महायुद्धातला शेक्‍सपीअर! (प्रवीण टोकेकर)

Article by Pravin Tokekar in Saptarang
Article by Pravin Tokekar in Saptarang

विल्यम शेक्‍सपीअर नावाचं एक भूत आहे. साडेचारशे वर्षांनंतरही अधूनमधून ते दिसतं. हॅम्लेटच्या बापाचं भूत डेन्मार्कच्या किल्ल्याच्या बुरुजावर दिसायचं. तसं हे शेक्‍सपीअरचं भूत आहे. ते झोपडपट्‌टीतही दिसतं, राजाच्या रंगमहालीदेखील दिसतं. गल्लीतही दिसतं, दिल्लीतही दिसतं. उत्कट प्रेम. विखारी दुश्‍मनी. छळ. कपट. कारस्थानं. मानवी स्वभावातलं काळंबेरं...हे सगळे त्या शेक्‍सपीरिअन भुताचे खेळ. शेक्‍सपीअरचे असलेच गडद रंग घेऊन अवतरलेली एक भन्नाट गोष्ट दोन-चार वर्षांपूर्वी पडद्यावर आली होती. चित्रपट होता ः ‘द एक्‍सेप्शन’. कहाणीची पार्श्‍वभूमी खरीखुरी. घडलेल्या घटनांची इतिहासात तारीख-वार नोंदही आहे; पण तरीही गोष्ट मात्र संपूर्णत: काल्पनिक. हीसुद्धा एक शेक्‍सपीरिअन गंमत. तसं पाहता या कथेचा आणि शेक्‍सपीअरचा दुरान्वयेही संबंध नाही; पण चित्रपट बघितला की लग्गेच आठवतो तो बार्डच! वाटतं, अरे, हे तर सगळे त्याचेच खेळ आहेत की! बार्डच्या जातकुळीतल्या या कहाणीला दुसऱ्या महायुद्धाचे दाहक रंग आहेत.

* * *

सन १९४० चा उन्हाळा होता. दुसऱ्या महायुद्धाचे ढग गडगडत होते. जर्मनीची सगळी सूत्रं तिसऱ्या राईखचा सर्वेसर्वा आडोल्फ हिटलर आणि त्याच्या साथीदारांच्या मुठीत एकवटली होती. हिटलरनं पोलंड गिळला होता, हॉलंड आणि बेल्जियममध्ये सैन्य घुसवलं होतं. एकीकडं यहुद्यांची निर्घृण कत्तलही आरंभली होती. हिटलरची ही राक्षसी कृत्यं हताशेनं दूरवरून बघत होता जर्मनीचा पदच्युत सम्राट विल्हेम कैसर (दुसरा). वास्तविक पहिल्या महायुद्धात जर्मनीचं नेतृत्व त्यानंच केलं होतं; पण आता काळ बदलला होता. हिटलरच्या ‘नॅशनल सोशॅलिझम’नं (नाझीवाद) सम्राटाचं सिंहासन उचलून माळ्यावर टाकून दिलं होतं आणि वृद्ध सम्राटाला कॉलर धरून हॉलंडमधल्या एका रम्य प्रासादात नेऊन ठेवलं होतं. 

सम्राट कैसर तूर्त आयुष्याच्या उतरणीवर वेळ घालवण्यासाठी भंपक विनोद करत बसला होता. प्रसंगी चुलीसाठी लाकडं फोडत होता. बदकांना दाणे टाकत होता. उंची कप-बश्‍यांमधून चहा-कॉफी भुरकत होता. आपल्या विविध गणवेशांचा संग्रह अभिमानानं जपत होता. हॉलंडमधला असला तरी तो प्रासादच होता. दास-दासी होत्या. ऐहिक सुख पुरेसं होतं. नव्हतं ते साम्राज्य. राजा...पण ओसाडगावचा! 

...तिथं ही कहाणी घडली.

* * *

पोलंडच्या मोहिमेत जायबंदी झालेल्या कॅप्टन स्टीफन ब्रॅंटची तब्येत आता बऱ्यापैकी सुधारली होती. दणकट शरीर होतं म्हणून निभावला इतकंच. व्रण अजूनही ठुसठुसतो. जखम आतून ओलीच असावी. तरीही निरोप मिळताच तो गणवेश चढवून ‘वेयमाख्त’च्या - जर्मन लष्कराच्या- मुख्यालयात हजर झाला. ‘‘सम्राट विल्हेम कैसर यांची ड्यूटी तुला लागली आहे...’’ वरिष्ठ अधिकाऱ्यानं त्याला सांगितलं.

‘‘तो म्हातारा अजून जिवंत आहे?’’ कॅप्टन ब्रॅंट तिरसटासारखा बरळला.

‘‘आहे थोडाफार...सध्या हॉलंडमधल्या एका महालात नजरकैदेत आहेत. त्यांच्यावर जाळं फेकण्यासाठी ब्रिटिश गुप्तचर धडपडत असल्याच्या खबरा येतायत. ताबडतोब तिथं जाऊन त्यांची काळजी घे आणि तिथल्या सगळ्या गोष्टींचा साद्यंत अहवाल फ्यूररला पाठव. कैसर हासुद्धा एक संशयित आहे, हे लक्षात ठेव,’’ वरिष्ठ अधिकारी म्हणाला.

...कैसरचे हे अखेरचे दिवस आहेत, हे न ओळखण्याइतका कॅप्टन ब्रॅंट बुद्दू नव्हता. तो आंतर्बाह्य नाझी लष्करी अधिकारी होता. हिटलरच्या पायी त्याच्या निष्ठा वाहिलेल्या होत्या. तिसऱ्या राईखच्या उद्धारासाठी प्रसंगी देह ठेवण्याची त्याची तयारी होती. तशी शपथ त्यानं घेतली होती. हॉलंडमधल्या उट्रेख्त नावाच्या गावाबाहेर कैसरचा महाल होता. कॅप्टन ब्रॅंट तिथं पोचला. तिथं डिट्रिख नावाचा गेस्टापो अधिकारी आपला अधिकार चालवत असे. कैसरच्या सुरक्षेची सूत्रं ब्रॅंटच्या हाती त्यानं दिली आणि तो स्वत: ब्रिटिश गुप्तचरांचा छडा लावण्याच्या कामामागं हात धुऊन लागला. उट्रेख्त गावातच कुठून तरी रेडिओ सिग्नल्स मिळताहेत. तिथं एखादा ब्रिटिशांचा ट्रान्समीटर असावा, असा संशय होता; पण नेमके कुठून हे सांकेतिक संदेश प्रसारित होताहेत, हे अजून कळलं नव्हतं. 

...ब्रिटिश गुप्तचर थेट जर्मनीच्या गंडस्थळापर्यंत पोचल्याचं ते लक्षण होतं.

* * *

ब्रॅंटनं आपल्या कामाला सुरवात केली. दुपारी त्याच्या खोलीत आलेल्या एका तरुण नोकराणीनं ‘राजेसाहेबांनी रात्रीच्या जेवणासाठी महालात बोलावलं आहे,’ असा निरोप दिला. खोलीत चालून आलेल्या दासीला ब्रॅंटसारखा तरुण नाझी अधिकारी नुसतंच सोडून देणार नव्हताच. किंबहुना, याला हल्ली अत्याचार म्हणतच नाहीत. पोरगी गोड होती. तिचं नाव मीके दे योंग असं होतं. होती हॉलंडचीच. अस्सल डच रक्‍त. निळे डोळे. शेलाटा बांधा. किंचित उदास चेहरा...आणि मुकी वाटावी इतकी अबोल. मीके हा ब्रॅंटचा विरंगुळाच झाला. नाझी नियमांनुसार महालाच्या आवारात प्रेमप्रकरण, स्त्री-पुरुष संबंध निषिद्ध होते; पण नाझी अधिकाऱ्याला एखादी पोरगी आवडली तर त्याला काय करणार? मीकेनंही त्याला अबोल प्रतिसाद दिला. 

* * *

रात्री झोपल्यावर कॅप्टन ब्रॅंट विव्हळायचा. दचकायचा. त्याला वाईट स्वप्नं पडत. पोलंडमधल्या संहाराची. कलेवरांच्या खचाची. मीकेनं हे अनेकदा पाहिलं होतं. नाझी असला तरी हा अधिकारी मनातून हबकलेला असावा. थोडा हळुवारही असावा, हे तिनं ओळखलं होतं.

‘‘मीके, लग्न कर माझ्याशी!’’ तो म्हणाला.

‘‘कमॉन...आर यू सीरिअस! मी...मी...ज्यू आहे!’’ मीके घाबरत घाबरत म्हणाली. नाझी अधिकाऱ्याला स्वत:हून ‘मी ज्यू आहे’ असं सांगण्याचा अर्थ ‘मला आत्महत्या करायची आहे’ असंच सांगण्यापैकी होतं.

‘‘मी नाहीए... इतकंच!’’ तो म्हणाला. मीके त्याला बेहद्द आवडली होती. फक्‍त ही गोष्ट बाकी कुणाला सांगू नकोस, असंही त्यानं तिला बजावलं. मीकेच्या खोलीत आलेल्या बंदुकीच्या तेलाच्या वासानं मात्र ब्रॅंट अस्वस्थ झाला होता. एका नोकराणीच्या खोलीत गन ऑइलचं काय काम होतं? 

...त्याच रात्री ते दोघे रंगेहाथ पकडले गेले. महालाच्या आवारात लफडं करणं गुन्हा होता. कैसरपत्नीनं तिथल्या तिथं मीकेला काढून टाकण्याचे आदेश दिले आणि कॅप्टन ब्रॅंटला परत पाठवण्याची तजवीज सुरू केली. मात्र, ‘‘मी जर्मन सत्ताधीश उरलेलो नसलो तरी माझ्या घरात माझाच शब्द चालतो!’’ असं ठणकावून कैसरनं हस्तक्षेप केला आणि या प्रेमी युगुलाला क्षमा केली. ‘यापुढं लेको काळजी घ्या’ असंही सांगितलं. त्याच दिवशी राइखफ्यूरर आणि हिटलरचा उजवा हात हाइनरिख हिमलर उट्रेख्तला भेट देणार असल्याचं कळलं होतं.

‘‘ओह, तो येणारेय? घरातले चमचे तरी मोजून ठेवा...’’ कैसर कडवटपणानं म्हणाला.

हिमलर सम्राट आहे की कैसर? असा प्रश्‍न पडावा, अशी ती भेट होती. कैसरपत्नीनं हिमलरच्या चापलुसीची पराकाष्ठा केली; पण हिमलर हा दैत्य होता. जेवणाच्या टेबलावर त्यानं ‘घाणेरडं ज्यू रक्‍त संपवण्यासाठी आम्ही पराकाष्ठा करत आहोत; पण विज्ञान कमी पडतं आहे,’ अशी कुरकूर केली. ‘पोलंडमध्ये लहान मुलांच्या हृदयात फिनॉलचं इंजेक्‍शन देऊन मारण्याचा प्रयोग आम्ही केला; पण एका मिनिटात फक्‍त दहाच मुलं दगावतात, हे फार अपुरं आहे,’ असं तो म्हणाला. ओकारी यावी असंच ते वक्‍तव्य होतं; पण इलाज नव्हता. 

‘कैसरनं पुन्हा बर्लिनला येऊन सिंहासनावर बसावं, असा हिटलरचा निरोप आहे,’ असं हिमलरनं सांगितलं. कैसरच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि कैसरपत्नीचा आनंद गगनात मावेनासा झाला; पण हा चक्‍क सापळा होता. कैसरनिष्ठावंतांना हुडकण्याचं ते फक्‍त आमिष होतं. त्याच वेळी...

हिमलरला जवळून गोळी घालण्याची ही एक नामी संधी आली होती. ब्रिटिश गुप्तचरांनी निर्णायक हालचाल केली.

* * *

ब्रॅंटचा संशय खरा ठरला. मीके अधूनमधून बाजारहाटाच्या निमित्तानं उट्रेख्त गावात जाते. तिथं एका खिस्ती धर्मोपदेशकाला भेटते, हे ब्रॅंटनं बघून ठेवलं. मीके हीच ब्रिटिशांची हस्तक आहे, हे त्यानं ओळखलं. त्यानं मीकेला गाठून जाब विचारला.

‘‘तू मला वापरलंस, मीके,’’ तो दुखावून म्हणाला.

‘‘मी स्वत:ला वापरलं, स्टीफन...’’ ती शांतपणे म्हणाली.

‘‘माझ्या राजनिष्ठेच्या शपथेचा भंग करायला लावलास तू!’’ तो म्हणाला.

‘‘तू तुझं कर्तव्य पार पाड, मी माझं पार पाडीन,’’ तिच्या डोळ्यांत भावनांचा लवलेश नव्हता.

‘‘ तू इथून पळ...’’ तो कळवळून म्हणाला.

‘‘मी कुठंही जाणार नाहीए स्टीफन. मला माझं कर्तव्य पार पाडायचंय!’’ ती म्हणाली.

त्याच संध्याकाळी तिनं कैसरला घराच्या बगीच्यात गाठून ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचा निरोप पोचवला. कैसरला तिथून पळवून ब्रिटनमध्ये नेण्याची चर्चिल यांची तयारी होती. युद्धानंतर त्यांना पुन्हा सिंहासनावर सन्मानानं बसवण्यात येईल, असं त्यांचं आश्‍वासन होतं.

...आणि इथंच हॅम्लेटसारखाच कॅप्टन स्टीफन ब्रॅंट आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या संभ्रमात पडला. टू बी ऑर नॉट टू बी...?

प्रेयसी? की राष्ट्र? निर्दय, सत्तापिपासू राष्ट्राधीशांच्या चरणी एकनिष्ठ राहून देशभक्‍तीचं पुण्य मिळवायचं? की निरपेक्ष प्रेमाला साथ देऊन देशद्रोहाचं पाप माथी घ्यायचं?

...कॅप्टन ब्रॅंटनं काय निवडलं? 

* * *

‘द एक्‍सेप्शन’ हा चित्रपट ॲलन जुड या ब्रिटिश लेखकाच्या कादंबरीवर आधारित आहे. कादंबरीचं नाव होतं ः ‘द कैसर्स लास्ट किस.’ त्यांचं मूळ नाव ॲलन एडविन पेटी; पण लिखाणासाठी त्यांनी ॲलन जुड हे टोपणनाव स्वीकारलं. सखोल अभ्यासानिशी निवडलेल्या वास्तवातल्या घटना आणि त्यांवर चढवलेला काल्पनिक कथानकाचा वर्ख. तोही इतका प्रभावी शैलीत मांडलेला की आख्खीच्या आख्खी कहाणीच खरीखुरी वाटावी. अशा चिक्‍कार कादंबऱ्या इंग्लिशमध्ये येत असतात. ‘द कैसर्स लास्ट किस’देखील त्याला अपवाद नाहीच!

‘द एक्‍सेप्शन’ हा चित्रपट २०१४ मधला. त्याला ऑस्करबिस्कर मिळालं नाही; पण क्रिस्तोफर प्लमर या बुजुर्ग अभिनेत्यानं साकारलेल्या सम्राट कैसरला जाणकारांनी सहस्र कुर्निसात केले. सत्ताच्युत, पराभूत सम्राटाचा ‘ब्लॅक ह्यूमर’ त्यानं अशा काही ढंगात पेश केला की बस. जय कोर्टनी या तगड्या सिताऱ्यानं कॅप्टन ब्रॅंट रंगवलाय. त्याचा तो नाझी पोशाखातल्या कर्दनकाळासारखा वावर आणि मीकेच्या सहवासातलं हळवेपण यांतलं नातं त्यानं नेमकेपणानं पेश केलं आहे. लिली जेम्सनं साकारलेली मीके त्याच्या उलट व्यक्‍तिमत्त्वाची. कोमलांगी; पण मनानं कणखर...हीच ती व्यक्‍तिरेखांमधली शेक्‍सपीरिअन गंमत. पराभूताची दिलदारी. राक्षसाचं कोमल हृदय. कोमलांगीचं कठीण कवच. 

...विरोधाभासांचा हा गडदरंगी खेळ कथानकात असे काही रंग भरतो की काल्पनिकाचं वास्तव व्हावं, यासाठी प्रेक्षकांचीच उलघाल होते. चित्रपटात एक सेकंदही हिटलरचं थोबाड दिसत नाही; पण तो अदृश्‍य रूपात भुतासारखा जाणवत राहतो...ही सगळी दिग्दर्शक डेव्हिड लेवो यांची करामत आहे. हे कथानक लेवो यांच्या हातात गेलं आणि त्याचं सोनं झालं. लेवो हे स्वत: शेक्‍सपीरिअन रंगभूमीचे गाढे अभ्यासक आणि कलावंत आहेत. ‘रॉयल शेक्‍सपीरिअन’ कंपनीचे अध्वर्यू आहेत. ही त्यांची पहिलीच दिग्दर्शकीय कलाकृती होती. त्यांच्या दृष्टीला इथं पानापानात भळभळणारा शेक्‍सपीअर स्पष्ट दिसला. वस्तुत: ‘द कैसर्स लास्ट किस’ या कादंबरीत भेटणाऱ्या याच व्यक्‍तिरेखा कमालीच्या वेगळ्या वाटतात. दिग्दर्शक कथेचा कायापालट कसा करू शकतो, याचं ‘द एक्‍सेप्शन’ हे जबरदस्त उदाहरण आहे.

शेक्‍सपीअर सर्वत्र आणि सर्वांभूती आहे. मानवी व्यवहारातली विकारविलसितं शोधणारी नजर ज्याला लाभली आहे त्यालाच तो दर्शन देतो. लेवोसाहेबांना तर तो दृष्टान्तच देतो. आपल्यासारख्या सामान्यजनांनी ‘मुखदर्शना’च्या रांगेत उभं राहावं आणि असा सिनेमा तेवढा पाहून घ्यावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com