मानसिकतेतील बदल महत्त्वाचा!

एखाद्या देशाला युद्धाला सामोरं जाण्यासाठी अनेक प्रकारचे संकेत समोरच्या देशाच्या कार्यप्रणालीतून मिळतात. राजनैतिक, आर्थिक अशा विविध पातळीवर हे संकेत मिळत असतात.
Army
ArmySakal
Summary

एखाद्या देशाला युद्धाला सामोरं जाण्यासाठी अनेक प्रकारचे संकेत समोरच्या देशाच्या कार्यप्रणालीतून मिळतात. राजनैतिक, आर्थिक अशा विविध पातळीवर हे संकेत मिळत असतात.

- जनरल एम. एम. नरवणे (निवृत्त) माजी लष्करप्रमुख

एखाद्या देशाला युद्धाला सामोरं जाण्यासाठी अनेक प्रकारचे संकेत समोरच्या देशाच्या कार्यप्रणालीतून मिळतात. राजनैतिक, आर्थिक अशा विविध पातळीवर हे संकेत मिळत असतात. जर समोरच्या देशाने इंधन, खाद्यसाठा करण्यास सुरुवात केली असेल, किंवा आपल्या संसाधन पुरवठ्यात अडथळे निर्माण करणं, हे यातील काही संकेत असतात. अशा प्रकारचे संकेत वेगवेगळ्या एजन्सी किंवा गुप्तचर विभागाद्वारे साधारणपणे सहा ते आठ महिन्यांपूर्वीच मिळू लागतात. युद्धं एका रात्रीत होत नसतात. रशिया आणि युक्रेनचं युद्ध हे त्याचंच एक उदाहरण आहे.

दोन्ही देशांमध्ये अनेक चर्चा झाल्या; पण त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. परिणामी युद्धाची स्थिती उद्‍भवली. रशियाने युद्धासाठी पूर्वतयारी केली होती. त्यांच्या हालचालीही तशा पद्धतीने होत्या. दरम्यान, चीनच्या सर्व कृतींची माहिती वेळोवेळी भारतीय लष्कराला मिळत आहे, त्यासाठी आजकाल आधुनिक तंत्रज्ञान, अद्ययावत उपकरणं, उपग्रह यांचा वापर केला जातो. देशाप्रती असलेलं कर्तव्य पार पाडण्याकरिता युद्ध किंवा संभाव्य धोक्यासाठी भारतीय लष्कर नेहमीच तयार असतं. तसंच, दुसऱ्या देशाकडून नियंत्रण रेषेच्या नजीक केल्या जाणाऱ्या कृतीबाबत गुप्तचर विभागाकडूनही माहिती मिळत असते. त्यानुसार चीनद्वारे होत असलेल्या हालचाली या युद्धाचे संकेत नव्हते हेही त्यातून स्पष्ट झालं.

हजाराच्या संख्येने चिनी सैन्य नियंत्रण रेषेच्या नजीक पोचलं आहे, तसंच ते आधुनिक वाहनांचा वापर करत असल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ही प्रोपगंडा युद्धप्रणाली असली तरी भारतीय सैन्य या सर्व गोष्टींचा सामना करण्यासाठी सक्षम आहे. सीमावर्ती भागातील प्रत्यक्ष परिस्थिती नेमकी कशी आहे, हे सैन्यदलाला दिसतं.

पूर्व लडाखच्या सीमावर्ती भागात चीनचे दहा सैनिक प्रत्येक ४८ तासांनी बदलत राहतात. मात्र, भारतीय सैन्यदलात एकदा जर जवानांचे ट्रूप त्या भागात तैनात झाले, तर ते पुढील काही महिन्यांसाठी तिथंच कर्तव्य पार पाडत असतात. भारतीय सैन्यदलाद्वारे ईशान्य भारतासह जम्मू-काश्मीर इथं अनेक मोहिमा राबविण्यात आल्या आहेत, यादरम्यान अनेक जवानांचा मृत्यू होतो. सैन्यदलाचं काम हे जोखमीचं असून त्याची जाणीव प्रत्येक जवानाला आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांमध्ये जेव्हा जवान शहीद होतात, तेव्हा इतर जवानांना अधिक स्फुरण चढतं आणि ते तितक्याच ताकदीने शत्रुदेशाच्या सैन्याचा सामना करण्यास पुढाकार घेतात.

अलीकडे युद्धाचं स्वरूप बदलत आहे. माहिती तंत्रज्ञान हे युद्धाचं नवं स्वरूप आहे. सोशल मीडियाच्या काळात युद्ध केवळ युद्धभूमीवर जिंकणं महत्त्वाचं नाही, तर आता ‘पर्सेप्शन वॉर’ जिंकणंही गरजेचं आहे. यासाठी राष्ट्रीय पातळीवर हा बदल करण्याची आवश्यकता आहे.

चीन आपली भलीमोठी सैन्यसंख्या, आधुनिक शस्त्रप्रणालीची भीती दाखवत शेजारच्या लहान देशांना घाबरविण्याचा प्रयत्न करतो. मात्र भारतीय सैन्यदलाने ज्या प्रकारे चीनला उत्तर दिलं, ते पाहून नक्कीच जागतिक स्तरावर इतर देशांचीही चीनच्या संरक्षण ताकदीबाबतची मानसिकता बदलली आहे. त्यामुळे युरोप, फिलिपिन्स, कॅनडा अशा सर्व देशांनाही समजलं की आपले सिद्धांत योग्य असतील, तर नक्कीच चीनलाही हरवणं शक्य आहे.

गलवान खोऱ्यात झालेल्या घटनेत चीनने आपलं किती सैन्य गमावलं याकडे पाहण्याऐवजी, त्यांचंही सैन्य मारलं गेलं हे अधिक महत्त्वाचं आहे. गेल्या दोन दशकांत चीन केवळ भारतासोबतच नाही, तर भूतान, नेपाळ या देशांसह दक्षिण चीन समुद्रात घुसखोरी करत आपली हद्द वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी त्यांना कधीही कोणी आव्हान दिलं नाही, तसंच त्यांच्या सैन्याची कोणतीही जीवितहानी झाली नाही, त्यामुळे जीवितहानी न होता अगदी सहजपणे त्यांची उद्दिष्टं साध्य होत होती. पण, गलवान खोऱ्यात चीनच्या सैन्याला भारतीय जवानांनी चोखरीत्या उत्तर दिलं.

चीनने त्यांच्या काही सैनिकांना गमावलं होतं. परिणामी पहिल्यांदाच चीनला असा झटका बसला. यातून आता चीनलाही संदेश मिळाला आहे की, जर त्यांनी काही चुकीचं पाऊल उचललं, तर त्यास सडेतोड उत्तर देण्यास भारतही तयार आहे.

लष्कराच्या तुकड्यांचं पुनर्संतुलन

देशाच्या पूर्वेकडील सीमेपासून ते ईशान्येकडील सीमेपर्यंत किंवा ईशान्येकडून पूर्वेकडे जवानांच्या हालचालींसाठी तसा मार्ग किंवा जागा आहे; पण सैन्याच्या या तुकडीला सुरुवातीला कुठं तैनात करायचं हा मुद्दा महत्त्वाचा आहे. अत्यंत पश्चिमेला, अत्यंत पूर्वेला की उत्तरेकडे? कारण पश्चिमेपासून ते ईशान्येपर्यंतच्या कोणत्याही ठिकाणी धोका कायम असतो. यासाठी लष्कराच्या तुकड्यांचं पुनर्संतुलन गरजेचं आहे.

नियंत्रण रेषेवर जेव्हा दोन्ही देशांमध्ये झटापट होते, तेव्हा त्या संपूर्ण परिस्थितीचा सविस्तर आढावा लष्कराच्या वतीने दिला जातो. कोणत्याही गोष्टी लपविल्या जात नाहीत, मग ती हुतात्मा झालेल्या जवानांची संख्या का असेना. पण चीन असं कधीच करत नाही. अशा घटनांमध्ये नेमकं काय घडलं, नजीकच्या भविष्यात काय होऊ शकतं, अशा सर्व गोष्टींचं मूल्यांकन करत त्याबाबतची माहिती दिली जाते. तिन्ही दलांद्वारे अशा प्रकारचं मूल्यांकन सादर केलं जातं. त्याआधारे पुढील कारवाई केली जाते. यांगत्से इथं नुकतीच झालेली झटापट पाहिली तर तो जमिनीशी निगडित संघर्ष आहे, त्यामुळे नौदलाची तिथं तशी काही भूमिका नसते. मात्र, तरीही त्यांचं मूल्यांकन विचारात घेतलं जाईल.

पँगॉन्ग त्सोमध्ये काय झालं?

चीनचं सैन्य पॅंगॉन्ग त्सोच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर सर्वप्रथम आलं. मग भारतीय लष्कराला वाटलं की, हे आता दक्षिण पँगॉन्ग येथील उंच भागात येण्याचा प्रयत्न करतील, जे त्यांनी केलं. मग त्या उंचीवर कोण लवकर पोहोचेल, अशी शर्यत दोन्ही देशांत होती. त्यामुळे काही ठिकाणी भारतीय लष्कर पहिलं पोचलं, तर काही ठिकाणी चीन. मात्र, भारताने त्यानंतर अजून पुढे रेझांग ला आणि रेचिन ला या पर्वतीय खिंड ताब्यात घेतल्या, ज्याची चीनला अपेक्षा नव्हती. एलएसी या दोन्ही पर्वतीय खिंडच्या बाजूने चालते, म्हणून दोन्ही देशांनी त्या व्यापलेल्या नव्हत्या.

दरम्यान, भारत आणि चीनच्या सैन्यात होत असलेल्या झटापटीच्या घटनांमुळे एका स्थिर सीमेसाठी शांतता गरजेची आहे, याकडे या घटना लक्ष केंद्रित करतात. शांतता नेहमीच विकास आणि प्रगतीसाठी आवश्यक असते, त्यामुळे हा सीमाप्रश्न दोन्ही देशांच्या परस्पर फायद्यासाठी सोडविण्याची गरज आहे.

सैन्यांतील फरक

चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या सैन्यांना आपण एक प्रगत आणि प्रोफेशनल सैन्य म्हणून सामोरं जातोय. दहशतवाद ही पाकिस्तानची फर्स्ट लाइन ऑफ डिफेन्स असून, हे त्यांचं मुख्य धोरण आहे; तर भारत दहशतवादाच्या विरोधात आहे. वैयक्तिक हितासाठी भारतीय जवान काम करत नाही, तर देशाच्या स्वाभिमानासाठी, संरक्षणासाठी भारतीय जवान काम करतात. सेवेच्या कालावधीत सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न ते सातत्याने करतात.

युक्रेन युद्धातील धडा

युक्रेन आणि रशियाच्या युद्धातून अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या, त्यामुळे हे पक्कं झालं की, २१ व्या शतकातही युद्धं होऊ शकतात, त्यामुळे शांततेसाठी सैन्याचं दृढीकरण, अत्याधुनिकीकरण आवश्यक आहे. युद्ध नक्की होईल आणि लष्कराला ते लढावं लागणार आहे, त्यामुळे जवानांवरचा खर्च वाया जात नाही. युद्धाचं स्वरूप जरी तसंच असलं तरी त्याची पद्धती बदलली आहे. मागील शतकात युद्धांमध्ये रणगाड्यांचा वापर झाला. दरम्यान, आता ड्रोनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. आधुनिकीकरणासाठी आत्मनिर्भर भारताची खरंच गरज आहे. त्यामुळे आयात कमी होईल, नक्कीच १०० टक्के स्वदेशीकरण होणार नाही; पण मोठ्या प्रमाणावर देशातच युद्धाचं साहित्य तयार होईल. रणगाडे, शस्त्रप्रणाली, क्षेपणास्त्रं अशा सर्व गोष्टी देशांतर्गत विकसित केल्या जाऊ शकतात आणि त्या होतही आहेत. सीमाभागात पायाभूत सुविधांचा विकास हा नेहमीच केला जातो. जवानांनीही सामरिकदृष्ट्या लडाखसह सर्वच भागांत रस्ते, पूल, रनवे आदी पायाभूत सुविधा उभारल्या आहेत.

अग्निवीर

जवानांच्या मनुष्यबळ व्यवस्थापनाच्या (एच आर पॉलिसी) योजना नेहमी बदलत जातात. अग्निवीर योजनेला संधी द्या, ७ वरून १५ वर्षांची सेवा करण्यात आल्यावर अनेकांनी नावं ठेवली होती. जर बदलांची गरज असेल तर तो व्हायला हवा. निश्चितच यातही आवश्यक बदल सुचविण्यात येतील. फक्त योजनेच्या कार्यान्वयनाची संधी देण्यात यावी. अग्निवीरचा प्रशिक्षण कालावधी कमी नाही. कारण सैन्यात टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशी विभागणी असते. खरंतर प्रशिक्षण ही नित्याची प्रक्रिया आहे.

(अनुवाद : अक्षता पवार)

(लेखक भारतीय लष्कराचे माजी प्रमुख आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com