
अभिनव आणि मौलिक संदर्भग्रंथ
निसर्ग - पर्यावरणाशी माणसाचे अतूट नाते आहे, असे असूनही त्याच्याशी संबंधित अनेक संज्ञा आणि संकल्पना सर्वसामान्य माणसांना ज्ञात नसतात. विद्यार्थ्यांसाठीच्या पाठ्यपुस्तकात त्या अनेकदा क्लिष्ट भाषेत दिलेल्या असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे आकलन होत नाही. विषय शिक्षकांनाही विषयाशी निगडीत संज्ञा आणि संकल्पना स्पष्ट करणारे विपुल संदर्भग्रंथ उपलब्ध नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. निसर्ग-पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणार्या व्यक्ती आणि संस्थांनी इंग्रजी शब्दांना समर्पक मराठी पर्याय शोधले.
त्या संज्ञांचे एकत्रीकरण आणि प्रमाणीकरण करताना अचूकतेला सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन पर्यावरणशास्त्राच्या अभ्यासक वर्षा गजेंद्रगडकर यांनी ‘पर्यावरणाच्या परिघात’ हा निसर्ग-पर्यावरणाच्या संज्ञा-संकल्पनांचा परिचय आणि विश्लेषण करणारा अभिनव आणि मौलिक संदर्भग्रंथ सिद्ध केला आहे. निसर्ग-पर्यावरणाला वाहिलेला हा मराठीतला पहिलाच संदर्भग्रंथ आहे. चित्रकार राजू देशपांडे यांनी देखणे मुखपृष्ठ काढले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने तो प्रकाशित केला आहे.
नव्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, मातृभाषेतून देण्यावर भर दिलेला आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण मराठीतून घेता येणे आता शक्य झाले आहे. सर्वच ज्ञान शाखांच्या बाबतीत या प्रकारची सुविधा विद्यार्थ्यांसाठी लवकरच उपलब्ध होईल. जगातील ज्या देशांनी मातृभाषेतून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देण्याची योजना राबविली. त्या देशांनी प्रथम त्या ज्ञानशाखांची पाठ्यपुस्तके आणि संदर्भग्रंथ मातृभाषेत तयार केले, त्यामुळे मातृभाषेतून उच्चशिक्षण देण्याचा त्यांचा प्रयोग यशस्वी झाला. मराठीत तो प्रयोग यशस्वी होण्यासाठी आपल्यालाही त्यांचे अनुकरण करावे लागेल.
नव्या शैक्षणिक धोरणामध्ये आंतर विद्या शाखीय आणि बहुविद्याशाखीय अभ्यासाची आणि संशोधनाची दृष्टी विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. याचा विचार करताना या अभिनव संदर्भग्रंथाचे मोल लक्षात येते. मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी विविध ज्ञानशाखांशी निगडीत अशा संदर्भ ग्रंथांची निर्मिती होणे गरजेचे आहे.
डॉ. वर्षा गजेंद्रगडकर यांनी सिद्ध केलेल्या ग्रंथात बाराशे संज्ञा आणि संकल्पनांचा समावेश आहे. स्पष्टीकरणासाठी आवश्यक तिथे आकृत्या आणि चित्रांचा आधार घेतलेला आहे. पर्यावरणाच्या परिघाचा विचार करताना भारतीय उपखंडावर या संदर्भग्रंथात विशेष भर दिलेला आहे. नैसर्गिक इतिहासापासून ते पर्यावरण संज्ञापना सारख्या आधुनिक ज्ञान शाखेपर्यंतचा मोठा पैस या संदर्भग्रंथाने कवेत घेतला आहे. या संदर्भग्रंथाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी सुलभ आणि सोप्या भाषेत केलेले संज्ञा-संकल्पनांचे स्पष्टीकरण, त्यात कुठेही रुक्षता नाही. त्यामुळे त्या समजून घेणे सोपे जाते.
काही संज्ञांच्या बाबतीत स्पष्टीकरण देताना त्यांचा उगम कुठे व कसा झाला त्याचा प्रथम वापर कुणी व कुठच्या संदर्भात केला याचा रंजक इतिहास सांगत वैज्ञानिक प्रगतीचा झालेला प्रवास त्यांनी ललित रम्य शैलीत अधोरेखित केलेला आहे. पर्यावरणशास्त्राची व्याप्ती खूप मोठी आहे. जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, भूशास्त्र, भूगोल, हवामानशास्त्र, वातावरण विज्ञान, सामुद्री विज्ञान अशा अनेक विद्याशाखा पर्यावरणशास्त्राच्या परिघात येतात.
गजेंद्रगडकर यांनी सजीव सृष्टीला केंद्रस्थानी ठेवून या ग्रंथातल्या संज्ञा-संकल्पनांची निवड केली आहे. सृष्टी विज्ञानावर त्यांनी लक्ष केंद्रित केलेले आहे. त्यामागे पर्यावरण रक्षणसंवर्धनाच्या प्रयत्नांना मदत करणारे अकादमिक साधन विकसित करण्याचे व्यापक उद्दिष्ट आहे.
कोणतीही ज्ञान शाखा स्वतंत्र नसते. इतर ज्ञानशाखांच्या पारंब्यांनी ती वेढलेली असतेच. पर्यावरणशास्त्र देखील त्याला अपवाद नाही. पर्यावरण विषयक प्रश्नांच्या मुळाशी जाताना अर्थशास्त्र, समाजशास्त्र, लोकसंख्याशास्त्र, राजकारण अशा विषयांचाही विचार करावा लागतो. वर्षा गजेंद्रगडकर यांनी संज्ञा-संकल्पनांचे विश्लेषण करताना या सर्व विषयांचे पर्यावरणाशी असलेले दुवे स्पष्ट केलेले आहेत. ‘पर्यावरणीय संज्ञापन’ (Environmental Comunication) ही नवी विद्याशाखा आज विकसित होत आहे. ही विद्याशाखा निसर्ग-पर्यावरण विषयक प्रश्नांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि अनेकदा ते प्रश्न सोडविण्यासाठी ही मदत करते. या विद्याशाखेतल्या निवडक संज्ञांचाही समावेश या संदर्भ ग्रंथात केलेला आहे. हे या संदर्भ ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.
या संदर्भग्रंथात वर्षा गजेंद्रगडकर यांनी जल, जंगल, जमीन ही नैसर्गिक संपत्ती आणि पशु- पक्षी- वनस्पती यांचे विश्व अधिक सविस्तर आणि तपशीलवार उलगडले आहे त्यामागे या क्षेत्रात नव्याने काम करू इच्छिणार्यांना कामाची व्याप्ती लक्षात येऊन कामासाठीच्या कोणत्या दिशा उपलब्ध आहेत याची जाणीव व्हावी हा उद्देश आहे. तो स्तुत्य आहे. पर्यावरणाचा बळी देऊन विकास कामांची उभारणी करणाऱ्या व्यवस्थांविरुद्ध पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणार्या संस्था-संघटनांनी चळवळी आणि आंदोलने केली. या चळवळी आणि आंदोलनांमुळे काळाच्या त्या त्या टप्प्यावर घडलेले बदल वाचकांपुढे ठेवताना गजेंद्रगडकर यांनी चिपको आंदोलन, नर्मदा प्रकल्प, सायलेंट व्हॅली प्रकल्प अशा राष्ट्रीय स्तरावरच्या निवडक प्रकल्पांची, त्यांना झालेल्या विरोधाची, त्या विरोधांमागच्या कारणाचीही माहिती वाचकांसाठी या संदर्भ ग्रंथांत दिलेली आहे.
दिवसें दिवस मराठी साहित्य विश्वात वाचकांकडून अनुवादित साहित्याची मागणी वाढते आहे. गेल्या काही वर्षांत वाचनसंस्कृतीचा पोत बदलत असताना ललित साहित्याबरोबरच ज्ञानलक्ष्यी अनुवादित साहित्याची मागणी वाढते आहे. हा संदर्भग्रंथ वैज्ञानिक अनुवादाच्या विशेषत: पर्यावरण विषयक अनुवादाच्या क्षेत्रात काम करणार्या अनुवादकांसाठी उपयुक्त आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालक, अभ्यासक, कार्यकर्ते, संस्था, माध्यमे, अनुवादक आणि ज्ञान लालसा असणारे जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा बृहतसंदर्भग्रंथ अनमोल ठेवाच आहे. उद्याच्या जागतिक पर्यावरण दिनाचा विचार करता अशा प्रकारच्या पुस्तकांचं महत्त्व खूपच आहे.
पुस्तकाचं नाव : पर्यावरणाच्या परिघात
लेखिका : वर्षा गजेंद्रगडकर
प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई
पृष्ठं : ५१२ मूल्य : २५६ रुपये.