मोहम्मद बिन रशीद ग्रंथालय

तंत्रज्ञानाबरोबरच परंपरागत वाचनाची सांगड
Mohammed bin Rashid Library Dubai
Mohammed bin Rashid Library DubaiSakal

भव्य बुक वॉल, वाचकांचे स्वागत करणारे रोबो, वाचन करण्यासाठी आलिशान व्यवस्था, वस्तुसंग्रहालय, नऊ स्पेशलाईज ग्रंथालये असलेले एक मोहम्मद बीन रशीद सार्वजनिक ग्रंथालय दुबईत (Mohammed bin Rashid Library, Dubai) आकारास आलंय. १० लाखांपेक्षा जास्त पुस्तकांचा संग्रह असलेले हे ग्रंथालय जगातील प्रगत तंत्रज्ञानाने सज्ज आहे.

इस्लाममध्ये असे मानले जाते, की स्वर्गातून पृथ्वीवरची पहिली आज्ञा ‘वाचा’ अशी दिली गेली होती. युरोप, दक्षिण कोरिया, जपानपासून अमेरिका, मेक्सिकोसह अनेक पाश्चिमात्य देशांत तिथल्या सार्वजनिक ग्रंथालयांच्या भव्यतेवरून त्या देशाची समृद्धी मोजली जाते. भारतालाही समृद्ध ग्रंथालये, वाचनाचा वारसा लाभला आहे. असे म्हणतात, की प्राचीन नालंदा विद्यापीठ जेव्हा पेटवून दिले, तेव्हा तिथल्या ग्रंथालयातून सहा महिने धूर निघत होता. एवढी भव्य ग्रंथालये त्या वेळी भारतात होती; मात्र मोबाईल, गॅजेटमुळे वाचन संस्कृतीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यातच कोविड संकटामुळे देशातील सार्वजनिक ग्रंथालयांची दुर्दशा झाली. कित्येक वाचनालये बंद पडली, कर्मचाऱ्यांसह पुस्तके वाऱ्यावर सोडली गेली. अशा निराशाजनक वातावरणात, आखाती देशात एक भव्य सार्वजनिक ग्रंथालय आकाराला आले आहे. कित्येक हजार मैल दूर असलेल्या या ग्रंथालयातील पुस्तकांचा सुंगध भारतातही दरवळायला लागला आहे.

दुबई म्हणजे जगातील उत्तमोत्तम, भव्यतेचा ध्यास असणारे शहर. या शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारी एक वास्तू आकारास आली आहे, ती म्हणजे अल मोहम्मद रशीद सार्वजनिक ग्रंथालय. कुराण वाचण्यासाठी जे लाकडी स्टँड वापरले जाते, त्याचा आकार या इमारतीला देण्यात आला आहे. ही आकर्षक इमारत दुबईच्या सांस्कृतिक विश्वाची शान ठरणार आहे.

संयुक्त अरब अमिरात हा एक तेलसंपन्न देश आहे. खनिज तेलाचा शोध लागण्यापूर्वी या देशाची अवस्था तिसऱ्या जगातील देशांप्रमाणे किंबहुना त्याहीपेक्षा वाईट होती. खनिज तेलाचा शोध लागल्याने इतर आखाती देशांप्रमाणे यूएईतही भरभराट आली. त्यात दुबई शहर हे शॉपिंग, धमाल, व्यापार आणि पर्यटनाचे डेस्टिनेशन म्हणून उदयास आले. अशा या शहरात २१ अब्ज रुपये खर्च करून हे सार्वजनिक ग्रंथालय उभारणे जरा वेगळे आहे. केवळ पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ही इमारत बांधली असे मानले, तरी एका देशाने सार्वजनिक ग्रंथालय उभारणीवर एवढी प्रचंड गुंतवणूक करावी, हे पाऊल ग्रंथप्रेमींसाठी आनंददायी आहे.

दुबईचे शासक मोहम्मद बिन रशीद यांनी २०१६ हे वाचन वर्ष म्हणून जाहीर केले होते. देशातील नव्या पिढीला वाचनाची आवड लागावी, त्यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडावे या हेतूने २०१६ मध्ये या ग्रंथालयाच्या उभारणीला सुरुवात झाली. त्यानंतर या इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी सहा वर्षांचा कालावधी लागला.

जगातील कुठल्याही ग्रंथालयाचे महत्त्व बुक शेल्फमध्ये ठेवलेल्या पुस्तकांवरून ठरते. याचाच विचार करून दुबई प्रशासनाने जगभरातून दुर्मिळ, प्राचीन पुस्तके, ऐतिहासिक हस्तलिखितांची माहिती गोळा करायला सुरुवात केली. एक टीम नेमून ही पुस्तके कोट्यवधी रुपये मोजून विकत घेतली. दोन वर्षे हे काम सुरू होते. सोबत दुबई, संयुक्त अरब अमिरातमधील शासकांच्या मालकीच्या वैयक्तिक दुर्मिळ वस्तू इथे ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आणि आकाराला आली ही भव्य वास्तू. भव्य बुक वॉल, वाचकांचे स्वागत करणारे रोबो, वाचन करण्यासाठी आलिशान व्यवस्था, वस्तुसंग्रहालय, नऊ स्पेशलाईज ग्रंथालये असे मोहम्मद रशीद ग्रंथालयाचे वैभव आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि परंपरागत वाचनाच्या माध्यमांची उत्तम सांगड या ग्रंथालयात घालण्यात आली आहे.

इथे १० लाखांपेक्षा अधिक अरेबिक, इंग्रजीसह जगभरातील मुख्य भाषांतील छापील आणि डिजिटल पुस्तकांचा संग्रह आहे. लहान मुले, तरुणाईपासून, मीडिया, बिझनेस, अमिरातसह नऊ विशेष ग्रंथालये आहेत. यात अमिरात या ग्रंथालयाची रचना संयुक्त अरब अमिरातचा सांस्कृतिक वारसा, साहित्य, खाद्य संस्कृती, संगीताचा इतिहास सांगण्यासाठी केली आहे. इथे ३५ हजार पुस्तकांचा संग्रह ठेवला आहे.

१३ व्या शतकातील कुराण

संग्रहालयात अनेक दुर्मिळ वस्तूंचा खजिना दडला आहे. जगभरातील २६०० पेक्षा अधिक जुने नकाशे, दुर्मिळ हस्तलिखितांचा संग्रह आहे. १३ व्या शतकातील पवित्र कुराणची हस्तलिखित प्रत, १६ व्या दशकातील हिरेजडित दुर्मिळ पेन पाहायला मिळतो. १७ व्या शतकात प्रसिद्ध डच लेखक थॉमस इर्पेनियस या लेखकाने लिहिलेले अरेबिक व्याकरणाच्या पुस्तकासह रामायणाची हस्तलिखित प्रतही इथे आहे. रामायण पुस्तकात चित्रांसह २४ हजार श्लोक लिहिले आहेत. याशिवाय १७ व्या शतकातील जपानी हस्तलिखितांचा ठेवा आहे. नेपोलियन बोनापार्ट ते शेक्सपियरची हस्तलिखिते, पहिल्या प्रकाशित पुस्तकांच्या प्रती इथे आहेत.

दुर्मिळ पुस्तकांचा खजिना

प्राचीन अरब नियतकालिके, दुर्मिळ पुस्तके, इजिप्शियन, अरब सिनेमांचे कलेक्शन आहे. जगभरातील ६० लाख रिसर्च पेपरचा खजिना हे या ग्रंथालयाचे वेगळेपण आहे. याशिवाय विविध भाषांमधील ७३ हजार गाणी, ७५ हजार व्हिडीओ, १३ हजार लेख, चारशे वर्षांचा इतिहास उलगडणारी पाच हजार ऐतिहासिक छापील आणि डिजिटल नियतकालिके, ५०० दुर्मिळ पुस्तके इथे वाचकांसाठी उपलब्ध आहेत. वाचकांना अपडेट ठेवण्यासाठी जगभरातील ३५ हजार छापील आणि डिजिटल वृत्तपत्रे ठेवली आहेत. दरवर्षी जगभरातील ९० लाख वाचक या ग्रंथालयाला भेट देतील अशी अपेक्षा आहे. वाचनाबरोबरच पोटाची भूक भागवण्यासाठी इथे आलिशान कॅफे आहे. त्यामध्ये बसून संपूर्ण इमारतीचे सौंदर्य न्याहाळता येते. ग्रंथालय इमारतीच्या बाहेर पडले, की एक सुंदर बगीचा आहे. यात देशाच्या प्रगतीबद्दल माहिती सांगणारे ६० खांब उभारले गेले आहेत. त्यावर अरेबिक आणि इंग्रजी भाषेतील म्हणी कोरल्या गेल्या आहेत.

सेल्फ किऑस्क

वाचकांना हवे ते पुस्तक, संदर्भ स्वत:च शोधता येण्यासाठी सेल्फ किऑस्क उभारले गेले आहेत. एटीएमसदृश ही यंत्रणा आहे. तुमचे कार्ड स्वाईप केले, की पैशांप्रमाणे तुम्ही मागणी केलेली पुस्तके तुमच्या खात्यात जमा होतात.

एकात्मिक ग्रंथालय प्रणाली

वेबसाईट किंवा किऑस्कच्या माध्यमातून पुस्तके मागवता येतात. मागणी केली की काही मिनिटांच्या आत ग्रंथालयाच्या ऑटो स्टोअरमधील पाचपैकी एका रोबोद्वारे ही पुस्तके मिळवली जातात. काही मिनिटांत मोनो रेल्वे यंत्रणेच्या माध्यमातून तळमजल्यावर ही माहिती, पुस्तके डेस्कवर पोहोचतात. या ऑटो स्टोअरमध्ये नऊ लाखांपेक्षा अधिक पुस्तके ठेवली आहेत. ही यंत्रणा प्रतितास १२५ पुस्तके शोधू शकते आणि वेगाने उपलब्ध करून देते.

मोनो प्रणाली

ग्रंथालयात कुठेही बसून वाचकाला हवी ती पुस्तके मागवण्याची मुभा आहे. निवडलेली पुस्तके त्याला त्याच माळ्यावर उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या पुस्तकांची वाहतूक करण्यासाठी पहिल्यांदा केबल मोनो या यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे.

डिजिटायजेशन

दुर्मिळ पुस्तकांच्या प्रतीचे डिजिटायजेशन करण्यासाठी इथे अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारली आहे. काही मिनिटांत कितीही मोठ्या आकाराच्या पुस्तकाचे डिजिटायजेशन करणे शक्य आहे. नकाशे स्कॅन करण्याची व्यवस्था आहे.

वाचनासाठी भरपूर जागा

प्रत्येक मजल्यावर वाचनासाठी व्यवस्था केली आहे. प्रत्येक टेबलवर पॉवर पाइंट बसवले आहे. मल्टिमीडिया प्रोजेक्टरही प्रत्येक स्टडी रूममध्ये बसवले गेले आहे. सार्वजनिक वापरासाठी कॉम्प्युटर आणि स्कॅनरची व्यवस्था आहे. व्याख्याने आणि परिषदा यासाठी ५५० आसन क्षमतेचे सभागृह आहे. व्याख्याने, वादविवाद आणि लाईव्ह इव्हेंटसाठी सभागृह आहे. आधुनिक ऑडिओ, व्हिज्युअल्स तंत्रज्ञानाने सभागृह सज्ज आहे.

स्मार्ट रोबो

वाचकांच्या प्रश्नांना, चौकशीला उत्तरं देण्याची जबाबदारी स्मार्ट पेपर रोबोवर सोपवण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा अंतर्भाव असलेले हे रोबो वाचकांना योग्य माहिती देतात. त्यांच्या शंकाचे निरसन करतात. हे रोबो बच्चे कंपनीला अगदी आजीप्रमाणे त्यांच्या आवडीच्या गोष्टीही सांगतात.

भारत प्रेरणा घेईल का?

दुबईसारख्या शहरात एवढे भव्यदिव्य ग्रंथालय सुरू होत असताना देशात विशेषत: महाराष्ट्रासारख्या राज्यात सार्वजनिक ग्रंथालयाची अवस्था दयनीय आहे. राज्यात १२ हजारांपेक्षा जास्त सार्वजनिक ग्रंथालये मोडकळीला आली आहेत. मुंबईचे वैभव असलेल्या एशियाटिक सोसायटीला जगण्यासाठी, टिकण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. आपल्याकडे मोबाईलवरचे वाचन वाढले; मात्र त्यातून चिंतनाची प्रक्रिया होत नाही. ग्रंथालयापासून वाचक दूर चालला आहे; मात्र आजही ग्रंथालयाशिवाय पर्याय नाही. पुस्तक वाचताना, हाताळताना जो आनंद मिळतो तो कुठे मिळणार. त्यामुळे आपल्या देशात लोकांच्या सांस्कृतिक, वैचारिक विकासात महत्त्वाचे योगदान असलेली सार्वजनिक ग्रंथालये टिकली पाहिजेत. मरगळ झटकली पाहिजे. किंबहुना, वाचन संस्कृती वाढवण्यासाठी ‘लेट्स रीड’सारख्या असंख्य चळवळींची गरज आहे. देशाचे वैभवाचे मोजमाप ग्रंथालयाच्या समृद्धीवरून होते असे आपण म्हणतो, मग आपली फूटपट्टी वाढवणार आहोत का, हा प्रश्न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com