स्थूलत्वाची 'पोट'कथा (डॉ. सुमेधा भोसले)

डॉ. सुमेधा भोसले
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

स्थूलत्वाचं प्रमाण शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागांतही वाढीला लागलं आहे. आधुनिक जीवनशैलीमुळं सगळ्याच वयोगटांना ग्रासलेल्या या आजारानं आता गंभीर स्वरूप धारण केलं आहे. आता महाराष्ट्र आरोग्यविज्ञान विद्यापीठानंही त्याची दखल घेऊन एमबीबीएसच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 'स्थूलत्व' हा स्वतंत्र विषयही म्हणून नुकताच मान्य केला आहे. या स्थूलत्वाची नेमकी कारणं काय, 'वजनी मंडळा'त समावेश न होण्यासाठी कोणत्या गोष्टी करायच्या, आहार कसा असावा, व्यायामाचं नेमकं तंत्र काय, पोटभर खायचं की खाणं कमी करायचं आदी गोष्टींचा वेध.

अ  गदी कालच दिवाळी संपली आहे. प्रत्येकानं मस्त साजरी केली आहे! पारंपरिक फराळ, पक्वान्नं, मिठाया, सुकामेवा....खाण्यापिण्याची अगदी रेलचेल झाली आहे. दिवाळी पहाट, मित्रांशी, नातेवाईकांशी गप्पा (प्रत्यक्ष भेटून कमीच; परंतु फेसबुक, व्हॉटसॲपवर आपल्याच घरातल्या सोफ्यावर बसून अगदी निवांतपणे), मग दुपारी दिवाळी अंकांचे वाचन अगदी बेडवर लोळत, कुठं पत्त्यांचे डाव, मल्टिप्लेक्‍सला जाऊन किंवा घरच्या टीव्हीवर तीन तास घालवून पाहिलेले चित्रपट, नाटकं....धमाल झालीय ना?

मंडळी लक्षात येतंय ना? या दिवाळीसारख्या सणांनिमित्त किंवा अशा सण-समारंभांमध्ये नेमकं काय होतंय? नको तेवढ्या प्रमाणात अतिउष्मांकयुक्त पदार्थांचं सेवन आणि रिलॅक्‍सेशनच्या नादात सतत कोणत्या तरी खुर्चीला चिकटून बसणं. म्हणजे शारीरिक हालचालच नाही. मला नक्की खात्री आहे- ही दिवाळी तुम्हाला एक भेट देऊन गेलीय- ती म्हणजे तुमचं वाढलेलं वजन. कोणाला कपडे घट्ट होताहेत, तर कोणाचं पोट बाहेर डोकावतंय. बरोबर ना?

नीट विचार केला तर, असं लक्षात येईल की वर्षभर आपली जीवनशैली साधारण अशीच आहे. शारीरिक हालचालींचा अभाव; रिमोट कंट्रोल, वाहनं, लिफ्ट्‌स, एस्केलेटर्स, प्रत्येक काम करणारी यंत्रं अशा अनेक गोष्टींच्या वापरामुळं खाल्लेल्या अन्नरूपी ऊर्जेचा वापरच होत नाही. त्याला जोड आहे उष्मांकाचा अतिवापर करून बनवलेल्या अन्नपदार्थांचं केव्हाही, कुठंही, कितीही प्रमाणात सेवन करण्याची मुभा. या ऊर्जेच्या अतिरिक्त प्रमाणाला जोड आहे ती ताणतणावाची. परिणामी ही जीवनशैली आरोग्याला घातक ठरते आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार, शहरांमध्ये ३२.४ स्त्रिया, तर ३१.२ टक्के पुरुष स्थूल असल्याचं आढळलं आहे. ग्रामीण भागांमध्येही स्थूलत्वाचं प्रमाण वाढत असून, तिथं ११ टक्के स्त्री-पुरुष स्थूल असल्याचं आढळलं आहे. या सगळ्या गोष्टींची गंभीर दखल महाराष्ट्र आरोग्यविज्ञान विद्यापीठानंही घेतली आहे. स्थूलत्वाच्या संदर्भात स्वतंत्र अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्याचं या विद्यापीठानं ठरवलं आहे. एमबीबीएस पदव्युत्तर अभ्यासक्रमात स्थूलतेसंदर्भातला हा विषय स्वतंत्रपणे शिकवला जाणार आहे. 

मुळातच स्थूलत्व हा 'स्वतः' एक आजारच आहे. शिवाय अनेक दीर्घ आणि गंभीर आजारांचं मूळही स्थूलत्वातच दडलं आहे. म्हणजे शरीराचं हे 'वजनी मंडळ' केवळ सौंदर्याला बाधक ठरत नाही, तर प्रत्येकाच्या आरोग्यावरही परिणाम करतं. इतके दिवस मोठ्या माणसांमध्येच स्थूलपणा आढळायचा. मात्र, आता तर लहान मुलांमध्येसुद्धा स्थूलपणा आढळतो. दर तीन मुलांमधलं एक मूल हे अधिक वजन असणारं आहे, असं स्पष्ट झालं आहे. मुलांमध्येदेखील शारीरिक श्रमांचा अभाव आहे. मैदानी खेळ, चालणं, पळणं या गोष्टी न करता टीव्ही, व्हिडिओ गेम्स, ट्युशन्स, अभ्यास यामध्येच ही मुलं जास्त व्यग्र असतात. नोकरी करणारे सुशिक्षित (?) पालक मुलांना नको ते पदार्थ खाण्याचा सवयी लावतात, असं दिसून येतं. बेकरीचे पदार्थ, चॉकलेट्‌स, पिझ्झा, पावभाजी या पदार्थांखेरीज एकही दिवस जात नाही. नोकरी करणारे आईबाबा हॉटेलिंग आणि पार्ट्यांद्वारे मुलांचे लाड करतात. घरी स्वयंपाक करायला वेळ नाही आणि 'सोशल स्टेटस'च्या फॅशनप्रमाणं पार्ट्या तर व्हायलाच हव्यात, या दुष्टचक्राचा परिणाम स्थूलपणा वाढण्यावर होतो आहे. खेडोपाडी वेगळी परिस्थिती नाही. अशा चुकीच्या जीवनशैलीचं लगेचच नियंत्रण करायला हवं. आरोग्यदायी जीवनशैलीचं शास्त्रोक्त नियोजन करायला हवं. स्वतःचं आणि आपल्या भावी पिढीचं या स्थूलत्वापासून संरक्षण करायला हवं.

अनेक व्याधींना 'आमंत्रण'
स्थूलत्व एकटं येत नाही. त्याच्यामुळं मधुमेहाचे प्रकार, उच्च रक्तदाब, हृदयविकार, सांधेदुखी, मासिक पाळींचे विकार, काही प्रकारचे कर्करोग, पित्ताशयातले खडे, वंध्यत्व असे शरीरांतर्गत प्रत्येक संस्थेचं कार्य बिघडवणारे विकार होऊ शकतात. लठ्ठपणाचं प्रमाण अधिकच वाढलं, तर झोपेत श्‍वासोच्छ्वासालासुद्धा त्रास होऊ शकतो. शिवाय थकवा, मरगळ येणं, अती घाम येणं अशा तक्रारीही वाढतात. 

स्थूल मुलांमध्ये, स्त्री-पुरुषांमध्ये अनेक वेळा आत्मविश्‍वासाचा अभाव असतो. स्थूलता हा बहुधा चेष्टेचा विषय असतो. वरवर या व्यक्ती 'जॉली' वाटल्या, तरी मनातून त्या व्यथित असतात. अशा व्यक्तीमध्ये न्यूनगंड येऊ शकतो. तरुणांना आवडीचे, मापाचे, फॅशनचे कपडे मिळत नाहीत. चांगला जोडीदार मिळताना अडचण येते. नोकरीच्या चांगल्या संधी गमवाव्या लागण्याची शक्‍यता असते. 

प्रत्येक स्थूल व्यक्ती कोणत्या ना कोणत्या तरी मार्गानं वजन उतरवण्याचा प्रयत्न सतत करत असते. आजकाल वृत्तपत्र उघडलं, की किमान चार ते पाच जाहिराती या 'वेटलॉस'विषयी असतात. कोणी म्हणतं- 'व्यायामाची कटकट नाही तरीही वजन हमखास उतरेल', कोणी म्हणतं- 'वाट्टेल ते खा आणि वजन उतरवा', कोणी म्हणतं- 'आम्ही देऊ ती शेक्‍स वा पावडर्स खा आणि वजन उतरवा'...'पोटाला पट्टे बांधा', 'सोना बेल्ट्‌स वापरा' असे एक ना अनेक उपचार. अशास्त्रीय वाटचाल! फेसबुक, सोशल मीडियावर रोज एक नवं फॅड डाएट येतं. जीएम डाएट, केटॉन डाएट, ॲटकिन्स डाएट, मेडीट्रेरिअन डाएट, अनेक प्रकारचे रस...'वेटलॉस'च्या वाट्टेल त्या उपायांची जाहिरातच जाहिरात.

अशा जाहिरातींना स्थूल व्यक्ती सहज बळी पडतात. स्थूलत्वाचं प्रमाण नियंत्रणाबाहेर गेलं, की कोणतेही उपचार करून घेण्यास अशी व्यक्ती तयार असते. अनेकदा भराभर वजन कमी होतंही. मात्र, अशास्त्रीय प्रकारांनी कमी केलेलं वजन वाढतंही भराभरा! शिवाय त्यांचे दुष्पपरिणाम भोगावे लागतात ते वेगळेच. अशा वेळी मग प्रश्‍न पडतो, की नक्की कोणती उपचारपद्धती अवलंबावी, काय करावं, आहार कसा ठेवावा? यासाठी आधी एक अगदी साधी गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आपल्या स्थूलत्वाच्या कारणांचा पहिल्यांदा विचार करायला हवा.

स्थूलत्व कशामुळं?
स्थूलत्वाचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे चुकीची जीवनशैली. त्याचबरोबर अनुवांशिकता, अंतःस्रावी ग्रंथीचं अनियमित कार्य, शस्त्रक्रियेनंतर अथवा एखाद्या दीर्घ आजारानंतर घेतलेली मोठी विश्रांती, स्त्रियांमध्ये गरोदरपण, बाळंतपण, मेनापॉज, काही औषधांचे दुष्परिणाम अशा अनेक कारणांनीही वजन वाढतं. 
आपलं वजन का वाढतंय ते आधी समजून घ्यावं. त्यानुसार उपचारांचं नियोजन करावं. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे 'जीवनशैलीचं उत्तम नियोजन' करायला हवं. कोणत्याही कारणानं वजन वाढलं असलं, तरी 'निरामय, आरोग्यदायी जीवनशैली' अवलंबल्यावर आणि त्यामुळंच वजन योग्य रीतीनं कमी होतं आणि टिकतंही! 

कशी असावी आरोग्यदायी जीवनशैली? 
आरोग्यदायी जीवनशैली कशी असावी, हा सर्वांत कळीचा प्रश्‍न. ही जीवनशैली म्हणजे 'शास्त्रोक्त व्यायाम, सुयोग्य आहारनियंत्रण, सकारात्मक दृष्टिकोन, ताणतणावांचे नियोजन!' प्रत्येकाला अंमलबजावणी करायला शक्‍य अशी ही जीवनशैली आहे.
शास्त्रोक्त व्यायाम कोणते? ज्या व्यायामांनी तंदुरुस्ती वाढते- म्हणजे स्नायूंची शक्ती, चिकाटी, लवचिकता वाढते, 'स्टॅमिना' वाढतो आणि यामुळं शरीराची ऊर्जा वापरण्याची क्षमता वाढते असे व्यायाम. अर्थात तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच असे व्यायाम करावेत.
जिममधले व्यायाम स्नायूंची ताकद आणि चिकाटी वाढवतात. स्नायू म्हणजे शरीराची 'कार्य करणारी यंत्रणा.' जिममधल्या व्यायामांनी ही 'यंत्रं' मजबूत होतात. यंत्रणा मजबूत असली, की इंधनाचा वापर अधिक. म्हणजेच खाल्लेल्या अन्नाचा विनियोग करण्याची क्षमता अधिक. शास्त्रीय भाषेत याला 'बेसल मेटॅबोलिझम रेट' (बीएमआर) असं म्हणतात. जिममधल्या व्यायामानं हा 'बीएमआर' वाढतो. आठवड्यातून तीन वेळा एक दिवसाआड जिमचे व्यायाम करावेत. त्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी. पाश्‍चात्य देशातले स्नायू वाढवणारे व्यायामप्रकार करण्यापूर्वी तज्ज्ञाद्वारे किती वजन, किती आवर्तनं यांची माहिती घ्यावी. या व्यायामांनी स्नायूंची ताकद आणि चिवटपणा वाढतो. उरलेले तीन दिवस दमश्‍वास वाढवणारे एरोबिक्‍सचे व्यायाम करावेत. त्यामुळं हृदयाची शक्ती वाढते. फुप्फुसाची क्षमता वाढते. रक्तवाहिन्या लवचिक होतात. अशा व्यायामप्रकारांसाठी इंधन म्हणून चरबी वापरली जाते. इतर अनेक फायदे होतात. 
योगासनांचाही समावेश हवा

रोज किमान दहा मिनिटं योगासनं करावीत. प्राणायाम, ध्यान यांचा अंतर्भाव आपल्या जीवनशैलीमध्ये असायलाच हवा. योगासनांमुळं लवचिकता वाढते. मानसिक आरोग्य सुधारतं. ताणतणावांचं नियोजन होतं. 

व्यायामाचे याखेरीज अनेक फायदे आहेत. शरीरांतर्गत प्रत्येक संस्थेचं कार्य सुधारण्यासाठी व्यायाम उपयुक्त असतात. अनेक दीर्घ आजारांच्या उपचारांमध्ये व्यायामाचा अंतर्भाव असतो. व्यायाम म्हणजे 'नवसंजीवनी'. व्यायाम म्हणजे अमृतच आहे. 

त्यामुळं लक्षात ठेवा- व्यायामाशिवाय 'वेटलॉस' म्हणजे आरोग्याची अपरिमित हानी.
व्यायामाशिवाय केल्या जाणाऱ्या 'वेटलॉस'मध्ये काय घडतं? केवळ आहारनियंत्रण करून वजन घटवलं, की शरीरास उपयुक्त असणारे, शरीराची कार्य करणारी यंत्रणा असणारे 'स्नायू' ऱ्हास पावतात. कमी झालेल्या वजनाच्या २५ टक्के वजन हे स्नायूंचा ऱ्हास झाल्यामुळं होतं. त्यामुळं कार्य करणारी यंत्रणा कमी जोमानं काम करते. तुमचा 'बीएमआर' कमी होतो. आता वजन कमी होण्याचा दर घटतो. खाल्लेलं अन्न फक्त साठवलं जातं. चरबीच्या रूपात! थकवा येतो, आजारी असल्याची भावना येते. काहीतरी शक्ती देणारं खावंसं वाटतं...आणि मग वजन पुन्हा वाढू लागतं. भराभर, पहिल्यापेक्षा जास्त! आता वाढणारं वजन असतं ते चरबीचं. 

म्हणजे आता शरीरात पूर्वीपेक्षा अधिक चरबी आणि उपयुक्त असणारं चरबीविरहित वजन मात्र पूर्वीपेक्षा कमी. एक गोष्ट लक्षात ठेवा, की ‘व्यायाम करणारी स्थूल व्यक्ती ही व्यायाम न करणाऱ्या बारीक व्यक्तीपेक्षा अधिक तंदुरुस्त आणि निरोगी असते.’ ‘वेटलॉस’मध्ये शास्त्रोक्त व्यायामाला पर्यायच नाही.  

आहाराचं सुयोग्य नियंत्रण 
व्यायाम महत्त्वाचा असला, तरी त्यापेक्षा जास्त महत्त्व अर्थातच ‘सुयोग्य आहारनियंत्रणाला’ आहे. ‘तुम्ही आणि तुमचं आरोग्य म्हणजेच तुमचा आहार असतो.’ त्या त्या वयाला, त्या त्या प्रकारच्या जीवनशैलीला आवश्‍यक असणाऱ्या उष्मांकाचा समतोल, पोटभर, त्यात रुची वाटेल असा आहार असावा. एकूण आहाराचा निम्मा भाग हा सर्व ऋतूंमध्ये मिळणाऱ्या सर्व रंगाच्या भाज्यांचा सॅलड्‌सचा असावा. कमी उष्मांक पुरवणारी प्रथिनं, योग्य प्रमाणात योग्य प्रकारची चरबी ही नियमांनुसार घ्यावी. ‘तेल, तळलेले गोड पदार्थ, साखर, गूळ, मैदा, बेकरीचे पदार्थ, खाण्यासाठी त्वरित तयार होणारी इन्स्टंट फूडस, जंकफूड्‌स, चॉकलेट्‌स, मिठाया इत्यादी आरोग्यास घातक पदार्थ पूर्णपणे टाळावेत.

हिरव्या भाज्या, लिंबू वर्गातली फळं, ऋतुमानानुसार इतर फळं आहारामध्ये आवर्जून समाविष्ट करावीत. दिवसभरातल्या आहारातून लागणारी सर्व जीवनसत्त्वं, खनिजं मिळतील असा आहार असावा.

उपासमार करून घेऊ नये
मुळातच आपल्या शरीराची कार्यपद्धती दर तीन-चार तासांनी काहीतरी आहारसेवन करावं अशी असते. त्यामुळं उपाशी राहणं किंवा सतत दोन-दोन तासांनी खाणं टाळावं.
जीएम डाएट, केटो डाएट अथवा फॅड डाएट हे सर्वसामान्यांच्या वेटलॉससाठी नाही. मॉडेलिंग क्षेत्रातील व्यक्ती किंवा चित्रपटसृष्टीतले कलाकार यांना तात्पुरतं वजन घटवण्यासाठीचे ते तात्पुरते उपाय आहेत. अशा सेलिब्रेटीजसाठी वेगळे डाएटिशिअन असतात. आपण त्या फंदात पडून आरोग्याची हानी करून घेऊ नये.

दररोज किमान दहा ते बारा ग्लास पाणी प्यावं. सकारात्मकता, प्रसन्न आणि आनंदी मनोवृत्ती वजन कमी करताना फार उपयुक्त ठरते. प्राणायाम, मेडिटेशन आणि कोणत्याही प्रकारचा व्यायाम यामुळं ताणतणावाचं नियोजन आपोआपच होतं.  
‘अमुक महिन्यात अमुक इतकं वजन कमी करणं’ असं ध्येय ठेवण्यापेक्षा ‘मी निरामय आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार उत्तम आरोग्यासाठी कायम स्वरूपात करणार आहे. होणारा वेटलॉस हा मला अशा जीवनशैलीचा आपोआप मिळणार फायदा असणार आहे,’ असं ध्येय ठेवावं.

कोणाशीही तुलना नको
कोणाशीही तुलना नको. स्वतःची स्पर्धा स्वतःशीच असावी. कालच्यापेक्षा आज माझ्यात अधिक सुधारणा आहे, हे तत्त्व आणि हेच ध्येय असावे. 

आजपासूनच या जीवनशैलीचा आरंभ करा. उद्या, सोमवारपासून, एक तारखेपासून, वाढदिवसानंतर, एक जानेवारीला असं लांबणीवर टाकू नका.

स्वतः या जीवनशैलीचा स्वीकार कराच, शिवाय इतरांनाही त्याचं मार्गदर्शन करा. स्वतः आदर्श बनून. या नवीन वर्षात आपल्या सर्वांना उत्तम आरोग्यसंपदा लाभावी ही शुभेच्छा.

Web Title: Marathi News Sakal saptranga esakal Sumedha Bhosale