बेगमी उद्याच्या प्रवासाची! (रश्‍मी ऊर्ध्वरेषे)

Future of transport
Future of transport

वाहतूक या क्षेत्रामध्ये आगामी काळात झपाट्यानं बदल होणार आहेत. इंटेलिजंट ट्रान्स्पोर्ट सिस्टिमपासून ‘हायपरलूप’सारख्या पर्यायापर्यंत अनेक गोष्टी होऊ घातल्या आहेत. हे सगळे बदल कशा प्रकारे होतील, त्यामुळं नक्की काय होईल, इतर परिणाम काय होतील आदी गोष्टींचा ऊहापोह.

देशाच्या प्रगतीचं एक महत्त्वाचं एकक म्हणजे औद्योगिकता. उत्पादन उद्योगात सर्वांत महत्त्वाचा म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के हिस्सा वाहन उद्योगाचा आहे. साहजिकच वाहन उद्योग सतत या ना त्या कारणानं प्रकाशझोतात असतो. परिवहन आणि त्याचा मानवी- विशेषतः नागरी जीवनावर होणारा परिणाम हा तर अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. या परिणामाची चांगली बाजू जमेला आहे, तशीच वाईट बाजू कायम चर्चेत असते! वाढतं प्रदूषण, बेसुमार अन्‌ अनियंत्रित वाढणारी वाहनसंख्या, अपुरे रस्ते आणि त्यामुळं सतत होणारी वाहतूक कोंडी ही आजची वस्तुस्थिती आहे.

पुढच्या दशकाकडं जाताना आपल्या मनात साहजिकच विचार येतो ः ‘हे प्रश्‍न असेच वाढत जाणार का? यालाच औद्योगिक आणि तंत्रज्ञानाची प्रगती म्हणावं का?’ या परिस्थितीचं समाधानकारक निराकारण केल्याशिवाय सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनात सुसह्यता येणं केवळ अशक्‍य. तेव्हा सर्व पातळ्यांवर निकरानं प्रयत्न केल्याशिवाय काही खरं नाही असंच वाटतं!

मात्र, दुसऱ्या बाजूला आपल्या हाताशी असलेली जमेची बाजू म्हणजे तंत्रज्ञान, मनुष्यबळ आणि आधुनिकीकरणाचं स्वागत करण्याची मानसिकता. ह्या सर्वांची सांगड घातली तर यातून मार्ग काढणं शक्‍य आहे. पुढील दहा-पंधरा वर्षांत काय उत्क्रांती घडेल हे बघणं मोठं रंजक आहे.

सतत बदलत्या गरजा
एकेकाळी ‘सायकलींचं शहर’ समजलं जाणारं पुणं, आज तिथं मनात आणलं तरी सायकलनं निर्धोकपणे जाता येत नाही. अंतरं आणि हाताशी असलेला वेळ याचं व्यस्त गणित जमायचं कसं? म्हणून दुचाकी वाहनांची गरज निर्माण झाली. रस्ते आणि इतर सुविधा त्या प्रमाणात कमी पडल्या. ऑटोरिक्षा, बसेस, गाड्या, सर्व प्रकारच्या वाहनांची त्यात रोज भर पडतेच आहे. आता लवकरच मेट्रो! इतर शहरांची स्थिती थोड्याफार प्रमाणात अशीच आहे. एक उदाहरण घेऊ या ः मानवी शरीरातली, अनेक गुंतागुंतीच्या घटकांनी तयार झालेली रक्ताभिसरण संस्था. प्रत्येक अवयवातल्या प्रत्येक पेशीपर्यंत प्राणवायू, पोषक घटक इत्यादी पोहचवणं आणि तिथं निर्माण झालेले टाकाऊ घटक उत्सर्जन संस्थेकडं नेणं हे रक्ताभिसरणाचं मुख्य कार्य आहे. अव्याहत चाललेल्या या यंत्रणेत वयापरत्वे अनेक बाधा येतात. त्याचे शरीरावर दूरगामी परिणाम होतातच. त्या बाधा मुळात येऊच नयेत किंवा आल्या असता उपाय योजणं या दोनही पातळ्यांवर वैद्यकीय शास्त्रात मार्ग आहेतच. नवीन निर्माण होणारी शहरं आणि जुन्यांचं नूतनीकरण करून ‘स्मार्ट सिटी’त रूपांतर ही संकल्पना काहीशी अशीच असेल.

इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टिम (आयटीएस)
टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातल्या क्रांतीमुळं माणसं कधी नव्हे इतकी जवळ आली आहेत. याच तंत्रज्ञानाला हाती धरून दळणवळण क्षेत्रात मोठा बदल आणता येईल. पुढल्या दशकात त्याचा प्रभाव अधिक प्रकर्षानं जाणवेल. नवीन रस्त्यांची बांधणी आणि इतर पायाभूत सुविधांच्या निर्माणात इंटेलिजन्सचा वाढता वापर हे वाहतूक नियमनासाठी फार उपयुक्तच नव्हे, तर आवश्‍यकच ठरेल. 

या सिस्टिममध्ये वाहनांचा एकमेकांशी संपर्क; तसंच वाहनांचा रस्त्यांशी आणि अनुषंगानं पायाभूत सुविधांशी संपर्क ही निर्माण केली जाते. माहितीच्या आदानप्रदानातून या घटकांना सतत एकमेकांशी जोडलेलं ठेवून प्रवाशांना कमीत कमी वेळेत, जास्तीत जास्त सुकर प्रवास देणं शक्‍य होते. रस्त्यावरची सुरक्षितता आणि सुसूत्रता मोठ्या प्रमाणात वाढते.

याच यंत्रणेद्वारे आणीबाणी किंवा धोक्‍याची/ अपघाताची माहिती, त्यावर तात्काळ मदत पुरवणं, स्वयंचलित स्पीड कंट्रोल ठेवणं, नियम उल्लंघन प्रसंगी चालकाला क्षणिक सूचना देणं इत्यादी आणि इतर अनेक गोष्टी सहज साध्य होऊ शकतात. पार्किंग फी आकारणं, दंड आकारणं, टोल भरणं यांसारख्या वेळखाऊ आणि त्रासदायक घटना स्वयंचलित करता येतात. या व्यवहारांमध्ये गुंतलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालायला यांत्रिकीकरणाचा फायदा मिळू शकतो ही आणखी वेगळी जमेची बाजू!

सामायिक गतिशीलता (शेअर्ड मोबिलिटी)
वैयक्तिक वाहन वापराचा कळस गाठल्यावर आपण शेअर मोबिलिटीकडं एक चांगला पर्याय म्हणून बघू लागलो आहोत. ‘ओला’ आणि ‘उबेर’ ही ठळक उदाहरणं. बऱ्याच कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना वाहनं शेअर करून ड्युटीवर येण्यासाठी उद्युक्त करतात. उत्तम प्रकारची बसवाहतूक निर्माण करणं आणि ती कार्यक्षमतेनं चालवणं ही आजची मोठीच गरज आहे. पुढच्या दशकात यावर फार मोठ्या प्रमाणात सुधारणा होणं अपेक्षित आहे.

सुरक्षित वाहनं 
रस्त्यांवरील सुरक्षितता हा सगळ्या जगातच चिंतेचा मोठा विषय आहे. इसवीसन २०१० ते २०२० हे दशक संयुक्त राष्ट्रांचं ‘वाहतूक सुरक्षा दशक’ (यूएन- डेकेड ऑफ ॲक्‍शन फॉर रोड सेफ्टी) आहे. संयुक्त राष्ट्रांच्या प्रत्येक सदस्य देशानं या विषयावर आपापल्या उपयाययोजना केल्या आहेत आणि त्यात भारताचा पण समावेश आहे. हे दशक संपत आल्यावरसुद्धा आपली अपघातांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. सुरक्षित रस्तेबांधणी करणं आणि त्याचबरोबर सुरक्षित वाहनांची निर्मिती करणं या दोन महत्त्वाच्या बाबींकडं लक्ष केंद्रित करावं लागेल. वाहनांमध्ये सुरक्षेसाठी अनेक यंत्रणा सुसज्ज असतात. अगदी ‘हेडलॅंप’, ‘हॉर्न’, ‘सेफ्टी ग्लास’ या मूलभूत भागांपासून ‘सीटबेल्ट’, ‘एअरबॅग्ज’, ‘अँटीलॉक ब्रेक सिस्टिमपर्यंत (एबीएस) सर्व यंत्रणा कार्यशील असूनदेखील अपघात होतात आणि मनुष्यहानी होते, हे कसं?

बहुतांशी अपघातांचं विश्‍लेषण करताना ‘मानवी चुकीमुळं’ याच कारणाचं लेबल लावलं जातं. हे संपूर्ण सत्य आहे असं मानलं, तरी या चुका न होण्यासाठी वाहनांच्या डिझाइनमध्ये योग्य ते बदल करता येतील का? रस्त्यावरचा कोणताही धोका ओळखून चालकाला क्षणात माहिती देणं, त्याद्वारे चालकाची निर्णयक्षमता वाढवणं आणि उपाययोजना अंमलात आणणं, हे तंत्रज्ञान आता विकसित झालं आहे. अतिश्रमामुळं किंवा कंटाळ्यामुळं डोळ्यांवर येणारी झापड, वाहनात होणारे क्षणिक बिघाड यांसारख्या घटनांची तात्काळ नोंद घेऊन चालकाला सावध करणं आणि प्रसंगी आणीबाणीची उपाययोजना करणं या कार्यप्रणालीपण तयार आहेत.

याचीच पुढची पायरी म्हणजे स्वयंचलित वाहनं! प्रायोगिक तत्त्वावर अशी वाहननिर्मिती सुरू झाली आहे. भारतासारख्या देशात अशी संपूर्ण स्वयंचलित वाहनं कितपत योग्य आणि मुळात किती सुरक्षित ठरतील ही शंका आहे. स्वयंचलित नाही; पण ‘इंटेलिजंट’ वाहनं नक्कीच सुरक्षिततेच्या दृष्टीनं मोठं पाऊल असेल. वाहनांच्या सुरक्षित प्रवासाकडं आणि चालकाच्या वाहननियंत्रणाकडं सतत लक्ष ठेवून, रस्त्यावरच्या इतर घटकांमधले बदल जोखणं आणि प्रसंगी ब्रेक, स्टिअरिंग, वेग यांचं नियंत्रण आपोआप वाहनातल्या कॉम्प्युटरद्वारे होऊन सुरक्षिततेत मोठीच भर पडेल.

स्वच्छ, पर्यावरणपूरक वाहनं
पर्यावरणाला कमीत कमी हानी करणारी अशीच वाहनं निर्माण करण्याचं धोरण सध्या राबवलं जात आहे. त्याचा परिणाम दिसायला काही काळ जावा लागेल. ऊर्जेचा समतोल राखणं ही पण महत्त्वाची जबाबदारी आहे. वाहन उद्योगात जैविक इंधनाचा पूरक वापर उपयोगाचा ठरेल. निरुपयोगी शेतकीजनक कचऱ्याचा वापर करून अशी इंधनं निर्माण केली जातात. तसंच विजेवर चालणाऱ्या वाहनांचं उत्पादन आणि पर्यायी परिवहन हा तर एक वेगळ्या लेखनाचाच विषय आहे.

इलेक्‍ट्रिक वाहनं आणून प्रदूषणाचा उगम वाहनांपासून काढून वीजनिर्मिती केंद्राकडं लादला जातो, अशी टीका नेहमी ऐकू येते. आज जी वीजनिर्मिती होते ती बहुतांश कोळशापासून असल्यानं हा मुद्दा आजमितीला काही प्रमाणात बरोबर आहे; पण नजीकच्या भविष्यात सौरऊर्जा, पवनऊर्जा इत्यादी योग्य मोठ्या प्रमाणात राबवल्यास पर्यावरणाचा समतोल नक्कीच राखता येईल. इलेक्‍ट्रिक वाहनांचा पर्यावरणविषयक दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यांचा अगदी कमी आवाज! ध्वनिप्रदूषणानं अक्षरशः बेजार झालेल्या नागरी जीवनात ही वाहनं मोठाच स्वागतार्ह बदल आणतील. इलेक्‍ट्रिक वाहनांच्या आगमनानंतर डिझेल, पेट्रोल वाहनं बंद होणार का, असाही प्रश्‍न सध्या चर्चेत आहेत. यावर असंच म्हणता येईल, की कोणतीही टोकाची भूमिका किंवा आततायी विचार करणं योग्य ठरणार नाही. इलेक्‍ट्रिक वाहनांची जनसामान्यात स्वागतार्हता वाढणं, या वाहनांसाठी लागणारी चार्जिंग व्यवस्था निर्माण करणं, किंमतीतली तफावत कमी करणं आणि इतर अनेक पायऱ्या गाठाव्या लागतील. काळाची गरज ओळखून हे अडथळे दूर केले जातील, तोपर्यंत डिझेल आणि पेट्रोल वाहनांना महत्त्व आहेच.

हायड्रोजन किंवा फ्युएल सेलवर चालणारी वाहनं हे दोन खूप आकर्षक पर्याय झपाट्यानं विकसित होत आहेत. यातल्या पहिल्या पर्यायात हायड्रोजन हा अत्यंत ज्वलनशील गॅस वाहनात भरून त्यावर इंजिन चालवलं जातं, तर दुसऱ्या पर्यायात फ्युएल सेल ही एक प्रकारची केमिकल फॅक्‍टरीच वाहनात वापरतात- ज्यामध्ये हायड्रोजन आणि प्राणवायूच्या प्रक्रियेनं वीजनिर्मिती होते. ही ऊर्जा साठवून विजेच्या वाहनाप्रमाणं बाकी यंत्रणा काम करते. आता यात वापरलेला हायड्रोजनदेखील कोणत्या प्रक्रियेतून निर्माण केला, याला महत्त्व आहेच. नाही तर कार्बनयुक्त इंधनातून त्याची निर्मिती असेल, तर पर्यावरणाच्या दृष्टीनं सगळंच मुसळ केरात!

जुन्या वाहनांची विल्हेवाट
हा सारा खटाटोप झाला नवीन तयार होणाऱ्या वाहनांसाठी; पण रस्त्यावर धावणाऱ्या जुन्या वाहनांचं काय, ही सगळी अडगळ समजायची का, अन्‌ तसं असेल तर ती फेकायची कुठं, हा आणखी वेगळा असमतोल निर्माण होतो. अनेक प्रगत देशांना भेडसावणारी ही मोठी समस्या आपण वेळीच लक्षात घ्यावी. नवीन वस्तू घे, वापर आणि फेक, ही मानसिकता आपल्याला परवडणार नाही. म्हणून जुनी, रस्त्यावर चालायला असुरक्षित आणि प्रदूषक वाहनं खड्यासारखी वेचून काढावी लागतील. जास्तीत जास्त विभागांचं विघटन, शक्‍य तिथं पुर्नवापर आणि पर्यावरणपूरक पद्धतीनं विल्हेवाट ही मोठीच साखळी त्यासाठी निर्माण करण्याचं काम हाती घेतलं पाहिजे. समजा भविष्यकाळात सगळी वाहनं विजेवर चालणारी झाली, तर त्यात वापरून झालेल्या बॅटऱ्यांचं विघटन याच प्रक्रियेतून करावं लागेल.

दळणवळणाच्या गरजेला आळा
अंतरं ही खऱ्या अर्थानं आणि लाक्षणिक अर्थानं कमी होत आहेत. जे काम पूर्वी पत्रानं होत होतं, ते आता ई-मेलनं सहज होतं. जे काम प्रत्यक्ष हजर राहूनच आज होतंय, ते प्रवास न करता तंत्रज्ञानानं करता येईल का? काही प्रमाणात नक्कीच!

दुकानात न जाताच आजची पिढी यथेच्छ खरेदी करतेच की! तेव्हा नजीकच्या काळात प्रवासी वाहतूक कमी होऊन मालवाहतूक; तसंच सर्व्हिसेसमध्ये मोठी वाढ होणार यात संशय नाही. याचा उपयोग रस्त्यावरच्या वाहतूकनियमनासाठी वेगळी उपाययोजना निर्माण करण्यासाठी होऊ शकेल.

विज्ञानकथेतील पर्याय फार दूर नाहीत
‘स्टारट्रेक’ मालिकेत माणसांचं एका ग्रहावरून दुसरीकडं प्रक्षेपण होताना आपण बघत होतो, तसं काही करणं शक्‍य आहे का? या कल्पनेला ‘टेलिपोर्टिंग’ असं म्हणतात. वस्तू किंवा उर्जेला-प्रत्यक्षपणे ती वस्तू न हलवता- एका ठिकाणावरून दुसरीकडं नेणं हा त्याचा अर्थ आहे. यावर मूलभूत संशोधन सुरू आहे. मालवाहतुकीसाठी रोबोचा वापर ही मात्र निश्‍चित स्वरूपात साकारता येण्यासारखी संकल्पना आहे. ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या पसरलेल्या आणि कमी लोकवस्तीच्या देशात आणि इतरही काही देशांत डिलिव्हरी ड्रोनचा वापर सयुक्तिक आहे. त्याचा आपल्यालाही विचार करता येईल. अर्थात याचा गैरवापर ड्रग वाहतूक, अवैध टेहळणी इत्यादींसाठी होऊ नये यासाठी नवीन कायदे करावे लागतील! ‘हायपरलूप’ हा पण एक वेगळा पर्याय होऊ घातला आहे. मोठ्या ट्युबसदृश मार्गातून अतिशय वेगानं होणारी वाहतूक, असं त्याचं थोडक्‍यात वर्णन करता येईल. साधारणपणे वाहनाच्या गतीला होणारा वातावरणाचा आणि इतर घर्षणाचा विरोध दूर करून त्याचं वेगवान प्रक्षेपण अशा ट्युबमधून केलं जाण्याचा हा प्रयोग आहे. प्रायोगिक स्वरूपात या तंत्रज्ञानाची उभारणी आणि चाचणी सुरू होणार आहे.

सुनियोजित आणि संतुलित वाहतूक
सर्वसाधारणपणे दळणवळणाचे चार प्रमुख पर्याय प्रचलित आहेत ः हवाई, जल, रेल्वे आणि रस्ते. या चारही पर्यायांचं योग्य ते जाळं निर्माण करणं हीच संतुलित वाहतुकीची गुरुकिल्ली आहे. परिवहनविषयक धोरण तयार करताना या सगळ्या तंत्रज्ञानाबरोबरच भौगोलिक वैशिष्ट्यं, सामाजिक गरजा, आर्थिकता आणि इतर अनेक बाबींकडं बारकाईनं लक्ष देऊन रस्त्यांवरच्या वाहतुकीवरचा अकारण भर कमी करणं ही भविष्यकाळाची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com