#MokaleVha चुकीला जबाबदार कोण?

Mokalevha
Mokalevha

एखादी वाईट गोष्ट घडली तर त्यासाठी दुसऱ्याला जबाबदार धरणे ही सगळ्यात सोपी गोष्ट असते. असे न करता आपणही त्यासाठी कसे जबाबदार होतो, कुठे जबाबदार होतो हे शोधणे जास्त महत्त्वाचे आहे. आपण आपल्या मेंदूची क्षमता ओळखली तर आयुष्यातल्या वेगवेगळ्या परिस्थितीतून नक्कीच मार्ग काढता येईल, स्वतःमध्ये सुधारणा करता येईल. कधीकधी कोणतीही बाह्य परिस्थिती त्रासाला कारणीभूत नसते, तर आपले स्वतःचेच विचार त्या परिस्थितीला कारणीभूत असतात. म्हणून मन अस्वस्थ झाले, दु:खी झाले तर नक्की कशामुळे घडले, हे तपासून बघायला हवे. कदाचित आपल्याच मनाचे काही ग्रह असू शकतात. त्यामुळे स्वत:ला तपासत राहिले पाहिजे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एखाद्या प्रसंगी आपण कसे वागणार आहोत हे आपले मानसिक भाव कसे आहेत, यावर अवलंबून असते. आपल्याच आयुष्यातल्या वेगवेगळ्या घटना शोधल्या आणि त्यावर विचार केला तर लक्षात येईल, कोणती परिस्थिती आपण चांगली हाताळली, कोणती परिस्थिती आपल्याला चांगल्या प्रकारे हाताळता आली नाही. या दोन्ही वेळेला मानसिक भाव कसे होते याचा विचार केला तर उत्तर नक्कीच सापडेल.

एखाद्या घटनेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा असतो? कसा असायला पाहिजे? विपरीत परिस्थिती उद्भवली तर त्या प्रसंगी आपल्याला भावना नियंत्रित ठेवता येतात, ते आपल्याच हातात असते. आत्यंतिक संकटातही मेंदू शांत असल्यास हातून चांगले काम होते. काळजी करणे म्हणजे कुठलीही एक योग्य दिशा न पकडता तिथल्या तिथे विचारांच्या गर्तेमध्ये फिरत राहणे. यापेक्षा समस्या काय आहे हे जाणून घ्यावे आणि त्या समस्या सोडविण्यासाठी शांतपणे एक-एक पायरी पुढे जायला हवे.

परिस्थिती चुकीची असेल तर तिच्या अधीन होऊन, वाहत जाऊन गर्तेत जायचे नाही, हे ठरवले की योग्य गोष्टी कृतीत उतरविता येतात. पण तसे ठरवायला हवे. आपल्या मनात, विचारात किती शक्ती आहे हे प्रत्यक्ष ‘वाईट’ अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला कळत नाही. सर्व अनुभवांसाठी तयार राहिले पाहिजे. दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा आपली जबाबदारी ओळखायला पाहिजे.

एकदा आपण कामाला लागलो, की चिंता मागे पडतात. कामात गुंतवून घेतले, की मन व्यवस्थित कामाला लागते. ताण जाण्यासाठी कामात गुंतवून घेणे अतिशय आवश्यक आहे. 
रेनहोल्ड हेबर यांनी देवाकडे अशी एक प्रार्थना केली आहे, की ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या शांतपणे स्वीकार करण्याची शक्ती दे, ज्या गोष्टी मी बदलू शकतो ते बदलण्याचे धैर्य दे आणि या दोन्हीतला फरक ओळखण्याइतके शहाणपण दे!
आपण ठरवले आणि मेंदूत ठसवले तर आपल्यालाही कोणत्याही परिस्थितीचा स्वीकार करता येतो. स्वतःमध्ये योग्य ते बदल करून घेता येतात.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com