बहुत सुकृताची जोडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dehare grampanchyat

देहेरे ग्रामपंचायतीतल्या नवापाड्याची एक गोष्ट. हा अगदी छोटा म्हणजे २२-२३ घरांचा पाडा. अजून पाड्यापर्यंत जाणारा पक्का रस्ता नाही.

बहुत सुकृताची जोडी

चळवळीत काम करताना अनेक अनुभव हे आम्हाला ऊर्जा देणारे ठरले आहेत. मानवी वृत्तीनुसार कधी कुणीतरी दगाफटका करण्याचा प्रयत्न करतो, त्यातून विश्‍वासाला तडाही जाण्याची भीती असते. तो विश्‍वास कायम राहावा म्हणून आपल्यातीलच काहीजण तो दगाफटका हाणून पाडतात. कधी आपण करत असलेल्या कार्याची पोच म्हणून गावकरी ‘शाबासकी’ची भेट देतात. अशाच काही प्रसंगांची आठवण...

देहेरे ग्रामपंचायतीतल्या नवापाड्याची एक गोष्ट. हा अगदी छोटा म्हणजे २२-२३ घरांचा पाडा. अजून पाड्यापर्यंत जाणारा पक्का रस्ता नाही. त्यासाठी खटपट, संघर्ष चालू आहेच. या पाड्याने पेसा कायद्याखाली प्रस्ताव केला आणि ग्रामसभा वेगळी करून घेतली. पुढे पेसा टीएसपी निधी या गावाला मिळाल्यानंतर त्यांनी त्या निधीतून खुर्च्या खरेदी केल्या. आता ग्रामसभेत सगळे नागरिक खुर्चीत बसतात. आतापर्यंत पंचायतीत होणाऱ्या ग्रामसभेत सरपंच, पंच, सरकारी पाहुणे हेच खुर्चीत बसत. नागरिक जमिनीवर. आता नवापाड्यात परिस्थिती बदलली.

अध्यक्ष निवडणे, मग अध्यक्षांनी सचिव नामनिर्देशित करणे, प्रत्येक ठरावाला सूचक व अनुमोदक म्हणून नागरिकांनी आपली नावे देणे, इतिवृत्त लिहून काढणे आणि सर्वांना वाचून दाखवणे, या सर्व गोष्टी गावातल्या सर्वांना सवयीच्या झाल्या आहेत. ग्रामसभेच्या बैठकीत परस्परविरोधी मतेही मांडली जातात. खुल्या दिलाने चर्चा होऊन निर्णय होतो. पण या पाड्याची एक विशेष गोष्ट सांगायची अशी की, मागच्या उन्हाळ्यात वयम् चळवळीच्या स्वस्थ विकास प्रकल्पात नवापाडा सहभागी होता. इथे एका विहिरीचे काम वयम् चळवळ आणि ग्रामसभेने मिळून केले. अशा कामात ‘वयम्’ची पद्धत अशी असते की, बाहेरचा कंत्राटदार घ्यायचा नाही.

गावाला पूर्ण बजेट ‘वयम्’चे कार्यकर्ते समजावून सांगतात. नंतर लोकांनी ग्रामसभेतच दोन जबाबदार व्यक्ती कामाच्या व्यवस्थापनासाठी निवडायच्या असतात. या व्यक्तींनी विहिरीच्या रोजच्या कामाचे मस्टर लिहून ठेवायचे, माल खरेदी करायला जव्हारला यायचे, रोजच्या मालाचा विनियोगही लिहायचा, उरलेला माल सुरक्षित ठेवायचा, अडचणी आल्या तर सोडवायच्या. -यासाठी या व्यक्तींना काही हजार रुपये मानधन ‘वयम्’ देणार असते. तेही पूर्ण गावाला माहीत असते. शेवटी काम पूर्ण झाले, की विहिरीच्या लोकार्पणाच्या वेळी सर्व जमा-खर्च वाचून दाखवला जातो. दर आठवड्याला एक दिवस सर्वांचे श्रमदान असते. श्रमदानाच्या मूल्याएवढी रक्कम वयम् चळवळ नंतर गावाच्या कोषात भेट देते. ती भेटही लोकार्पणाच्या कार्यक्रमातच दिली जाते.

नवापाड्याच्या बाबतीत असे झाले की त्यांनी एका मस्टरमध्ये प्रत्यक्ष कामापेक्षा दोन दिवस जास्त लिहिले होते. लोकांवर विश्वास ठेवायचा, हे ‘वयम्’चे धोरण असल्यामुळे कार्यकर्त्यांनी नवापाडा ग्रामसभेपुढे मस्टर वाचले आहे म्हणजे ते खरे आहे, असे म्हणून खर्चात तेवढी मजुरी धरली आणि गावाला हस्तांतरितही केली. काम पूर्ण होता होता गावकऱ्यांच्या हे लक्षात आले. रवींद्रदादा, जयरामदादा, मुक्ताताई, सीताताई, मीनाक्षीताई, बेबीताई या गावातल्या समितीच्या चर्चेत ही गोष्ट आली. त्यांनी चक्क लोकार्पणाच्या कार्यक्रमात ही बाब जाहीरपणे सांगून ती रक्कम ‘वयम्’ला परत केली.

त्र्यंबक तालुक्यातले काम नव्याने सुरू झाले, तेव्हा तिथल्या एखाद्या गावातच आम्ही प्रशिक्षण शिबिर घेत असू. चळवळीच्या सुरुवातीपासूनची पद्धत अशी की, शिबिराला येणाऱ्या सर्वांनी तीस-चाळीस रुपये वर्गणी काढायची. दोन दिवसांच्या जेवणखाणाचा थोडा खर्च त्यातून सुटत असे. शिबिराच्या शेवटी जमा-खर्च वाचून दाखवायचा. त्यात एकूण खर्च किती झाला, त्यातले आपल्या वर्गणीतून किती भागले आणि ‘वयम्’ने किती घातले हे सर्वांपुढे यायचे.

काही वेळा ज्या गावात शिबिर आहे, तिथला एखादा कार्यकर्ता एक वेळची भाजी त्याच्या मळ्यातून आणून द्यायचा किंवा कोणी एखादा कोंबडा द्यायचा. असे अनुभव आम्ही अनेकदा घेतले होते. पण त्र्यंबकच्या धायटीपाड्यात निवासी शिबिर झाले, तेव्हा यापुढचा अनुभव आला. त्या शिबिराला इतर गावांमधून आलेले १५ जण आणि त्या पाड्यातले १०-१२ जण अशी संख्या होती. गावातले जे लोक व्यवस्था सांभाळत होते, त्यांच्याकडे शिबिरार्थींची वर्गणी आम्ही सुपूर्द केली. बाकी खर्च काय होईल तो सांगा, असे म्हटले आणि त्यासाठीही थोडे पैसे आगाऊ देऊन ठेवले.

शिबिरातल्या रात्री धायटीपाड्यातले सर्व लोक पाटलाच्या घरात जमले. आम्हाला बोलावून घेतले. म्हणाले, हे वर्गणीचे पैसे आणि हे तुम्ही दिलेले पैसे आम्हाला नको. एका लिफाफ्यात घालून ते पैसे परत विनायकच्या हातात त्यांनी ठेवले. म्हणाले, तुम्ही आमच्यासाठी इतके करता, कधी चार पैसे घेत नाही. एक वेळ आम्हालाही चळवळीसाठी काहीतरी करू द्या की. आमच्या गावातून दरवर्षी दिंडी जाते. तेव्हा आम्ही दिंडीला जेवण देतो. दर वर्षी गावाकडून काहीतरी दानाचा धर्म झाला पाहिजे हो. दोन वर्षे दिंडी गेलेली नाही. आम्हाला आता या शिबिराचा तरी पूर्ण खर्च करू द्या. दान घडले नाही, तर गाव म्हणून आम्हालाच बरे वाटत नाही.

आता असे म्हटल्यावर आम्ही हात जोडण्यापलिकडे काय करू शकणार होतो? दुसऱ्या दिवशी शिबिरातल्या सर्वांना त्यांनी गोड जेवण दिले.

खुडेद गावाच्या एका पाड्यातला आमचा कार्यकर्ता भारत पाटारा. काही काळ त्याने पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणूनही काम केले. ते करत असतानाच काही गावात वाद झाले. त्या वादांचा संबंध त्याच्या पूर्वाश्रमीच्या कामाशी होता. त्याला असे वाटू लागले की, आपल्या जुन्या वादांमुळे ‘वयम्‌’च्या कामाचा तोटा होतो आहे. त्याने आपणहून मला भेटून सांगितले, की दादा माझ्यामुळे चळवळीचे काम अडते आहे. मला मुक्त करा. दरमहा चांगले मानधन मिळणारे काम सोडून देतो म्हणायचे, याला नैतिक ताकद लागते. भारतने ती दाखवली. पुढे त्याचे तहसीलदार कार्यालयाजवळचे झेरॉक्सचे दुकान ही चळवळीच्या प्रचाराची जागा झाली. भारतने फक्त मानधन सोडले, वयम् त्याच्या नसांत भिनलेली होती. आता तो ‘वयम्’च्या कार्यकारिणीचा सदस्य आहे. विक्रमगड तालुक्यात काम वाढवण्यात त्याचे प्रयत्न आजही चालू आहेत.

२००८ मध्ये एका अग्रगण्य दैनिकाने ‘जिंदगी वसूल’ हा माझ्या अनुभवांवरचा एक दीर्घ लेख छापला. अकरावीतल्या एका विद्यार्थ्याने तो जपून ठेवला आणि बीएससी पदवी झाल्या झाल्या मला मेल पाठवले. तुमच्याबरोबर काम करायचंय. ये म्हटल्यावर पुणे जिल्ह्यातल्या एका गावातला हा मुलगा घर सोडून आला आणि तीन वर्षे चळवळीच्या कामात पार बुडून गेला. स्वप्नीलला अशा कामाचा काही पूर्वानुभव नव्हता. त्याच्या डिग्रीशी आम्हाला कर्तव्य नव्हते. सारे काही तो करून शिकला. तेव्हा आमची ऐपत यथातथा होती. जव्हारमध्ये राहण्याचा खर्च भागून कधीतरी आईसक्रीम खाता येईल, एवढे पैसे तुला देऊ, असेच आम्ही त्याला म्हटले होते. पुढे अर्थात मानधनात थोडी थोडी वाढ होत गेली.

आणि स्वप्नीलने एका महिन्यात त्याच्या तीन आठवड्याच्या मानधनाएवढी देणगी दिली ‘वयम्’ला. मला पण काही तरी द्यावंसं वाटतंय म्हणाला आणि दिले. आता स्वप्नील जाधव पुणे जिल्ह्यातल्या ग्राम ऊर्जा या संस्थेत उत्तम काम करतो आहे.

चांगलं करावं, चांगलं जोडत जावं, की ही अशी माणसं भेटतातच. बहुत सुकृताची जोडी... दुसरं काय?

टॅग्स :Gram Panchayatsaptarang