाचा कॉल करण्याइतपत चार्ज व्हावा, अशा तऱ्हेच्या रिचार्जेबल बॅटरीज्‌ वापरून, केवळ दोन हातांनी  चक्रासारखी हालचाल करून फोन चार्ज करण्यासाठी त्यांनी एक उपकरण जोडून आणलं होतं. सायकल चालवूनही जशी ऊर्जा तयार होते, त्यानुसार तळहातात मावेल एवढं छोटं, अंदाजे फोनच्याच आकाराचं उपकरण तयार करावं, अशी त्यांची कल्पना होती. त्यातलं चाक विशिष्ट दिशेनं आणि गतीनं फिरवलं, की एका कॉलइतकी पॉवर त्याला जोडलेल्या फोनमध्ये यावी, अशी योजना करण्यात त्यांना यश आलं होतं. 

मात्र, ती केवळ एक जोडाजोडी केलेली यांत्रिकी रचना होती. त्या कल्पनेचं, त्या रचनेचं सहजपणे उत्पादन करता येईल अथवा ती सुरळीत वापरता येईल, असं प्रॉडक्‍ट तयार व्हावं, यासाठी त्यांना डिझाइन टीमची आवश्‍यकता वाटली. इंजिनिअर्सचा कल प्रॉडक्‍टची यांत्रिक कार्यक्षमता चांगली असावी याकडं असतो आणि प्रॉडक्‍ट डिझायनर्स भर देतात तो वापरणाऱ्या व्यक्तीसाठी ते प्रॉटक्‍ट उपयुक्त कसं करता येईल या मुद्द्यावर. अर्थातच डिझाइन टीमनं कित्येक तास फिरते विक्रेते, भाजीविक्रेते, रेल्वेप्रवासी यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या प्रत्यक्ष हालचाली, गरजा, फोन धरण्याची, घेण्याची पद्धत, सवयी यांवर लक्ष केंद्रित केलं. 

या चर्चांमधून आणि निरीक्षणांमधून या प्रॉडक्‍टचा आकार, रंग-रूप कसं असावं, वेगवेगळ्या वातावरणात, आव्हानांत ते जास्तीत जास्त टिकाऊ कसं करता येईल आणि त्यासाठी कोणत्या प्रकारच्या प्लास्टिकचा उपयोग करावा, याबद्दल विशिष्ट प्रस्ताव मांडले. या सगळ्या निरीक्षणांत एक अतिशय महत्त्वाची गोष्ट पुढं आली व ती म्हणजे, एका हातात फोन पकडून बोलताना दोन्ही हात वापरून चार्जरचं चक्र फिरवणं अवघड होत होतं. मग मान आणि गाल यांमध्ये फोन पकडून तो चार्जरला जोडून दोन हात वापरून चार्जरचं चक्र फिरवणं अशी तारांबळ उडवणारी कसरत करावी लागत होती. 

डिझाइनचं मोठं उद्दिष्ट म्हणजे, प्रॉडक्‍ट वापरणाऱ्या व्यक्तींसाठी ते साधं, सहज आणि सुरळीत व्हावं. मग यासाठी एक वेगळ्या प्रकारची योजना करून हे चाक एकाच हातानं फिरवता येईल का, असा विचार सुरू झाला. त्यासाठी काही तांत्रिक इनोव्हेशनची गरज निर्माण झाली. इंजिनिअर्सनी आणि प्रॉडक्‍ट डिझायनर्सनी एकत्र डोकं लढवलं व ही अवघड गोष्ट अशक्‍य राहिली नाही. 

प्रॉडक्‍टमध्ये अंतर्गत फेरफार करून ते कोणत्याही पृष्ठभागावर, अगदी टेबलवर किंवा स्वतःच्या मांडीवरही एका हातानं फिरवता येईल अशा पद्धतीचं तयार करण्यात आलं. एक मिनिट फिरवल्यावर सामान्यतः तीन मिनिटांचा कॉल करता यावा इतका चार्ज या संपूर्ण वीजविरहित रोटो-चार्जरद्वारे मिळू शकेल अशी व्यवस्था झाली. अंदाजे फोनच्याच आकाराचं हे उपकरण वेगवेगळ्या प्रकारच्या फोनना जोडता यावं, अशी सुविधा करण्यात आली. 

‘3 Idiots`  या चित्रपटातला ड्रोनवर लावलेला उडता कॅमेरा प्रेक्षकांच्या लक्षात असेल; पण तो खराखुरा ड्रोन तयार करणारी टीम फारच कमी लोकांना माहीत आहे. त्या कंपनीचं नाव आहे ‘आयडिया फोर्ज’ आणि नेमक्‍या याच टीमनं हा मोबाईल चार्जर डिझाइन करण्यासाठी आमच्या टीमबरोबर काम केलं.  

२००८-२००९ मध्ये आयडिया फोर्जद्वारे हा रोटो-मोबाईल चार्जर केवळ ३५० रुपयांत उपलब्ध करून देण्यात आला. वीज न वापरता केवळ एका हातानं सहजपणे कोणत्याही पृष्ठभागावर फिरवून फोन चार्ज करता येण्याची ही सुविधा असामान्य होती. 

या प्रॉडक्‍टला भारतात ‘प्लास्टइंडिया इनोव्हेशन ॲवॉर्ड’ बहाल करण्यात आलं, तसंच अमेरिकेतल्या अत्यंत नावाजलेल्या ‘स्पार्क ॲवॉर्डस’ आणि ‘ग्रीन गॅजेट्‌स अवॉर्ड’तर्फेही या प्रॉडक्‍टला पारितोषिकं जाहीर करण्यात आली आहेत. वीज वाचवणं आणि ऐन गरजेच्या वेळी फोन वापरता येणं अशा दोन्ही कसोट्या पार पाडणारा हा मोबाईल चार्जर बदलत्या काळाची महत्त्वाची गरज भागवतो. 

अशाच प्रकारे सौरऊर्जा, पवनऊर्जा यांच्यावर चालणारी अधिकाधिक उपकरणं डिझाइन होऊन सर्वसामान्यांच्या जीवनात उपलब्ध व्हावीत, ही काळाची गरज आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com