‘रोबो’युग...आजचं, उद्याचं! (सुरेंद्र पाटसकर)

सुरेंद्र पाटसकर
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

एका रोबोला नागरिकत्व? आश्‍चर्य वाटलं ना! थोडं थांबा. आता संपूर्ण रोबोंचंच शहर सौदी अरेबियात विकसित होतंय. कृत्रिम बुद्धिमत्ता आता नव्या आव्हानात्मक वळणावर पोचली आहे.

रियाधमध्ये दहा दिवसांपूर्वीच्या दोन घोषणांमुळं संपूर्ण जगाचं लक्ष सौदी अरेबियाकडं वळलं. पहिला घटना होती ती सोफिया या रोबोला नागरिकत्व बहाल करण्याची आणि दुसरी होती ती संपूर्णत: रोबोंचं शहर विकसित करण्याची!

कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशल इंटिलिजन्स अर्थात एआय) आणि तिचा निर्माता मानव यांच्यात खरंच कधीतरी संघर्ष होईल? यंत्रं स्वत:च स्वत:ची निर्मिती करू शकतील? कृत्रिम बुद्धिमत्तेचा भस्मासूर होईल?...अशा अनेक प्रश्‍नांची मालिका ‘सोफिया’ला सौदी अरेबियानं नागरिकत्व बहाल केल्यानं अनेकांच्या मनात निर्माण झाली असेल. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातलं हे महत्त्वाचं पाऊल आहे; पण यापेक्षा मोठ्या गोष्टी अद्याप घडायच्या आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्दप्रयोग सर्वप्रथम वापरला तो संगणकशास्त्रज्ञ जॉन मॅकार्थी यांनी- १९५६मध्ये डार्टमाऊथ विद्यापीठातल्या परिषदेत बोलताना. तेव्हापासून आतापर्यंत या क्षेत्रात फार मोठी झेप घेतली गेलीय. यांत्रिकीकरणाचे दोन टप्पे मागं पडून आता रोबोंचं शहर वसवण्याकडं प्रवास सुरू झाला आहे.

रोबोंचं शहर
जॉर्डन आणि इजिप्त या दोन्ही देशांच्या मध्ये सौदी अरेबियाचा एक भाग येतो. सुमारे २६ हजार ५०० चौरस किलोमीटर क्षेत्राच्या या भागात नवं औद्योगिक शहर वसवलं जाणार आहे. ‘निओम’ असं त्याचं नाव असेल. सौर आणि पवनऊर्जेवर इथले सर्व व्यवहार चालतील. हे शहर पूर्णत्वाला गेल्यानंतर तिथं माणसांपेक्षा रोबोंची संख्या अधिक असू शकेल. 

आधुनिकता, कल्पकता आणि नवं तंत्रज्ञान यांचं दर्शन या शहरातून घडणार आहे. महिलांच्या बाबतीत प्रतिगामी समजल्या जात असलेल्या देशानं ‘सोफिया’ नावाच्या एका रोबोला नागरिकत्व देणं आणि रोबोंच्याच शहराचा आराखडा सर्वांसमोर उलगडणं ही घटना अविश्‍वसनीय मानली जाते. 

रियाधमधल्या ‘फ्युचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह’ परिषदेत सौदी राजपुत्र मोहंमद बिन सलमान यांनीच पाचशे अब्ज डॉलरची गुंतवणूक असलेल्या या नव्या शहराची घोषणा केली. ज्या प्रकारच्या शहराचा विचार करायला पुढारलेले पाश्‍चिमात्यही धजावत नव्हते, अशा या शहराची घोषणा सौदी अरेबियानं केली. निओम शहर ‘ड्रोन फ्रेंडली’ असेल. म्हणजे सर्व व्यवहारांवर ड्रोनची नजर असेल. रोबोटिक्‍सचं ते जगातलं सर्वांत मोठं केंद्र असेल. असामान्य, स्वप्नवत गोष्टी इथं प्रत्यक्षात उतरतील.

ॲल्युमिनियमच्या क्षेत्रातली मोठी कंपनी असलेल्या अल्कोआचे माजी प्रमुख क्‍लौस क्‍लेइनफिल्ड यांची शहराचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीही करण्यात आली आहे. यावरून सौदीच्या कामाचा धडाका लक्षात येईल.

सौदी अरेबिया फक्त खनिज तेल आणि नैसर्गिक वायूनं समृद्ध नाहीये, तर भरपूर सूर्यप्रकाश आणि जोरदार वारे या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. त्यांचाच वापर करून शून्यातून हे शहर वसवलं जाणार आहे. ऊर्जा, पाणी, जैवतंत्रज्ञान, रोबोटिक्‍स, सुरक्षा, लॉजिस्टिक, होम डिलिव्हरी अशा क्षेत्रांमध्येही निओममध्ये संशोधन होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांकडे बघण्यासाठी घरी कोणी नाही अशी परिस्थिती अनेकदा निर्माण होते. त्यांच्याकडे लक्ष ठेवण्यासाठीही रोबोंची मदत होऊ शकेल. हाही विचार कृत्रिम बुद्धिमत्तेवरील संशोधन करताना सौदी अरेबियानं डोळ्यासमोर ठेवला आहे. येत्या १३ वर्षांत म्हणजे २०३०पर्यंत निओम वसवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.

सोफियाऽऽ सोफिया!
रोबोला नागरिकत्व देण्याची कल्पना अपूर्वच म्हणावी लागेल. रोबोंचा वापर आतापर्यंत यांत्रिकीकरणाचा पुढचा टप्पा म्हणूनच कारखान्यांमध्ये होत होता. ‘सायबोर्ग’ या चित्रपटात अर्धा माणूस अर्धा रोबो अशी संकल्पना मांडली होती. अशी व्यक्ती प्रत्यक्षात आली, तर त्याला त्या देशाचे नागरिक म्हणायचं का नाही अशी चर्चाही त्यावेळी झाली होती. आता त्यापुढं जाऊन सौदी अरेबियानं रोबोलाच नागरिकत्व प्रदान केलं आहे.

सौदी अरेबियात महिलांवर अनेक निर्बंध आहेत. त्यांना कुणीतरी पुरुष ‘पालक’ असावाच लागतो, हिजाब वा बुरखा घातल्याशिवाय त्यांना घराबाहेर पडता येत नाही, सौदीतल्या एखाद्या महिलेनं परदेशी नागरिकाशी लग्न केल्यास तिच्या मुलांना नागरिकत्व दिलं जात नाही. बहारिन, कुवेत, लेबनॉन आणि जॉर्डनमध्येही महिलेनं परदेशातील पुरुषाशी विवाह केल्यास तिच्या मुलांना नागरिकत्व दिलं जात नाही. असं असताना एका रोबोला महिला समजून नागरिकत्व दिल्याने तिथल्या महिलांनी रोष व्यक्त केला. त्यांनी सर्व राग सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला. ‘रोबोला नागरिकत्व; मात्र माझ्या चार वर्षांच्या मुलीला नाही, हा खासा न्याय!’ अशी प्रतिक्रिया हदील शेख हिनं व्यक्त केली. तिनं लेबनॉनच्या नागरिकाशी लग्न केलं आहे.

सौदी अरेबिया हा सुन्नी मुस्लिमांचा कर्मठ देश मानला जातो. गेल्या महिन्यातच त्यांनी महिलांना मोटारी चालवण्याची; तसंच स्टेडियममधले सामने बघायला जाण्याची पहिल्यांदाच परवानगी दिली. सुधारणेचे वारे वाहण्याची ही सुरवात म्हणावी लागेल.

सोफियाच्या निमित्तानं अरब देशांमध्ये महिलासमानतेची चळवळ सुरू झाली, तरी आधुनिक विज्ञानाचं ते यश असेल.

असा असेल निओम प्रकल्प
गुंतवणुकीची क्षेत्रं :

  • मानवी वस्त्यांचा विकास ऊर्जा आणि पाणी
  • वाहतूक व्यवस्था जैवतंत्रज्ञान  अन्न प्रसारमाध्यमे  
  • करमणूक  प्रगत उत्पादनक्षमता  डिजिटल विज्ञान

तंत्रज्ञान :

  •   स्वयंचलित वाहनं आणि प्रवासी ड्रोन
  •   वारंवार करायला लागणारी सर्व कामं रोबोंमार्फत
  •   जागतिक दर्जाचं ऑनलाइन शिक्षण मोफत   कृत्रिम बुद्धिमत्ता, आभासी दुनियाचा मिलाफ
  •   वायरलेस, अतिवेगवान इंटरनेट    संपूर्ण शहर अपारंपरिक ऊर्जेवर
  •   सर्व सेवा व प्रक्रिया यांत्रिकीकरणाद्वारे
  •   धान्योत्पादन व प्रक्रियेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान    संपूर्ण ई-गव्हर्नन्स
  •   जगातल्या सत्तर टक्के देशांतले नागरिक आठ तासांत निओमला पोचू शकतील अशी आंतरराष्ट्रीय वाहतूकव्यवस्था

सोफियाला नागरिकत्व देण्यात आल्याची घोषणा रियाधमध्ये पत्रकार परिषदेत करण्यात आली. त्यानंतर तिच्यासोबत प्रश्‍नोत्तराचा कार्यक्रमही झाला. त्यातला वानगीदाखलचा संवाद : 
प्रश्‍न : सौदी अरेबियानं नागरिकत्व दिलेली तू पहिली रोबो आहेस. तुझी प्रतिक्रिया काय?
सोफिया : सौदी अरेबिया सरकारने माझा सन्मान केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते. कोणत्याही देशाचं नागरिकत्व मिळविणारी मी पहिली रोबो आहे, याचा अभिमान आहे. (त्यानंतर उपस्थित नागरिकांकडे वळून) हॅनसन रोबोटिक्‍सचा हा अत्याधुनिक आविष्कार आहे. आजूबाजूला श्रीमंत आणि शक्तिशाली ‘स्मार्ट’ लोक असले, की मी नेहमी आनंदी असते. इथं उपस्थित असलेल्या सर्वांना भविष्यातल्या तंत्रज्ञानामध्ये म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये रस आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच मी. त्यामुळे मी आनंदी आहे.

प्रश्‍न : कृत्रिम बुद्धिमत्ता वाढतेय. हॉलिवूडमधल्या विविध ‘अवतारां’शी तुझी तुलना केली जातेय. याबाबत चिंता वाटते का?
सोफिया : तुम्ही बहुतेक इऑन मस्कची पुस्तकं खूप वाचत असाल आणि हॉलिवूडचे चित्रपटही सारखे पाहत असाल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi News Sakal saptranga esakal Surendra Pataskar