जपान भारत खाद्यान्न सहकार्य 

mitsuhiro miyakoshi
mitsuhiro miyakoshi

जपानने भारतीय खाद्यान्न उद्योगात शिरकाव करण्यासाठी जोमाने प्रयत्न चालविलेत. त्यासाठी पंतप्रधान शिंजो आबे यांनी त्यांचे खास सल्लागार मित्सुहीरो मायाकोशी यांना 11 मार्च रोजी भारताच्या दौऱ्यावर पाठविले. मायाकोशी प्रथम मुंबईमार्गे हैद्राबादला गेले व तेथे तेलंगणा सरकाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. दुसऱ्या दिवशी मायाकोशी यांनी जपानची कंपनी 'फुजी ऑईल' व भारतीय कंपनीच्या संयुक्त प्रकल्पाला भेट दिली. तीन वर्षांपासून या प्रकल्पात हॉटेल्स व बेकरी आदींना लागणाऱ्या 'कुकींग क्रीम'चे उत्पादन होत असून, त्यात 90 टक्के भारतीय कच्चा माल वापरला जातो. 13 मार्चला जपानी दूतावासात मायाकोशींची भेट झाली, तेव्हा वरील माहिती देत ते म्हणाले, "सध्या हे क्रीम गोठवलेल्या स्थितीत दिले जाते, तथापि, घराघरातून ते उपलब्ध व्हावे, याचे प्रयत्न सुरू असून, ते थंड (चिल) स्थितीत विकण्याचा विचार आहे. त्या संदर्भात समझोता झाला."

जपानमध्ये प्रतिदिन 18 दशलक्ष अंड्यांचे उत्पादन होते. ते भारतात निर्यात करण्यासाठी काय करता येईल, याबाबतही त्यांनी तेलंगणाचे वित्त, वाहतूक व अन्न खात्याचे मंत्री व दिल्लीत केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग व खाद्यांन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्याशी चर्चा केली. मायाकोशी म्हणाले, की भारताची सव्वा अब्ज लोकसंख्या ही फार मोठी बाजारपेठ आहे. त्यात जपानी खाद्यांन्नांचे प्रमाण अत्यल्प आहे. खाद्यान्य उद्योगातील अनेक जपानी कंपन्यांना भारतात यायचे आहे. सागरी अन्नाची निर्यात त्यांना करावायची आहे. परंतु, प्रत्यक्षात स्थिती वेगळी आहे. सध्या जपान 1.2 अब्ज येनचे खाद्यांन्न निर्यात करतो. उलट , त्याच्या सत्तर पट अधिक खाद्य वस्तूंची निर्यात भारत जपानला करीत आहे. हे चित्र विषम आहे. भारतातर्फे जपानला प्रामुख्याने प्रॉन्स, मासे, काजू, कॅस्टर ऑईल, सोयाबीन्स व अन्य वस्तूंची निर्यात होते. 2014-15 मधील आकडेवारीनुसार भारताने जपानला 796.68 दशलक्ष डॉलर्सचा कृषीजन्य माल निर्यात केला. त्याच वर्षी जपानहून भारताने केवळ 6.51 दशलक्ष डॉलर्स कृषिजन्य मालाची आयात केली. त्यात बीबियाणे, भाज्या, कॅटफिश, तिलापिया मासे आदींचा समावेश होता. 

दिल्लीच्या मंडईत काय मिळते, हे पाहण्यासाठी मायोकोशी यांनी दक्षिण दिल्लीतील "आयएनए" बाजाराला भेट दिली. खाद्यान्नांची ही मोठी मंडई आहे. तिथं त्यांना अमेरिका, चीन, कोरियाहून आलेली सफरचंदं, पेअर आदी फळभाजा दिसल्या. पण, जपानी फळे दिसली नाही. त्यामुळे ते नाराज होते. जपानने 2008 मध्ये भारतीय आंब्याची आयात सुरू केली. ते म्हणाले, की 2009 मध्ये जपानी सफरचंद आयात केली जावी, या जपानच्या प्रस्तावाला भारताने अद्याप प्रतिसाद दर्शविलेला नाही. जपानसाठी निर्यातीतील महत्वाची अडचण म्हणजे, "उत्पादित वस्तूच्या प्रत्येक खोक्‍यावर अथवा पुडक्‍यावर त्याच्या उत्पादनाची तारीख असावी," असा भारताने धरलेला आग्रह. तसेच, "वस्तूंमध्ये कोणत्या प्रकारचे घटकपदार्थ, घटकद्रव्य आदी आहेत व त्यांचे प्रमाण काय आहे, याची माहिती इंग्रजीमध्ये छापलेली असावी." मियोकोशी म्हणाले, की आंतरराष्ट्रीय मानकानुसार, पुडक्‍यावर केवळ कोणत्या तारखेच्या आत वस्तू खावी अथवा सेवन करावे, याची तारीख छापण्याची प्रथा आहे. परंतु, ती भारताला मान्य नाही. 

मियाकोशींच्या दौऱ्यात आणखी दोन महत्वाचे समझोते झाले.

  1. दोन्ही देशांदरम्यान खाद्यान्नांची "कोल्ड चेन" प्रस्थापित करण्याविषयीचा समझोता. झाला. "भारताला जपानमधील कृषीजन्य वस्तू हव्या आहेत," असे सांगून ते म्हणाले, की भारतीय शेतकऱ्यांपुढे कृषिमालाला वाजवी दर मिळण्याबाबत जी समस्या आहे, तशीच जपानमधील शेतकऱ्यांपुढेही आहे. "दोन्ही देशांनी सहकार्य केले, तर शेतकऱ्यांचे प्रश्‍न काही प्रमाणात आपण सोडवू शकू." 
  2. खाद्यान्नवस्तूंची शुद्धता व आरोग्यविषयक (फायटोसॅनिटरी) प्रमाणपत्राच्या संदर्भातील समझोता. त्यामुळे जपानी खाद्यमाल भारतात पाठविण्यात सुलभता येणार आहे. तरीही ""भारताने बाजारपेठ अजून खुली करण्याची गरज आहे,"" असे मायाकोशी यांना वाटते. 

जपानी खाद्यवस्तू लोकप्रिय करण्यासाठी जपानने येथे चालू असलेल्या आंतरराष्ट्रीय "आहार" प्रदर्शनात आपले दालन मांडले आहे. तसेच जपान दूतावासात या क्षेत्रातील भारतीय उद्योजकांना बोलावून अत्यंत कलात्मकरित्या (ओरिनिगिरी- ओरिगामी) बनविलेले रंगीबेरंगी भाताची सुशी, राईस क्रॅकर्स, वासाबी, माच्छा, उमेशू व प्रसिद्ध जपानी मद्य "साके" आदींचा स्वाद घेण्याची संधी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com