करिअरच्या चिंतेनं हरवलं मानसिक स्वास्थ्य!

world mental health day
world mental health day

सध्यस्थितीत कोरोनाचे संकट कधी जाईल याबाबत अनिश्चितता आहे. कोरोनाच्या काळात संपूर्ण जगाला काही ना काही तरी शिकायला मिळालं. आपल्या मूळ गरजा समजल्या. त्याचबरोबर अनेक व्याधींनीही माणसाला ग्रासलं. एकटेपणा, नोकरी-व्यवसाय बुडाल्यामुळं वाढलेली चिंता आणि त्यातून येणारं नैराश्य हा जगातला आजचा सर्वांत मोठा प्रश्न बनलाय.

नैराश्यग्रस्त व्यक्ती असलेल्या देशात भारताचा सहावा क्रमांक लागतो. १० ऑक्टोबर हा जागतिक मानसिक स्वास्थ्य दिवस. यानिमित्त जागतिक आरोग्य संघटनेकडून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जगभरात एकूणच मानसिक आरोग्याबद्दल जी उदासीनता आहे ती दूर करण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे. कोरोनाचे संकट आणि त्यामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळातला हा तणाव काय आहे याबद्दल एक सर्वेक्षण करण्यात आलंय. त्यातील निष्कर्ष धक्कादायक असे आहेत. 

2020 : आकांक्षांवर फिरले पाणी 
2019च्या मावळत्या संध्येला मौज करत अनेकांनी 2020मधील नवनवीन योजना आखायला सुरुवात केली. विद्यार्थीदशेत असणाऱ्या किंवा विद्यार्थीदशेतून नुकत्याच बाहेरच्या जगात पाऊल ठेवणाऱ्यांसाठी हा काळ मोठा उमेदीचा होता. येणारं वर्ष आपला उत्कर्ष करून घेण्य़ाच्या दृष्टीने किती महत्वाचं आहे, याचा गांभीर्याने विचार करून प्रत्येकजण प्रयत्नशील होण्याची इच्छाशक्ती मनात तयार करत असतानाच एका अदृश्य शत्रूने हाहाकार उडवला. स्वप्नांवर, आकाक्षांवर पाणी फेरण्यासाठी चीनमधून अदृश्य बाहेर पडला होता. सुरूवातीच्या काळात याचं काहीही कौतुक न वाटणाऱ्या तरूणांना हा किती गंभीर प्रश्न घेऊन बाहेर पडला आहे याचा अंदाजही आला नव्हता.

कोरोनाच्या या भयानक परिस्थितीत गेले काही महिने आपणा सर्वांना लॉकडाऊनमध्ये घरातच, एकाच ठिकाणी बंदीस्त राहावे लागले. अनेकांची घरूनच कामे सुरू होती. काहीजण मात्र घरच्यांसाठी रिकामटेकडेच होते. याचे गंभीर परिणाम अनेकांच्या मानसिकतेवर जाणवून आले. याबाबतीत कोरोनाकाळात आणि विशेषतः लॉकडाऊनच्या परिस्थितीत केलेल्या एका सर्वेक्षणानुसार समोर आलेले निष्कर्ष गंभीर असल्याचं दिसून येतंय.

काही दिवसांपूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार, जगातील फारच थोड्या लोकांना योग्य मानसिक उपचार मिळतात, अशी माहिती समोर आली होती. कमी आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशातील ७५ टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांना मानसिक ताण-तणावाचे उपचार अजिबातच मिळत नाहीत. यामध्ये मेंदूचे विकार आणि अंमली पदार्थ्यांच्या आहारी गेलेल्या लोकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. 

कोरोनाकाळात सोशल डिस्टन्सिंग पाळणे सक्तीचे होते. यामुळे मानसिक ताण-तणावाच्या समस्या असलेल्या रूग्णांना डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटण्याच्या मर्यादा आल्या. कोरोनाच्या महामारीत अनेक मानसोपचार तज्ज्ञ, डॉक्टर व दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे या सेवांवर मर्यादा आल्या.

कोणाचा सहभाग?
याबाबत एका सर्वेक्षणानुसार काही गोष्टी समोर आल्या असून, त्यातून अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. लॉकडाऊनच्या दरम्यान विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर झालेला परिणाम सर्वेक्षणानुसार समोर आला. या सर्वेक्षणात  ६४ टक्के मुले आणि ३६ टक्के मुलींनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हे सर्व विद्यार्थी 18 ते 30 वर्षे वयोगटातील आहेत. 

सर्वेक्षणातील निष्कर्ष?
लॉकडाऊनमध्ये महाविद्यालये बंद होती. परीक्षांबद्दलही अनिश्चितता होती. यामुळे विद्यार्थ्यांना, 'तुम्ही आपल्या करिअरबद्दल चिंतीत आहात का?, असा प्रश्न विचारल्यावर त्यातील ९३.१ % विद्यार्थ्यांनी 'हो' असे उत्तर दिले. परीक्षांबद्दल राज्य सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांच्यातील मतभेद न्यायालयातपर्यंत गेले. यामध्ये तीन ते चार महिन्यांचा कालावधी गेल्यानंतर परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. यामुळे विद्यार्थ्यांना आता कोरोना महामारीत परीक्षेला सामोरे जाण्याची मानसिक तयारी दाखवावी लागणार आहे.

कोणी गांभीर्यानं घेतं का? 
लॉकडाऊनच्या काळात सोशल डिस्टन्सिंगचे नियम असल्यामुळे अनेकांना घराबाहेर पडता आले नाही. यामुळे लोकांच्या भेटीघाटी होणे, काहीकाळ का होईना घराबाहेर असणे, या गोष्टी करताच येणार नव्हत्या. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकटेपणाची जाणीव व्हायला सुरूवात झाली. धक्कादायक बाब म्हणजे ३७.९ टक्के विद्यार्थ्यांमध्ये याची तीव्रता अधिक होती. तर ४१.४ टक्के विद्यार्थ्यांना सौम्य स्वरूपात एकटेपणा जाणवला. या काळात मानसिक ताण-तणावाचे प्रश्न उपस्थित झाल्यामुळे अनेक विद्यार्थी मेडिटेशनकडेही वळल्याचे समोर आले. महत्वाचे म्हणजे एकूण विद्यार्थ्यांमधील ४६.५ टक्के विद्यार्थी मेडिटेशनची मदत घेत असल्याचे समोर आले. लॉकडाऊन दरम्यान, विद्यार्थ्यांना इतरही अनेक समस्या जाणवल्या, ज्या त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करणाऱ्या होत्या.

अनेकांना याकाळात स्थलांतर करावे लागले. स्थलांतराच्या विविध सरकारी नियमांनी विद्यार्थी बेजार झाले होते. ऑनलाईन शिक्षणपद्धतीत काही विद्यार्थ्यांना नेटवर्कचीही समस्या होती. घरातील उत्पन्न कमी झाल्याने आर्थिक अडचणी प्रचंड प्रमाणात जाणवल्या. अशा एक ना अनेक समस्या विद्यार्थ्यांनी बोलून दाखवल्या. या सर्वांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या एकंदरीत मानसिक स्वास्थ्यावर झालेला दिसून आला. 

"लॉकडाऊनमध्ये रूग्णांना प्रत्यक्ष भेटता नाही आले तरी, आम्ही ऑनलाईन पद्धतीने समुपदेशन आणि सूचना देत होतो. रूग्णसंख्येतील वाढ लक्षात घेता शासनस्तरावर मानसिक ताण-तणावाच्या नियोजनासाठी एखादी हेल्पलाईन सुरू होणे गरजेचे आहे. मानसिक ताण-तणावांच्या प्राथमिक उपचारासाठी सरकारने शहरी व ग्रामीण स्तरावर लोकसंख्येच्या घनतेनुसार समुपदेशन केंद्र उभारायला हवेत."
- गौरी जानवेकर, मानसोपचार तज्ञ

मानसिक आरोग्याकडं दुर्लक्षच-
भारताच्या एकूण जीडीपीपैकी आरोग्यावर 3.6 % इतका खर्च केला जाते. यातही मानसिक आरोग्यावर होणारा खर्च अत्यल्प आहे. २०१९च्या जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात २० कोटी लोकांना प्रत्यक्ष मानसिक आरोग्याच्या सुविधांची आवश्यकता आहे. आता खरी गरज आहे ती मानसिक ताण-तणावावर मात करून मानसिक आरोग्याबाबत आपण सजग होण्याची. ती आपली जबाबदारी आहे. शेवटी निरोगी आणि आनंदी आयुष्य हा प्रत्येकाचा अधिकार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com