‘मिस्टर’ शेफ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

‘बफ्लाकोटा’ची भाजी

‘बफ्लाकोटा’ची भाजी
पुण्यातल्या टिळक रस्त्यावरच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मी शिक्षक म्हणून कार्यरत असतानाचा हा प्रसंग. माझा नुकताच विवाह झाला होता. माझी पत्नी मला रोज डब्यामध्ये चविष्ट भाजी देत असे. मधल्या सुटीत आम्ही सगळे पुरुष शिक्षक एकत्र डबा खायचो. त्या वेळी शाळेतले वरिष्ठ शिक्षक माझ्यावरच्या प्रेमापोटी माझ्या डब्यातल्या भाजीवर आडवा हात मारत असत. एकदा पत्नी गावाला गेली असल्यामुळं मी स्वतःच भाजी करायचं ठरवलं. मंडईतून आणलेल्या भाजीतून रोज थोडीशी भाजी शिल्लक राहत असे. त्यातूनच मी एक लेकुरवाळी भाजी केली होती. बटाटा, फ्लॉवर, कोबी आणि टोमॅटो यांच्या मिश्रणाला मी ‘बफ्लाकोटा’ हे नाव दिलं. ब्रेड आणि ‘बफ्लाकोटा’ची भाजी यांचा डबा घेऊन मी शाळेत गेलो. भाजी करताना एक गडबड झाली होती. बटाटे कच्चे राहिले होते, तर टोमॅटोचा लगदा झालेला होता. कोबी आणि फ्लॉवर ही जुळी भावंडं एकमेकांच्या मिठीत विसावली होती. दुपारी डबा खाताना शरद चिंचाळकर, कमलाकर वाकणकर, डॉ. ग. प्र. परांजपे आणि डॉ. दत्ता वाळवेकर या वरिष्ठ शिक्षकांनी एकाच सुरात ‘‘ही कोणती भाजी रे?’’ असं विचारलं. त्यावर मी ‘बफ्लाकोटाची’ असं उत्तर दिलं. भाजी खाताना सगळ्यांचेच चेहरे आंबट झाले होते. नाही तरी त्यात चिंच घातलीच नव्हती. कधी-कधी एखाद्या लग्नसमारंभात वाकणकर सर भेटतात आणि आपुलकीनं विचारतात, ‘‘काय रे बफ्लाकोटा - कसा आहेस?’’ आणि मीसुद्धा ‘मजेत’ हे उत्तर हसत-हसत देत असतो.
- डॉ. श्रीकांत नाडगौडा, पुणे
 
-------------------------------------------------------------------------------------------
पाण्यात तळली भजी

ही  गोष्ट बऱ्याच वर्षांपूर्वीची. मी तेव्हा सहावीत शिकत होतो. माझं गाव संगमनेर तालुक्‍यातलं खंडेरायवाडी. आमच्या गावात तेव्हा लाईटची सोय नव्हती.
माझे कुटुंबीय मळ्यात (शेतात) राहत होते आणि गावातलं घर मोकळंच होतं. आम्हाला त्या वेळी शिक्षकांनी शाळेत रात्री अभ्यासासाठी बोलावलं होतं.
एक दिवस माझे मित्र दिनकर ढेरंगे, शिवाजी वाळुंज, दिलीप मदने, किसन वाळुंज या सर्वांनी पार्टी करायचं ठरवलं. माझ्या घरी कोणी नसल्यामुळं माझ्या घरात जागा ठरवण्यात आली. त्यात भजी करायचं ठरलं. मग आम्ही प्रत्येकी पाच रुपये वर्गणी जमा केली. पंचवीस रुपये जमा झाले. त्यात बेसनपीठ, तेल आणि मसाला विकत घेतला.

हे सगळं साहित्य घेतलं खरं; पण तेल मात्र कमी पडलं. कमी तेलामुळं भजी काही तळली जात नव्हती. कुणाच्या तरी सुपीक डोक्‍यातून कल्पना आली आणि त्यात पाणी टाकलं. पाणी पडताच मोठा भडका उडाला. तो आम्ही विझवला. लगेच शेजारी आले. परंतु, आम्ही चिमणीचा (दिव्याचा) भडका झाल्याचं सांगितलं आणि सारवासारव केली. मग भजींच्या ऐवजी त्याचं पिठलं खाऊन पार्टी झाली. असली पार्टी कधी करायची नाही, असं आम्ही ठरवून टाकलं.
- बाळासाहेब साळुंखे, खोपोली जि. रायगड

-------------------------------------------------------------------------------------------
शंकरपाळ्यांची ‘गोड’ गोष्ट

त   सं मला स्वयंपाकघरामध्ये पत्नी स्वयंपाक करत असताना मध्ये-मध्ये लुडबूड करायची सवय. पत्नी काही नवीन पदार्थ करायला लागली, की ‘हे काय, ते काय, हे कशाला बनवलंस ते कशाला बनवलं,’ वगैरे वगैरे विचारायची मला सवय.
एका रविवारी पत्नी एका नातेवाइकाकडं एक दिवसासाठी सकाळी लवकर गेली होती. माझा मुलगा, मुलगी आणि मी घरी होतो. मुलं मला म्हणाली, ‘‘बाबा, काही तरी गोड पदार्थ बनवा ना! खावंसं वाटतय. लगेच माझ्या डोक्‍यात एक गोड पदार्थ आला. तो म्हणजे शंकरपाळी. मी पुस्तकामध्ये त्याची रेसिपी वाचली होती. मी मुलाला म्हणालो, ‘‘मला मैदा, डालडा-तूप आणि पिठी साखर आणून दे. मी मस्तपैकी शंकरपाळे बनवतो. शंकरपाळी खायला मिळणार म्हटल्यावर मुलगा लगेच जाऊन सामान घेऊन आला. सामान आणल्यानंतर मी शंकरपाळी बनवायला घेतली. एका परातीत मैदा, डालडा तूप आणि पिठी साखर एकत्र करून पिठाचा गोळा तयार केला. गोळा तयार झाल्यावर आठवलं, यात खायचा सोडा घालावा लागतो. नंतर त्या पिठाच्या गोळ्यात सोडा टाकला आणि गोळा थोडा तोडून परत तिंबला. गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला टाकलं आणि पोळपाटावर शंकरपाळ्यांचं पीठ लाटून घेतलं आणि त्यावर सुरीनं उभे-आडवे काप मारून शंकरपाळ्यांच्या आकाराचे तुकडे केले आणि गरम झालेल्या झालेल्या तेलात ते हळुवार सोडले. पण गंमत अशी झाली, की ती शंकरपाळी पूर्ण तेलात विरघळून गेली आणि काळी झाली. असं का झालं, हे मलापण समजलं नाही. मुलगा आणि मुलगी माझी ‘कला’ पाहत होते. त्यांच्याही लक्षात आलं नाही. नंतर मी मुलीला म्हणालो, ‘‘आईला फोन लाव.’’ मुलीनं आईला फोन लावला आणि मी माझी रेसिपी माझ्या पत्नीला सांगितली. ती फोनवर हसायला लागली आणि म्हणाली, ‘‘अहो, त्यात तुम्ही खाण्याचा सोडा प्रमाणापेक्षा जास्त टाकल्यामुळं ती शंकरपाळी पूर्ण विरघळली आणि काळी झाली.’’ माझा मुलगा आणि मुलगी हसायला लागले. असे हे नवीन शंकरपाळे आम्ही गोड पदार्थ म्हणून ‘गोड’ मानून घेतले.
- नंदकुमार सुराणा, पुणे
-------------------------------------------------------------------------------------------

Web Title: mr shef article in saptarang