'माउली'मुळं पाय जमिनीवरच!

'माउली'मुळं पाय जमिनीवरच!

‘झेंडा’मधल्या संत्याच्या भूमिकेनंतर माझ्याकडं अनेक भूमिका आल्या; परंतु संत्याची भूमिका माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. प्रत्येक भूमिका तुम्हाला काहीतरी देत असते. ‘एक तारा’मधल्या माउलीच्या भूमिकेनं मला आयुष्याकडं बघण्याचा वेगळा दृष्टिकोन दिला. यश टिकवणं अवघड कसं असतं, ते या भूमिकेमुळं कळलं आणि पाय जमिनीवर ठेवायलाही याच ‘माउली’नं शिकवलं.

‘आणि मकरंद राजाध्यक्ष’ या दिलीप कोल्हटकर दिग्दर्शित नाटकातून माझा अभिनयाचा प्रवास सुरू झाला. व्यावसायिक रंगभूमीवर नरेन देशमुख ही पहिली भूमिका. या पहिल्याच नाटकात मला विक्रम गोखले यांच्यासारख्या दिग्गज कलाकारासोबत काम करायची संधी मिळाल्यानं माझा आत्मविश्‍वास वाढला. नरेन हा नाट्य चळवळीत जोमानं काम करणारा तरुण. मकरंद राजाध्यक्ष या सुप्रसिद्घ नटाचा तो जबरदस्त चाहता असतो. हा चाहता त्यांच्या उत्कर्षाच्या काळात तर त्याच्यासोबत असतोच, पण पडत्या काळातही त्यांची साथ सोडत नाही. ही भूमिका मला आजही फार जवळची वाटते. मला अजूनही चांगलं आठवतंय की नाटकातलं माझं काम पाहून विक्रमजींचे वडील चंद्रकांत गोखले यांनी माझं खूप कौतुक केलं होतं. ‘‘मला तुमची भूमिका खूप आवडली. तुमचे डोळे फारच बोलके आहेत,’’ असं त्यांनी मला प्रयोग संपल्यावर सांगितलं. त्यांचं शब्द आठवलं की आजही मला उभारी येते.

‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेतल्या शेखर परांजपे या व्यक्तिरेखेनं खऱ्या अर्थानं मला घराघरात पोचवलं. या मालिकेतला शेखर हा अत्यंत बिनधास्त मुलगा. जो स्वतःच्या वडिलांनाही बाबा असं न संबोधता नावानंच हाक मारतो. आपल्या तत्त्वांच्या बाबतीत अतिशय प्रामाणिक असणाऱ्या, सडेतोड बोलणाऱ्या शेखरनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली. त्यानंतर ‘वादळवाट’मधला चित्रकार शैलेश कविश्‍वर असो किंवा ‘पोलिस फाईल’मधला दिलीप कामत असो या भूमिकांनी मला रसिकांच्या अधिक जवळ नेलं.

मालिका करत असतानाच मला काही चित्रपटही करता आले. यापैकी ‘झेंडा’ चित्रपटातली ‘संत्या’ आणि ‘मोरया’ चित्रपटामधला ‘मन्या’ या माझ्या आवडत्या भूमिका आहेत.

अवधूत गुप्ते दिग्दर्शित ‘झेंडा’ चित्रपटातल्या संत्याची भूमिका एका प्रामाणिक कार्यकर्त्याची आहे. तळागाळातल्या कार्यकर्त्यांचं प्रतिनिधित्त्व करणारी ही भूमिका होती. हे कार्यकर्ते किती तळमळीनं काम करतात हे मला संत्या साकारताना लक्षात आलं. सुजय डहाके दिग्दर्शित ‘शाळा’ चित्रपटातली मांजरेकर सर ही भूमिकाही माझी अत्यंत आवडती आहे. मिलिंद बोकील यांची ‘शाळा’ ही कादंबरी मी जेव्हा वाचली होती, तेव्हाच मला ही व्यक्तिरेखा फारच आवडली होती. ज्येष्ठ साहित्यिक विश्‍वास पाटील यांच्या साहित्यकृतीवर आधारित राजीव पाटील दिग्दर्शित ‘पांगिरा’ चित्रपटातली माझी तान्या भिलारेची भूमिकाही लक्षात राहणारी आहे. तान्याची भूमिका सुरवातीला नकारात्मक आहे. कालांतरानं मात्र आपल्या गावाशी आपण किती चुकीचे वागलो हे लक्षात आल्यावर हीच भूमिका सकारात्मक होते. ‘पांगिरा’मधला तान्या भिलारे करताना मला एकाच भूमिकेतले बदल साकारता आले, एकाच भूमिकेच्या दोन शेड्‌स रंगविता आल्या.
या वेगवेगळ्या भूमिका करताना मला माझी ‘एक तारा’ चित्रपटातली भूमिका आव्हानात्मक वाटली. त्यात मला एका रॉकस्टारची भूमिका साकारायची होती. मुळात एक साधा भजन गाणारा मुलगा असतो, जो पुढं रॉकस्टॉर होतो. भजन गाणारा मुलगा ते एक रॉक स्टार हा प्रवास दाखविणं माझ्यासाठी अवघड होतं. गाण्याचा आणि माझा फारसा संबंध आला नव्हता. मला गाणी ऐकायला आवडतात, पण गाण्याचा प्रयत्न मी फारसा केला नव्हता. परंतु चित्रपटात मला एक पट्टीचा गाणारा मुलगा साकारायचा होता. या भूमिकेसाठी मला अवधूत गुप्तेची फार मदत झाली. त्यावेळी मी अवधूतकडून अनेक गोष्टी शिकलो. मी या भूमिकेसाठी त्याचं अनुकरण करत होतो.

एखादी भूमिका निवडताना माझ्यासाठी कथा फार महत्त्वाची असते. शिवाय ते नाटक, मालिका किंवा चित्रपट कोण दिग्दर्शित करतोय यावर अनेक गोष्टी ठरत असतात. शेवटी दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनातूनच ते पात्र साकारलं जाणार असतं. त्यामुळं भूमिका निवडताना कथा आणि दिग्दर्शक या दोन गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या असतात. त्याचबरोबर तुमचे सहकलाकार कोण असणार आहेत, तुमची टीम काय असणार आहे या गोष्टींचा मी विचार करतो. या सगळ्या गोष्टी माझ्या मनाला पटणाऱ्या, आवडणाऱ्या असतील तर लगेचच ती भूमिका स्वीकारतो. मी निवडलेली भूमिका साकारताना समोर तितक्‍याच तोडीची माणसे असतात. ज्यांनी आपल्यावर विश्‍वास टाकलेला असतो. त्यामुळं कुठलीही भूमिका करताना मी समोरच्या व्यक्तीच्या विश्‍वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं काम करताना एक वेगळाच उत्साह येतो आणि ते काम तुम्हाला आनंद देऊन जातं.

भूमिका स्वीकारल्यावर त्याचा सखोल अभ्यास करणारा अभ्यासू कलाकार या गटातला मी नाही. त्यामुळं कथा वाचून झाल्यावर माझा दिग्दर्शक मला जे सांगतो तसंच मी करतो. मला एखादी कथा आवडल्यावर मी ती भूमिका स्वीकारतो आणि स्वतःला पूर्णपणे दिग्दर्शकाला सोपवून देतो.
‘झेंडा’ चित्रपटातल्या ‘संत्या’नंच कलाकार म्हणून माझ्या आयुष्याला महत्त्वाचं वळण दिलं. ही भूमिका करण्याआधी मी अनेक चित्रपटांत, मालिकांत छोट्या मोठ्या भूमिका करीत होतो. पण संत्यामुळं मला चित्रपटात नायकाची भूमिका मिळाली. गुप्ते यांनी दाखविलेल्या विश्‍वासामुळंच मी इतकं उत्तम काम करू शकलो. संत्यामुळं अनेक निर्मात्यांचं, दिग्दर्शकांचं लक्ष माझ्याकडं वळलं. माझ्याकडं वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका येऊ लागल्या. या भूमिकेनं माझ्या आयुष्याला एक कलाटणीच मिळाली.

विविध भूमिका आपल्याला माणूस म्हणून काहीतरी देऊन जातात. ‘एक तारा’ चित्रपटातल्या ‘माऊली’नं आयुष्याकडं पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन मला दिला. तुमच्या आयुष्यात तुम्हाला यश मिळवायला कष्ट करावे लागतात हे सर्वमान्य सत्य आहेच. परंतु मिळालेलं यश टिकवून ठेवायला त्यापेक्षा जास्त कष्ट करावे लागतात हे मला ‘एक तारा’मधल्या माऊलीनं शिकविले. कलाकार म्हणून आपण कितीही मोठे झालो तरी माणूस म्हणून आपले पाय नेहमीच जमिनीवर असले पाहिजेत ही शिकवण मला माऊलीची भूमिका देऊन गेली.

माझ्या अनेक भूमिकांसाठी माझं कौतुकही झालं. ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर एकदा मला म्हणाले होते की, ‘‘संत्या फार कमी कलाकार असे आहेत की ज्यांनी बोलायच्या आधीच त्यांच्या डोळ्यातून कळते त्यांना नेमके काय म्हणायचे आहे. अशा काही मोजक्‍या कलाकारांपैकी तू एक आहेस. डोळ्यांच्या माध्यामातून बोलणारे कलाकार फार कमी असतात आणि ही मंडळी जे काही बोलू शकतात ती एक वेगळी ताकद असते. जी तुझ्याकडे गॉड गिफ्टेड आहे.’’ मला एक तारा चित्रपटाचाही एक किस्सा आठवतो. या चित्रपटात मला आधी कास्ट करणार नव्हते, या भूमिकेसाठी जसं दिसणं अपेक्षित आहे तसा मी वाटणार नाही असं अभिनेते सचिन पिळगावकर म्हणाले होते. पण ‘एक तारा’ जेव्हा त्यांनी पाहिला त्यानंतर मात्र लगेचच सगळ्यांसमोर येऊन त्यांनी मला घट्ट मिठी मारली आणि म्हणाले की, ‘‘तुझ्या कास्टिंगच्या वेळी मी म्हणालो होतो की या रोलसाठी संत्या योग्य दिसणार नाही, पण आता चित्रपट पाहिल्यावर मला असं वाटतंय की, या रोलसाठी तू नाहीस तर दुसरं कोणीच नाही.’’ आपण केलेल्या कामाचे कौतुक झाले की कलाकाराला कायमच प्रोत्साहन मिळते.

मला नेहमी असं वाटतं की प्रत्येक माणसात चांगला आणि वाईट असे दोन अंश असतात. त्यामुळं कलाकार म्हणून मी साकारत असलेल्या भूमिकेचा काही अंश हा प्रत्येक कलाकारात निसर्गतः असतोच. तो नेमका अंश ओळखून कलाकारानं त्याला व्यापक रूप द्यायचं असतं. ‘झेंडा’तील संत्या काहीसा माझ्यात होता किंवा ‘अस्सं सासर सुरेख बाई’मधील यश महाजन माझ्यात कुठंतरी आहे. भूमिकेतला आणि माझ्यातला तो समान अंश मी नेहमी शोधत असतो.
मी आजवर साकारलेल्या भूमिकांनी मला अनुभवांची मोठी शिदोरी दिली आहे. या शिदोरीत अनेक किस्से आहेत, चांगले-वाईट अनुभव आहेत. या शिदोरीतील चांगल्या - वाईट दोन्ही अनुभवांचा वापर करूनच मी माझा पुढचा प्रवास करतोय. या पुढच्या प्रवासात मला अनेक चांगले चित्रपट करायचे आहेत...उत्तम दिग्दर्शकांसोबत काम करायचे आहे...अनेक चांगल्या भूमिका साकारायच्या आहेत.

(शब्दांकन - शाल्मली रेडकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com