पहिलं प्रेम नेहमीच का फसतं..?

Valentines Day
Valentines Day

पहिल्या प्रेमाची अनुभूती आपल्यातील प्रत्येकानेच घेतलेली आहे. या प्रेमाची आठवण विसरता विसरत नाही. आपण आयुष्यात पुढे जातो पण या आठवणी आपल्या कायम सोबत असतात. असे फारच थोडे नशिबवान असतात ज्यांना हे प्रेम लाभतं. जगात दुर्दैवी लोकांचीच संख्या जास्त आहे. हे सगळं आठवण्याचं  कारण म्हणजे आमचा मित्र राहुल (नाव बदलेलं)! काल मला भेटायला आल्यावर प्रेमाचा विषय निघाला आणि त्याची लव्हस्टोरी डोळ्यांसमोरून गेली. आम्ही बारावीला असतानाची गोष्ट आहे. वर्गामध्ये राहुल माझ्या बाजूला बसायचा. पहिल्या दिवसापासून तो माझ्या बाजूला बसत होता आणि चांगला मित्रही झाला होता. एकदम मनमोकळा स्वभावाचा. नेहमी हसरा चेहरा. घरची परिस्थिती पण चांगली होती. पहिल्या दिवसापासून तो माझा चांगला मित्र झाला. कॉलेज सुटल्यावर आम्ही खूप धमाल करायचो. 

आमच्या शेजारच्या वर्गामध्ये एक सुंदर मुलगी होती. लांबसडक पाठीवर रुळणारे केस, गोरीपान काया, अंगाने नाजूक शिडशिडित बांध्याची, पाणीदार डोळ्यांची. तिचे नाव तृप्ती (नाव बदलेलं)! तृप्ती आणि राहुल एकाच सोसायटीमध्ये राहायला होते. तृप्तीचे वडील कर्जत पोस्ट ऑफिसमध्ये कामाला होते. राहुलमुळे माझी आणि तिची ओळख झाली. मी, राहूल, तृप्ती आणि तिच्या दोन मैत्रीणी असा आमचा चांगला ग्रुप तयार झाला होता. इतर कोणाला आम्ही ग्रुप मधे घेतलेच नाही. लेक्चर सुरू व्हायच्या आधी आणि सुटल्या नंतर आम्ही क्लासच्या बाहेरच्या कठ्ठ्यावर गप्पा मारता बसायचो. एक गोष्ट आमच्या नजरेतुन सुटत नव्हती ती म्हणजे राहूलचे तृप्तीकडे पाहणे आणि तीने त्याला प्रतिसाद देणे. त्यावेळचे प्रेम आता सारखे फास्ट फॉरवर्ड नव्हते. त्यावेळेला नजरेवरच सगळी भिस्त असायची. मेसेजेस पोचवायला एक तर मित्र मैत्रिणी नाही तर लायब्ररीची पुस्तके. जरी मोबाईलची सुरुवात झाली असली तरी तो मोठ्या शहरांपर्यंतच सीमित होता. फ्रेंडशिप डे, वॅलेन्टाईन डे वगैरे गोष्टी अजून उघडपणे साजऱ्या होत नव्हत्या. त्यामुळे एखादी मुलीबरोबर मैत्री करायची असेल तर डेअरिंग करण्याशिवाय पर्याय नसायचा अन्यथा मुलगी डेअरिंग करून रक्षाबंधनला राखी बांधायची. 

अशा परिस्थितीत राहुल आणि तृप्ती यांच्या प्रेमाच्या चॅप्टरला सुरुवात झाली होती. गप्पा मारताना हळूच एकमेकांकडे बघुन हसणे, डोळ्यांच्या खाणाखूणा होणे, गप्पा मारताना दोघांचे एका विषयावर एकमत होणे आणि उस्फुर्तपणे टाळी देणे, टाळी दिल्यावर तृप्तीने हळूच लाजून मान खाली घालणे, क्लासमध्ये आल्यावर पहिले एकमेकांना शोधणे आणि नेहमीच्या जागेवर दिसले नाही तर चेहर्‍यावर चलबिचल होणे. कधी राहुल उशिरा आला की तृप्तीचे  क्लासच्या दरवाज्याकडे एकटक बघत वाट पहाणे आणि राहुलने आत प्रवेश केला की दोघांची नजरानजर होणे, मग राहूल आत येऊन जागेवर बसेपर्यंत राणी त्याच्याकडे पाहत राहायची. 

एकदा राहूल बसला की मग तो तृप्तीकडे पाहायचा. मग ती खुणेनेच विचारायची, ‘ का रे? कुठे होता ?’ तो  मग मान हलवून सांगायचा, "असचं!”. मग क्लास चालू असताना एकमेकांकडे लक्ष नसताना बघणे आणि चुकूनमाकून नजरानजर झाल्यावर माना खाली घालून हसणे. हे लगेच आम्हाला समजून येऊ लागले होते. आम्हां सगळ्यांना त्यांची जोडी आवडत होती पण जो पर्यंत त्यांच्या मनातले समजत नव्हते तो पर्यंत आम्हाला काही करता येत नव्हते. 

तरीही आम्ही त्यांना स्पेस देण्यास कधीच सुरुवात केली होती. एकत्र बसलो असताना आम्ही खास करून दोघांना एकमेकांच्या बाजूला बसायला जागा द्यायचो. तेव्हा राहुलच्या होणार्‍या ओझारत्या स्पर्शाने तृप्तीची कळी खलून यायची. हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत असे. तर तिचे लाजणे बघुन राहूलची गाडी एकदम जाम खुष होऊन जायची. कॉलेज सुटल्यावर आम्ही सगळे जण तृप्तीच्या घराच्या कॉर्नरपर्यंत चालत जायचो. रस्त्याने ग्रुपमधील इतर सर्व पुढे चालायचो आणि हे दोघे मागे जेणे करुन दोघांना एकांत मिळावा पण एवढे पण पुढे नाही चालायचो की जेणे करून इतर लोकांना संशय येईल. चालताना एकमेकांकडे बघणे, गप्पा मारताना ओठांपेक्षा डोळ्यांनी जास्त बोलणे हे सारे आम्हांला समजू लागले होते. त्यांना वाटायचे आम्हाला कोणी बघितलेच नाही आणि आम्ही ही त्यांना तसे कधी जाणवू दिले नाही. 

दोघांचे प्रेम आता खऱ्या अर्थाने फुलू लागले होते पण अजूनही एकमेकांना त्यांची जाणीव होऊन दिली नव्हती. एक दिवशी संध्याकाळी मी राहुलला भेटायला त्याच्या घरी गेलो. त्यावेळेस तो खूप अस्वस्थ वाटत होता. राहुलने खाली बसतोय नाही तोपर्यंत मला सांगितले कि आज मला करमत नाही रे! मला सारखी तृप्तीची आठवण येते. रात्री पण तिची खूप आठवण येते. मग तिने मला दिलेलं पुस्तक घेऊन झोपतो. तेव्हा कुठे झोप येते. काय होतेय तेच समजत नाही. हीच गोष्ट तिच्याबरोबर घडत असेल का?  मी म्हटले, ‘मित्रा! तुला प्रेम झालेय. तिच्या मनात काय आहे ते आपण उद्दया विचारूया. आता तू आराम कर. ’ दुसर्‍या दिवशी तो लवकरच आला पण त्याला तिला विचारायची डेअरिंग नाही झाली. मी म्हटले, राहू दे, जसे चालले आहे तसे चालु दे. त्यानंतर बरेच दिवस गेले तरी दोघांनी एकमेकांना काही प्रेमाची कबुली दिली नाही. सर्व नेहमी सारखेच चालले होते. पण बेचैनी वाढत होती. शेवटी राहुलने डेअरिंग करायची ठरवली आणि मागणी घालायची ठरवली. खूप विचाराअंती असे ठरले की तिला एक चिठ्ठी लिहायची. लेक्चर सुटले कि तिच्या हातात द्यायची आणि निघुन जायचे. तिला विचार करायला वेळ द्यायचा आणि दुसर्‍या दिवशी भेटायचे. खूप विचार केल्यानंतर राहुलने तृप्तीसाठी प्रेमपत्र तयार केलं. दोन दिवस ते घेऊन तसाच फिरत होता. डेरिंगच होत नव्हती.

पुढच्या दिवशी तो कॉलेजला लवकर आला. घामेघूम झाला होता. चेहऱ्यावर तणाव जाणवत होता. मला वाटलं तृप्तीला विचारायचं आहे म्हणून टेन्शन आहे. मी विचारले काय झाले तर म्हणाला, आज ती शाळेत आलीच नाही रे. दिवस बेकार गेला. तिच्या घरासमोर जाऊन आलो. दिसली; पण तिने बघूनही न बघीतल्यासारखे केले आणि न हसताच आत निघून गेली. असं कधीच झाले नव्हते !!! काय झाले तिला? तिला समजले असेल का मी तिला प्रपोझ करणार आहे ते? म्हणुन रागवली आहे का? मी म्हटले, शांत हो राहुल. ती उद्या कॉलेजला आल्यावर समजेल. दुसऱ्या दिवशी आम्ही तिची कॉलेजच्या गेटबाहेरच वाट पाहत थांबलो होतो. थोड्या वेळाने ती आली पण एकच नजर टाकली आणि निघून गेली. नेहमीसारखे हाय नाही की चेहर्‍यावर हसू नाही. चेहरा खूप लाल झाला होता. डोळे सुजले होते. बहुतेक खूप रडली होती. तशीच न बोलता वर्गात जाग्यावर जाउन बसली होती. आम्ही पण जाउन बसलो. कधी लेक्चर संपतील आणि तिच्याशी बोलतोय असे राहुलला झाले होते. शेवटचं लेक्चर संपल्यानंतर शेवटी आम्ही तिघेजण वर्गात होतो. मी राहुलने लिहलेलं पत्र त्याच्या हातात दिलं आणि वर्गाच्या बाहेर निघून गेलो. राहुलने ते पत्र घेतेले आणि तिच्या जवळ गेला. हातातील पत्र देण्यासाठी तिचा हात पकडला. तर तिच्या हातात अगोदरच एक पत्र होतं. ते राहुलसाठी होतं. राहुलने त्याचे पत्र तिच्या हातात दिले आणि तिचे पत्र हातात घेतले. राहुलने थरथरत ते पत्र वाचले आणि आनंदाने उडी मारली. आम्ही समजून गेले कि राहुलला जे हवं होत ते झालं. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते म्हणूनच तर एकाच दिवशी प्रपोझ करावासा वाटला.

आम्ही सगळे या दोघांसाठी खुश होतो. पण तृप्तीच्या मनात काहीतरी वेगळंच चाललं होतं  तिने चिठ्ठी वाचली तिच्या चेहर्‍यावर हसु उमटले…डोळ्यात अश्रु आले. तशाच भरल्या डोळ्यांनी चिठ्ठी दोन्ही हातात घेउन ति राहुलकडे काही वेळ बघत राहिली आणि जोरात रडायला लागली.  आम्हाला काय झाले समजलेच नाही आम्ही तिच्या जवळ गेलो आणि तिला शांत केले आणि विचारले. तिने स्वतःला सावरत राहुलचा  हात हातात घेतला आणि म्हणाली, “मी हि चिठ्ठी तुला दोन दिवसांपुर्वीच लिहिली होती पण द्यायला हिंमतच होत नव्हती. मला पण तु खुप आवडतोस! पण…..” आणि तिने एक मोठा पॉझ घेतला. परत मोठया मोठ्याने रडायला लागली. रडतच ती म्हणाली, ‘माझ्या वडिलांची बदली झाली आहे. आम्हाला उद्याच कर्जत सोडून बदलीच्या ठिकाणी जायचेय..” तिच्या एका वाक्याने आम्हाला धक्काच बसला. आता कुठे प्रेमाला सुरवात झाली होती. आम्ही कोणी काहीच बोललो नाही. पुढे काहि चर्चा करण्यात अर्थच नव्ह्ता. सर्व शांत झाले होते. तसेच वर्गामधून बाहेर पडलो नेहमी प्रमाणे चालू लागलो. कोणाला काही सुचतच नव्हते. मी शेवटी विचारले, ‘उद्या किती वाजता निघणार आहे.’ ती म्हणाली सकाळी दहा वाजता निघणार आहोत. 

राहुल नेहमीप्रमाणे त्याच्या घरी न जात माझ्यासोबत माझ्या रूमवर आला. इतका मनात दाटून जे आलं होतं ते मोकळं केलं. अगदी मनसोक्त रडला. मी फक्त त्याच्या पाठीवर थोपटत राहिलो दुसरे काय करू शकणार होतो. त्याच्या जागी जर मी असतो तर कदाचित मी काहीं वेगळे नसते केले. रडण्याचा भर ओसरल्यावर मी त्याला विचारले की तू येणार आहेस का खाली सकाळी ? तो नाही म्हणाला. मला तिला सोडून जाताना बघवणार नाही…. ‘अरे पण ती वाट बघत राहिली तर?’ मी म्हणालो. ‘नाही बघणार आणि वाट बघितली तरी ती समजून जाईल.’ असे म्हणून त्याने तृप्तीने दिलेले पत्र काढले आणि परत परत वाचत रडत राहिला.

मी यात त्याला धीर देण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हतो. मनात आले..सगळे म्हणतात त्याप्रमाणे पहिलं प्रेम नेहमी फसतं, असे का म्हणतात हे त्यावेळी लक्षात आलं..!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com