‘मिस्टर’ शेफ

‘मिस्टर’ शेफ

कोबीच्या भाजीचा ‘विलंबित’ ख्याल
‘‘से  वानिवृत्त झाल्यावर समाजसेवा करता- जरा स्वयंपाकघरातही लक्ष घाला,’’ असं फर्मान सौभाग्यवतीनं काढलं आणि माझं ‘रिटायर्ड लाइफ’ काय असावं याचीही दिशा ठरवली. तसं तर मी ३०-३५ वर्षांपूर्वीपासून स्वयंपाकघरात थोडी थोडी लुडबूड करत आलो आहे. परंतु, माझ्यापेक्षा पत्नी चांगली सुगरण असल्यानं लग्नानंतर माझे पाककलेचे प्रयोग कमी होत गेले. नोकरी, लेखन, समाजसेवा यांतून वेळही मिळत नव्हता. पण आता सेवानिवृत्त झाल्यावर आणि घरात एकटं राहण्याचे प्रसंग उद्‌भवल्यावर मी माझ्या ‘स्वयंपाकघरातल्या ज्ञानावरची’ धूळ झटकली आणि कंबर कसून कामाला लागलो.

विविध देशांच्या नकाशाच्या आकाराच्या पोळ्यांमधून मी अद्याप बाहेर पडत नाही; पण ‘ग्रहण’ लागण्याचं प्रमाण कमी झालं आहे. वरण-भाताचा कूकर हा माझ्या डाव्या हाताचा मळ आहे, असं मी समजतो. पण अधूनमधून ‘भाताची पेज’ होते आणि मग ‘आपलाच भात आणि आपलाच कूकर’ समजून मी तो स्वाहा करतो. आमटी करणं माझी खासियत आहे; पण मधूनच ती खूप पातळ होते. भाजी करतानाचा माझा प्रयत्न प्रत्येक वेळी काही नवीन भाजीचा प्रकार निर्माण करतो.
परवा तसंच कोबीच्या भाजीचं झालं. त्यापूर्वी एकदा मी कोबीची भाजी कूकरमध्ये फोडणीला टाकून एक शिट्टी देऊन केली. त्यामुळे कोबीचा लगदा झालेला पदार्थ मला खावा लागला होता. त्यामुळं ‘कोबीची भाजी कधी कूकरमध्ये करतात का?’ हा सौभाग्यवतींचा प्रश्‍न कानात दोन दिवस घुमत होता. म्हणून परवा कोबीची भाजी करताना मागचा धडा लक्षात ठेवला. या खेपेला कोबी शिळा झाला होता. त्यामुळे तो न चिरता किसून घ्यायचं ठरवलं. तरीही त्याचा थोडा भाग मला चिरावा लागला. कारण शेवटपर्यंत कोबी किसण्याच्या नादात माझं बोट कापलं गेलं असतं. जेवणारा मी एकटाच होतो. किसलेला/चिरलेला कोबी मला थोडा जास्त वाटला. पण आधीच शिळा झालेला कोबी आता ठेवून कशाला द्यायचा- म्हणून मी तो सर्व फोडणीला टाकला. हरभऱ्याची डाळ पण फोडणीत टाकली. मीठ, तिखट, शेंगदाणे कूट आणि वाटी-दीड वाटी पाणी टाकलं. भाजी मंद गॅसवर शिजू लागली. पंधरा वीस मिनिटांनंतर गॅस बंद केला.

चार-पाच माणसांना पुरेल एवढी भाजी झाली होती. माझा अंदाज चुकला होता. घरात तर मी एकटाच होतो. शिळा झालेला कोबी, न शिजलेली हरभऱ्याची डाळ आणि मीठ कमी असा तो ‘भाजी’नामक पदार्थ मी खाऊ लागलो. दोष कुणाला द्यायचा? ‘कर्ताकरविता’ मीच होतो. ती भाजी खाऊन खाऊन खाणार किती? राहिलेल्या भाजीचं काय करायचं?
कांदा पदार्थाला चव आणतो. पण म्हणून कोबीच्या भाजीत कांदा? मी तर ऐकलंही नव्हतं आणि पाहिलंही नव्हते. पण माझ्या पुढच्या भाजीत चव आणणं गरजेचं होतं. कोणाला विचारावं, तर आपली अक्कल निघणार होती. न शिजलेल्या डाळीसाठी कूकरशिवाय पर्याय नव्हता. सायंकाळी दोन कांदे चिरून मी कूकरमध्ये फोडणी टाकून त्यात ते टाकले. नंतर सकाळची राहिलेली भाजी टाकली. वाटीभर पाणी टाकून कूकरचं झाकण बंद केलं. एकच शिट्टी होऊ दिली.

दिवसभर रूसलेल्या बायकोचा रुसवा काढण्यासाठी तिच्या माहेरच्या माणसांचं कौतुक, साडी अगर दागिना खरेदीचं आश्‍वासन असे सोपस्कार केल्यावर तिचा राग थोडाफार कमी होतो; पण तशी ती घुश्‍श्‍यातच राहते. तद्वत माझ्या कोबीच्या भाजीचं झालं होतं. कूकर, कांदा या प्रयोगानं ती थोडी-फार बरी लागत होती; पण रात्रीचं जेवण होऊन अजून दोन जेवणांसाठी ती शिल्लक राहिलीच!
अन्न टाकून कसं द्यायचं म्हणून मी दुसऱ्या दिवशी पण ती खाल्ली. चार जेवणांत कोबी, कोबी आणि कोबीच! मित्राला ही हकिगत सांगितली. तेव्हा तो म्हणाला, ‘‘कॉलेजला असताना चार वेळा ‘बॉबी’ बघितला होतास ना? तेव्हा ‘बॉबी, बॉबी’... आता ‘कोबी कोबी!’ त्याच्या त्या यमकाला मी हसलो.

पण या प्रकारामुळं मी एक शिकलो, की केवळ भाजीच नव्हे, तर कोणताही पदार्थ कोणतीही गोष्ट, चित्र, मूर्ती, लेख आणि नातेसंबंधसुद्धा एकदा बिघडले, की बिघडतातच. पुन्हा कितीही दुरुस्त करा, सुधारायचा प्रयत्न करा, सांभाळून घ्यायचा प्रयत्न करा; पण ती पहिली गोडी त्यात येत नाही. म्हणून करताना, घडवतानाच विचार करून घडवायला हवे आणि ते ‘प्रमाणातच’ करायला हवे.
- पद्माकर पाठकजी, सातारा

अफलातून शिकरण
मी  साधारण अकरावी किंवा बारावीत असतानाची ही गोष्ट. माझ्या गावाकडचा मामा (जगूमामा) मामीला घेऊन बऱ्याच दिवसांनी आमच्या घरी जेवायला येणार होता. नेमकं त्या दिवशी आईला बरं नव्हतं. तिनं त्या दिवशी कामवाल्या बाईंनाच पोळ्या करायला सांगितल्या. सकाळीच त्या पोळ्या करून निघून गेल्या. इतक्‍या दिवसांनी मामा आलेला! आईला अजिबातच उठवत नव्हतं. मग तिनं बाकीच्या स्वयंपाकाची जबाबदारी माझ्यावर सोपवली. ‘‘तुला कूकर लावता येतो ना? मग कूकर लाव आणि काही तरी गोड करावं लागेल. पण तुला गोड खायची सवय, तू गोड काय बनवायचास आणि कसं बनवायचास?’’ आई बिचारी तिच्या आईपणाच्या धर्माला जागून काळजीत पडली. खरंच की गोड काय बनवायचं? लग्नाच्या जेवणात वीस-पंचवीस जिलेब्या हाणणारा मी. पण खाण्याइतकं बनवणं थोडंच सोपं असतं. मला येणारा एकमेव गोड पदार्थ म्हणजे चहा. शेवटी डोकं खाजवता खाजवता एक शक्कल सुचली. ‘‘आई शिकरण करू का,’’ मी विचारलं. ‘‘अरे खरंच की! शिकरण सोपे असते. शिकरणच बनव...पण जरा लक्ष देऊन बनव.’’

कोपऱ्यावरच्या सोपानरावांच्या दुकानातून मी चांगली दीड-दोन डझन केळी घेतली. शिकरण दूध आणि केळ्यांची करतात, एवढंच माहीत हो. त्यानुसार मी एकीकडं कूकर लावला आणि दुसरीकडं केळी कुस्करून ती एका भांड्यात काढून घेतली. त्यावर दूध ओतलं, दोन-तीन डाव साखर टाकली आणि चढवलं गॅसवर! चांगलं ढवळून रटरट शिजवलं. तेवढ्यात मामा आणि मामी आलेच. जेवणाची वेळ झालेली. त्यामुळं पटकन्‌ हात-पाय धुवून पाटावरच बसले. आईपण अंथरुणावरून उठून जेवायला बसली. आज सगळा स्वयंपाक मी केल्याचं आईनं सांगितल्यावर मामा मोठ्या आनंदानं आणि मामी मोठ्या अचंब्यानं माझ्याकडं बघू लागले. ‘‘अरे वा शिकरण! मला खूप आवडतं, वाढ वाढ पटकन,’’ मामा म्हणाला. मी भराभर सगळ्यांना ‘वाफाळती’ शिकरण वाढायला सुरवात केली. त्या वाफा बघून आई, मामा आणि मामी चाटच पडले. ‘‘अरे शिकरण शिजवलीस की काय?’’- इति आई. ‘‘हो, काय चुकलं का?’’- मी. ‘‘कर्म माझं! अरे शिकरण कुणी शिजवतं का?’’ आई करवादली. ‘‘अगं असू दे, लहान आहे तो. आज आपण ‘ऐतिहासिक पदार्थ’ खाऊयातस’’ मामानं सांभाळून घेतलं. आई पण हसायला लागली. माझ्यावरच्या प्रेमापोटी ती शिजवलेली शिकरण सगळ्यांनी गोड मानून घेतली. मी पुढचं जेवण खजील होऊन खाली मानेनं गिळलं.
- अजय चव्हाण, पुणे.

पिठल्याचं ‘बाळंत’पण
दोन-अडीच वर्षं झाली असतील. सौभाग्यवती बाहेर गेल्या होत्या. सायंकाळी सातपर्यंत येऊन स्वयंपाक करीन, असं सांगून गेल्या होत्या. सातचे आठ झाले, तरी ‘सौं’चा पत्ता नव्हता. शेवटी स्वयंपाकाचा विचार मीच केला आणि पिठलं-भाताच्या तयारीला लागलो. भाताचा कूकर लावला. पिठल्यासाठी कांदा, मिरची, कोथिंबीर सगळ्या गोष्टी कापून घेतल्या. कढईत तेल तापत ठेवलं. मसाल्याचा डबा काढला. तेल तापल्यावर त्यात मोहरी घालायची, हे माहीत होतं; पण त्या डब्यातली मोहरी संपल्याचं दिसलं. चला, मोहरी नाही तर जिरे कढईत टाकू असा विचार केला. पण डब्यात जिरे दिसले नाही. तेल तापायला सुरवात झाली होती. जिरे तेलात टाकणं आवश्‍यक होते. स्वयंपाकघरातलं कपाट उघडलं. एका लहान बाटलीत जिरे दिसले. मनाशीच म्हणालो, ‘वा! जिरे मिळाले. आता पिठलं छान होणार.’ जिरे कढईत टाकले, मिरची-कांदा परतून झाल्यावर पाणी टाकलं. वरून पीठ पेरले. मीठ, कोथिंबीर टाकली. पिठलं तयार झाले. एकीकडं कूकर पण झाला होता.

एवढ्यात पत्नीचं आगमन झालं. मी पिठलं-भात केला, हे सांगितल्यावर तिला आश्‍चर्य वाटलं. जेवायला बसल्यावर पिठल्याची चव घेतल्यावर पत्नी आणि मुलगा एकमेकांकडं बघू लागले. मला वाटलं-दोघंही खूश आहेत. मला शाबासकी मिळणार. पत्नीनं मला विचारलं- ‘‘जिरे कोणत्या बरणीत मिळाले?’’ मी उठून कपाटातून बरणी काढून पत्नीच्या हातात दिली. तिनं बरणी उघडून पाहिली आणि मला म्हणाली, ‘‘अहो, हे जिरे नाहीत. ह्या तर बाळंत शेपा आहेत. तरीच पिठल्याची चव वेगळी लागतीय.’’ जेवण्याच्या कार्यक्रमाऐवजी हसवण्याचाच कार्यक्रम बराच वेळ झाला. अशा तऱ्हेनं बाळंत शेपाची फोडणी घालून पिठलं करणारा मीच एकमेव असेन, असं मला वाटते.
- सुधीर भालेराव, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com