‘राष्ट्रवादी’ दोन दशके विश्वासाची 

सुप्रिया सुळे, खासदार 
रविवार, 10 जून 2018

अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असणारे मुंबईचे शिवाजी पार्क १० जून १९९९ रोजी देशभरातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेले होते. मुंबानगरी उत्साहाने सळसळत होती. याचे कारण म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय वारसदार आणि देशातील मोठ्या नेतृत्वापैकी एक असणारे शरद पवार साहेब नव्या पक्षाची घोषणा करणार होते. साहेब भाषणाला उभे राहताच त्यांच्या जयजयकाराने अवघे शिवाजी पार्क अक्षरशः दुमदुमून गेले.

अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असणारे मुंबईचे शिवाजी पार्क १० जून १९९९ रोजी देशभरातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेले होते. मुंबानगरी उत्साहाने सळसळत होती. याचे कारण म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय वारसदार आणि देशातील मोठ्या नेतृत्वापैकी एक असणारे शरद पवार साहेब नव्या पक्षाची घोषणा करणार होते. साहेब भाषणाला उभे राहताच त्यांच्या जयजयकाराने अवघे शिवाजी पार्क अक्षरशः दुमदुमून गेले. साहेब म्हणाले, ‘सर्व जातींच्या आणि धर्मांच्या लोकांना बरोबर घेऊन भारतीयांची एक जबरदस्त शक्ती निर्माण करण्यासाठी आज पुन्हा एकदा नव्याने महात्मा गांधींचा विचार घेऊन तुम्हा सर्वांच्या साक्षीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी मार्गस्थ होत आहे.’

पक्षाची स्थापना करताना सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा साहेबांनी दिलेला शब्द पक्षाच्या आजवरच्या वाटचालीत खरा करून दाखविला आहे. साहेबांनी शिवाजी पार्कवरील त्या भाषणाच्या सुरवातीलाच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेला समतेचा वस्तुपाठ हीच खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पुढील वाटचालीची शिदोरी असेल, असे स्पष्टपणे नमूद केले होते. ही शिदोरी पाठीशी बांधूनच ‘राष्ट्रवादी’ने आपली वाटचाल कायम ठेवली. 

पवार साहेब गेली अर्धा शतकाहून अधिक काळ राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्याचा क्रांतिकारी निर्णय असो किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार असो, सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने बहुजनांच्या मतांचा आदर करण्यात पवार साहेब नेहमीच अग्रेसर राहिले.  

सहकारातून समृद्धीचा राजमार्ग प्रशस्त करताना खेड्यापाड्यातील जनता सुखी आणि समृद्ध व्हावी, याकडे त्यांनी आवर्जून लक्ष पुरविले. एकेकाळी धान्य आयात करणारा आपला देश त्यांच्या केंद्रीय कृषिमंत्रिपदाच्या कार्यकाळात केवळ अन्नधान्याबाबत स्वयंपूर्णच झाला नाही, तर अन्नधान्याची निर्यात करणारे प्रमुख राष्ट्र बनले. शेतीच्या क्षेत्रात मूलभूत संशोधनांना गती देण्याचे कार्यही त्यांच्याच काळात आवर्जून हाती घेण्यात आले. अन्नप्रक्रिया क्षेत्राला चालना देण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान इतिहासाला टाळताच येणार नाही. 

एखादा राजकीय पक्ष स्थापन झाल्यावर वर्षाच्या आत सत्तेवर येतो आणि त्यानंतर तब्बल दीड दशक सत्तेच्या केंद्रस्थानी असतो, हे क्वचितच घडते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बाबतीत हे घडले. पक्षाच्या स्थापनेस १९ वर्षे पूर्ण होत असताना आतापर्यंतच्या वाटचालीचे सिंहावलोकन करणे आवश्‍यक ठरते. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकारने आपल्या शासनकाळात प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. कृषी, आरोग्य, कुटुंबकल्याण, सामाजिक न्याय, क्रीडा, उद्योग, ग्रामीण आणि शहरी विकास, पायाभूत सुविधांचे जाळे, ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीच्या जोरावर भारनियमनातून मुक्ती अशा क्षेत्रात सरकारने केलेली कामे अभूतपूर्व आहेत. दुष्काळी परिस्थितीत बळीराजाला दिलासा देण्यासाठी सरकारने मोठी कर्जमाफी जाहीर केली. सध्याच्या सत्ताधाऱ्यांप्रमाणे शेतकऱ्यांना ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी रांगेत उभे केले नाही. शेतकऱ्यांना शून्य अथवा कमी व्याजदराने पतपुरवठा केला. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश दिला. बचत गटाची चळवळ चालवून महिलांना स्वावलंबनाचा मार्ग दाखविला. शैक्षणिक क्षेत्रात पहिलीपासून इंग्रजीसारखा धाडसी प्रयोग जाणीवपूर्वक राबविला. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान राखला. थातूर-मातूर कारणे देऊन शिक्षकभरती रोखून ठेवली नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सातत्याने स्वतंत्र आणि सक्षम गृहमंत्री दिला. गडचिरोलीसारख्या नक्षलप्रवण भागात अधिकारीदेखील जाण्यास तयार नसताना तेथील पालकमंत्रिपद जाणीवपूर्वक स्वीकारून प्रशासन आणि शासन व्यवस्थेला आत्मविश्वास देण्याचे काम पक्षाचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांनी केले. आजकाल असा आदर्श आणि विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न या सरकारकडून होत नाही, ही खेदाची बाब आहे. 

पक्षाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने हल्लाबोल यात्रेचा समारोपही होत आहे. या यात्रेच्या माध्यमातून सदैव ‘इलेक्‍शन मोड’वर असणाऱ्या विद्यमान राज्यकर्त्यांच्या काळात शासन व्यवस्थेपासून दूर गेलेल्या जनतेशी आम्ही नव्याने संवाद साधला. शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक, त्याच्या मालाला बाजारपेठेत मिळणारी कवडीमोल किंमत, त्यातून निर्माण झालेली उद्विग्नता, नोकरभरतीमध्ये कपातीचे धोरण व त्यामुळे हताश झालेला तरुण, नोटाबंदी आणि ‘जीएसटी’मुळे कोलमडून पडलेला उद्योजक, महागाईमुळे घरखर्च भागविताना मेटाकुटीला आलेल्या गृहिणी, शिक्षणक्षेत्रातील अनाठायी लुडबूड आणि नसते प्रयोग यामुळे हैराण झालेले शिक्षणक्षेत्र, ढासळलेली कायदा सुव्यवस्था, अशा अनेक कारणांमुळे जनतेच्या मनात शासनकर्त्यांबाबत संताप आणि अविश्वास आहे. पिण्याचे पाणी, रस्ते, वीज अशा मूलभूत समस्यांचा निपटारा करण्यासाठीही जनतेला झगडावे लागते आहे. जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी आता आम्ही आक्रमकपणे रस्त्यावर उतरलो आहोत. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता हा समतेच्या चळवळीतील कार्यकर्ता आहे. सर्वसमावेशक, कल्याणकारी शासनव्यवस्थेचा तो पुरस्कर्ता आहे. राज्यातील जनता विद्यमान राज्यकर्त्यांच्या काळात सुखी नाही, हे उघड सत्य आहे. त्यामुळेच या सरकारच्या विरोधात एल्गार करण्यात पक्षाच्या अगदी शेवटच्या कार्यकर्त्यानेसुद्धा पुढाकार घेतला आहे. या लढ्यात पक्षाची एक कार्यकर्ता म्हणून इतर कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी स्वतः उतरले आहे. जोपर्यंत या राज्यातील जनतेच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलणार नाही, तोपर्यंत हा संघर्ष कायम राहील. 

Web Title: MP Supriya Sule writes about Nationalist Congress Party NCP