घरकुल अपुले : ‘यश’सूत्रे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Success Life

जगातील ९९.९९ टक्के लोकांना आयुष्यात यशस्वी व्हायचं असतं. अर्थात यशाची व्याख्या मात्र प्रत्येकाची वेगळी असते.

घरकुल अपुले : ‘यश’सूत्रे

- मीनल ठिपसे

जगातील ९९.९९ टक्के लोकांना आयुष्यात यशस्वी व्हायचं असतं. अर्थात यशाची व्याख्या मात्र प्रत्येकाची वेगळी असते. कुणासाठी यश म्हणजे संपत्ती, पैसा.. कुणासाठी यश म्हणजे प्रसिद्धी, लोकप्रियता.. कुणासाठी यश म्हणजे नातीगोती, मित्रपरिवार, तर कुणासाठी यश म्हणजे समाधान, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य! मात्र, ढोबळमानानं यशाच्या व्याख्येत बसायचं असेल, तर दोन गोष्टी एकत्रितपणे घडाव्या लागतात. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला संधी मिळायला हवी आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या संधीचं सोनं करता यायला हवं. मिळालेल्या संधीचं सोनं करणं यात तुमचं ज्ञान, एखाद्या गोष्टीतील कौशल्य, एखादं काम झोकून देऊन करण्याची वृत्ती आणि क्षमता या गोष्टींचं योगदान असतं, तर संधी कशी मिळवायची हे ठरतं तुमचा आत्मविश्वास, आयुष्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन, उत्तम व्यक्तिमत्त्व आणि संवादकौशल्य, शिष्टाचार यावर. एकूणच या सगळ्याची गोळाबेरीज म्हणजे यशाची पहिली पायरी. उत्कर्ष आणि उन्नती ही यशाची दोन चाकं आहेत. खालील काही गोष्टी तुम्हाला आयुष्यात यशस्वी बनण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरतील :

1) कायम सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. खूप नकारात्मकता असेल, तर आपला दृष्टीकोन बदलण्यासाठी प्रामाणिकपणे आत्मविश्लेषण करणं आवश्यक आहे. आपल्यातील कमतरता ओळखून काय बदललं पाहिजे आणि काय सुधारलं पाहिजे हे जाणून घ्या.

2) योग्य प्रमाणात व संतुलित आहार, पुरेशी झोप (लवकर झोपणं व लवकर उठणं), व्यायाम या गोष्टींचा अवलंब नक्की करावा. चांगल्या संगतीत राहा. कायम नवनवीन गोष्टी शिकत राहा. चांगल्या व्यक्तींचं मार्गदर्शन घ्या आणि उत्तम गोष्टी कारण्यासाठी कायम अग्रेसर राहा.

3) यश हस्तरेषांसारखं असतं. आपल्याच मुठीत असतं; पण आपल्या नियंत्रणात नसतं. सबबी देऊन जबाबदारीपासून पळ काढू नका. आपल्या चुकांसाठी दुसऱ्यांना दोष देऊ नका. अपयश आलंच तर ते स्वीकारा, त्याचं निराकारण करा. स्वतःची जबाबदारी स्वीकारा आणि आत्मविश्वासानं पुढे जा.

4) कोणत्याही गोष्टीचा त्रास करून घेण्यापेक्षा संकटातून किंवा कोणत्याही प्रश्नांमधून मार्ग कसा काढता येईल याचा सर्वप्रथम आणि सर्वाधिक विचार करा. काळजी करण्यापेक्षा काळजी घ्या.

5) स्वतःला, स्वतःच्या आयुष्यातील ध्येयाला सर्वांत जास्त वेळ द्या. त्यामुळे इतरांकडून अपेक्षा कमी होतील. डोकं शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. कमी बोलणं आणि जास्त ऐकणं ही गोष्ट लक्षात ठेवा.

6) जीवनात अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. फक्त स्वप्न बघून चालत नाही, तर स्वप्नपूर्तीसाठी अतोनात मेहनत घ्यावी लागते. मेहनतीला कोणत्याच क्षेत्रात पर्याय उपलब्ध नाही.

7) आयुष्यात जोखीम घेतल्याशिवाय यश मिळवणं अवघड आहे. आपण आपल्या कंफर्ट झोनच्या बाहेर पडून जोखीम घ्यायची तयारी दाखवायला हवी. प्रवाहाविरुद्ध जाण्याची तयारी लागली तर तीसुद्धा हवी.

8) वेळेचा सदुपयोग करणं अतिशय महत्त्वाचं आहे. वेळ कोणासाठीही थांबत नाही. वेळेची किंमत जाणून वेळेचा योग्य आणि चांगला वापर करता यायला हवा. कोणत्याही कामात शिस्त हवी. रोजच्या दिवसाचा दिनक्रम बनवून त्याचं नियमित पालन करून आपण या शिस्तीत भर घालू शकतो.

9) वेळच्या वेळी आणि योग्य निर्णय घेणं, व्यक्तिमत्व विकासावर भर देणं, पैसे योग्य जागी इन्व्हेस्ट करणं आणि हार्ड वर्कसोबतच स्मार्ट वर्क करण्याची कला शिकून घेणं गरजेचं आहे.

10) प्रत्येक यशस्वी माणसाची एक खास गोष्ट म्हणजे त्याच्या यशाच्या मागे एक विशिष्ट असं ध्येय असतं. त्यांना माहीत असतं, की जीवनात त्यांना काय करायचं आहे आणि काय मिळवायचं आहे. प्रत्येक गोष्ट अनुभवून पुढे जाण्यासाठी आयुष्य खूप लहान आहे. म्हणूनच स्वतःला आणि त्याबरोबर दुसऱ्याला येणाऱ्या अनुभवातून शिकलं पाहिजे. दुसऱ्यांच्या अनुभवाला अनुभवण्याचं प्रभावी साधन म्हणजे वाचन. चौफेर आणि उत्तम वाचनाची सवय अतिशय उपयोगी.

(समाप्त)

टॅग्स :LifeTipssaptarang