डाउनलोड अॅप (सम्राट फडणीस)

App
App

इच्छा असो किंवा नसो, मुलांच्या हाती मोबाईल न देणं टाळता तर येत नाही बहुतेक वेळा. ‘मुलं काहीतरी सर्फ करत बसतील मोबाईलवर आणि वेळ वाया जाईल...सवय लागेल...काही क्रिएटिव्ह करणार नाहीत...’ असलं काहीबाही घराघरात कधी ना कधी बोललं जातं. असं बोलण्यापेक्षा मोबाईलच अॅप्सच्या मदतीनं क्रिएटिव्ह बनवला, तर पालकांनाही नवीन काही शिकता येईल आणि मुलांचा वेळ ‘वाया जाणार’ नाही; तर सत्कारणी लागेल...! 

ल्युमोसिटी 
मुलांचंच नव्हे; तर सगळ्या घरा-दाराचं डोकं खाईल, असं हे अॅप. दृष्टी, स्मृती, विचारांची गती, अंक-भाषा-चित्रांचं आकलन अशा वेगवेगळ्या क्रियांना आपला प्रतिसाद किती वेगवान आहे, हे या अॅपवरच्या गमतीशीर गेम्समधून तपासता येतं. उदाहरणार्थ : सलग काही चित्रं दाखवली जातात आणि त्यापैकी समान चित्रं कमीत कमी वेळात ओळखायची असतात. एकेक लेव्हल पूर्ण करत जाल, तसतसे अवघड गेम्स येतात आणि मग मेंदूच्या क्षमतेचा कस लागू लागतो. काही संशोधक-शास्त्रज्ञांनी मिळून या अॅपची निर्मिती केलीय. अॅपचा मुख्य उद्देश मूलभूत मानवी कौशल्यांचा विकास करणं हा आहे. जगभरातल्या ४० हून अधिक विद्यापीठांतल्या संशोधकांची मदत ‘ल्युमोसिटी’साठी घेतली जाते. या अॅपची साईज मोठी, म्हणजे ६४ एमबी आहे. मात्र, हे अॅप मुलांच्या (आणि पालकांच्याही) डोक्‍याला भरपूर खाद्य पुरवेल हे निश्‍चित. 
  गूगल प्ले स्टोअरवर सर्च कराः 
     Lumosity- Brain Training
  ॲप रेटिंगः ४.२ 

हॉपस्कॉच
खरंतर हे अॅप पालकांसाठी आहे. त्यातही, ज्या पालकांना आपल्या मुलांसाठी छान छान कपडे सतत खरेदी करायला आवडतं, त्यांच्यासाठी आहे. शॉपिंगची ढीगभर अॅप्स असताना ‘हॉपस्कॉच’ कशासाठी?...तर जगभरातल्या हजारभर ब्रॅंड्‌समधून मुलांसाठी हवं ते निवडून आधीच तिथं ठेवलेलं आहे म्हणून. रोज सकाळी साडेनऊ वाजता या अॅपवर नव्या बुटिकची माहिती येते. लहान मुलांसाठी कपडे निवडताना, त्यांच्यासाठी खेळणी घेताना या अॅपचा चांगला उपयोग होऊ शकतो. वैविध्यपूर्ण ब्रॅंड्‌स तर या अॅपवर आहेतच; शिवाय फक्त लहान मुलांसाठी म्हणून ऑनलाईन शॉपिंग करताना जी शोधाशोध करावी लागते, ती या अॅपनं आधीच करून ठेवली आहे. त्यामुळं कमी वेळात चांगलं शॉपिंग करता येतं. मुलं सोबत असतील, तर त्यांच्या चॉईसनं त्यांना हव्या त्या गोष्टी निवडता येतात. 
  गूगल प्ले स्टोअरवर सर्च कराः Hopscotch 
  ॲप रेटिंगः ४.२ 

माय क्‍लास शेड्यूल
सकाळी घराबाहेर पडायची घाई आणि त्यात ऐनवेळी मुलानं शाळेची असाईनमेंट समोर आणली तर...? जो काही त्रागा होईल, तो वाचवण्यासाठी या अॅपचा पुरेपूर उपयोग करता येतो. खरंतर हे अॅप पालकांनी नव्हे; तर मुलांनी वापरावं म्हणून बनवण्यात आलेलं आहे. सोमवारी कोणते क्‍लास आहेत, होमवर्क काय आहे, परीक्षांच्या तारखा कधी अशी सगळी माहिती अॅपमध्ये नीट भरून ठेवता येते आणि मग आपल्याला हवे तसे रिमाइंडर्स सेट करता येतात. एखादं होमवर्क नोंदवून ठेवलाय आणि केलं नाही, तर त्याचेही रिमाइंडर्स येतात. परिणामी, सकाळी आई-बाबांच्या घाईच्या वेळी होमवर्कसाठी मदत मागण्याची वेळ मुलांवर येत नाही. या अॅपचे दोन तोटे मात्र आहेत. एकतर हे अॅप भारतीय शाळा डोळ्यांसमोर ठेवून बनवण्यात आलेलं नाही आणि सगळी फीचर्स वापरण्यासाठी ते विकत घ्यावं लागतं. मात्र, ‘फ्री व्हर्जन’ वापरून पाहिलं, तर त्याची उपयुक्तता लक्षात येईल. 
  गूगल प्ले स्टोअरवर सर्च कराः
    My Class Schedule 
  ॲप रेटिंगः ४.१

प्लोन्स
मुलांना आणि पालकांनाही शाळेच्या अभ्यासाचा कंटाळा आलाय आणि अभ्यासक्रमाबाहेरचं क्रिएटिव्ह काही हवंय? प्लोन्स अॅप त्यासाठी उत्तम आहे. पालक, शिक्षक, शाळांनी मुलांच्या क्रिएटिव्ह कामाचं जणू स्टोअरच इथं उघडलं आहे. आपल्या मुलांनी बनवलेल्या वस्तू, चित्र, लिखाण आदी क्रिएटिव्हिटी या अॅपवर अपलोड करून ठेवता येतात. आपल्याला आवडत्या आर्टिस्ट मुलाला फॉलो करता येऊ शकत. क्रिएटिव्हिटीला पॉईंट्‌स मिळतात. पॉईंट्‌स वाढत जातील, तसतसं त्या मुलाची क्रिएटिव्हिटी जास्तीत जास्त यूजर्सपर्यंत पोचू लागते. ‘प्रत्येक मूल सर्जनशील विचार करतं...रोज काही नवी निर्मिती करतं...ती निर्मिती जपू या...शेअर करू या...’ असा सकारात्मक विचार घेऊन हे अॅप बनवण्यात आलेलं आहे. नावडत्या विषयांपासून काही वेळ सुटका हवी असेल, तर पालकांनी आणि मुलांनीही या अॅपला भेट दिली पाहिजे. 
  गूगल प्ले स्टोअरवर सर्च कराः Plowns 
  ॲप रेटिंगः ४.७ 

१२३ नंबर्स
घरी तीन-चार वर्षं वयाचं मूल आहे आणि गंमत म्हणून हे मूल मोबाईल हाताळतंय...? मुलाला मोबाईलची सवय लागली, तर वेळ वाया जाईल असं वाटतंय...? मोबाईल हाती असतानाच मुलाला प्री-स्कूलचं काही शिक्षण देता आलं, तर वेळ वाया जाणार नाही.  ‘१२३ नंबर्सः काउंट अँड ट्रेसिंग’ हे अॅप त्यासाठीच आहे. अॅपमध्ये भरपूर भन्नाट गेम्स आहेत, ज्यांच्याद्वारे मुलं स्वतःची स्वतः काही नवं शिकू शकतात. अंक आणि रंग या दोन महत्त्वाच्या कौशल्यांची तोंडओळख गमतीशीर गेम्समधून मुलांना करून देता येते. अॅप पूर्णतः शैक्षणिक आहे आणि फ्री आहे. 
  गूगल प्ले स्टोअरवर सर्च कराः 
    Numbers-Count & Tracing 
  ॲप रेटिंगः ४.६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com