सृष्टीच्या अंताची सुरवात! (संदीप वासलेकर)

सृष्टीच्या अंताची सुरवात! (संदीप वासलेकर)

काही महिन्यांपूर्वी अमेरिकेतल्या साल्क इन्स्टिट्यूट या संशोधन-संस्थेतल्या शास्त्रज्ञांनी मनुष्य व डुक्कर यांच्या पेशींचा संकर करून एक नवीन जीव निर्माण केला. २८ दिवसांनंतर त्याला पूर्ण आकार येण्याआधी तो नष्ट करण्यात आला. मानव व प्राणी यांच्या पेशींचा संकर करून नवीन प्रकारचे जीव निर्माण करण्याचा हा सगळ्यात प्रगत व यशस्वी प्रयोग होता; पण या प्रकारचा हा काही पहिलाच प्रयोग नव्हता.

सुमारे दहा वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये मनुष्य व गाय यांच्या पेशी संकरित करून एका नव्या जीवाला जन्म देण्यात आला होता. त्या वेळी प्राणी व मानव यांच्या पेशींचा संकर करण्याच्या मुद्द्यावरून इंग्लंडच्या संसदेत खडाजंगी झाली होती व ‘असे जीव निर्माण केले तर प्रयोगशाळेतच १४ व्या दिवशी नष्ट केले पाहिजेत,’ असा कायदाही करण्यात आला होता. त्यानुसार मनुष्य-गाय अशा संकरित जीवाचं बीज १४ व्या दिवशी नष्ट करण्यात आलं. पुढच्या तीन वर्षांत इंग्लंडमध्ये प्राणी-मानव यांच्या संकराचे सुमारे १५० प्रयोग करण्यात आले. त्यांच्या बातम्या प्रमुख वर्तमानपत्रांत येत असत; परंतु २०१० नंतर या विषयावरच्या बातम्या इंग्लंडच्या माध्यमांतून प्रसिद्ध होणं अचानकच थांबल्या ते आजतागायत.

प्राणी व मनुष्य यांच्या संकराची सुरवात चीननं केली. २००३ मध्ये शांघायमध्ये एका संशोधनकेंद्रात मानवाच्या व सशाच्या पेशी एकत्र करून नवीन जीव निर्माण करण्यात शास्त्रज्ञांना यश आलं. इंग्लंड-अमेरिकेतले शास्त्रीय प्रयोग जरी वर्तमानपत्रांतून जाहीर झाले नसले तरी इतर शास्त्रज्ञांना व अन्य व्यक्तींना त्यासंबंधीची माहिती थोडीफार मिळू शकते. चीनमध्ये मात्र काय सुरू असतं, हे चिनी जनतेलाही कळण्याचा मार्ग नाही. चीनमधल्या जैविक क्रांतीबद्दल जवळपास अंधारातच राहावं लागतं.

हे वैज्ञानिक प्रयोग करण्यामागं शास्त्रज्ञांचा हेतू चांगला आहे. मनुष्याचं यकृत, मूत्रपिंड व जमलं तर हृदयही हे अवयव प्राण्यांच्या शरीरात निर्माण करून वाढवायचे व मग गरजू रुग्णांना द्यायचे हा त्यामागचा हेतू आहे. येत्या काही वर्षांत मानवी अवयव आपल्या शरीरात वाढवणाऱ्या प्राण्यांचे कळप अमेरिकेतल्या काही शेतांमध्ये सुरक्षितपणे वावरताना दिसतील. याशिवाय अशा प्रयोगांतून अल्झायमर व पार्किन्सन हा दोन रोगांवरही उपाययोजना सापडू शकेल, असं शास्त्रज्ञांना वाटतं.

प्राणी व मनुष्य यांचा संकर करून नवीन जीव निर्माण करण्याची गरज अमेरिकेतले विख्यात जैविक शास्त्रज्ञ क्रेग व्हेंटर यांना वाटत नाही. पृथ्वीवर आतापर्यंत कधीही अस्तित्वात नसलेला जिवाणू त्यांनी गेल्या वर्षी प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या निर्माण केला. तो जिवाणू प्रजोत्पादन करून मोठ्या प्रमाणात पसरू शकतो. त्या जिवाणूच्या काही पेशी सृष्टीतच नव्हे, तर आजवर कधीच अस्तित्वात नव्हत्या.

याआधी २०१० मध्ये वेंटर यांनी प्रयोगशाळेत एक कृत्रिम जिवाणू निर्माण केला होता; परंतु तसा जिवाणू पृथ्वीवर आहे. व्हेंटर यांच्या प्रयोगशाळेत तयार केला गेलेला जिवाणू सृष्टीतल्या जिवाणूची कृत्रिम प्रत होती. मात्र, गेल्या वर्षी तयार करण्यात आलेला जिवाणू व त्यातल्या काही पेशी सृष्टीत प्रथमच व अनैसर्गिकरीत्या अवतरल्या.
या लेखातली माहिती काही कल्पनाविश्वातली नव्हे किंवा हा कुठल्या विज्ञानविषयक कादंबरीचाही हा भाग नव्हे. आज ज्या वेगानं जैविक शास्त्र पुढं जात आहे, त्याविषयीची ही वस्तुस्थिती होय. प्राण्यांच्या अथवा मानवाच्या पेशीत बदल करण्यासाठी ‘क्रिस्पर’ नावाचं तंत्र वापरलं जातं. हे काही वेंटर यांच्यासारख्या मूठभर शास्त्रज्ञांपुरतं मर्यादित नाही. जगात सुमारे ३० हजार संशोधक ‘क्रिस्पर’ वापरून पेशींवर प्रयोग करत आहेत. ते अमेरिका, युरोप, चीन व जपान या देशांत होत आहेत.

कृत्रिम जिवाणू निर्माण करण्यामागचे वेंटर यांचे उद्देश चांगले आहेत. त्यांच्या संशोधनासाठी त्यांना अमेरिकी व ब्रिटिश तेलकंपन्यांकडून कोट्यवधी डॉलर मिळतील. इंधन उत्पादित करणारे नवीन जिवाणू जन्माला यावेत, अशी त्यामागची अपेक्षा आहे.
वैज्ञानिक प्रगती मानवाच्या भल्यासाठी, सद्‌हेतूनं केली जाते; परंतु महत्त्वाकांक्षी राजकारणी विज्ञानाचा उपयोग स्वतःच्या महत्त्वाकांक्षेसाठी करतात. त्यातून सृष्टीचा अंत होऊ शकतो. याचं ठळक उदाहरण म्हणजे अण्वस्त्रं.

सन १९२० मध्ये रुदरफोर्ड यांनी प्रोटॉनचा शोध लावला. सन १९३२ मध्ये जेम्स चाडविक यांनी न्यूट्रॉनचा शोध लावला. या दोन्ही शोधांमागचा उद्देश उदात्त होता, हे निःसंशय. आधुनिक जीवन हे प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या शोधामुळं सुसह्य झालं आहे. मात्र,
प्रोटॉनचा शोध लावून २५ वर्षांच्या आत व न्यूट्रॉनचा शोध लावून १५ वर्षांच्या आत अमेरिकेनं अण्वस्त्रं बनवली व त्यातली दोन अण्वस्त्रं हिरोशिमा व नागासकी या शहरांवर टाकली. त्यापैकी प्रत्येक अण्वस्त्राची क्षमता १५ किलोटन होती. सध्या रशियाकडं ‘झार बॉम्बा’ नावाचं ५० हजार किलोटन क्षमतेचं अण्वस्त्र आहे.

पाकिस्तानकडच्या अण्वस्त्रांची क्षमता प्रत्येकी ४००-५०० किलोटनच्या आसपास असावी, असा एक अंदाज आहे. चीनकडं एक हजार ते १० हजार किलोटन क्षमतेची अण्वस्त्रं आहेत. (भारतातल्या अण्वस्त्रांच्या क्षमतेबद्दल जाहीर चर्चा करणं राष्ट्रहिताच्या दृष्टीनं अयोग्य होईल म्हणून मी त्यावर भाष्य करू इच्छित नाही). थोडक्‍यात प्रोटॉन-न्यूट्रॉनचा शोध लागून एक शतक पूर्ण व्हायच्या आतच जगाचा संहार करण्याची लाखो किलोटन क्षमता सुमारे दहा राष्ट्रांकडं आहे.

१५ किलोटन अण्वस्त्रामुळं एक शहर बेचिराख झालं, तर त्यापेक्षा ३०-३५ पट क्षमता असलेल्या ५०० किलोटन अण्वस्त्रांमुळं व ५०० पट क्षमता असलेल्या सात हजार- आठ हजार किलोटन अण्वस्त्रांमुळं पृथ्वीवरचं जीवन किती मिनिटं टिकेल, याची माहिती विज्ञानविषयक ग्रंथांमध्ये उपलब्ध आहे. जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व उत्तर कोरियाचे नेते किम हे एकमेकांच्या देशांवर अण्वस्त्रं टाकण्याची भाषा वापरतात, तेव्हा जगातले काही अज्ञानी आणि मानवता विसरलेले लोक त्यांचं कौतुक करतात; परंतु जगभरातले शास्त्रज्ञ ट्रम्प व कीम या दोघांवरही यासंदर्भात टीकाच करतात. ट्रम्प यांनी सप्टेंबर महिन्यात युनोमध्ये धमकी देणारं जे भाषण केलं, त्याचा ‘वॉशिंग्टन पोस्ट’ व ‘न्यू यॉर्क टाईम्स’सारख्या वृत्तपत्रांनी व अमेरिकेतल्या नोबेल पारितोषिकविजेत्या सर्व शास्त्रज्ञांनी जोरदार धिक्कार केला होता.

अण्वस्त्रांमुळं किमान दोनदा जगाचा सर्वनाश होणार होता. ऑक्‍टोबर १९६२ मध्ये रशियाची अण्वस्त्रांनी सज्ज असलेली पाणबुडी क्‍यूबाकडं निघाली होती. तिला चुकीचे संकेत मिळाले. त्यामुळं पाणबुडीचे कप्तान व्हॅलेंटिन साविट्‌स्की यांनी अण्वस्त्रांचा हल्ला करण्याचा आदेश दिला; परंतु उपकप्तान वासिली आर्खिपोव यांनी त्याला विरोध केला. शीतयुद्धकाळात अमेरिकी व रशियन नौदलात एक संकेत होता व तो असा ः ‘जर प्रतिपक्षाकडून अण्वस्त्रांचा हल्ला झाला आहे असं वाटलं, तर जहाजाचा अथवा पाणबुडीचा कप्तान-उपकप्तान व राजकीय सल्लागार या तिन्ही अधिकाऱ्यांनी मिळून अण्वस्त्र वापरण्या-न वापरण्याविषयीचा निर्णय घ्यावा व जो काही निर्णय घेतला जाईल तो निर्णय एकमुखी असावा.’ तांत्रिक चुका व गैरसमजुती टाळण्यासाठी हा संकेत होता. आर्खिपोव यांनी साविट्‌स्की यांना विरोध करून ‘अमेरिकेबद्दल आपले गैरसमज आहेत,’ असं सांगितलं व अणुयुद्ध थांबवलं. जर त्या वेळी रशियाकडून अण्वस्त्र वापरलं गेलं असतं तर व अमेरिकेनंही अण्वस्त्रांनीच प्रत्युतर दिलं असतं, तर पुढच्या २४ तासांत सगळी सृष्टीच संपुष्टात आली असती.

हा प्रसंग घडून गेल्यावर २१ वर्षांनंतरची गोष्ट. म्हणजे सप्टेंबर १९८३ ची. ‘अमेरिकेनं चार क्षेपणास्त्रं सोडली आहेत,’ असे संकेत रशियाच्या हवाई दलाच्या संगणककेंद्रात मिळाले; परंतु ‘हे संकेत तांत्रिक चुकीमुळं दिसले,’ असं स्टॅनिस्ला पेयोव या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं आणि रशियाकडून न झालेल्या हल्ल्याचं आण्विक प्रत्युत्तर थांबवलं.

सन १९६२ अथवा १९८३ यांपैकी एकाही प्रसंगात जर संबंधित रशियन अधिकाऱ्यानं प्रसंगावधान दाखवलं नसतं, तर महाअणुयुद्ध होऊन सृष्टी संपुष्टात आली असती. हा लेख लिहिण्यासाठी मी व वाचण्यासाठी तुम्ही अस्तित्वात नसता. सर्वत्र दूषित किरणं पसरली असती व पृथ्वीतलावर केवळ झुरळांचं साम्राज्य असतं.

मनुष्य व इतर प्राणी यांच्या संकरातून, तसंच प्रयोगशाळेत निर्माण करण्यात आलेल्या नव्या जिवाणूंपासून अण्वस्त्रांपेक्षा महाभयंकर अशी जैविक महाअस्त्रं येत्या काही वर्षांत निर्माण करण्यात आली तर आश्‍चर्य वाटणार नाही. अण्वस्त्र व क्षेपणास्त्रांसाठी मोठी सामग्री लागते. तुलनेनं कृत्रिम जिवाणू करण्याची प्रयोगशाळा कुणालाही उभारता येते.
मनुष्य व इतर प्राण्यांपासून संकरित जीव तयार करण्याची स्पर्धा, कृत्रिम जिवाणू व कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण करण्याची स्पर्धा वैज्ञानिक मंडळी मानवी सुखासाठी व रोगनिर्मूलनासाठी करत आहेत; परंतु त्यांनी उघडलेल्या दालनात कुठला महत्त्वाकांक्षी राजकीय नेता कधी शिरेल, याची खात्री नाही, हे इतिहासानं दाखवून दिलं आहे. प्राचीन काळापासून आपल्या रक्तात असलेला स्वार्थ, महत्त्वाकांक्षा, गर्व व अरेरावी यांत मात्र काहीही फरक पडलेला नाही, म्हणून या प्रवृत्ती जैविक क्रांतीचा दुरुपयोग करण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. जर आपण जागरूक राहिलो नाही, तर सृष्टीच्या अंताची सुरवात लवकरच होईल!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com