दोस्तीगिरी

Dostigiri
Dostigiri

कॉफीचा मग हातात होता. मस्त पाऊस पडत होता. आज अपॉईंटमेंट्स कमीच घेतल्या होत्या. वाटलं घरी लवकर जाऊन मस्तपैकी गरमागरम भजी, रिमझिम पाऊस आणि मस्त गाणी कुटुंबासोबत अनुभवावी, नाहीतर परत पुढच्या पावसाची वाट बघावी लागणार होती. सगळं मस्त जुळून आलं होतं. तेवढ्यात फोन वाजला. 

"मॅडम मी गार्गी बोलतेय. मला तुमचा नंबर एका ग्रुपवरून मिळाला. मला अर्जंट तुम्हाला भेटायचंय. प्लीज-प्लीज भेटा.’’ पलीकडून इतकं आर्जव होताना बघून राहावलंच नाही. शेवटी एक मानसोपचारतज्ज्ञ कस काय नाही म्हणणार. राखून ठेवलेली वेळ तिला दिली. गार्गी वेळेच्या आधीच अर्धा तास हजर. आधीचा क्‍लायंट जात नाही बाहेर तर गार्गी केबिनमध्ये हजर. तिला बघून खरंच अप्रतिम सौंदर्य काय असतं, याचा नमुना बघितला. सुंदर, आकर्षक व्यक्तिमत्त्व, लांब केस, गोरीपान शिकलेली पण... जेवढी अत्यंत सुंदरता बाहेरून दिसत होती, तेवढी चेहऱ्यावर चिंता, वैताग, भेदरलेले मन. तिला बघून काहीतरी फार भयानक असेल असं वाटलं. 

गार्गी पुढ्यात येऊन बसेपर्यंत व पाणी पियेपर्यंत मनात शंभर शंका आल्या. प्रेमभंग असेल का? 
नोकरीत प्रॉब्लेम असेल का? घरात भांडण असेल का? मन चिंती ते कुणी न चिंती. तसंच झालं होतं माझं! शेवटी गार्गी शांत झाली आणि बोलती झाली. ‘‘मॅडम मला तुमची मदत हवीय. पार वेड लागायची वेळ आलीय. मी माझ्या मैत्रिणीच्या विचित्र वागण्यामुळे खूप गोंधळलीय. ती तिच्या मनाप्रमाणे वाट्टेल तसं वागते, बोलते. तसेच तिला कोणीही काही सांगितले (कान भरले थोडक्‍यात) तर लगेच भांडते माझ्याशी.’’ 

पुढे ती तशीच बोलत राहिली, ``मॅडम मी तरी किती सहन करायचं. किती समजून घ्यायचं, समजावून सांगायचं? मी का नेहमीच माघार घ्यायची. मी काय तिची नातेवाइक नाही, मैत्रिण आहे.'' गार्गी सगळं मोकळेपणानं सांगत होती. तिचं सगळं ऐकून घेतलं. गार्गी मनातले बोलून शांत झाली व डोळे पुसू लागली. 

मी सर्वप्रथम तिचं कौतुक केलं, की या इंटरनेट आणि टेक्‍नॉलॉजीच्या युगात मैत्री या जीवाभावाच्या नात्याला तिच्या नजरेत अमूल्य किंमत होती. खरंच एक समुपदेशक म्हणून रोज मी कित्येक क्‍लायंटस बघते. स्वतःच्या वैयक्तिक किंवा नात्यासंबंधी तक्रारी घेऊन येतात. पण मैत्री जपण्यासाठी तडफडणारी गार्गी पहिल्यांदाच आली आणि खरंतर बरं पण वाटलं. 

मैत्री ही एक प्रामाणिक आणि तरल संकल्पना आहे. ती दोन्हीकडून तेवढीच निःस्वार्थ व प्रामाणिक असावी. पूर्वीच्या तुलनेत आजची मैत्री जास्त निकोप आणि निखळ आहे. मैत्रीमध्ये मोकळेपणा अभिप्रेत असतो आणि कदाचित गार्गीच्या मैत्रिणीला मोकळे होण्याची खरी गरज होती, हे गार्गीला समजावून सांगितले. ते तिला पटले. ती बरीच रिलॅक्‍स झाली आणि मैत्रीसाठी एक नवा दृष्टिकोन घेऊन सकारात्मक विचाराने बाहेर पडली. तेही मला चक्क मिठी मारून. 

मैत्रीमध्ये प्रवाही राहण्यासाठी व्यक्त व्हायलाच पाहिजे. त्याने मैत्रीला मूर्त स्वरूप प्राप्त होते. ‘मी’च का कॉल/मेसेज करू, हे सोडून मस्तपैकी मैत्रिचा आस्वाद घ्यायला पाहिजे. पूर्वीची आणि आताच्या मैत्रिमध्ये खूप फरक आहे. आता एकमेकांच्या संपर्कात राहण्याची बरीच साधने आहेत. त्यामुळे मैत्री निभावणे सोपं झालंय. सोशल साइडस्‌द्वारे संपर्क वाढलाय. वैचारिक, एंटरटेनमेंट याची देवाणघेवाण वाढलीय. एक समुपदेशक म्हणून आजच्या प्रत्येक गार्गीला व तिच्या मैत्रिणीला तसेच सर्व तरुण पिढीला व उतारवयातील सेकंड इनिंग जगताना सगळ्यांना एकच सांगावसं वाटतंय, ‘मैत्री ही जपा, समजा आणि खऱ्या अर्थाने जगा’ व या निखळ असणाऱ्या नात्याचा आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सुखात, दुःखात आनंद घ्या. 

‘‘तेरी मेरी यारी, ये दोस्ती हमारी भगवान को पसंद है, अल्लाह को है प्यारी’’ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com