'ओरिजिनल' विनोदकार! (मिलिंद घांग्रेकर)

मिलिंद घांग्रेकर gmilind@gmail.com
रविवार, 3 जून 2018

शिरीष कणेकर यांचा विनोद हा पूर्णपणे स्वतःची छाप/शैली असणारा विनोद असतो. मराठीतल्या अन्य काही विनोदी साहित्यकारांवर जसा पाश्‍चात्य लेखकांचा छाप कळत-नकळतपणे जाणवतो, तसा तो कणेकरांच्या विनोदी लेखनावर जाणवत नाही. त्यांचा विनोद म्हणजे मुंबईचा निर्भेळ विनोदप्रकार आहे, मुंबईची भेळ असावी ना तसा. त्याच्यात "ओरिजिनॅलिटी' आहे.

शिरीष कणेकर येत्या सहा जूनला पंचाहत्तरी पूर्ण करत आहेत. "कणेकरांनी वयाच्या शंभराव्या वर्षापर्यंत आपली फटकेबाजी सुरू ठेवावी,' अशा त्यांना यानिमित्तानं एक सच्चा चाहता या नात्यानं माझ्या शुभेच्छा!

शिरीष कणेकर यांचा विनोद हा पूर्णपणे स्वतःची छाप/शैली असणारा विनोद असतो. मराठीतल्या अन्य काही विनोदी साहित्यकारांवर जसा पाश्‍चात्य लेखकांचा छाप कळत-नकळतपणे जाणवतो, तसा तो कणेकरांच्या विनोदी लेखनावर जाणवत नाही. त्यांचा विनोद म्हणजे मुंबईचा निर्भेळ विनोदप्रकार आहे, मुंबईची भेळ असावी ना तसा. त्याच्यात "ओरिजिनॅलिटी' आहे.

शिरीष कणेकर येत्या सहा जूनला पंचाहत्तरी पूर्ण करत आहेत. "कणेकरांनी वयाच्या शंभराव्या वर्षापर्यंत आपली फटकेबाजी सुरू ठेवावी,' अशा त्यांना यानिमित्तानं एक सच्चा चाहता या नात्यानं माझ्या शुभेच्छा!

पत्रकारिता, स्तंभलेखन, क्रिकेटवरचं पहिलं पुस्तक, पुढं हिंदी सिनेमांवरचं जिज्ञासू वृत्तीनं केलेलं अभ्यासपूर्ण आणि स्वतःची मत असलेलं लेखन आणि मग ललित लेखन असा कणेकर यांचा प्रदीर्घ प्रवास आहे. या सगळ्या प्रवासात त्यांना ललित लेखनाचा सूर सापडला आणि त्यातून निर्माण झाला "कणेकर' नावाचा ब्रॅंड. यात कणेकरांनी लिहिलेली "यादों की बारात' आणि "फिल्लमबाजी' ही सिनेमावरची पुस्तकं म्हणजे दीपस्तंभच. "फिल्लमबाजी' 1980 मध्ये प्रकाशित झालं. ही दोन्ही पुस्तकं प्रकाशित होईपर्यंत अशा प्रकारच्या लेखनप्रकाराचा बाज म्हणजे नट-नट्यांची प्रेमप्रकरणं, त्यांचा आचरटपणा सांगणारे किस्से, त्यांच्या नामावल्या आणि सनावळ्या आणि मग उरलंच तर त्यांच्या चित्रपटांची कथा असा काहीसा असे. हा पायंडा मोडायचं काम केलं ते कणेकर यांनी. अभिनेत्यांची थेट नावं घेऊन आपली परखड मतं आपल्या खास शैलीत मांडायला सुरवात कणेकर यांनी केली. उदाहरणार्थ ः "ताजमहल'मधल्या प्रदीपकुमारबद्दल लिहिताना त्यांनी म्हटलं ः " या सिनेमात प्रदीपकुमारनं हाती धरलेल्या तलवारीनं तो फार फार तर कोथिंबिरीची जुडी कापू शकेल!' कणेकर हे खरंतर दिलीपकुमार यांचे भक्त. मात्र, दिलीपकुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या "शक्ती' या सिनेमातल्या अभिनयाविषयी कणेकर लिहितात ः "अमिताभ या सिनेमात अभिनयाची कमालीची उंची गाठतो. एका पाठलागदृश्‍यात अमिताभ हा दिलीपकुमारला मागं टाकत पुढं निघून जातो, त्याच धर्तीवर अमिताभ या सिनेमात अभिनयातही दिलीपकुमारच्या पुढं निघून गेला आहे...' असं थेट लिहिण्याचं धाडस दाखवत कणेकर यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. "फिल्म ऍप्रिसिएशन' हा शब्द फार नंतर प्रचलित झाला. मात्र, सन 1970 ते 80 दशकातल्या पिढीला ही "फिल्म ऍप्रिसिएशन'ची कला कणेकर यांच्या लेखनातूनच अवगत झाली. कधी मार्मिक पद्धतीनं, तर दिग्दर्शकाची खिल्ली उडवत त्यांनी वाचकांनाही ही कला शिकवली. त्या काळात प्रदर्शित झालेल्या सगळ्या चांगल्या-वाईट सिनेमांविषयी कणेकर यांनी लिहिलं. त्यातून आमची पिढी शिकत गेली.
पुढं यातूनच निर्माण झाले ते भारतातल्या पहिल्यावहिल्या "स्टॅंडअप टॉक शो'चं रसायन. हा काळ 1980 चा होता, हे लक्षात घ्यायला हवं. कारण, टीव्ही, माध्यमं यांद्वारे अशा शोला प्रेक्षकवर्ग मिळू शकण्याचा तो काळ नव्हता.

याआधी अनेक एकपात्री प्रयोग किंवा कथाकथन आदी आपल्याकडं होत असे; पण कणेकरांनी हा "पाथब्रेकिंग' प्रकार भारतात प्रथमच आणला. साहजिकच तो प्रचंड लोकप्रिय झाला. त्याची जादू कायम आहे व परदेशात त्याला अजूनही मागणी आहे. या प्रयोगाच्या शंभराव्या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आले होते. हा प्रयोग पाहण्याचं भाग्य मला लाभलं. या प्रयोगात शेवटच्या प्रश्‍नोत्तराच्या भागात पाटेकर आणि कणेकर यांची जुगलबंदी रंगली होती. ती अत्यंत वेधक आणि संस्मरणीय ठरली. या कार्यक्रमाच्या "स्टॅंडअप फॉरमॅट'ला धरून कणेकरांनी त्यांच्या दुसऱ्या आवडत्या विषयावर म्हणजेच क्रिकेटवर आधारलेला "फटकेबाजी' हा शो श्रोते-प्रेक्षकांपुढं आणला. हा कार्यक्रमही अत्यंत लक्षवेधी ठरला. क्रिकेटच्या आकडेवारीत न गुंतता गाजलेल्या खेळाडूंची खेळण्याची शैली, त्यांचे किस्से आणि त्यांचे विक्रम-पराक्रम, तसंच काही प्रमाणात त्यांची शल्यं आणि सौंदर्यस्थळं दाखवणारा हा कार्यक्रम होता. हा वरवर विनोदी वाटणारा कार्यक्रम अत्यंत गांभीर्यपूर्वक काही सांगून जायचा. या कार्यक्रमातून कणेकर यांनी सांगितलेले डॉन ब्रॅडमन यांचे किस्से, त्यांची अतुलनीय कामगिरी व त्यांचा साधेपणा व त्यावर कणेकरांनी केलेलं भाष्य अविस्मरणीयच. क्रिकेटचा सच्चा चाहता, अस्सल क्रिकेटप्रेमी असणाऱ्या कणेकरांची मी नैरोबीच्या आमच्या वास्तव्यात तिथल्या ओडुम्बे या क्रिकेटपटूशी गाठ घालून दिली, तेव्हा कणेकरांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता.

कणेकरांचं ललित लेखन म्हणजे थोडं चुरचुरीत, थोडंसं चटपटीत, थोडंसं चावट...असं एक अजब मिश्रण होय. नामवंत विनोदी साहित्यिकांच्या लेखनाहून कणेकराचं हे लेखन काही वेगळंच आहे. या लेखनात स्वतःचं व्यक्तिमत्त्व आहे, स्वतःचा बाज आहे. कणेकरांचा विनोद हा पूर्णपणे स्वतःची छाप/शैली असणारा विनोद असतो. अन्य विनोदी साहित्यकारांवर जसा पाश्‍चात्य लेखकांचा छाप कळत-नकळतपणे जाणवतो तसा कणेकरांच्या विनोदी लेखनावर तो जाणवत नाही.
कणेकर यांचा विनोद हा मुंबईचा निर्भेळ विनोदप्रकार आहे. मुंबईची भेळ असावी ना तसा! त्याच्यात "ओरिजिनॅलिटी' आहे. कणेकरांनी मराठी साहित्यात नवा लेखनप्रकार आणला व तो आता "कणेकरी' या नावानं अमर झालेला आहे. यातूनच निर्माण झाला त्यांचा तिसरा टॉक शो "कणेकरी'. याला नवनवीन श्रोतृवर्ग-प्रेक्षकवर्ग लाभतच राहणार. कारण, त्यांचं "मास अपील' कायम राहणारं आहे.

अशा या वेगवेगळ्या साहित्यप्रकारांत तब्बल 30 वर्षं "खेळल्या'नंतर अत्यंत गंभीर लेखनप्रकाराकडं वळणं आणि तो समर्थपणे हाताळणं हे केवळ कणेकरच करू जाणोत. या प्रकारातली त्यांची पुस्तकं म्हणजे "डॉ. कणेकरांचा मुलगा' (आत्मपर), "गोतावळा' (व्यक्तिचित्रण) तसंच "डॉलरच्या देशा' (प्रवासवर्णन). कणेकरांच्या गंभीर लेखनाची साक्ष ही पुस्तकं देतात. अशाच गंभीर विषयाला धरून ते सध्या "ह्या कातरवेळी' हा टॉक शो सादर करतात. माझ्या मते, हा शोदेखील मराठी नाट्यसृष्टीतला एक महत्त्वाचा टप्पा ठरावा, एवढं सामर्थ्य त्यात आहे.

कलाकार म्हणून तर कणेकर मला आवडतातच; पण एक व्यक्ती म्हणूनही मला ते खूप भावून गेले. ते 2002 मध्ये नैरोबीला आमच्या घरी राहायला आले होते. नैरोबी महाराष्ट्र मंडळात "कणेकरी' हा त्यांचा कार्यक्रम त्या वेळी होता. समोरच्या व्यक्तीला जपण्याची त्यांची हातोटी आम्हा सगळ्यांनाच तेव्हा फार भावून गेली. आज इतकी वर्षं मध्ये जाऊनही आमची प्रेमानं विचारपूस करणारे कणेकर मला माणूस म्हणून खूप मोठे वाटतात. त्यांना पुढील आयुष्यात आणखी यश लाभो. वाचकांचं प्रेम आणि उत्तम आरोग्य लाभो अशी प्रार्थना.

Web Title: miliind ghangrekar wrtie article in saptarang