मोबाईल - आकर्षण की ॲडिक्‍शन?

शिवराज गोर्ले
शनिवार, 13 जुलै 2019

शिक्षण, पालकत्व  बद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा  शिवराज गोर्ले यांचा लेख

बालक-पालक
आज जो तो मोबाईल फोनवर असतो आहे; दिवसेंदिवस, तासन्‌तास. सर्वत्र हेच चित्र असताना मुलांनी मात्र मोबाईलपासून दूर राहावं, ही अपेक्षा कशी करता येईल?

अगदी जन्मल्यापासून मुलाच्या डोळ्यांसमोर दिसतो तो फक्त मोबाईल फोन. अगदी जळी, स्थळी.. पूर्वी तो फक्त संवादासाठी वापरला जात असे. आता मात्र ‘स्मार्टफोन’वर शेकडो गोष्टी करता येतात. व्हिडिओ कॉल करा, गेम्स खेळा, व्हॉट्‌सॲप चेक करा.. फॉरवर्ड करा, सेल्फी घ्या... मुलांना आकर्षण न वाटणं कसं शक्‍य आहे? असं आकर्षण की ज्याचं ‘ॲडिक्‍शन’च होत जातं. स्वतः आई-बाबा किती वेळ आणि कधी मोबाईल फोन वापरत असतात? मुलांसमोर असताना तरी पालकांनी मोबाईलला कॉल व्यतिरिक्त जास्त महत्त्व देणं टाळलं तर? घरात असताना कुटुंब, जिव्हाळा, गप्पा.. मुलांशी संवाद याला प्राधान्य दिलं जातं का?

मुळात मुलाच्या हाती मोबाईल देतंच कोण? मूल दंगा करत असलं, रडत असलं की मोबाईल फोन हातात दिल्यानंतर ते शांत बसतं. म्हणून पालकच (बिनधास्त) मोबाईल मुलाकडं देतात. त्यातूनच तर त्याला मोबाईलची सवय लागते. प्रारंभी तर मुलाच्या मोबाईल वापरण्याचं विशेषतः आजी-आजोबांना कौतुकच वाटत असतं. मूल पौगंडावस्थेत असलं तर मोबाईलवर काय बघायचं याचं तारतम्य न राहता इतर आकर्षणं निर्माण होतात. त्यातील गेमच्या ‘लेव्हल’ पूर्ण करण्याची धडपड वाढते. या दोन्ही गोष्टी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी वाईट असतात. त्यातून मुलाची नवनिर्मिती क्षमता कमी होते. मुलं ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या’ आहारी जातात. त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी पालकांनी नैसर्गिक बुद्धिमत्तेचं महत्त्व पटवून द्यायला हवं. टीव्ही व मोबाईल फोनचा वापर मर्यादित ठेवण्यासाठी पालकांनी मुलांना मैदानी, साहसी, बौद्धिक खेळात गुंतवलं पाहिजे. त्यांत त्यांची गोडी निर्माण केली पाहिजे. आकर्षक चित्रं, गोष्टींची पुस्तकं वाचायला दिली पाहिजेत, एखाद्या छंदाची ओळख करून दिली पाहिजे, सहलींसाठी निसर्गाच्या सान्निध्यात, उद्यानात नेलं पाहिजे. त्या वेळी ‘स्मार्टफोन’ स्वतःही वर्ज्य मानलं पाहिजे. एकत्र जेवलं पाहिजे. त्या वेळीही ‘फोनबंदी’ ठेवली पाहिजे. भरपूर गप्पा मारल्या पाहिजेत. गोष्टी सांगितल्या पाहिजेत. मोबाईलशिवायही आयुष्य छान, अधिक छान मजेत जगता येतं हे त्यांना दाखवून दिलं पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mobile - Auction of attractions