खरंच, ती काय करत असेल? (वामन काळे)

वामन काळे
रविवार, 28 जानेवारी 2018

आता तो मोठा झाला होता, बडा अधिकारी होता. त्याचे आजोबाही आता अतिशय वृद्ध झाले होते. त्यांच्या हिंडण्या-फिरण्यावर वयामुळं बंधनं आली होती. आता त्याला त्या वेड्यांच्या रुग्णालयाकडं जाण्यापासून आजोबा किंवा अन्य कुणीही प्रतिबंध करू शकणार नव्हतं.
 

वेड्यांच्या रुग्णालयाचा दर्शनी भाग...कडेकोट किल्ल्यासारखी घट्ट चिरेबंदी, बंदिस्त बांधणी...अशी ५० फूट उंच, भव्य इमारत. बाहेर खाकी पोशाखातले काही तगडे हवालदार-रक्षक पहारा देत इकडं तिकडं लक्ष ठेवत फिरत होते. वेळ सूर्यास्तापूर्वीची...संध्याकाळची. नित्याच्या रिवाजानुसार, बरेच सुधारलेले काही वेडे स्त्री-पुरुष त्याच रुग्णालयाच्या आवारात मोकळे सोडण्यात आले होते. त्या सगळ्यांवर रुग्णालयाचे हवालदार-रक्षक बारीक लक्ष ठेवून येरझारा घालत होते. ते वेडे स्त्री-पुरुष वेडेवाकडे चाळे करत इकडं तिकडं बागडत होते...लोखंडी जाळीचं भक्कम कुंपण त्यांच्याभोवती होतं आणि त्या जाळीच्या कुंपणाबाहेरून लहान मुलं त्या वेड्यांकडं बघत, 

हसत-खेळत त्या वेड्यांची मजा बघत होती. बागडत होती. समोरचे वेडेही त्या मुलांकडं पाहून स्वत:ची करमणूक करून घेत होते. काही वेडे मुलांशी हसत होते, काही खोटं खोटं रडतही होते. मुलांना त्यांची गंमत पाहताना मजा येत होती. बाहेरच्या त्या मुलांपैकी एक मुलगा मात्र ही ‘गंमत’ पाहत नव्हता. तो एका बाजूला खिन्न, उदासवाणा असा एका दगडावर कधीपासूनचा बसला होता. काही वेळानं तिथल्या हवालदार-रक्षकाचं त्याच्याकडं लक्ष गेलं. त्या मुलाला तिथं असा एकटा, उदासवाणा पाहून तो हवालदार त्या मुलाजवळ गेला आणि काही वेळ त्या मुलाकडं बघत उभा राहिला. नंतर मुलाच्या पाठीवरून-डोक्‍यावरून हात फिरवत तो त्याला म्हणाला : ‘‘अरे बाळा, तू इथं असा एका बाजूला या दगडावर एकटा का बसला आहेस? ही सगळी तुझ्यासारखीच मुलं बघ कशी आनंदानं मजेत खेळत आहेत...बागडत आहेत...त्यांच्यात जाऊन खेळावं, बागडावं असं तुला नाही का वाटत?’’

तो मुलगा गप्पच.

हवालदार पुन्हा म्हणाला : ‘‘कुणी नाही का आलेलं तुझ्याबरोबर? एकटा आहेस का? हरवला आहेस का? की कुणी सोडून गेलं आहे तुला इथं?’’

तरीही तो मुलगा गप्पच.

हवालदाराला आता त्याची दया आली. त्यानं काळजीनं पुन्हा विचारलं : ‘‘तुझे कुणी नातेवाईक आहेत का इथं नोकरीला?’’

मुलानं मान हलवत नकार दिला.

‘‘मग कोण आहे तुझं इथं?’’

आता मात्र मुलाला रडू कोसळलं.

‘‘थांब. रडू नकोस. मला सांग बरं, खरंच कोण आहे तुझं इथं?’’

रडू न आवरता मुलगा म्हणाला : ‘‘आई!’’

हवालदार आश्‍चर्यचकित होत म्हणाला : ‘‘आई?’’

‘‘हो. माझी आईच आहे इथं आत...’’

हवालदाराला काही समजेना. त्यानं पुन्हा विचारलं : ‘‘खरंच, तुझी आई आहे इथं आत? या वेड्यांच्या रुग्णालयात?’’

मुलगा रडतच म्हणाला : ‘‘हो’’

हवालदारानं मुलाला हाताला धरून उठवलं आणि म्हणाला : ‘‘हे बघ, समोर रुग्णालयाच्या आवारात काही वेडे दिसत आहेत ना तुला...त्यातल्या त्या महिला-वेड्यांकडं नीट निरखून पाहा आणि मला सांग बघू, त्यांपैकी कोणती आहे का तुझी आई?’’ मुलानं त्या वेड्या महिलांकडं नीट निरखून पाहिलं आणि तो पुन्हा रडू लागला.

‘‘यातली कोणतीच नाही का तुझी आई?’’ हवालदारानं विचारलं.

‘‘माहीत नाही’’ मुलानं सांगितलं.

‘‘बरं, नाव काय तुझ्या आईचं?’’

‘‘माहीत नाही’’ मुलगा स्फुंदतच उत्तरला.

‘‘मग आता कसं शोधायचं बरं तुझ्या आईला?’’ हवालदार म्हणाला.

तो मुलगा पुन्हा मुसमुसत रडत, गप्प.

इतक्‍यात तिथं एक म्हातारेसे गृहस्थ आले आणि आल्या आल्या त्या मुलाच्या पाठीत दोन धपाटे घालत म्हणाले: ‘‘किती शोधायचं रे तुला? आणि इथं कसा आलास तू?’’

‘‘आपण कोण?’’ हवालदार.

‘‘मी या मुलाचा आजोबा!’’

‘‘नमस्कार! अहो आजोबा, हा मुलगा सांगत होता, की त्याची आई वेडी आहे आणि ती या वेड्यांच्या रुग्णालयात आहे...’’ हवालदार म्हणाला.

‘‘होय रे?’’ मुलाच्या पाठीत पुन्हा एक धपाटा घालत आजोबांनी त्याला विचारलं.  मुलाच्या बखोटीला पकडत त्याला घेऊन आजोबा तिथून बाहेर पडले आणि घराच्या रस्त्याला लागले. ‘‘पुन्हा कधी चुकूनही इकडं फिरकायचं नाही, समजलास ना! नाहीतर फोडून काढीन चाबकानं...चामडी लोंबेपर्यंत...काय समजलं?’’ आजोबांनी मुलाला दम भरला.

‘‘पण आजोबा, माझ्या आईचं नाव काय?’’ मुलगा. 

‘‘ते काय करायचंय तुला? अरे, तुझ्या आईला देवाकडं जाऊन किती तरी वर्षं झाली! अगदी लहान होतास तू. काही दिवसांचा. तेव्हाच ती हे जग सोडून गेली. देवाघरी. मग माझ्या म्हाताऱ्या आईनंच वाढवलं तुला हातावरच्या फोडासारखं! मुलगा पुन्हा मुसमुसत आजोबांच्या सोबत चालू लागला.

आजोबांनी त्याचा हात आपल्या हातात घट्ट पकडलेला.

‘‘तुझी आई वेडी आहे हे कुणी सांगितलं तुला? आणि ती इथं वेड्यांच्या रुग्णालयात आहे, हेही कुणी सांगितलं तुला?’’

‘‘माझ्या आजीनं!’’

‘‘काहीतरी सांगू नकोस! तुझी आजीसुद्धा जाऊन बरीच वर्षं झालीत, याची कल्पना आहे का तुला?’’

‘‘किती?’’

‘‘तुला जितकी वर्षं झालीत तितकीच!’’

‘‘पण आजोबा...’’

‘‘अरे, म्हणजे थोडे दिवस कमी! तू नुकताच चालायला लागला होतास तेव्हा...’’

‘‘पण आजोबा, खरंच आजीनंच सांगितलं होतं मला...’’

‘‘काय सांगितलं होतं?’’

‘‘माझी आई वेडी आहे आणि तिला वेड्यांच्या रुग्णालयात ठेवलं आहे म्हणून! आजोबा, माझ्या आईची शप्पत!’’ गळ्याला हात लावत, डोळे मिटून त्या मुलानं सांगितलं. 

‘‘वेडा आहेस काय तू असं काहीतरी बडबडायला?’’

‘‘नाही आजोबा, मी वेडा नाय्ये; पण माझी आई वेडी आहे आणि तिला इथं, या रुग्णालयात ठेवलं आहे वेड्यांच्या!’’

‘‘गप्प बैस! पुन्हा असलं काही बोलायचं नाही आणि इकडं पुन्हा कधी फिरकायचंही नाही...नाहीतर पाय मोडून ठेवीन,  समजलं?’’ आजोबांनी पुन्हा त्याच्या पाठीत एक धपाटा घातला. पुढं नंतरच्या काळातही आजोबाच त्या मुलाला रोज शाळेत पोचवायला आणि आणायला जाऊ लागले. त्यानं दुसरीकडं कुठंही; विशेषत: त्या वेड्यांच्या रुग्णालयाकडं, जाऊ नये म्हणून.

‘तुझी आई लहानपणीच वारलेली आहे,’ हे त्या मुलाच्या मनावर आजोबा तेव्हापासून रोज रोज ठसवत राहिले; पण मुलाच्या मनातून आईची आठवण जात नव्हती. काळ भराभर पुढं सरकत होता.

मुलगा शाळेत अभ्यासात हुशार, अत्यंत बुद्धिमान होता. वर्गात सतत पहिला नंबर. दहावी-बारावीतही गुणवत्तायादीत तो पहिला आला होता.

बारावीनंतर त्याला मेडिकलला जायची इच्छा होती; पण आजोबांच्या आग्रहावरून तो इंजिनिअरिंगला गेला आणि तिथंही चमकत राहिला. नंतर इंजिनिअर झाल्यावर तो स्कॉलरशिपवरच परदेशात गेला...पण आईची आठवण काही त्याची पाठ सोडत नव्हती. विमानात बसतानाही त्यानं आपल्या आईला मनोमन नमस्कार केला होता. अजूनही त्याच्या मनात आईची प्रतिमा जागी होती. ‘वेडी असली तरी ती आपली आई आहे,’ ही हुरहुरती...पवित्र भावना त्याच्या मनाला बिलगून होती.

परदेशातून परत आल्यावर पुन्हा त्या वेड्यांच्या रुग्णालयात जायचं, असं त्यानं ठरवलं होतं. आता तो मोठा झाला होता, बडा अधिकारी होता. त्याचे आजोबाही आता अतिशय वृद्ध झाले होते. त्यांच्या हिंडण्या-फिरण्यावर वयामुळं बंधनं आली होती. आता त्याला त्या वेड्यांच्या रुग्णालयाकडं जाण्यापासून आजोबा किंवा अन्य कुणीही प्रतिबंध करू शकणार नव्हतं.

शेवटी एक दिवस त्यानं आपली गाडी थेट त्या रुग्णालयाकडं वळवली.

तिथल्या अधीक्षकांनी त्याचं स्वागत केलं. त्यानं त्यांना सगळी हकीकत सांगितली आणि आपल्या प्रिय आईला भेटण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली; पण नंतर अधीक्षक म्हणाले : ‘‘साहेब, तुम्हाला तुमच्या आईचं नाव माहीत नाही...तुमच्याकडं त्यांचा फोटोही नाही किंवा त्यांना या रुग्णालयात दाखल केल्याची तारीखही तुम्हाला माहीत नाही...त्यामुळं आमचं सगळं ऑफिस, सगळी रजिस्टर्स त्यासंबंधात मुकी आहेत! मग काय करणार आम्ही? सॉरी...वुई आर हेल्पलेस, सर! अहो, तुम्ही पहिलीच अशी व्यक्ती आहात, की आपल्या वेड्या आईची चौकशी करायला आला आहात! पण तुम्हाला सांगतो, इथं एकदा एखाद्या वेड्याला दाखल केलं गेलं की कुणीच कधीही त्या रुग्णाची साधी चौकशी करायलाही येत नाही...कधीच! कुणा वेड्याचा नंतर मृत्यू झाला तर आणि त्याच्या नातलगांना कळवण्याचा प्रयत्न केला तरी कुणी दाद देत नाही सहसा...’’

‘‘पण...’’ तो काही बोलण्याचा प्रयत्न करत होता; पण शब्दच संपल्यासारखा तो एकदम डोळे मिटून गप्प झाला. 

थोडा वेळ वाट पाहून अधीक्षक निघून गेले.

तो मात्र दगडाचा पुतळा झाल्यासारखा तिथंच गप्प उभा होता.

आईला शोधण्याचे सगळेच मार्ग आता संपले होते; पण त्याच्या मनात मात्र असंख्य प्रश्‍नांची फौज उभी होती...माझी आई वेडी का झाली असेल? आत्ता ती खरंच इथं आत, याच रुग्णालयात असेल का...? की...?? तिला इथं कुणी त्रास देत असेल का? ती हिंसक होत असेल का? हिंसक झाल्यावर तिला शॉक दिले जात असतील का? मारलं जात असेल का? मग ती काय करत असेल? रडत असेल की आणखी हिंसक होत असेल?

खरंच, ती काय करत असेल...?

'सप्तरंग'मधील लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: marathi news Saptarang Waman Kale Marathi features