बाबूजी धीरे चलना... (संदीप वासलेकर)

Article by Sundeep Waslekar
Article by Sundeep Waslekar

जगद्विख्यात चित्रकार पाब्लो पिकासो याला त्याच्या अखेरच्या दिवसांत एक पत्रकार भेटायला गेला होता. पिकासोनं त्याला काही सेकंदांत एक चित्र काढून दिलं. तो पत्रकार म्हणाला : ‘‘तुम्ही हे चित्र किती पटकन काढलंत...मी ते विकलं तर मला लाखो डॉलर्स मिळतील.’’ त्यावर पिकासो त्याला म्हणाला : ‘‘अरे! मी हे चित्र पटकन काढलेलं नाही. त्यासाठी मी अनेक दशकं संथपणे तपश्‍चर्या केलेली आहे...म्हणून आत्ता मी ते असं सहजपणे काढू शकलो.’’ जगण्यात आणि सर्जनशील कलेत अशी संथपणे केलेली तपश्‍चर्या फार महत्त्वाची असते.

अलीकडंच एक विद्यार्थी मला भेटायला आला व म्हणाला : ‘‘तुम्हाला एक प्रश्‍न विचारायचा आहे...’’

मी म्हटलं : ‘‘विचार.’’ 

त्यानं विचारलं : ‘‘तुमच्या दैनंदिन जीवनातली कोणती गोष्ट संथ गतीनं केली तर योग्य होईल, असं तुम्हाला वाटतं?’’

मी माझ्या दिनचर्येबद्दल विचार करू लागलो. वरवर सोप्या वाटणाऱ्या या प्रश्‍नाचं उत्तर खूप कठीण होतं. सकाळी आरामात उठलो तर चालेल का? ऑफिसला आरामात गेलो तर चालेल का? कामं हळूहळू केली तर चालतील का? या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरं नकारार्थी होती. तुम्हीदेखील हा प्रश्‍न स्वत:ला विचारून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. आयुष्यात गती असण्यापेक्षा आशयपूर्ण संथपणा असणं किती आवश्‍यक आहे आणि तो आपल्या जगण्यात आणणं किती कठीण आहे, ते कळेल!

काही दिवसांनी मी मित्राबरोबर एका बगीच्यात रपेट मारायला गेलो होतो. काही वेळानं मित्र म्हणाला : ‘‘तू एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत खूप वेगानं जातोस. पुढची फेरी हळू मार, म्हणजे गंमत दिसेल.’’

त्यानं सांगितल्यानुसार, मी संथपणे रपेट मारायला सुरवात केली...तर दोन्ही बाजूंना विविध प्रकारची झाडं, पानं, फुलं मला दिसली. वास्तविक, त्या रस्त्यानं यापूर्वीही मी अनेकदा गेलेलो होतो; परंतु मी त्या रस्त्याच्या दुतर्फा असलेलं सौंदर्य कधी पाहिलेलं नव्हतं.

आपल्या आयुष्याच्या प्रवासातही अनेकदा असंच होतं. आपण ध्येय गाठायचं म्हणून वेगानं जातो व आयुष्याच्या प्रवासाचा खरा आनंद चाखतच नाही; त्यामुळं ध्येय प्राप्त झाल्यावरही एक प्रकारची कमतरता भासते...मग नवीन ध्येय गाठण्याची गरज वाटू लागते.

***
राष्ट्रीय प्रवाहात जे प्रवास करतात त्यांची स्थिती आपण पाहत आहोतच. लोकशाहीत निवडणुका जिंकणं हे प्रत्येकाचं ध्येय असतं. पूर्वी पंडित नेहरूंपासून ते अटलबिहारी वाजपेयींपर्यंत व मधू लिमयेंपासून ते मधू दंडवतेंपर्यंत सगळे नेते ध्येय गाठताना प्रवासातल्या रस्त्याचं बारकाईनं निरीक्षण करायचे. कधी जिंकायचे, कधी हरायचे...पण त्यांचा राजकीय प्रवास विधायक असायचा व निवडणुकीचं ध्येय साध्य झालं तरी अथवा नाही झालं तरी राष्ट्रकार्यात त्यांचा सहभाग प्रेरणादायी असायचा.

सध्याच्या राजकारणात ‘प्रचंड वेगानं आपलं ईप्सित कसं साध्य करायचं,’ एवढंच महत्त्वाचं मानलं जातं. खूप वेगानं यश मिळावं म्हणून भरपूर पैसा ओतायचा, तो मिळवण्यासाठी भ्रष्टाचार करायचा व तरतमभाव सोडून एकमेकांची निंदा-नालस्ती करायची, हे चित्र आजच्या गतिमान राजकीय स्पर्धेत दिसतं.

गती म्हणजे काय हेच कधी कधी आपल्याला समजत नाही. जगद्विख्यात चित्रकार पाब्लो पिकासो याला त्याच्या अखेरच्या दिवसांत एक पत्रकार भेटायला गेला होता. पिकासोनं त्याला काही सेकंदांत एक चित्र काढून दिलं. तो पत्रकार म्हणाला : ‘‘तुम्ही हे चित्र किती पटकन काढलंत...मी ते विकलं तर मला लाखो डॉलर्स मिळतील.’’ पिकासो त्याला म्हणाला : ‘‘अरे! मी हे चित्र पटकन काढलेलं नाही. त्यासाठी मी अनेक दशकं संथपणे तपश्‍चर्या केलेली आहे... म्हणून आत्ता मी ते असं सहजपणे काढू शकलो.’’ सावकाश वाटचाल केल्यानंच कलेचा अप्रतिम आविष्कार करता येत असतो.

दुसरा जगद्विख्यात चित्रकार लिओनार्दो दा व्हिन्सी यालाही ‘मोनालिसा’ हे त्याचं विख्यात तैलचित्र पूर्ण करण्यासाठी चार-पाच वर्षं लागली होती. त्याचं हे चित्र जगातलं सगळ्यात महागडं चित्र समजलं जातं. 

वास्तविक, एखाद्या महिलेची प्रतिमा कुणी कलाकार काही तासांत अथवा काही दिवसांत पूर्ण करेल; परंतु हळुवार कौशल्यानं तयार केलेल्या ‘मोनालिसा’ या कलाकृतीची किंमत सुमारे सात हजार कोटी रुपये आहे. ही कलाकृती कलारसिकांना पॅरिसमधल्या लुव्र वस्तुसंग्रहालयात पाहायला मिळते.

पॅरिसमध्येच असलेलं ‘नोत्रदाम’ हे सुप्रसिद्ध चर्च बांधण्यासाठीही शिल्पकारांना तब्बल १८० वर्षं लागली होती. औरंगाबादजवळच्या वेरूळ लेण्यातलं ‘कैलास’ हे शिल्प निर्माण करण्यासाठी किती वर्षं लागली, याची ऐतिहासिक नोंद नाही. मात्र, संपूर्ण जगातली अभूतपूर्व अशी ही कलाकृती आपण जवळून पाहिल्यावर आणि तिथली कलेची विविध रूपं पाहिल्यावर, ही कलाकृती निर्माण करण्यासाठीही अनेक वर्षं लागली असणार, याबाबत शंका उरत नाही.

कलेबरोबरच विज्ञानातलेही महत्त्वाचे शोध संथ गतीमुळंच शक्‍य झाले आहेत. झाडावरून हळुवारपणे पडणाऱ्या सफरचंदाचं निरीक्षण न्यूटन हा शास्त्रज्ञ करत होता म्हणून गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त तो मांडू शकला. जर त्यानं घरापासून झाडाकडं व झाडापासून घराकडं भराभर फेऱ्या मारण्याची सवय ठेवली असती तर वरून पडणारं सफरचंद त्याच्या लक्षात आलंही नसतं.

सध्याचे शास्त्रज्ञ झाडाखाली बसत नाहीत; ते अत्याधुनिक प्रयोगशाळांमध्ये कार्य करतात. त्यांच्या सोईसाठी संगणकाच्या साह्यानं चालणारी महागडी उपकरणं असतात; परंतु त्यांना निरीक्षण अतिशय संथपणेच करावं लागतं.

मी स्वत: एका संशोधन संस्थेत प्रमुख आहे. आमच्याकडच्या सगळ्या सहाय्यक संशोधकांना सावकाश काम करण्याचा सल्ला मी नेहमीच देतो. कधीही कुणाला संध्याकाळी सहा-साडेसहानंतर व सकाळी दहाच्या आधी, तसंच शनिवारी-रविवारी काम करण्याची परवानगी देत नाही. संशोधनकार्य अर्थपूर्ण अशा संथ गतीनं केलं तरच सर्जनशीलतेचा उगम होतो, असा माझा अनुभव आहे. माझी संशोधनाची व्याख्या अतिशय कठोर आहे. आम्ही केलेल्या संशोधनाला समांतर असं काहीही गुगलवर खोलवर शोध घेऊनसुद्धा दुरान्वयेही दिसता कामा नये व ऑक्‍सफर्ड, हॉर्वर्ड यांसारख्या जगातल्या प्रमुख विद्यापीठांनी आणि ‘युनो’नं ‘हे आम्ही प्रथमच पाहिलं व असं काही आधी अस्तित्वात नव्हतं’ असं खात्रीपूर्वक सांगितलं पाहिजे. अशी कठोर परिमाणं लावून होणारं संशोधन अतिशय काळजीपूर्वक आणि सावकाश केलं तरच ते नावीन्यपूर्ण व परिणामकारक होतं.

मला भेटलेल्या त्या विद्यार्थ्याच्या प्रश्नामुळं मला स्वत:ची दिनचर्या, राजकारण, कला, विज्ञान, संशोधन यांत आवश्‍यक असणाऱ्या संथपणाचं महत्त्व पुन्हा एकदा आठवलं. मात्र, खरं तर सावकाशपणे व जबाबदारपणे प्रवास करायचा असतो तो प्रेमात, हे मी लहानपणीच एका हिंदी गाण्यातून ऐकलं होतं! माझ्याही जन्मापूर्वी भारतभर झळकलेल्या ‘आरपार’ या सिनेमातलं हे गाणं आहे. गीता दत्त यांनी गायलेलं. ‘बाबूजी धीरे चलना’ हे ते गाणं. हे गाणं आजही लोकप्रिय आहे व या गाण्यातून दिला गेलेला सल्ला आजच्या युवकांनीसुद्धा ऐकणं त्यांच्यासाठी लाभदायक आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com