क्रांती का फसते? (संदीप वासलेकर)

संदीप वासलेकर
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

‘ऑ क्‍टोबर क्रांती’ या जागतिक इतिहासातल्या महत्त्वाच्या घटनेची शताब्दी नुकतीच झाली; परंतु कुणीही ती साजरी केली नाही. जगभरातल्या सगळ्या माध्यमांना या घटनेचा विसर पडला. ऑक्‍टोबर १९१७ मध्ये लेनिननं रशियात क्रांती करून झार राजाला पदच्युत केलं व पहिल्या कम्युनिस्ट राज्यपद्धतीची स्थापना केली. सुमारे ७० वर्षांनी जगातल्या बहुसंख्य भागांत कम्युनिस्ट सरकारं बरखास्त झाली. लाल क्रांती फसली.

‘ऑ क्‍टोबर क्रांती’ या जागतिक इतिहासातल्या महत्त्वाच्या घटनेची शताब्दी नुकतीच झाली; परंतु कुणीही ती साजरी केली नाही. जगभरातल्या सगळ्या माध्यमांना या घटनेचा विसर पडला. ऑक्‍टोबर १९१७ मध्ये लेनिननं रशियात क्रांती करून झार राजाला पदच्युत केलं व पहिल्या कम्युनिस्ट राज्यपद्धतीची स्थापना केली. सुमारे ७० वर्षांनी जगातल्या बहुसंख्य भागांत कम्युनिस्ट सरकारं बरखास्त झाली. लाल क्रांती फसली.

ऑक्‍टोबर-नोव्हेंबर १९७८ मध्ये इराणमध्ये धार्मिक क्रांतीला सुरवात झाली व फेब्रुवारी १९७९ मध्ये अयातुल्ला खोमेनी राजवट येऊन ती क्रांती पूर्ण झाली. इराणमध्ये अजूनही अयातुल्ला राजवट आहे; पण ही क्रांती फसण्याच्या मार्गावर आहे.

फेब्रुवारी २०११ मध्ये इजिप्तमध्ये क्रांती होऊन मुबारक कुटुंबाची उचलबांगडी झाली. सत्तेत आलेले राष्ट्रपती मोरसी सध्या तुरुंगात आहेत. मुबारक यांचे सहकारी जनरल सिसी सत्तेत आहेत. ही क्रांती तीन-चार वर्षांत फसली.

युरोपीय समुदायातून बाहेर पडण्याचा ब्रिटननं घेतलेला निर्णय ही एका प्रकारे युरोपीय समुदायाविरुद्धच्या अप्रत्यक्ष क्रांतीचीच सुरवात होती; पण हीही क्रांती फसली आहे. फ्रान्स, जर्मनी व इतर देशांत लोकांनी युरोपीय समुदायाला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांना निवडून दिलं आहे. ब्रिटनला आता विभक्तपणाच्या वाटाघाटी करताना नाकी नऊ येत आहेत व शेवटी ब्रिटन बाहेर पडल्यास देशाची शकलं होऊन स्कॉटलंड व उत्तर आयर्लंड विभक्त होतील, याबद्दल शंका नाही.

गतकाळात जर्मनीत लोकशाहीच्या मार्गानं झालेली हिटलरची निवड व सर्बियात मिलोशेविच यांची निवड हेदेखील मतपेटीतून क्रांती होण्याचेच प्रकार होते. निवडणुकीत केवळ सत्तांतर झालं, तर त्याला क्रांती म्हणत नाहीत. ती लोकशाहीची प्रक्रिया असते; परंतु जर का सत्तांतर होऊन नवीन राजवटीनं देशात आमूलाग्र बदल घडवण्याचा प्रयत्न केला, तर ती अप्रत्यक्ष क्रांती असते. इराणमधली अयातुल्ला राजवट ही निवडणुकीच्या औपचारिकेतूनच सत्तेवर येते व सत्तेत राहते; परंतु इराणमधल्या १९७९ नंतरच्या सत्ताधाऱ्यांनी देशात आमूलाग्र बदल करून धर्मावर आधारित राज्यपद्धती निर्माण केली. ही क्रांती झाली.

जगातल्या विविध देशांत व इतिहासाच्या विविध टप्प्यांवर होणाऱ्या क्रांतींमागचं कारण संपूर्ण पृथ्वीतलावर एकच असतं. एखादी राजवट भ्रष्टाचार व जुलूम यांना आश्रय देते. सर्वसामान्य लोक कंटाळतात. केवळ राज्यकर्ता बदलून काही फरक पडणार नाही, असं समजतात व राजवट उलथून पाडल्यानंच आपला सर्वतोपरी उत्कर्ष होईल, असं गृहीत धरून हिंसेच्या, धर्माच्या, मतपेटीच्या अथवा इतर मिळेल त्या मार्गानं राजवट पाडतात आणि एक नवीन प्रकारची राजवट प्रस्थापित करतात.
रशियातला झार १९१० ते १९१७ च्या दरम्यान, इराणचे शहा रझा पहलवी १९६० ते १९७० च्या दरम्यान, इजिप्तचे मुबारक विसाव्या शतकाच्या अखेरीस व या शतकाच्या सुरवातीला होऊन गेले. या तिन्ही राजवटींमध्ये भ्रष्टाचार वाढला होता. विरोधकांच्या अभिव्यक्तीवर निर्बंध लादण्यात आलेले होते. लोकांना आर्थिक व सामाजिक प्रगतीची आशा नव्हती, म्हणून जगाच्या निरनिराळ्या भागांतल्या लोकांनी क्रांती केली. या प्रसिद्ध उदाहरणांपलीकडं जाऊन पाहिलं तर कंबोडियापासून चिलीपर्यंत सर्वत्र एकच प्रक्रिया व एकाच प्रकारची कारणं क्रांती घडवून आणतात असं दिसेल आणि सर्वत्र काही वर्षांनी क्रांती फसते. रशिया व क्‍यूबामधल्या क्रांतीनं अनेक दशकं श्‍वास घेतला; पण अलीकडं होणारी प्रत्येक क्रांती चार-पाच वर्षांतच फसते. ही क्रांती का फसते?

क्रांती झाल्यावर येणारी नवीन राजवट ‘भ्रष्टाचारनिर्मूलन’, ‘राष्ट्रीय सुरक्षा’ व ‘देशप्रेम’ ही त्रिसूत्री वापरून राज्य कारभार सुरू करते. लेनिनपासून ते खोमेनींपर्यंत व पॉल पॉटपासून ते नासर-सादत-मुबारक यांच्यापर्यंत सगळ्यांनी हीच त्रिसूत्री वापरली.
एकदा लोकांना भावनिक आवाहन करून या त्रिसूत्रीला जनमान्यता मिळवली की मग तिची अंमलबजावणी करण्यासाठी सामाजिक, राजकीय व आर्थिक शिस्त लागू केली पाहिजे, हे लोकांच्या मनावर बिंबवण्यात येतं. लोक त्यात समाजाचं हितच मानतात. एकदा लोकांनी हे मान्य केलं की ‘नियमांची कठोर अंमलबजावणी केली पाहिजे,’ असं लोकांना समजावण्यात येतं व मग सार्वत्रिक नियंत्रण हे राज्य कारभाराचं तत्त्व ठरतं. त्यासाठी खूप धाक घालावा लागत नाही. लोकच भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी, देशाचं शत्रूंपासून रक्षण करण्यासाठी व आपलं राष्ट्रप्रेम दाखवण्यासाठी नियंत्रणं कबूल करतात. हे ‘अयातुल्ला-मॉडेल’ झालं, ‘स्टॅलिन-मॉडेल’ झालं व ‘पॉलपॉट-मॉडेल’देखील झालं.

या ‘अयातुल्ला-मॉडेल’बद्दल इराणमध्ये एक दंतकथा आहे. सोशल मीडियामध्ये ती प्रसिद्धही आहे. मी ती विविध रूपांत निरनिराळ्या देशांत ऐकली आहे.
झानझान नावाच्या प्रांतात एक राजा होता. त्या गावातले रस्ते पर्शिया व तुर्कस्तान या दोन देशांना जोडलेले होते. व्यापाऱ्यांना ते रस्ते महत्त्वाचे होते. एकदा राजानं प्रजेची सहनशक्ती किती आहे, ते पाहायचं ठरवलं व त्यानं व्यापाऱ्यांना तुर्कस्तानकडं जाणाऱ्या रस्त्यांवरून प्रवास करण्यासाठी १० दारीक (त्या वेळंचं चलन) कर लावला.

गरीब लोक खूश झाले. ‘हे व्यापारी खूप थाटात राहतात, बरं झालं, कर लावला गेला,’ असं म्हणाले. व्यापाऱ्यांच्या सभेनंही ‘हे खूप चांगलं, देशहिताय धोरण आहे,’ असं म्हणून ठराव संमत केला. काही महिन्यांनी राजानं कर १० दारीकवरून २० दारीक केला. व्यापाऱ्यांनी ही वाढही स्वीकारली. दर काही महिन्यांनी वाढ होत कर १०० दारीक झाला व व्यापारी उद्‌ध्वस्त झाले. व्यापार कमी झाल्यामुळं उत्पादन व रोजगार कमी झाला. गरिबांचे हाल झाले; पण राजानं तर म्हटलं की शत्रूपासून रक्षण करण्यासाठी व देशात शिस्त आणण्यासाठी कराची गरज आहे. लोकांनी देशप्रेमामुळं कर स्वीकारले. उत्पन्न खरोखरच थांबल्यामुळं जे लोक कर भरू शकत नव्हते, त्यांना राजाचे सैनिक येऊन शिक्षा करत व लोकही निमूटपणे शिक्षा मान्य करत. हळूहळू देशातलं चैतन्य संपलं. तेहरान अथवा इस्फहानमध्ये सध्या प्रवास केला तर युवकांकडून हलक्‍या आवाजात असल्या गोष्टी ऐकायला मिळतात. अयातुल्ला राजवटीला लोक विटत चालले आहेत; पण दुसरा पर्याय दिसत नसल्यानं मुकाट्यानं सगळं सहन करत असल्याचं चित्र आढळून येतं.

‘नियंत्रण’ हा मंत्र म्हणत सत्ता राबवण्यास क्रांतिकारी राजवटीनं सुरवात केल्यावर मोठे उद्योगधंदे अधिक सक्षम होतात. त्यांना प्रत्येक राजवटीत कुणाशी व कसं संधान बांधायचं ही कला अवगत असते. शिवाय त्यांच्याकडं साधनसामग्रीही असते. परदेशी कंपन्यादेखील नवीन राजवटीचं कौतुक करून कंत्राटं कशी मिळवायची, यात तरबेज असतात. त्यांचं प्रतिनिधित्व करणारे वकील, लेखा परीक्षक आणि इतर व्यावसायिक भरभराटीस येतात. ते क्रांतीचा उदो उदो करतात.

मात्र, मध्यम व लघुउद्योजक, व्यापारी, व्यावसायिक हे विविध नियंत्रणांच्या सापळ्यातून बाहेर पडू शकत नाहीत. पॉल पॉटच्या कंबोडियात अशा मध्यमवर्गीय व बुद्धिजीवी लोकांना यमसदनास पाठवण्यात आलं. चीनमध्येही ‘सांस्कृतिक क्रांती’च्या नावानं असाच प्रकार झाला. इतर देशांत अगदी एवढ्या टोकापर्यंत क्रांतिकारी राजवटीनं पावलं उचलली नाहीत; परंतु सामाजिक व आर्थिक व्यवस्थेतल्या घटकांना शिस्तीच्या व भ्रष्टाचारनिर्मूलनाच्या नावाखाली त्रस्त केलं जाऊन त्यांचं कंबरडं मात्र नक्कीच मोडलं.

यात गरिबांचं सगळ्यात जास्त नुकसान झालं; पण त्यांनी मध्यमवर्गीयांचे हाल पाहून क्रांतिकारी राज्यकर्त्यांचं कायम कौतुक केलं. दरम्यान, चीनमधल्या कम्युनिस्ट पक्षांच्या नेत्यांची मुलं यशस्वी उद्योजक झाली. अर्थात त्यांनी भ्रष्टाचार केला नाही; पण कम्युनिस्ट पक्षातलं त्यांच्या वडिलांचं स्थान पाहून त्यांना व्यवसाय आपोआपच मिळत गेला. रशियात, इजिप्तमध्ये, अयातुल्लांच्या इराणमध्ये, व्हिएतनाम व कंबोडियामध्ये अल्प काळात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर पसरला. जुलूम वाढला. क्रांतीनंतरच्या काळात सर्वसामान्य जनतेची स्थिती क्रांतीपूर्वीच्या युगापेक्षा भयंकर बिकट झाली. हिटलरची जर्मनी तर युद्धात भस्म झाली व मिलोशेविच यांच्या सर्बियाचे तुकडे पडले. लोकांना क्रांती केल्याचा पश्‍चात्ताप झाला; पण सर्वत्र खूपच उशीर झाला होता. म्हणूनच ‘ऑक्‍टोबर क्रांती’च्या शताब्दीनंतर संपूर्ण जगात या विषयावर गेल्या महिन्यात व या महिन्यात फारच कमी प्रमाणात लेख  प्रसिद्ध झाले.

Web Title: Marathi News Sakal saptranga esakal Sundeep Waslekar