संहारातली माणुसकी (डॉ. यशवंत थोरात)

डॉ. यशवंत थोरात
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

‘‘एक लक्षात ठेव, त्या काळात भारतीय उपखंडात जे काही केंद्रस्थानी होतं ते आजही तसंच आहे. आपल्यापुढंही असा प्रसंग उभा राहू शकतो. खरी गोष्ट ही आहे, की प्रेम आणि द्वेष या दोन्हींची बीजं आपल्या मनात असतातच. मागच्या पिढीसारखा निवड करायचा प्रसंग आपल्यावर आला तर आपल्या मनातही प्रकाश आणि अंधार आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या मनातला द्वेष कायम ठेवून लोकांना एकमेकांच्या विरोधात उभं करायचं, की त्यांच्यातल्या विवेकाला साद घालून त्यांना एकत्र आणायचं ते आपणच ठरवायचं आहे.’’

‘‘एक लक्षात ठेव, त्या काळात भारतीय उपखंडात जे काही केंद्रस्थानी होतं ते आजही तसंच आहे. आपल्यापुढंही असा प्रसंग उभा राहू शकतो. खरी गोष्ट ही आहे, की प्रेम आणि द्वेष या दोन्हींची बीजं आपल्या मनात असतातच. मागच्या पिढीसारखा निवड करायचा प्रसंग आपल्यावर आला तर आपल्या मनातही प्रकाश आणि अंधार आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या मनातला द्वेष कायम ठेवून लोकांना एकमेकांच्या विरोधात उभं करायचं, की त्यांच्यातल्या विवेकाला साद घालून त्यांना एकत्र आणायचं ते आपणच ठरवायचं आहे.’’

मा  झी मुलगी इंग्लंडमध्ये स्थायिक झाली आहे. तिचा मुलगा राघव सध्या सुट्टीत आमच्याकडं कोल्हापूरला आलाय. दोन गोष्टी सोडल्या तर तो मला खूप आवडतो. मला न आवडणाऱ्या या दोन गोष्टी त्याच्या आजीकडून त्याच्यात आल्या असाव्यात. एक म्हणजे तो सतत प्रश्न विचारतो आणि त्याचं समाधान होईपर्यंत तो पिच्छा सोडत नाही. एकदा त्यानं मला विचारलं की इंग्लिशमध्ये Z नंतर कुठलं अक्षर येतं? हा प्रश्न खरं तर तत्त्वज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातच समाविष्ट करायला हवा. तुम्हाला त्याचं उत्तर माहीत आहे का? मलादेखील माहीत नाही! अन्य कुणालाही ते माहीत असेल असं मला वाटत नाही. मी कॉफी घेत बसलो होतो, एवढ्यात तो आला आणि शेजारी बसला.
‘‘आजोबा, तुम्हाला माहीतंय का, की इंग्लंडमधल्या अनेक लोकांना आता, त्यांचं भारतावर राज्य होतं, त्या वेळची परिस्थिती जाणून घ्यायची आहे. आमच्या टीचरनं मला या सुटीत भारताच्या फाळणीवर असाईनमेंट करायला सांगितली आहे. तुम्ही मला मदत कराल का?’’अशी काही मदत मला करायची नव्हती...पण त्यानं ते त्याच्या आईला सांगितलं तर काय होईल, यातला धोका माझ्या लक्षात आला आणि मी ती स्थिती काळजीपूर्वक हाताळायचं ठरवलं. त्यानं मला त्याची असाईनमेंट-डायरी दाखवली. तीत त्याच्या टीचरनं लिहिलं होतं ः ‘राघव सुट्टीत त्याच्या आजोबांकडं कोल्हापूरला जाणार आहे.‘इंग्लंडनं भारताच्या फाळणीचा विषय अतिशय चुकीच्या पद्धतीनं हाताळला का?’ या विषयावर त्यानं या सुट्टीत निबंध लिहावा.’

ब्रिटिशांना खरंच त्यांच्या पापाची जाणीव झाल्याचं हे लक्षण आहे की हा एक वरवरचा उपचार आहे, असा प्रश्न मी स्वत:लाच केला. विषयात दम होता; पण तो लिहिण्यासाठी बरेच परिश्रमही घ्यावे लागणार होते. निवृत्तीनंतरच्या आयुष्यात सुख मानणारा मी माणूस आहे. त्यामुळं मी त्याच्या प्रश्नाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला.
‘‘तू तुझ्या आजीला का नाही विचारत?’’- मी म्हणालो.‘‘नाही, आजी माझ्या सगळ्या कठीण प्रश्नांची उत्तरं देते. हा सोपा प्रश्न आहे. तुम्हीच सांगा, टाळू नका,’’ तो म्हणाला. 
***

फाळणीचा वणवा पेटला आणि भारतात हिंसाचारानं थैमान घातलं होतं, त्या वेळी मी खूप लहान होतो; पण आजही अनेक गोष्टी मला आठवतायत. माझी आई डॉक्‍टर होती. त्या वेळी अगदी भल्या पहाटे उठून ती निर्वासितांच्या छावणीत जात असे.

सीमेपलीकडून येणाऱ्या जखमी निर्वासितांची सेवा आणि शुश्रूषा करणं हे तिचं काम होतं. निर्वासितांच्या हाल-अपेष्टा, मृत्यूचं तांडव आणि परिस्थितीची भीषणता याविषयीच्या अनेक कहाण्या आम्हाला रोज रात्री जेवणाच्या वेळी ऐकायला मिळत. माझी बहीण एका भाजीवाल्याचा किस्सा सांगायची. त्या भाजीवाल्याच्या बोलण्यात जुन्या राजवटीचा प्रभाव आणि धाक दिसायचा. तो भाजी वजनापेक्षा जास्त द्यायचा आणि वर म्हणायचा की काही हरकत नाही. ‘ताई, पहले कभी किया नही...लेकिन फिकीर ना कर, ये भी सीख जाएंगे’ कदाचित त्या कटू आठवणी पुन्हा आठवायची वेळ आली असावी; पण राघवच्या टीचरनं सांगितलं त्या पद्धतीनं नव्हे, तर त्या वेळच्या भीषण कहाण्या पुन्हा उगाळून नव्हे, तर संकुचित जातीय वास्तवाच्या पलीकडं जाऊन त्यातली मानवी कहाणी जाणून घेण्याच्या उद्देशानं! या असाईनमेंटमध्ये मी राघवला ‘गोष्टीं’चा समावेश करायची कल्पना सुचवली. त्यानं माझ्याकडं संशयाने पाहिलं. तो काही बोलायच्या आत मी त्याला म्हणालो ः ‘‘हे बघ, मी तुला तीन गोष्टी सांगतो. त्या तू नंतर इतिहासातल्या घटनांशी जुळवून बघ.’’ त्याला यातही काहीतरी कट वाटला. तो म्हणाला ः ‘‘तुम्ही नेहमीच गोष्टी सांगत असता; पण हा विषय गंभीर आहे.’’ 
मी म्हणालो ः ‘‘ते खरंय; पण या गोष्टी विषयाशी अगदी सुसंगत आहेत. यातली एक गोष्ट अशा माणसाची आहे, ज्याला असं वाटत होतं की आपण फक्त नकाशावर सीमा आखल्या आहेत; पण प्रत्यक्षात त्यानं या उपखंडाच्या हृदयावरच रेघा मारल्या होत्या. दुसरी गोष्ट आहे ती निराश्रित झालेल्या काही वेड्या माणसांची आणि तिसरी गोष्ट आहे ती लष्करातल्या एका मेजरची, ज्यानं व्यक्तिगत नुकसान सहन करून माणुसकीचा एक आदर्श निर्माण केला. या तिन्ही गोष्टीतून नेमकं काय घडलं ते तुला समजू शकेल. मला सर्वप्रथम तुला अशा माणसाबद्दल सांगायचंय ज्यानं नकाशावरच्या सीमा आखल्या.’’ 

‘‘तुम्हाला रॅडक्‍लिफबद्दल काही सांगायचंय का?’’ राघवनं विचारलं. 

राघवचं मला कौतुक वाटलं.

‘‘होय...पण तुला त्याच्या या कामापेक्षा वेगळं असं काय माहीत आहे?’’ त्याला मी विचारलं. 

‘‘तुम्हीच मला सांगा,’’ तो म्हणाला. आपल्या स्वातंत्र्यलढ्याच्या अखेरच्या टप्प्यात म्हणजे १९४० च्या सुमाराला भारताची हिंदू आणि मुस्लिमबहुल तत्त्वावर फाळणी करण्यास समर्थन देणारा आवाज खूप मोठा झाला होता. युद्धानंतर माउंटबॅटन यांना भारताचे अखेरचे व्हाईसराय म्हणून नेमण्यात आलं. ३० जून १९४८ पूर्वी भारताला स्वातंत्र्य देण्याची व सत्तांतर घडवून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. यासंदर्भात ते विविध नेत्यांशी चर्चा करत होते. आकाशवाणीनं दोन जून १९४७ रोजी जाहीर केलं, की भारताला स्वातंत्र्य मिळेल, त्या वेळी पाकिस्तान नावाचा एक नवा देश जन्माला येईल. मात्र, त्यासाठी कोणतीही वेळेची मर्यादा घालण्यात आलेली नव्हती. काही दिवसांनंतर एका पत्रकार परिषदेत माऊंटबॅटन यांनी भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी  १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस निश्‍चित करण्यात आला असल्याचं जाहीर केलं. दुसऱ्या महायुद्धानंतर जपाननं पत्करलेल्या शरणागतीचा हा दुसरा स्मृतिदिन होता. या घोषणेचं भारतीय नेत्यांना आणि ब्रिटिश सरकारला सटिंच आश्‍चर्य वाटलं. जगातल्या दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशाचं भवितव्य ठरवण्यासाठी अवघ्या सात आठवड्यांची मुदत देण्यात आली होती. ‘ही घोषणा करताना मी सगळ्या गोष्टींचा संपूर्ण विचार केलेला नव्हता, ही तारीख तशी अचानकच ठरली’ असं माउंटबॅटन यांनी नंतर लॅपिरे यांच्याशी बोलताना मान्य केलं.
हा आदेश प्रत्यक्ष नकाशावर आणण्याची कामगिरी सर सिरील रॅडक्‍लिफ यांच्यावर सोपवण्यात आली.

रॅडक्‍लिफ हे व्यवसायानं वकील होते आणि त्यांचा सगळा वेळ कोर्टात आणि क्‍लबमध्ये जात असे. दोन्ही देशांच्या सीमा ठरवण्यासाठी नेमलेल्या आयोगाचं अध्यक्षपद स्वीकारण्याविषयी त्यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांना आश्‍चर्याचा धक्काच बसला. ते भारतात कधीही आलेले नव्हते.

भारतीय संस्कृती, तिथल्या चाली-रीती, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातली गुंतागुंतीची स्थिती आणि भारतीय भूप्रदेश याविषयी त्यांना काहीही माहिती नव्हती. केवळ सरकारनं सांगितलं म्हणून त्यांनी ही कामगिरी स्वीकारली; पण आपल्या या कृतीतून अत्यंत विपरीत आणि सर्वाधिक क्‍लेशदायक घटना घडतील, याची त्यांना कल्पनाही नव्हती. रॅडक्‍लिफ यांनी भारतीय भूमीवर पाऊल ठेवलं तेव्हा सत्तांतरासाठी अवघे पाच आठवडे उरले होते. उपलब्ध माहितीनुसार, एका कालबाह्य नकाशावर त्यांनी काम केलं. ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांनी त्यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की ‘सीमा आखताना जिल्ह्यांचा तपशीलही मला मिळाला नव्हता. भारताच्या सर्वसामान्य नकाशावर मी सीमा आखली.’ पाकिस्तानात एकही मोठं शहर गेलेलं नाही, असं त्यांच्या सहाय्यकानं त्यांच्या लक्षात आणून दिलं तेव्हा लाहोरचा पाकिस्तानमध्ये समावेश करण्यात आला.

आणखी वाईट म्हणजे, या प्रश्नावरून होणारं आंदोलन टाळण्यासाठी माउंटबॅटन यांनी दोन्ही देश प्रत्यक्ष अस्तित्वात येईपर्यंत हा तपशील गुप्त ठेवला. प्रत्यक्ष घोषणा १७ ऑगस्टला झाली तेव्हा इतिहासातलं सगळ्यात मोठं स्थलांतर सुरू झालं. या फाळणीमुळे सुमारे १० लाख लोकांची कत्तल झाली आणि एक कोटी २० लाख लोक निर्वासित झाले. रॅडक्‍लिफ यांनी या सीमा १९४७ मध्ये आखल्या; पण त्यावरून होणारा रक्तपात अद्यापही थांबलेला नाही. ‘लाईफ’ या मासिकाच्या छायाचित्रकार मार्गारेट व्हाईट यांनी या घटनेचं घेतलेलं छायाचित्र अंगावर काटा उभा करतं. ते त्या काळातल्या भीषणतेची कल्पना देणारं आहे.

फाळणीनंतरच्या घडामोडींनी घेतलेलं वळण पाहून रॅडक्‍लिफला यांना एवढं वाईट वाटलं, की त्यांनी त्याविषयीची सगळी कागदपत्रं जाळून टाकली. त्यानंतर ते इंग्लंडला परत गेले आणि ज्याचं भवितव्य त्यांनी ठरवलं होतं त्या भारतात ते पुन्हा कधीच आले नाहीत. भारत-पाकिस्तानच्या सीमा आखण्याच्या कामगिरीबद्दल मिळालेले तीन हजार ब्रिटिश पौंड त्यांनी सरकारला परत देऊन टाकले. ते सगळ्या कामातून निवृत्त झाले आणि आपल्या गावाकडच्या घरी जाऊन राहिले.

मात्र, इथंच त्यांची कहाणी संपत नाही.  फाळणीच्या आकांतानं हादरलेल्या डब्ल्यू. एच. ऑडेन या प्रसिद्ध कवीनं सन १९६६मध्ये ‘पार्टिशन’ या शीर्षकाची एक जळजळीत कविता लिहिली. या कवितेत फाळणीच्या शोकान्तिकेबद्दल ऑडेन यांनी रॅडक्‍लिफ यांनाच पूर्णपणे जबाबदार धरलं. या कवितेमुळं रॅडक्‍लिफ यांच्या मनावर इतका खोल परिणाम झाला, की त्यातून ते सावरलेच नाहीत. ‘नीरजा’ या अनेक पारितोषिकं मिळवणाऱ्या चित्रपटाचे दिग्दर्शक राम माधवानी यांनी या विषयावर ‘धिस ब्लडी लाईन’ या नावाचा नऊ मिनिटांचा मिनिटांचा एक लघुपट तयार केला. या लघुपटाची सुरवात अशी आहे ः रॅडिक्‍लिफ यांचा एक मित्र त्यांना फोन करून त्या दिवशीच्या वृत्तपत्रात त्यांच्याविषयी एक कविता आल्याचं सांगतो. अखेरीस आपल्याविषयी काहीतरी चांगलं लिहिलं असावं, असं वाटून दृष्टी अधू झालेले रॅडिक्‍लिफ आपल्या पत्नीला ती कविता मोठ्यानं वाचायला सांगतात. मात्र, कविता वाचताना ती त्यांच्याविषयीच्या वाईट ओळी टाळून वाचत असल्याचं त्यांच्या लक्षात येतं. कविता ऐकत असताना रॅडक्‍लिफ यांच्या भावना क्षणोक्षणी बदलत असतात. दु:ख, नकार, क्रोध, शोक आणि अखेरीस आपल्या अपराधाची कबुली अशा भावनांचे तरंग त्यांच्या चेहऱ्यावर उमटतात. यांनी लघुपटाच्या अखेरच्या दृश्‍यात रॅडक्‍लिफ हे चर्चमध्ये जात असताना दाखवले आहेत. आपल्या कृत्याच्या परिणामांची जबाबदारी स्वीकारून ते क्षमायाचनेसाठी जात असल्याचं प्रतीकात्मकतेनं दाखवण्यात आलं आहे.‘‘शक्‍य आहे’’ राघव म्हणाला ः ‘‘पण ही गोष्ट विसरणं आणि त्यासाठी क्षमा करणं इतकं सोपं आहे का?’’ ‘‘विसरणं नक्कीच सोपं नाही, पण क्षमा करण्याबाबत आपण प्रयत्न करू शकतो,’’ मी म्हणालो. त्यावर ‘‘दोन्ही देशांतल्या लोकांसाठी हा एक प्रकारचा धडा आहे का?’’ असा प्रश्‍न राघवनं उपस्थित केला...
***

आणि राघवनं पुढं विचारलं ः ‘‘...आणि त्या वेड्या लोकांची गोष्ट काय आहे?’’ 
मी म्हणालो ः ‘‘लक्षात घे, ही फक्त एक गोष्ट आहे. लेखक हे इतिहासकारापेक्षा वेगळ्या नजरेनं एखाद्या घटनेकडे पाहत असतो. इतिहास हा वस्तुस्थितीवर आधारित असतो. वस्तुस्थिती जे सांगते तेच इतिहास बोलत असतो; पण वस्तुस्थिती जे लपवते ते लेखक शोधून काढत असतो. त्या वेळच्या बहुतांश लेखकांनी फाळणी ‘कां’ झाली, या प्रश्नावर लक्ष केंद्रित केलं होतं. सामाजिक, सांस्कृतिक, पारंपरिक आणि ऐतिहासिक समानतेनं विणलेली वीण कशी फाटली? आपण गुन्हेगार आणि मारेकरी का बनलो? आपण भूतकाळ का विसरलो? आपण बुद्धीपेक्षा भावनेला का शरण गेलो? या घटना जवळून बघणाऱ्या काही कादंबरीकारांनी फाळणीच्या वेळी दोन्ही समाजांकडून झालेल्या नरसंहारावर अधिक भर दिला आहे. बाकीच्यांनी फाळणीमुळं बसलेल्या मानसिक आणि भावनिक धक्‍क्‍यावर लक्ष केंद्रित केलं होतं. उर्दू साहित्यातले एक नामवंत लेखक सआदत हसन मंटो यांची १९५३ मध्ये लिहिण्यात आलेली ‘तोबा टेकसिंग’ ही कथा या प्रकारात मोडते. ऐतिहासिक निवेदनातून या गोष्टीची सुरवात होते.

फाळणीनंतर दोन-तीन वर्षांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी एकमेकांकडच्या मनोरुग्णांची अदलाबदल करायचं ठरवलं. यापूर्वी दोन्ही देशांनी एकमेकांकडच्या गुन्हेगारांचीही अदलाबदल केली होती. भारतात असलेले मुस्लिम मनोरुग्ण पाकिस्तानात पाठवले जाणार होते आणि त्याबदल्यात पाकिस्तानात असलेले हिंदू आणि शीख मनोरुग्ण भारतात आणले जाणार होते. हा निर्णय कितपत शहाणपणाचा होता, हा वादाचा विषय असला तरी तो सर्वोच्च पातळीवरून घेतला गेला होता. या मनोरुग्णांमध्ये सर्वधर्मीयांचा समावेश होता. एक मुस्लिम मनोरुग्ण उर्दू वृत्तपत्र अगदी निष्ठेनं वाचायचा. आपल्याला भारतातली भाषा येत नसताना आपल्याला भारतात का पाठवलं जात आहे,असा प्रश्न एका शीख मनोरुग्णाला पडला होता. एका मनोरुग्णानं तर ‘भारत आणि पाकिस्तान’ या विषयावर दोन तासांचं भाषण दिलं. मात्र नंतर ‘मला दोन्हींपैकी कुठंच जायचं नाही’ असं जाहीर करून तो एका झाडावर जाऊन बसला आणि ‘मी झाडावरच राहणार’ असं म्हणाला. निर्णय घेणारे आणि ज्यांच्यावर त्याचा परिणाम होतो ते यांच्यातली दरी किती रुंद असू शकते, याचं हे मार्मिक उदाहरण मंटोनं या कथेतून दिलं आहे. ‘नकाशावर सीमा आखून देशाची विभागणी करणं राजकीय नेत्यांना सोपं असलं, तरी सर्वसामान्य माणसावर त्याचा काय परिणाम होईल, याची कुणालाच चिंता नव्हती,’ असं मंटोनं या कथेतून स्पष्ट केलं आहे.

एखाद्याला अचानक त्याच्या मुळापासून उखडून काढणं आणि त्याच्या परिचयाच्या वातावरणातून त्याला बाहेर फेकणं यातून संतापाचा उद्रेक होणं स्वाभाविक आहे. कारण, घर ही काही केवळ चार भिंती असलेली जागा असत नाही किंवा एखादी गल्ली असत नाही. ती त्याही पलीकडं काहीतरी असते. त्यात तिथं राहणाऱ्याला एकप्रकारची सुरक्षितता वाटत असते. तिथल्या परंपरांची आणि संस्कृतीची मुळं त्यांच्या मनात खोलवर रुजलेली असतात. त्यामुळंच त्या मनोरुग्णाच्या मनात नैराश्‍य दाटून आलं
आणि भारत आणि पाकिस्तान या दोहोंनाही नाकारून तो झाडावर जाऊन बसला. मनोरुग्णांसाठीचं रुग्णालय उभारण्यातून तत्त्वज्ञानाचा एक प्रश्न पुढं येतो ः ‘अधिक रुग्ण कोण? आत असलेला मनोरुग्ण की बाहेर असलेला शहाणा माणूस?’ बाहेरच्या तथाकथित शहाण्या माणसापेक्षा आतला मनोरुग्ण अधिक शहाणा आहे, असा निष्कर्ष काढत मन्टोनं म्हटलंय, ‘रुग्णालयातल्या सगळ्यांचा वेडेपणा एकत्र केला तरी त्यापेक्षा फाळणीचा वेडेपणा कितीतरी पटींनी जास्त होता.’ कथेच्या शेवटी तिचा नायक दोन्ही देशांच्या सीमेवरच्या काटेरी तारांच्या कुंपणांमध्ये असललेल्या जमिनीवर उभा असतो. त्याच्या समोर तारेच्या कुंपणाच्या पलीकडं भारतातले मनोरुग्ण उभे असतात आणि पाठीमागं अशाच कुंपणाच्या पलीकडं पाकिस्तानातले मनोरुग्ण उभे असतात. कुठलंही नाव नसलेल्या या मधल्या जागेवर ‘तोबा टेकसिंग’ याचं गाव असतं. मंटोच्या मते याबाबत हिंदू, मुस्लिम किंवा शीख यापैकी कुणालाच दोष देता येणार नाही, तर सर्व सहिष्णुता गमावून रानटी बनलेला माणूसच त्यासाठी खरा दोषी आहे. ’’
‘‘तुमच्याकडं मंटोची पुस्तकं आहेत का?’’ राघवनं विचारलं. ‘‘माझ्याकडं आहेत आणि ती तू वाचलीच पाहिजेस,’’ मी म्हणालो. तो काही वेळ शांत होता आणि मग अचानक म्हणाला ः ‘‘फाळणी ही भौगोलिक

अदलाबदलीपेक्षा भयानक मार्ग वापरून लोकांचं जीवन बदलून टाकणारी होती.’’ राघवचं म्हणणं अगदी रास्त होतं. राजकीय निर्णयानंतरचा वेडेपणा अभूतपूर्वच म्हणायला हवा. सूडबुद्धीनं जणू प्रत्येकाच्या डोक्‍याचा ताबा घेतला होता. इतके दिवस गुण्यागोविंदानं एकत्र राहणारे आता एकमेकांचे शत्रू बनले होते. कालपर्यंत एकमेकांना ताटातली अर्धी भाकरी देणारे आता एकमेकांच्या नरडीचा घोट घ्यायला सिद्ध झाले होते. कारण फक्त एकच, ते वेगवेगळ्या धर्माचे होते. यात सर्वप्रथम सारासार विवेकबुद्धीचा बळी गेला आणि त्यातून भय आणि सूड यांचा जन्म झाला. यातली आश्‍चर्याची आणि दु:खाची गोष्ट म्हणजे, याच लोकांनी काही दिवसांपूर्वी जगातलं सगळ्यात सामर्थ्यवान साम्राज्य उलथवून टाकत स्वातंत्र्य मिळवलं होतं आणि तेही अहिंसेच्या मार्गानं.
***
थोड्या वेळानं राघवनं विचारलं ः ‘‘तो लष्करी अधिकारी आपल्याच सैन्यदलाचा अधिकारी होता का?’’

‘‘ ‘हो’ आणि ‘नाही’ ’’ -मी म्हणालो ः ‘‘तो अधिकारी तुझ्या पणजोबांच्या रेजिमेंटमध्ये होता आणि फाळणीनंतर पाकिस्तानच्या सैन्यदलात गेला होता. कारण, तो मुस्लिम होता. त्याचं नाव काय होतं, हे महत्त्वाचं नाहीय. पाकिस्तानात गेल्यानंतर तो लाहोरला आपल्या घरी गेला. त्याचं घर तर ठीकठाक होतं; पण घरातल्या सगळ्या माणसांना ठार मारण्यात आलं होतं. हा त्याच्यासाठी फार मोठा धक्का होता. काही क्षण तो जणू थिजून गेला. रागानं बेभान झालेल्या अवस्थेत त्यानं आपलं पिस्तूल काढलं आणि तो हिंदूंचा सूड घेण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या जमावात सामील झाला. तो जमाव पहिल्या घरात घुसला, ते घर रिकामं होतं...पण त्याच्या लष्करी नजरेला काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं. त्यानं त्या जमावाला घराच्या तळघरात नेलं. तिथं काही हिंदू महिला आणि लहान मुलं लपलेली होती. आता त्याला सूड घेण्याची संधी मिळाली. त्याची मुलं हसीना आणि अकबर यांच्या हत्येचा सूड! त्याच्या खांद्यावर जी यापुढं कधीही डोकं ठेवू शकणार नव्हती, त्या बानोच्या हत्येचा सूड! त्याच्या कुटुंबीयांच्या झालेल्या हत्येची माहिती असलेला तो जमाव त्याला सूड घेण्यासाठी चिथावत होता. तो सूड घेणारही होता; पण अचानक त्याच्या मनात काही आलं. तो त्याच्या लष्करातल्या प्रशिक्षणाचा भाग होता किंवा लष्कराची परंपरा होती किंवा त्याच्यावरच्या संस्कारांचा भाग होता, ते माहीत नाही; पण तो अचानक शांत झाला. तो त्या घाबरलेल्या महिलांपुढं उभा राहिला आणि त्यांना धीर देत म्हणाला ः ‘‘घाबरू नका. आता रात्र संपली आहे. मी तुम्हाला घरी नेतो.’’ 

‘‘- मग काय झालं?’’ राघवनं अधीरतेनं विचारलं. तेवढ्यात त्याचे काही मित्र त्याला शोधत तिथं आले आणि तो संतप्त जमाव पांगला. ‘‘बस एवढंच?’’ राघवनं विचारलं.‘‘तेवढं पुरेसं होतं. आवश्‍यकतेपेक्षा जास्त होतं...’’ काही क्षण शांतता पसरली.
***

मग राघव म्हणाला ः ‘‘ही असाईनमेंट पूर्ण होताच मी ती तुम्हाला पाठवीन.’’ 
‘‘हो, नक्की पाठव...पण एक लक्षात ठेव, त्या काळात भारतीय उपखंडात जे काही केंद्रस्थानी होतं ते आजही तसंच आहे. आपल्यापुढंही असा प्रसंग उभा राहू शकतो. खरी गोष्ट ही आहे, की प्रेम आणि द्वेष या दोन्हींची बीजं आपल्या मनात असतातच. मागच्या पिढीसारखा निवड करायचा प्रसंग आपल्यावर आला तर आपल्या मनातही प्रकाश आणि अंधार आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या मनातला द्वेष कायम ठेवून लोकांना एकमेकांच्या विरोधात उभं करायचं, की त्यांच्यातल्या विवेकाला साद घालून त्यांना एकत्र आणायचं ते आपणच ठरवायचं आहे. असहाय महिलांवर पिस्तूल रोखून ट्रिगर दाबायचा की माणुसकीवर विश्वास ठेवून त्यांना अंधारातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायचे...’’ - मी म्हणालो.
त्यावर राघव काहीच बोलला नाही. मात्र, माझा हात हातात घेऊन तो कितीतरी वेळ तसाच बसून होता...

Web Title: Marathi News Sakal saptranga esakal Yashwant Thorat