सीमारेषेची जाण महत्त्वाची

डाॅ. संज्योत देशपांडे
रविवार, 16 जुलै 2017

नागपूरमधल्या वेणा तलावात गेल्या आठवड्यात आठ तरुणांचा मृत्यू झाला. हे तरुण ‘फेसबुक लाइव्ह’ करणं आणि सेल्फी काढणं यांच्यात मग्न होते. त्यातून घडलेल्या अपघातानं बघताबघता ही तरुणाई काळाच्या पडद्याआड गेली. अशा अनेक घटना हल्ली घडत आहेत. समाजमाध्यमांचा एकीकडं सकारात्मक उपयोग होत असतानाच दुसरीकडं त्यांच्या अतिरेकाची बळी ठरणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. काय आहे नेमकं हे ‘सेल्फी’ प्रकरण? समाजमाध्यमांचा वापर कशा प्रकारे करायला हवा? त्यांच्यात कशामुळं इतकं गुंतलं जातं आणि तो अतिरेक कुठपर्यंत जाऊ शकतो? या अतिरेकाला पायबंद कशा प्रकारे घालता येईल?....या सर्व प्रश्‍नांचं विविध अंगांनी विश्‍लेषण.

सेल्फीचा क्षणिक आनंद, स्वतःला मिळणारं महत्त्व, कॉमेंट्‌स हे सगळं वरवरचं आहे. या आनंदात आपण स्वतःच्या अंतरंगात डोकावायचं विसरून जातोय का? आपलं ‘स्व’शी असलेलं नातं संपवून टाकतोय का? आपला आतला आवाज आता आपल्याला ऐकू येईनासा झालाय का? 

सेल्फी हा शब्दच काही दिवसांपूर्वी आपल्या शब्दकोशातच नव्हता आणि आता मात्र कोणत्याही ‘खास’ क्षणांना ‘एक सेल्फी तो बनताही है यार...’ असं म्हणत तो आता अाबालवृद्धांमध्ये, सेलिब्रिटीजपासून सर्वसामान्य माणसांपर्यंत सगळ्यांच्यात आनंद साजरा करण्यासाठीचा एकदम फेमस शब्द झालाय. जिकडं पाहावं तिकडं जागोजागी सगळे जण भान हरपून सेल्फी काढण्यात दंग दिसतात. मुळात सेल्फी काढणं, ही गोष्ट तशी मजा आणणारी आहे. स्वतःची छबी/ प्रतिमा मोबाईलच्या कॅमेऱ्यात न्याहाळायची, चेहऱ्यावर विशिष्ट हावभाव आणायचा आणि मग तो खास क्षण साठवून ठेवायचा आणि क्षणार्धात इतरांपर्यंत पोचवायचा! तुम्हीच सांगा- आपलीच प्रतिमा न्याहाळायला आणि मिरवायलासुद्धाकुणाला आवडत नाही? 

कोणे एके काळी नार्सिसस नावाचा राजा असाच स्वतःच्या प्रतिमेच्या प्रेमात पडला होता, अशी एक दंतकथा आहे. तासन्‌तास तो आपलीच प्रतिमा पाण्यात पाहत बसायचा. स्वतःमध्येच दंग होऊन...! आणि शेवटी यातच त्याचा अंत झाला. तसंच आत्ताच्या काळातही सेल्फीमुळं जीव जाणाऱ्यांची संख्या वाढतानाच दिसते आहे. मार्च २०१४ला सर्वांत प्रथम सेल्फी काढताना मृत्यू झाल्याची पहिली नोंद झाली. त्यानंतर २०१६पर्यंत १२७ मृत्यू सेल्फी काढताना झाले आणि त्यातले ७६ मृत्यू भारतात झाले, ही आपल्यासाठी नोंद घेण्याची गोष्ट! म्हणजे लोकांवर प्रभाव पाडणं हे आपल्यासाठी इतकं महत्त्वाचं होतं, की त्यासाठी आपल्या जीवावर उदार होऊन एखाद्या दरीच्या कडेला जायला किंवा एखाद्या उंच इमारतीच्या टोकावर उभं राहायला त्या क्षणाला तरी भीती वाटत नाही. कारण ‘धिस इज मी’ असं जगाला दाखवण्याची ती संधी असते. ती संधी ‘आता तुमच्या जीवाला धोका आहे,’ या वास्तवाला मनाच्या आसपासही फिरकू देत नाही. ‘असे अपघात फक्त मूर्ख लोकांच्या बाबतीतच होतात- माझ्या बाबतीत असं होणं शक्‍यच नाही,’ अशा गृहीतकांवर गाढ विश्‍वास असणाऱ्या या लोकांना पाय घसरून कोसळेपर्यंत याची जाणीव होत नाही आणि जाणीव होते तेव्हा कदाचित खूपच उशीर झालेला असतो. तो क्षण कॅमेरा बंद करून पकडून ठेवण्याच्या नादात आपण इतके दंग होऊन जातो, की यात आपल्या जीवाला धोका निर्माण होतोय, याचं भानही उरत नाही. 

भावनिकदृष्ट्या गुंतवून ठेवणारी कृती
सेल्फी ही कृतीच आपल्याला अशी भावनिकदृष्ट्या गुंतवून ठेवणारी आहे. आपण कसे दिसतोय हे स्वतःकडंच पाहायचं, स्वतःचे अविर्भाव निरखायचे, त्या क्षणाला आपण म्हणजे जणू काही एखादा सेलिब्रिटीच! त्याचवेळी मनाच्या एका कोपऱ्यात नकळतपणे याचा कुणावर कसा प्रभाव पडेल, कोण लाइक करेल, कशा कॉमेंट्‌स येतील याचा विचार...सेल्फी वाढून पोस्ट केल्यावर पुढची (फक्त!) १५ मिनिटं आपण ‘कुणीतरी खास’ होऊन जातो आणि या १५ मिनिटांसाठी, त्या ‘किक’साठी, ती मजा वारंवार अनुभवण्यासाठी आपण सेल्फी काढतच राहतो. या गुंतलेपणामुळंच हा प्रकार केव्हा जीव घेणारा ठरतो, हेच समजत नाही. हा क्षणिक आनंद, हे मिळणारं महत्त्व, कॉमेंट्‌स हे सगळं वरवरचं आहे. या आनंदात आपण स्वतःच्या अंतरंगात डोकावायचं विसरून जातोय का? आपलं ‘स्व’शी असलेलं नातं संपवून टाकतोय का? आपला जो आतला आवाज सतत आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो, तो आता आपल्याला ऐकू येईनासा झालाय का? आभासी जगात वावरत असताना प्रत्यक्षात आपल्या आसपासच्या माणसांमध्ये आपली अनुपस्थिती वाढत चालली आहे का? या सेल्फीच्या नादात आजूबाजूच्या अनेक गोष्टी, निसर्ग, पाऊस या गोष्टी आपल्या अनुभवाच्या पातळीवर हरवत चालल्या आहेत का?...हे प्रश्‍नही विचारून बघितले पाहिजेत. मला माझ्या सेल्फीला मिळणाऱ्या प्रतिसादावर माझी ‘किंमत’ ठरवायची असते. पण आपली किंमत, आपलं मनःस्वास्थ्य किती काळ या लाइक्‍सवर अवलंबून ठेवायचं? आणि ते तसं अवलंबून असायला हवं का?

सेल्फी म्हणजे तो खास क्षण साठवून ठेवण्याचं आणि लगोलग इतरांसोबत शेअर करण्याचं एक तंत्र. माझा आनंद अनेकांसोबत वाटून तो वाढवण्याचा एक मार्ग, एक मजा, एक गंमत! सेल्फी म्हणजे व्यक्त करणं स्वतःला (खरं अथवा खोटं दोन्हीही), सेल्फी म्हणजे जोडलं जाणं अनेकांशी... सेल्फी म्हणजे संवाद साधणं...पण सेल्फी म्हणजे धोकाही... असं का? 

तुम्हाला असं होतंय का?

  • सातत्यानं सेल्फी काढत राहणं आणि ती पोस्ट करणं याचेच विचार मनात येत राहतात का?
  • सेल्फी काढण्याच्या कृतीवर नियंत्रण आणणं फारच त्रासदायक, कष्टप्रद झालं आहे का? सेल्फी काढण्याची ऊर्मी फारच प्रबळ होत चालली आहे का?
  • सेल्फीमुळे तुमच्या कामावर, नातेसंबंधांवर परिणाम झाला आहे का?
  • आपल्याला मिळणारे लाइक्‍स, कॉमेंट्‌स यांच्यावर आपलं मनस्वास्थ्य अवलंबून आहे का?
  • सेल्फीमुळं आपला आत्मकेंद्रीपणा, आत्ममग्नता या गोष्टी वाढत चालल्या आहेत का?

    यापैकी एकाही प्रश्‍नाचं उत्तर ‘हो’ असेल, तर त्वरित मानसोपचारतज्ज्ञांना भेटा.

थोडक्‍यात मजा असते
‘थोडक्‍यात मजा असते,’ असं लहानपणी ऐकलेलं वाक्‍य आठवतं. सेल्फीचंही तसंच आहे. सिगारेट, दारू, कामाच्या व्यसनामध्ये माणसं अडकतात; तसंच सेल्फीचंही ऑब्सेशन केव्हा होऊन जातं समजत नाही. म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्टीतल्या सीमारेषा समजायला हव्यात.

  • स्वतःला छान प्रेझेंट करायचंय, की स्वतःचं ‘प्रदर्शन’ मांडायचंय?
  • दिवसभर घडणाऱ्या अगदी अनेक रुटीन गोष्टींचे, घटनांचे सेल्फी काढायचेत, की त्यातल्या निवडक क्षणांसाठी सेल्फी राखून ठेवायचेत?
  • फक्त सेल्फी काढण्यात आत्ममग्न होऊन जगायचंय, की जगणाऱ्या अनेक क्षणांमध्ये जगायला शिकायचंय?
  • फक्त आभासी जगताच्या नात्यांमध्ये रमून जायचंय, की माझ्या आसपास वावरणाऱ्या माणसांची दखल मला घ्यायची आहे?
  • फक्त सेल्फीचाच अनुभव घ्यायचाय, की जगण्यातले इतर क्षणही अनुभवायला शिकायचेत?

असे अनेक प्रश्‍न विचारता येतील; पण त्यातली सीमारेषा समजणं महत्त्वाचं! ती सीमारेषा समजायला सेल्फीपलीकडचा आपला ‘स्व’ समजणं याहून महत्त्वाचं!

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा
 

Web Title: Marathi News Sakal saptranga esakal Selfie addiction Sanjyot Deshpande